माय

मायसंगं मीबी तवा,
काडक्या येचाया जायचो.....
माय लाकडांकडं आन,
मी धसपाटं घ्यायचो......

माय माझी हुती गोरी,
उन्हात त्वांड जळालेली....
गरीबीच्या लांड्ग्यामागं,
दमस्तवर पळालेली.....

फ़ाट्क्या तिच्या पदराशी,
लेमण गोळीचा तुकडा....
भुक तिची जाळायसाठी,
संगं र्‍हायचा मिश्रीचा पुडा....

माजी साळा बुडाया नगं,
म्हणून रोज लई राबायची......
कंधी दमलो शाळंत जर,
पोट्र्‍या माह्या दाबायची.....

म्या मेट्रिक केली तवा,
मायचं कातडं लोंबलं...
पण तिचं गोधडी घेणं,
माया काळजाला झोंबलं....

शर्ट-चड्डी घालेल पोर्‍या,
तिनं नीट पाह्यला न्हाई......
पण शिकवुन माला लय,
जायाची व्हती तिला घाई....

दाराम्होरं आजबी ढीग,
वाळेल काडक्यांचा हाय.....
पण चुलीजवळ शेकणारी,
गेली सोडुन लाडकी माय....


कवी - संतोष वाटपाडे(नाशिक)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा