पांढऱ्या शुभ्र हत्तींचा
रानांतुन कळप निघाला
संपूर्ण गर्द शोकाच्या
झाडांतहि मिसळून गेला.
त्या गुढ उतरत्या मशिदी
पक्ष्यांनी गजबजलेल्या
कल्लोळ पिसांचा उडता
आभाळ लपेटुन बुडल्या.
पांढऱ्या शुभ्र हत्तींनी
मग डोंगर उचलुन धरले
अन् तसें काळजाखालीं
अस्थींचें झुंबर फुटलें.
मावळता रंग पिसाटे
भयभीत उधळलीं हरिणें
मुद्रेवर अटळ कुणाच्या
अश्रूत उतरलीं किरणें.
पांढरे शुभ्र हत्ती मग
अंधारबनांतुन गेले
ते जिथे थांबले होते
ते वृक्ष पांढरे झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा