सांगेल राख माझी

संपूर्ण मी तरू की आहे नगण्य पर्ण
सांगेल राख माझी गेल्यावरी जळून.

खोटी खरी दुधाची होती कशी बिजे ती,
बरसून मेघ जाता येईल 'ते' रुजून.

रानी कुठून आलो? गाऊन काय गेलो?
वेळूत संध्यावेळी येईल ते कळून.

लागे मला कशाची केव्हा कशी तहान :
चर्चा कशास? नाव काठास की अजून.

कोणा फुले दिली मी, माळून कोण गेले?
शेल्यावरी कुणाच्या असतील स्पर्श ऊन?

का ते कशास सांगू मांडून मी दुकान?
शब्दास गंध सारे असतील की जडून.

काठास हा तरू अन विस्तीर्ण दूर पात्र
केव्हातरी पिकून गळणे नगण्य पर्ण.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

प्रणाली..

कणकण झरतो मी मन्द आकाश होतो
अविचल सरणान्च्या दिव्य भासात न्हातो

पळभर हलणारा चन्द्र होतो डहाळी
विहग झुलत तेथे रंग त्याचा गव्हाळी

नयन गड्द माझे द्रुश्य नेती तळाला
मीणमीण पणतीच्या आटवू क घराला..?


कवी - ग्रेस

प्रीत

ही माझी प्रीत निराळी
संध्येचे शामल पाणी
दु: खाच्या दंतकथेला
डोहातून बुडवून आणी

हाताने दान कराया
पोकळीत भरला रंग
तृष्णेचे तीर्थ उचलतो
रतीरंगातील नि: संग

शपथेवर मज आवडती
गाईचे डोळे व्याकूळ
घनगंभीर जलधीचेही
असणार कुठेतरी मूळ

आकाश भाकिते माझी
नक्षत्र ओळ ही दंग
देठास तोडतानाही
रडले न फूलांचे अंग


कवी - ग्रेस

वाटा

माझ्या मनापाशी

चैतन्याचा क्षण

निळी आठवण

बाभळीचे डोळे

डोळ्यांतला काटा

माझा मला वाटा


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश

एक

एक हात तुझा एक हात माझा

जसा शब्द खुजा शब्दापाशी

एका हृदयाला एकच क्षितिज

आकाशाचे बीज तुझ्या पोटी

एका कुशीसाठी एकाचे निजणे

बाकीची सरणे स्मशानात


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश

वाटेपाशी

रात्र थांबवुनी असेच उठावे

तुझ्यापाशी यावे क्षणासाठी!

डोळियांच्या व्हाव्या वेड्या गाठीभेटी

आणि दिठी दिठी शब्द यावे!

तूही थेंब थेंब शब्दापाठी द्यावा

अर्थ ओला व्हावा माझ्यासाठी

आणि उजाडता पाठीवर ओझे

वाटेपाशी तुझे डोळे यावे!


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश

मर्म

ज्याचे त्याने घ्यावे
ओंजळीत पाणी
कुणासाठी कोणी
थांबू नये!
…असे उणे नभ
ज्यात तुझा धर्म
माझे मीही मर्म
स्पर्शू नये


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश