शेवटी

बेगडी तेजाळुनी अंधारतो मी शेवटी
जे जसे आहे तसे स्वीकारतो मी शेवटी

खूपदा परिपक्वतेने वावरावे लागते
येउनी आईपुढे उंडारतो मी शेवटी

अडगळीला फेकतो जागेपणी स्वप्ने जरी
शोधुनी… झोपेत ती साकारतो मी शेवटी

फक्त मुद्देसूदही बोलून कोठे भागते?
लाच मौनाची जगाला चारतो मी शेवटी

फायदा उंचीमुळे झाला कुठे काही मला?
माणसांची छप्परे शाकारतो मी शेवटी

राग माध्यान्ही कुठे सूर्यावरी मी काढतो?
सांजवेळी सावली पिंजारतो मी शेवटी

मान खाली घालुनी बाहेरच्यांना सोसतो
आपल्यांच्यावर घरी फुत्कारतो मी शेवटी

लाभली खोटे खर्‍याला मानणारी माणसे
थाप वैतागून त्यांना मारतो मी शेवटी

तत्ववेत्ते, संत, जेते, शंभरावरती कवी
संपले ते सर्व की आकारतो मी शेवटी

ग्रंथ अभ्यासून जेव्हा ओळही नाही सुचत
आत डोकावून… बाजू सारतो मी शेवटी

एकदा माझ्याघरी येऊन अभ्यासा मला
जिंकतो तो ‘बेफिकिर’ अन हारतो मी शेवटी

- बेफिकीर

भिकार्‍यांचा

वीट आला जरी शिसार्‍यांचा
हात होतो पुढे भिकार्‍यांचा

होत नाहीत जे स्वतःचेही
कोण वाली अशा बिचार्‍यांचा

आज नसतील… काल होते ते
ठेव आदर्श त्या सितार्‍यांचा

राबती जीवने कुणासाठी
कोण साहेब कर्मचार्‍यांचा

शेवटी भेटलीस की तूही
काय उपयोग त्या पहार्‍यांचा

एकदा जीव घाबरा व्हावा
सावजांच्यामुळे शिकार्‍यांचा

एक साधा सजीव होता तो
काय आवाज हा तुतार्‍यांचा

मूक आहेत, मान्य आहे… पण
दोष आहे तुझ्या पुकार्‍यांचा

मी जमाखर्च ठेवला आहे
चोरलेल्या तुझ्या सहार्‍यांचा

आवराआवरी करू दोघे
घोळ आहे तुझ्या पसार्‍यांचा

शेवटी शेवटी मजा आली
लागला नाद त्या शहार्‍यांचा

तोंड माझे कुठे कुठे होते
सोसतो मी जुगार वार्‍यांचा

फक्त आहे तसे नसावे मी
‘बेफिकिर’सा विचार सार्‍यांचा


- बेफिकिर

हे गंधित वारे फिरणारे

हे गंधित वारे फिरणारे
घन झरझर उत्कट झरणारे . . .
हे परिचित सारे पूर्वीचे . . .
तरी आता त्याही पलिकडचे . . .
बघ मनात काही गजबजते . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

कुठल्या देशी नकळत माझे पाऊल पडले रे
सूर रोजचे कसे नव्याने मनास भिडले रे
हे गीत जयाला पंखसुध्दा . . .
अन हवाहवासा डंखसुध्दा . . .
कधि शंकित अन नि:शंकसुध्दा . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

मनात जे जे दडून होते नकळत आकळते
कसे दुज्याच्या स्पर्शाने ‘मीपण’ झगमगते
ही जाणीव अवघी जरतारी . . .
हर श्वासातुन परिमळणारी . . .
हर गात्रातुन तगमगणारी . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

नाव न उरले, गाव न उरले, अवघे ओसरले
बेभानाचे भान जिण्याला बिलगुन बसलेले
हा स्पर्श विजेच्या तारांचा . . .
हा उत्सव बघ अस्वस्थाचा . . .
हा जीव न उरला मोलाचा . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

- संदिप खरे

धाडस

एकदा मेडिकल आणि इंजिनियरिंग कॉलेजच्या प्राचार्यांमध्ये कुणाचे विद्यार्थी जास्त धाडसी आहेत, याबद्दल वाद चालू होता.
मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांनी आपल्या काही विद्यार्थ्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना शार्कचा वावर असलेल्या समुद्रात उड्या मारायला सांगितल्या. 
त्या मुलांनी आपल्या जिवाची पर्वा न करता अतिशय धाडसीपणे उड्या मारल्या. 
मेडिकल कॉलेजचे प्राचार्य : (विजेत्याच्या थाटात) पाहा धाडस !!!

आता इंजिनियरिंग कॉलेजच्या प्राचार्यांनीसुद्धा आपल्या काही विद्यार्थ्यांना बोलावल. त्यांना या समुद्रात उड्या मारायला सांगितल्या. 
विद्यार्थी : पागल है कया साले ? 
प्राचार्य (मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांना) : याला म्हणतात धाडस !!!

ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

अखंड धरती ती
अनंत आकाश मी
आणि अस्पर्ष क्षितिजाची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

न संपणारी रात्र ती
न संपणारा दिवस
मी आणि गर्द आसवांची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

स्वप्नातली राजकुमारी ती
स्वप्नातला राजकुमार मी
आणि खरया अस्तीत्वाची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

जीवनाची राणी ती
मृत्यूचा राजा मी
आणि झुरणाऱ्या जीवांची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

अर्धवट प्रेमिका ती
अर्धवट प्रेमी मी
आणि अर्धवट प्रेम कहाणीची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

दूर कुठेतरीची सुरवात ती
जवळचा अंत मी
आणि दोघांच्या मिलनाची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

ती माणसं निराळीच

हृदय अर्पण करतात
ती माणसं निराळीच असतात

पूर असतो त्यांच्या स्वभावात
किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात
कोसळतात खोल तेव्हा किती उंच जातात

जशी हसतात फुलं, पूर्ण उमलतात,
उधळतात गंध, गळून पडतात
नियतीचा सहज स्विकार हृदय देणारेच करतात

अश्रुंच्या प्रत्येक थेंबातून त्यांची गाणी फुलतात
प्रीतीचे दिव्य किरण त्यांच्यातून नित्य पाझरतात
ज्यांची दारे बंद होतात त्यांनाही आपले हृदय देतात

हृदय अर्पण करतात
ती माणसं निराळीच असतात


कवियत्री - शिरीष पै

आनंदाचे डोही

आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदची अंग आनंदाचे ॥धृ॥

काय सांगू झाले कांहिचिया बाही
पुढे चाले नाही आवडीने ॥१॥

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥२॥

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा
अनुभव सरिसा मुखा आला ॥ ३ ॥

- संत तुकाराम