मयसभा राहिली भरुन

मम दृष्टीला भेसुर दिसते भुवन
मयसभा राहिली भरुन।।

जे दिसते असे रुप वस्तुचे वरुन
जे आत न येते दिसुन
मम डोळे हे निशिदिन जाती फसुन
त्यामुळे जात मी खचुन
जे वाटतसे जाउ उराशी लावू
ते बघ प्राण मम घेऊ
दंभ हा जगाचा धर्म
उलटेच जगाचे कर्म
मग मिळेल केवी शर्म
मन्मन होई खिन्न वर्म हे बघुन
मयसभा राहिली भरुन।।

मज ओलावा वरुन मनोहर दिसला
जाताच जीव परि फसला
मद्दग्ध जणु प्राण तिथे मी नेले
येईल टवटवी गमले
मज्जीवन जे म्लान फुलापरि होते
ते तेथे नेले होते
तो आग अधिकची उठली
जीवाची तगमग झाली
वंचना रक्तांची कळली
जे आर्द्र दिसे, टाकि तेच करपवुन
मयसभा राहिली भरुन।।

कुणी मज दिसला दिव्यज्ञानांभोधी
वाटले करिल निर्मळ धी
मज मोक्षाचा दाविल वाटे पंथ
वाटले हरिल हा खंत
नव चक्षु मला देइल हा गुरु गमले
जाऊन चरण मी धरिले
तो गुलामगिरिगुरु ठरला
मज अंधचि करिता झाला
अघपंथ दाविता झाला
मम आशेचे अंकुर गेले जळुन
मयसभा राहिली भरुन।।

जे सुधारले ऐसे वाटत होते
जे भाग्यगिरिवर रमते
जे निजतेजे दिपवित होते डोळे
अभिनव नवसंस्कृतिवाले
जे कैवारी स्वातंत्र्याचे दिसती
जे समत्वगीते गाती
परि जवळ तयांच्या गेलो
तो दचकुन मागे सरलो
वृक व्याघ्र बरे मी वदलो
ते करिति सदा समतादींचा खून
मयसभा राहिली भरुन।।

ते शांतीची सूक्ते गाती ओठी
परि काळकूट ते पोटी
ते एकिकडे तोफा ओतित नविन
परि वरुन शांतीचे गान
ते एकिकडे दास्यी दुनिया नेती
स्वातंत्र्यभक्त म्हणवीती
चराचरा चिरुन इतरगळे
ते स्वतंत्रतेचे पुतळे
उभविती कसे मज न कळे
हा दंभ कसा प्रभुवर करितो सहन
मयसभा राहिली भरुन।।

जे पावन, ते जगती ठरती पतित
परि पतित, पूतसे गणित
यत्स्पर्शाने श्रीशिव होइल पूत
अस्पृश्य ते जगी ठरत
जे आलस्ये दंभे दर्पे भरले
ते स्पृश्य पूज्य परि झाले
दुनियेचा उलटा गाडा
जे सत्य म्हणति ते गाडा
जे थोर म्हणति ते पाडा
हे दंभाला पूजिति धर्मच म्हणुन
मयसभा राहिली भरुन।।

मज दीप गमे आहे तेथे भव्य
दावील पंथ मज दिव्य
त्या दीपाचा पंथ सरळ लक्षून
चाललो धीट होऊन
मज दीप अता दिसेल सुंदर छान
पडतील पदे ना चुकुन
परि तिथे भयद अंधार
ना अंत नसे तो पार
ना पंथ नसे आधार
या अंधारा भजति दीप मानून
मयसभा राहिली भरुन।।

मृदू शीतलसे सुंदर दिसले हार
सर्प ते प्राण घेणार
किति सुंदरशी सुखसरिता ती दिसत
परि आत भोवरे भ्रमत
जे अमृत मला जीवनदायी दिसले
ते गरल मृतिप्रद ठरले
मृगजळे सकळ संसारी
होतसे निराशा भारी
ही किमर्थ धडपड सारी
ते कांचन ना कांत दिसे जे वरुन
मयसभा राहिली भरुन।।

जे जगताला जीवन अंबुद देती
त्यामाजी विजा लखलखती
या जगति जणू जीवनगर्भी मरण
परि देइ जीवनामरण
ज्या मखमाली त्यातच कंटक रुतती
परी कंटक कोमल फुलती
हे कसे सकल निवडावे
परमहंस केवी व्हावे
जलरहित पय कसे प्यावे
हे कोण मला देइल समजावून
मयसभा राहिली भरुन।।

कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, फेब्रुवारी १९३३

खरा धर्म

खरा तो एकची धर्म। जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अति पतित
जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे। जगाला....।।

जयांना कोणी ना जगती
सदा जे अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे। जगाला....।।

समस्ता धीर तो द्यावा
सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे। जगाला....।।

सदा जे आर्त अति विकळ
जयांना गांजिती सकळ
तया जाऊन हसवावे। जगाला....।।

कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे। जगाला....।।

प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे। जगाला....।।

जिथे अंधार औदास्य
जिथे नैराश्य आलस्य
प्रकाशा तेथ नव न्यावे। जगाला....।।

असे जे आपणापाशी
असे जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे। जगाला....।।

भरावा मोद विश्वात
असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे। जगाला....।।

असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्थ प्राणही द्यावे। जगाला....।।

जयाला धर्म तो प्यारा
जयाला देव तो प्यारा!
तयाने प्रेममय व्हावे। जगाला....।।

खरा तो एकची धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

कशासाठी जगावे?

असे का जीवनी अर्थ?
असे रे, जो जगी चिंता
असे, जो आपदा व्याधी
असे, जो दुर्दशाभूता।।

असे, जो गोरगरिबांच्या
न गेले ज्ञान झोपडीत
असे, जो गोरगरिबांची
मुले थंडीत कुडकुडत।।

असे, अज्ञान जो जगती
असे, जो अश्रु या जगती
असे, जो बंधु लाखो हे
उपाशी नित्य रे मरती।।

असे, जो त्रास मत्तांचा
असे, जो राजकी जुलुम
असे, जो दीन दुबळ्यांचा
जगी उच्छेद रे परम।।

असे, जो दु:ख या जगती
असे, जो खिन्नसे वदन
समीप प्रीतिने जाता
हसे जे जेवि ते सुमन।।

असे, जो जाणण्या काही
असे, जो कार्य करण्याला
असे, स्वातंत्र जो जगती
कृतीला आणि रे मतिला।।

असे, जो दुष्ट त्या रुढी
असे, जो जाच धर्माचा
असे, जो घाण सर्वत्र
असे, जो सूर शोकाचा।।

असा हा जीवनी अर्थ
असा हा जीवनी हेतू
विपददु:खाब्धि- तरणाला
जगाला होइ तू सेतू।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, छात्रालय १९२७

जीवनातील दिव्यता

आयुष्याच्या पथावर। सुखा न तोटा खरोखर
दृष्टी असावी मात्र भली। तरिच सापडे सुखस्थली
सुंदर दृष्टी ती ज्याला। जिकडे तिकडे सुख त्याला
आशा ज्याच्या मनामध्ये। श्रद्धाही मंगल नांदे
सदैव सुंदरता त्याला। फुलेच दिसतील दृष्टीला

प्रचंड वादळ उठे जरी। गगन भरे जरि मेघभरी
तरी न आशा त्यागावी। दृष्टी वर निज लावावी
वारं शमतिल, घन वितळे। नभ मग डोकावेल निळे
निशेविना ना येत उषा। असो भरंवसा हा खासा
दयासागर प्रभुराजा। सकलहि जीवांच्या काजा
आयुष्याच्या पथावरी। रत्नांची राशी पसरी
दृष्टी असावी परि विमला। फुलेच दिसतील दृष्टीला

माणिकमोती अमोलिक। होती आपण परि विमुख
संसाराच्या पथावरी। माणिकमोती प्रभु विखरी
मुलावरिल ते प्रेम किती। मातेचे त्या नसे मिती
मायलेकरांचे प्रेम। बहीणभावांचे प्रेम
मित्रामित्रांचे प्रेम। पतिपत्नीचे ते प्रेमे
गुरुशिष्यांचे ते प्रेम। स्वामिसेवकांचे प्रेम
माणिकमोती हीच खरी। डोळे उघडुन पहा तरी

तृषार्तास जरि दिले जल। शीतल पेलाभर विमल
क्षुधार्तास जरि दिला कण। हृदयी प्रेमे विरघळून
ज्ञान असे आपणाजवळ। दिले कुणा जरि ते सढळ
कृतज्ञता त्या सकळांचे। वदनी सुंदर किति नाचे
कृतज्ञतेचे वच वदती। तेच खरे माणिकमोती

कृतज्ञतेसम सुंदरसे। जगात दुसरे काहि नसे
रत्ने अशि ही अमोलिक। मागत आपण परि भीक
आयुष्याचे हे स्थान। माणिकमोत्यांची खाण
रत्नजडित मुकुटाहून। त्रिभुवनसंपत्तीहून
अधिक मोलवान हा खजिना। रिता कधिहि तो होईना
कुणास चोराया ये ना। कुणास पळवाया ये ना
माणिकमोती ही जमवा। जीवन सुंदर हे सजवा
प्रभु- हेतुस पुरवा जगती। करी करोनी शुभा कृती
सत्य मंगला पाहून। संसार करु सुखखाण
हृदयी ठेवु या सुविचारी। विश्व भरु या सुखपूरी
काट्यावरि ना दृष्टी वळो। काटे पाहून मन न जळो
आशा अपुली कधि न ढळो। फुलावरिच ती दृष्टि खिळो
सोडून हा मंगल मार्ग। उगीच पेटविती आग
चिंध्या पाहुन ओरडती। आतिल रत्ना ना बघती
उगीच रडती धडपडती। बोटे मोडिति कडकड ती
रागे खाती दात किती। डोळे फाडुन किति बघती
जीवनपट विसकटवून। सुंदर तंतू तोडून
कशास चिंध्या या म्हणती। खोटी दुनिया ते वदती
असे नसे परि जीवन हे। सुखसरिता मधुरा वाहे
सुखास नाही मुळि तोटा। संसार नसे हा खोटा
दृष्टी करावी निज पूत। निराळेच मग जग दिसत
दिसतील मग माणिकमोती। मिळेल सकळा श्रीमंती
ही श्रीमंती सर्वांना। सदैव देतो प्रभुराणा
तत्त्व असे हे मनि आणा। नांदा मोदे ना गाना।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, छात्रालय १९२८

मित्रांसाठी प्रार्थना

विशुद्ध मत्स्वांत सदैव राहो। विचार चित्तांत पवित्र येवो
न पापसंपर्क मना असावा। न लोभलेश प्रभुजी! दिसावा।।

करी सदा सत्कृति तीच व्हावी। अशी मला उत्सुकता असावी
नको मला मत्स्तुतिलालसा ती। घडो जनांचे हित नित्य हाती’
असे प्रभो प्रार्थियले अनंत। विलोकिसी काय मदीय अंत
न चित्त होई विमल प्रशांत। अधी रमे सतत विश्वकांत।।

न ऐकशी हाक मदीय काय। दयार्द्र तू कोमल देवराय
विमार्गगामी मज बाळकाते। न सत्पथी आणिशि काय होते?।।

जरी अध:पात मदीय व्हावा। सदैव पंकांतच हा रुतावा
अशी त्वदिच्छा जरि ती असेल। कसा तरी बाळ वरी चढेल?।।

तुझ्या मतीच्या नच मी विरुद्ध। सहावयास सर्व सदैव सिद्ध
मदर्थ आता न कधी वदेन। बुडेन किंवा प्रभुजी! तरेन।।

मदुद्धृतीचे मज नाहि काही। अता न प्रार्थीन मदर्थ पाही
परी सखे जे मम स्नेहपूर्ण। तदर्थ रात्रंदिन आळवीन।।

जयावरी प्रेम अपार केले। यदर्थ अश्रू नयनांत ठेले
दिले जयाते सगळे मदीय। असे सखे जे मम लोभनीय।।

जयाविना ना मजला विसावा। मनात ज्यांच्याजप म्या करावा
झुरे अहोरात्र यदर्थ जीव। जयावरी जीव जडे मदीय
जयाविणे शून्य उदास वाटे। जयाविणे मानस फार दाटे
जयांवरी जीव मदीय लोल। हिरेच माझे जणु जे अमोल।।

मदीय जे देव धरेवरील। मदीय पूजा मन हे करील
यदीय सौख्य मम सौख्य नांदे। यदीय दु:खे मम जीव फुंदे।।

जयांस आनंद अपार द्यावा। विचार रात्रंदीन हा करावा
यदर्थ हे जीवन अर्पण्याला। कितीकदा हा प्रभु सिद्ध झाला।।

मलाच येवो दुखणे तयांचे। यदर्थ वाटे मज हेच साचे
मला जयांची प्रभुराज सेवा। गमे सुधेचा स्पृहणीय ठेवा।।

प्रसन्नता यत्प्रिदर्शनाने। मनास वाटे न तशी कशाने
बघून ज्या दृष्टि मदीय तप्त। निवे सुखावे मम जीव तप्त।।

बहिश्चर प्राण जणू मदीय। सखे असे जे मम आंतरीय
तया तरी सत्पथि देव ठेवी। अधोगतीला न कधीहि नेई।।

तदुन्नती सतत होत राहो। उदार तच्चित्त पवित्र होवो
कृतार्थ होवोत असोत धन्य। न कोणताही मज काम अन्य।।

अनन्यभावे करितो प्रणाम। प्रभो! करा हा मम पूर्ण काम
मदीय जे मित्र तयां सदैव। करा कृती मागत एकमेव।।

तया दयाळा निज देइ हाता। निवारि आघात बनून माता
तदीय चारित्र्यकळी फुलू दे। तदीय कीर्ति त्रिजगी भरू दे।।

असोत अंतर्बहि रम्यरुप। सखे प्रभो! ठेवि सुखी अमूप
सदा पवित्रा कृती तत्करांनी। घडो न जावोत कधीहि रानी।।

त्वदीय कारुण्यवसंत- वात। सुटो सुहृज्जीवनकाननात
फुलो डुलो, हा मम एक काम। पुरा करावा, रघुवीर राम!।।

जनात होवोत पवित्रनाम। पुरा करा हा जगदीश! काम
नसे मला रे मम जीवनाशा। तयार मी तो मम सर्वनाशा।।

मदर्थ मी प्रार्थिन ते न आता। मदर्थ ना मी नमवीन माथा
मदर्थ ना प्रार्थिन मी कधीही। परी सख्यांच्यास्तव याचना ही।।

प्रभो! सखे जे प्रिय प्रेमधाम। तदर्थ चिंता मज हेच काम
सुखात ठेवी प्रभु ते सदैव। पुन:पुन्हा मागत एकमेव।।

मदर्थ नाहे रडतील डोळे। तदर्थ होतील सदैव ओले
न जीवनाची मम आस माते। सदैव जावोत सखे सुपंथे।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली, सप्टेंबर १९३०

संत

भरो विश्वात आनंद। शांती नांदो चराचरी
म्हणून जळती संत। महात्मे भास्करापरी।।

असो विकास सर्वांचा। हरो दैन्य सरो तम
म्हणून जळती नित्य। महात्मे भास्करासम।।

नसे सौख्य विलासात। त्यात ना राम वाटत
हरावयाला जगत्ताप। तपती संत सतत।।

फळे लागोत मोदाची। लोकांच्या जीवनावरी
म्हणून जळती नित्य। महात्मे भास्करापरी।।

सुखासीन विलासात। पाही मरण तन्मन
मरण्यात तया मौज। जळण्यातच जीवन।।

पेटलेले होमकुंड। संताचे तेवि जीवन
परचिंता सदा त्यांना। करिती प्राण अर्पण।।

राम ना ऐषारामी। राम ना लोळण्यामध्ये
राम तो एका गोष्टीत। परार्थ जळण्यामध्ये।।

परार्थ जळती तारे। रविचंद्रहि तापती
परार्थ पळती वारे। नावेक न विसावती।।

परार्थ जगती मेघ। परार्थ तरु तिष्ठती
परार्थ पर्वत उभे। कदा काळी न बैसती।।

परार्थ सरितासंघ। परार्थ सुमने तृणे
परार्थ फळधान्यादी। परार्थ भवने वने।।

तसेच हे महा संत। परार्थ जळती सदा
तोच त्यांना सदानंद। प्रणाम शत तत्पदा।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, नोव्हेंबर १९३२

मेघासारखे जीवन

काय करावे
मी मेघासम विचरावे।।

तनुवर दु:खाचे कांबळे
चिंता-चपला हृदयी जळे
शांति क्षणभर मज ना मिळे।। काय....।।

कधि सन्मित्रसंगतीमधे
घटकाघटका रमती मुदे
कधि मी फटिंग कोठे उडे।। काय....।।

कधि मी शुभ्र रुप्याच्या परी
कधि सोनेरी वेषा करी
परि ना ओलावा अंतरी।। काय....।।

कधि मी जनमतवा-यासवे
जाऊ देतो मजला जवे
होतो सुज्ञ परी अनुभवे।। काय....।।

कधि किति अधोगती पावतो
थोराथोरांशिहि झगडतो
टपटप अश्रू मग ढाळितो।। काय....।।

कधि मी वरवर किति जातसे
मन हे चिदंबरी रमतसे
इवलेही मालिन्य न दिसे।। काय....।।

कधि मी होतो मुनि जणु मुका
बघतो प्रसन्न प्रभुच्या मुखा
लुटितो अनंत आंतर सुखा।। काय....।।

कधि मी जगा सुपथ दावितो
मोठ्यामोठ्याने गरजतो
हाका मारुन मी शिकवितो।। काय....।।

येते कधि मन ओसंडुन
येतो प्रेमे ओथंबुन
तप्ता शांतवितो वर्षुन।। काय....।।

कधि गगनाहुन गुरु होतसे
कधि बिंदुकले मी बनतसे
ब्रह्मस्वरुप अनुभवितसे।। काय....।।

कधि मी हासतो रडतो कधी
कधि मी पडतो चढतो कधी
कधि कुमती मी परि कधि सुधी।। काय....।।

कधि वाक्पटू केवळ कोरडा
कधि मी भरलेला हो घडा
कधि जनसंगत कधि मी सडा।। काय....।।

ऐशा अनंत करितो कृति
अनुभवितो मी विविध स्थिति
अंती मिळविन परि सदगति।। काय....।।

जीवन यापरि मी नेइन
दिन मी ऐसे मम कंठिन
मजला आणिक ते मार्ग न।। काय....।।

कधि तरि पूर्णत्वा पाहिन
रसमय अंतर्बहि होइन
सेवा करुनी मग राहिन।। काय....।।

गळेन शिणलेली तनु यदा
सिंधुत बुडेल हा बुडबुडा
मिळविन मंगल सच्चित्पदा।। काय....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, छात्रालय १९२६