मेघासारखे जीवन

काय करावे
मी मेघासम विचरावे।।

तनुवर दु:खाचे कांबळे
चिंता-चपला हृदयी जळे
शांति क्षणभर मज ना मिळे।। काय....।।

कधि सन्मित्रसंगतीमधे
घटकाघटका रमती मुदे
कधि मी फटिंग कोठे उडे।। काय....।।

कधि मी शुभ्र रुप्याच्या परी
कधि सोनेरी वेषा करी
परि ना ओलावा अंतरी।। काय....।।

कधि मी जनमतवा-यासवे
जाऊ देतो मजला जवे
होतो सुज्ञ परी अनुभवे।। काय....।।

कधि किति अधोगती पावतो
थोराथोरांशिहि झगडतो
टपटप अश्रू मग ढाळितो।। काय....।।

कधि मी वरवर किति जातसे
मन हे चिदंबरी रमतसे
इवलेही मालिन्य न दिसे।। काय....।।

कधि मी होतो मुनि जणु मुका
बघतो प्रसन्न प्रभुच्या मुखा
लुटितो अनंत आंतर सुखा।। काय....।।

कधि मी जगा सुपथ दावितो
मोठ्यामोठ्याने गरजतो
हाका मारुन मी शिकवितो।। काय....।।

येते कधि मन ओसंडुन
येतो प्रेमे ओथंबुन
तप्ता शांतवितो वर्षुन।। काय....।।

कधि गगनाहुन गुरु होतसे
कधि बिंदुकले मी बनतसे
ब्रह्मस्वरुप अनुभवितसे।। काय....।।

कधि मी हासतो रडतो कधी
कधि मी पडतो चढतो कधी
कधि कुमती मी परि कधि सुधी।। काय....।।

कधि वाक्पटू केवळ कोरडा
कधि मी भरलेला हो घडा
कधि जनसंगत कधि मी सडा।। काय....।।

ऐशा अनंत करितो कृति
अनुभवितो मी विविध स्थिति
अंती मिळविन परि सदगति।। काय....।।

जीवन यापरि मी नेइन
दिन मी ऐसे मम कंठिन
मजला आणिक ते मार्ग न।। काय....।।

कधि तरि पूर्णत्वा पाहिन
रसमय अंतर्बहि होइन
सेवा करुनी मग राहिन।। काय....।।

गळेन शिणलेली तनु यदा
सिंधुत बुडेल हा बुडबुडा
मिळविन मंगल सच्चित्पदा।। काय....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, छात्रालय १९२६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा