गाडी धीरे धीरे हाक

गाडी धीरे धीरे हाक।
बाबा धीरे धीरे हाक
धीरे धीरे हाक।। गाडी....।।

बैलांना तू फार न मारी
प्रेमे त्यांना तू चुचकारी
प्रेमाची जी बळकट दोरी
तीने त्यांना राख।। गाडी....।।

हाती परि तद्गती असावी
म्हणुनी वेसण ती घालावी
त्यामना परि ती कळू न द्यावी
टोचावे हळु नाक।। गाडी....।।

ठेवी अपुले प्रसन्न बैल
घाली पाठीवरती झूल
केवळ सोडी परी न सैल
वाटू दे तव धाक।। गाडी....।।

गाडी बाबा मजबुत ठेवी
उत्साहाचे ओंगण देई
मार्गी ती ना मोडुन जावी
धैर्ये पुढती ठाक।। गाडी....।।

सावध राहुन पंथा पाही
असतिल खळगे ठायीठायी
गाडी जाइल खाली पाही
करि न डोळेझाक।। गाडी....।।

अंधारी ना मार्ग दिसेल
गाडी पुढती तुझी घुसेल
असेल दलदल तिथे फसेल
रुतेल बाबा चाक।। गाडी....।।

चाक रुते तरि खांदा देई
निराश मुळि ना चित्ती होई
हृदयी भगवंताला ध्याई
करुणा त्याची भाक।। गाडी....।।

चोरहि येतिल व्याघ्रहि येतिल
बैल बुजोनी तूही भीशिल
भिऊ नको तो स्वामी येइल
मारी त्याला हाक।। गाडी....।।

पथि कंटाळा जरि कधि येई
गोड प्रभुची गाणी गाई
भूक लागली तरि तू खाई
भक्तीचा मधुपाक।। गाडी....।।

संतजनांच्या उपदेशाचा
भगवंताच्या मधु नामाचा
चारा बैला देई साचा
दिसतिल तेजे झाक।। गाडी....।।

मार्ग क्रमिता ऐसा बापा
पावशील ना पापातापा
प्रवास सुखकर होइल सोपा
चिंता सारी टाक।। गाडी....।।

इष्टस्थाना मग तू जाशिल
प्राप्तव्य तुझे तुला मिळेल
सौख्याने मन वोसंडेल
दिव्यानंदा चाख।। गाडी....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा