नमस्कार

असो तुला देवा माझा सदा नमस्कार
कसा होउ उतराई मी काय बोलु फार।। असो....।।

दिले निळे आकाश तसे चंद्र सूर्य तारे
दिले जीवनाधार असे दिवारात्र वारे
सरसरित्सागर दिधले कितिक तू उदार।। असो....।।

वसुंधरा सुंदर दिधली श्रमामूर्ति माय
हिरवि हिरवि सृष्टी दिधली दृष्टि तृप्त होय
फुले फळे धान्ये देउन चालविशि भार।। असो....।।

माय बाप बंधू भगिनी आप्त सखे स्नेही
दिले प्रेम त्यांचे म्हणुनी सकळ सह्य होई
कृतज्ञता मैत्री प्रीती तू दिलीस थोर।। असो....।।

तसा देह अव्यंग दिला हृदयी दिलेस
बुद्धिची दिली देणगि रे केवि वर्णु तीस
अशा साधनांनी तरि ते दिसो तुझे दार।। असो....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

गाडी धीरे धीरे हाक

गाडी धीरे धीरे हाक।
बाबा धीरे धीरे हाक
धीरे धीरे हाक।। गाडी....।।

बैलांना तू फार न मारी
प्रेमे त्यांना तू चुचकारी
प्रेमाची जी बळकट दोरी
तीने त्यांना राख।। गाडी....।।

हाती परि तद्गती असावी
म्हणुनी वेसण ती घालावी
त्यामना परि ती कळू न द्यावी
टोचावे हळु नाक।। गाडी....।।

ठेवी अपुले प्रसन्न बैल
घाली पाठीवरती झूल
केवळ सोडी परी न सैल
वाटू दे तव धाक।। गाडी....।।

गाडी बाबा मजबुत ठेवी
उत्साहाचे ओंगण देई
मार्गी ती ना मोडुन जावी
धैर्ये पुढती ठाक।। गाडी....।।

सावध राहुन पंथा पाही
असतिल खळगे ठायीठायी
गाडी जाइल खाली पाही
करि न डोळेझाक।। गाडी....।।

अंधारी ना मार्ग दिसेल
गाडी पुढती तुझी घुसेल
असेल दलदल तिथे फसेल
रुतेल बाबा चाक।। गाडी....।।

चाक रुते तरि खांदा देई
निराश मुळि ना चित्ती होई
हृदयी भगवंताला ध्याई
करुणा त्याची भाक।। गाडी....।।

चोरहि येतिल व्याघ्रहि येतिल
बैल बुजोनी तूही भीशिल
भिऊ नको तो स्वामी येइल
मारी त्याला हाक।। गाडी....।।

पथि कंटाळा जरि कधि येई
गोड प्रभुची गाणी गाई
भूक लागली तरि तू खाई
भक्तीचा मधुपाक।। गाडी....।।

संतजनांच्या उपदेशाचा
भगवंताच्या मधु नामाचा
चारा बैला देई साचा
दिसतिल तेजे झाक।। गाडी....।।

मार्ग क्रमिता ऐसा बापा
पावशील ना पापातापा
प्रवास सुखकर होइल सोपा
चिंता सारी टाक।। गाडी....।।

इष्टस्थाना मग तू जाशिल
प्राप्तव्य तुझे तुला मिळेल
सौख्याने मन वोसंडेल
दिव्यानंदा चाख।। गाडी....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

आशानिराशा

पतीत खिन्न अति दु:खी उदासीन
तळमळे जीव जैसा जळावीण मीन।।
कोठे जाऊ कोणा पाहू निराधार बाळ
अश्रूंनी ओले झाले माझे दोन्ही गाल

मदीय हृदयात निराशेचा सूर
अंधार सभोवती भरलासे भेसूर
मनोरथमुकुलांचा माझ्या झाला नाश
तिळभर उरलि नाही मला मुळि आस

आकांक्षा स्वप्ने जणू माझी स्वार्थमूल
म्हणून काय आज पडली खात धूळ
भिकारि जरि केली इतकी मी वणवण
रिकामि झोळी माझी जवळ नाही कण

लाजेने मरतो मी दावु कुणा मुख
या जन्मि नाहि जणु मजलागि सुख
कशाला मी राहु जगि फेकु दे हे प्राण
मनी म्हणे असे तोचि ऐकु येइ गान

अनंत सिंधुमध्ये मिळावा फलक
अपार अंधारात दिसावी झलक
तान्हेल्याला लाभावी पाण्याची चुळुक
घामाघूम झालेल्याला वा-याची झुळुक

तसा मला ऐकु आला शब्द मोठा गोड
दाखवु लागला मला माझ्या सौभाग्याचा मोड
‘विकारांची वासनांची तुझ्या झाली राख
आकांक्षा मनोरथ जे जे झाले खाक

त्यातून तो बघ दिसतो येत आहे वर
आशेचा प्रकाशाचा अंकुर सुंदर
भविष्य बघ तुझा सुंदर उज्ज्वल
निराश नको होऊ सोस थोडी कळ

प्रेमाचे पावित्र्याचे पल्लव फुटतील
सेवेची त्यागाची फुले फुलतील
प्रशांत शांतिची फळे लागतील
तुझ्या मनोवृत्ति मुला मोदे डोलतील

पूस पूस अश्रू सारे हास रे बाळा हास
तुझ्या भविष्याचा बघ येतो गोड वास’
कुणि तरि हृदयात बोले असा सूर
‘हुरहुर नको करु बाळा! जाईल दैन्य दूर’

निराशेतून असे येति आशेचे किरण
आशा जाउन पुन्हा घेरि निराशा भीषण
आशानिराशांच्या अशा लाटांवर मीन
खाली वर होइ तुझा, देवा! दास दीन।। पतीत...


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, मार्च १९३१

ये रे मला तार

ध्येयहीन
कर्महीन
शक्तिहिन दीन
घृतहीन
मतिहीन
पदोपदि शीण।।

मतिमंद
निरानंद
हृदयि दुर्गंध
नाना बंध
नाना छंद
नाही सुखकंद।।

नाही मान
नाही स्थान
मनावर ताण
मनी घाण
जाई प्राण
होई ओढाताण।।

निराधार
हृतसार
झालो भूमिभार
डोळ्यां धार
अनिवार
ये रे मला तार।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, मार्च १९३१

निराधार

फुलापरी
दंवापरी
हळु मदीय मन
विजेपरी
विषापरी
कठोर सारे जन।।

तृषा मला
क्षुधा मला
मदीय कंठ प्राण
कण न मिळे
जळ न मिळे
मजसि मारित बाण।।

नयन झरे
हृदय भरे
कुणाचे पाहु दार
दार लाविती
हाकलुन देती
कुणि न मज आधार।।

अंधार पडे
गगन रडे
वणवण मी करित बाळ
तुझ्या दारी
आलो तारी
करि तू तरि सांभाळ।।

अंगावरुन
हात फिरवून
घे मला जवळ
डोळे पुशी
बोले मशी
प्रेमे दे कवळ।।

अंकि निजव
गीते रिझव
ताप मम सरो
तूहि निष्टुर
होशि जरि दूर
तरि हा दारी मरो।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, मार्च १९३१

दाखव मज अपुले चरण

हे शरणामतजन-करुण! दाखव मज अपुले चरण।।
मी पतंग सूत्रावीण
मी पाखरु पंखावीण
मी मीन जीवनावीण
मज फारच होई शीण।। दाखव....।।

हे प्रबळ वासनावारे
खेळणे करिति मज बा रे
उडविती भ्रमविती जोरे
सांभाळिल तुजविण कोण।। दाखव....।।

मी पापपंकरत कीट
दुर्गंधि मनी ये वीट
होईल हृदय कधि नीट
मज बरवे वाटे मरण।। दाखव....।।

वेढितो घोर अंधार
मजसि ना दिसतसे पार
कोण रे असे आधार
कासाविस होती प्राण।। दाखव....।।

मी तुझी बघतसे वाट
डोळ्यांत अश्रुचे लोट
हृदयात शोक घनदाट
तू माय बाप गुरु जाण।। दाखव....।।

ये करे मला कुरवाळी
मी मूल मला प्रतिपाळी
मी फूल होइ तू माळी
ये येइ करी उद्धरण।। दाखव....।।

घे मांडीवर निज बाळ
प्रेमानं चुंबी गाल
ही इडापिडा तू टाळ
तू मंगल तू अघहरण।। दाखव....।।

हे जीवन होवो सफळ
करि पूर्ण हेतु मम विमल
मम निश्चय राहो अचळ
आदर्श असो आचरण।। दाखव....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, ऑगस्ट १९३०

येवो वसंतवारा

नवजीवन-प्रदाता। चैतन्य ओतणारा
सुकल्यास हासवीता। आला वसंतवारा

आला वसंतवारा। वनदैन्य हारणारा
सुटला सुगंध गोड। भरला दिगंत सारा

रानीवनी बहार। आला फुलांफळास
समृद्धि पाहुनीया। आनंद पाखरांस

वेली तरू रसाने। जातात भरभरोनी
डुलतात नाचतात। नवतेज संचरोनी

फुटतो मुक्या पिकाला। तो कंठ गोड गोड
सजते सुपल्लवांनी। ते शुष्क वृक्ष-खोड

सोत्कंठ गायनाने। पिक नादवीत रान
परिसून ते सहृदय। विसरून जाइ भान

सृष्टीत सर्व येतो। जणु जोम तो नवीन
जे जे वठून गेले। ते ते उठे नटून

सृष्टीत मोद नांदे। सृष्टीत हास्य नांदे
संगात गोड गोड। सृष्टीत सर्व कोंदे

सृष्टीत ये वसंता। परि मन्मनी शिशीर
मम जीवनी वसंत। येण्यास का उशीर

का अंतरी अजून। नैराश्य घोर आहे
का लोचनांमधून। ही अश्रुधार वाहे

अंधार अंतरंगी। भरला असो अलोट
काही सुचे रुचे ना। डोळ्यांत अश्रुलोट

उत्साह लेश नाही। उल्हास अल्प नाही
इवलीहि ना उमेद। झालो हताश पाही

सत्स्फूर्तिचा स्फुलिंग। ना एक जीवनात
मेल्यापरी पडे मी। रडतो सदा मनात

हतशुष्क जीवनाचा। निस्सार जीवनाचा
जरि वीट येइ तरिही। न सुटेच मोह त्याचा

ओसाड जीवनाची। भूमी सदा बघून
वणवेच पेटतात। मनि, जात मी जळून

ओसाड जीवनाचे। पाहून वाळवंट
करपून जीव जाई। येई भरुन कंठ

पाहून जीवनाचा। सारा उजाड भाग
मज येइ भडभडोनी। मज ये मदीय राम

कर्मे अनंत पडली। दिसतात लोचनांते
परि एकही कराया। राया! न शक्ति माते

संसार मायभूचा। सारा धुळीत आज
काही करावयाला। येई मला न काज

हृदयी मदीय भरते। देवा अपार लाज
काहीच हातुनिया। होई न मातृकाज

असुनी जिवंत मेला। जो कर्महीन दीन
मनबुद्धि देह त्याची। ती व्यर्थ, फक्त शीण

या मातृसेवनात। या मातृकामकाजी
वाटे मनातकाया। झिजुदे सदैव माझी

परि जोर ना जराही। संकल्पशक्ति नाही
मनिचे मनी तरंग। जाती जिरून पाही

मम जीवनात देवा। येवो वसंतवारा
गळू देत जीर्ण पर्णे। फुटु दे नवा धुमारा

शिरु देत मनात जोम। शिरु दे मतीत तेज
करण्यास मातृसेवा। उठु देच जेवि वीज

खेळो वसंतवात। मज्जीवनी अखंड
करुदेच मातृसेवा। अश्रांत ती उदंड

असु दे सदा मदीय। मुखपुष्प टवटवीत
असु दे सदा मदीय। हृत्कंज घवघवीत

तोंडावरील तेज। आता कधी न लोपो
आपत्ति आदळोत। अथवा कृतांत कोपो

दृष्टीमध्ये असू दे। नव दिव्य ब्रह्मतेज
वाणीतही वसू दे। माझ्या अमोघ आज

पायांमध्ये असू दे। बळ अद्रि वाकवाया
हातामध्ये असू दे। बळ वज्र ते धराया

हसु दे विशंक जीव। पाहून संकटांना
निश्चित जाउ दे रे। तुडवीत कंटकांना

निर्जीव मी मढे रे। पडलो असे हताश
चढु दे कळा मुखाला। करु दे कृती करांस

हातून अल्प तरि ती। सेवा शुभा घडू दे
न मढ्यापरी पडू दे। चंडोलसा उडू दे

चैतन्यसिंधू तू रे। दे दिव्य जीवनास
जरी मृत्यू तो समोर। विलसी मुखी सुहास्य

संजीवनांबुधी तू। संजीवनास देई
दे स्फूर्ति जळजळीत। नैराश्य दूर नेई

तू एक शक्ति माझी। तू एक तारणारा
जे दीन हीन त्यांची। तू हाक ऐकणारा

हतजीव-जीवनांच्या। रोपास कोण पाळी
तू एक वाढविवी। तूचि प्रबुद्ध माळी

हृदयी बसून माझ्या। फुलवी मदीय बाग
मातापिता सखा तू। गुरु तूच सानुराग

फुलतील वाळवंटे। हसतील शुष्क राने
नटतील भू उजाड। गातील पक्षि गाणे

जरि त्वत्कृपा-वसंत। येईल जीवनात
चंडोलसा उडेन। संस्फूर्त गात गात

त्वत्स्पर्श अमृताचा। मजला मृता मिळू दे
मम रोमरोमि रामा। चैतन्य संचारु दे

आता सदा दयेचा। सुटु दे वसंतवारा
फुलु देच जीवनाचा। जगदीश भाग सारा


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४