एक आजारी पती रुग्णालयात उपचार घेत असतो.

औषधाच्या जास्त मात्रेमुळे त्याला गाढ झोप लागते.

अचानक झोपेतून जागा होऊन तो म्हणतो, “मी कुठे आहे? स्वर्गात तर नाही ना?”

तेवढ्यात बाजूला बसलेली बायको म्हणते, “नाही ओ. मी अजून आहे तुमच्याबरोबर.”

किशोरी

कुठे चाललीस तू, किशोरी, कुठे चाललीस तू?

कलशाशी कुजबुजले कंकण
‘किणकिण किणकिण रुणझुण रुणझुण’
कुठे चाललीस तू, किशोरी, कुठे चाललीस तू?

चरणगतीत तुझ्या चंचलता
मधुर-रहस्य-भरित आतुरता
कुठे चाललीस तू, किशोरी, कुठे चाललीस तू?

गहन-गूढ-मधुभाव-संगिनी
गहन-तिमिरगत चारुरूपिणी
कुठे चाललीस तू, किशोरी, कुठे चाललीस तू?

अंधारावर झाली भवती
तरलित पदसादांची भरती
कुठे चाललीस तू, किशोरी, कुठे चाललीस तू?

स्वप्नतरल ह्रदयातच या पण
का केलेस सताल पदार्पण
कुठे चाललीस तू, किशोरी, कुठे चाललीस तू?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

व्यवसाय वाढवायचा मार्ग !

तरुण : नमस्कार अबक कॉम्प्यूटर्स ?
पलिकडून : हो, अबक कॉम्प्यूटर्स. बोला काय झालं ?
तरुण : माझा प्रिंटर खराब झाला आहे. तुम्ही दुरुस्त कराल काय ?
फोन : हो, आम्ही करतो. दुरुस्तीचे आम्ही ३०० रुपये घेतो पण तुम्ही अस करा सोबत दिलेल पुस्तक वाचून तो तुम्हीच दुरुस्त करायचा प्रयत्न करा, नाही झाला तर आम्ही करुच.
तरुण : काहो अस केल्याने तुमचा मालक तुम्हाला काढून टाकेल ना कामावरुन. तुम्ही त्याचा धंदा कमी का करता ?
फोन : नाही तस नाही. हे मालकांचच सांगण आहे. तस केल्याने आम्हाला दुरुस्तीचे जास्त पैसे मिळतात.

कधी व्हायचे मीलन?

कुठवर पाहू आता वरी आकाश चांदण्याचे जाले,
आकाश काळे काळे?

काय पाहू आता खाली भूमी प्रस्तर पाषाणी
सागराचे पाणी पाणी?

आसमंत हासे खेळे : भासे निरार्थ पसारा :
जीव झाला वारावारा

सापडेना वाट कोठे : हारवले देहभान
उदासले माळरान

भावनेच्या परागांनी लिहियेली गूढ गाणी
अंतराच्या पानोपानी

आता भागले हे डोळे : भवताली काळी रात :
कुठे पाहू अंधारात?

काय नाही दयामाया? माझे जाळसी जीवन :
कधी व्हायचे मीलन?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ
अजित आणि अमित एकदा Bike वरुन जात होते, आणि समोरुन शांतपणे सरळ जात असलेल्या Premier Padmini चालवत असलेल्या माणसाने अचानक उजवीकडे वळण घेतले,

कुठलाही सिग्नल न देता !!! आणि हे दोघे जाऊन त्याच्यावर धडकले, कुणाला काही लागल नाही पण...

अजित आणि अमित : काय रे,वळवताना सिग्नल देता येत नाही का !!!

तो : काय राव तुम्ही !! अख्खी गाडी वळताना तुम्हाला दिसली नाही ,मग सिग्नल कसा दिसला असता !!!

अजित आणि अमित याव्रर अगदी निरुत्तर झालो..

अनुभव

नन्या : अरे बन्या माझा बॉस रोज रोज मला त्याच्या घरापर्यंत माझ्या स्कूटरवर लिफ्ट मागतो रे. मला कंटाळा आला आहे याचा. काय करु सांगना.

बन्या : तो गाडीवर बसुन काही बोलतो का ?

नन्या : हो , माझ्या चालवण्याच कौतुक करत असतो.

बन्या : त्याने कौतुक केल्यावर त्याला सांग तु रस्ता पार करताना काय करतोस. तो परत लिफ्ट मागणार नाही.

नन्या : काय सांगु ?

बन्या : त्याला सांग रस्ता पार करतांना तु डोळे बंद केलेले असतात व लोकांनी ते बघितले असते म्हणुन अपघात होत नाही. यात तुझे कौशल्य नाही.

या रामपहारी

तू हळूच येतो, चंद्रा माझ्या मागंऽ !
भयभीत अशी मी कुणीच नाही जागं

हे पाठीमागं तुझंच हसरं बिंब
अन समोर माझी पिशी साउली लांब

या समोर गायी उभ्या गावकोसात
हे ढवळे ढवळे ढग वरले हसतात

या रामपहारी गारच आहे वारा
वर कलला हारा : पाझरते जलधारा

मी अधीर झाले : घरी निघाले जाया
ही गारठली रे, कोमल माझी काया!

हे माघामधलं हीव : थरकते अंग
हुरहुर वाटते कुणीच नाही संग

पण हसतो का तू मनात आले पाप?
मी नवती नारी : बघ सुटला थरकाप

अन नकोस हासू चंद्रा माझ्या मागं
भयभीत अशी मी कुणीच नाही जागं


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ