स्मृती माझी परि नसे तुला बाई '

मंद अनिलावरि वाहतो सुगंध,

सुवासानें मी होत असें धुंद.

तुझ्या प्रीतीनें ह्रुदय भरुनि जाई,

स्मृती माझी परि नसे तुला बाई !

रोज फुलती गोजिरीं फुलें येथें

खुडुनि त्यांना आणितों मी गृहातें;

गमे ओतावीं सर्व तुझ्या पायीं

स्मृती माझी परि नसे तुला बाई !

निशादेवीचें हास्य जणूं कांत,

खुले जेव्हां चांदणें शुभ्र शांत

ह्रुदय तळ्मळतें--स्मृती तुझी होई,

स्मृती माझी परि नसे तुला बाई !

नील गगनीं चमकती रम्य तारा;

मधुर गुंगीनें देह भरे सारा !

नयन दिसती तव-विध्द जीव होई ;

स्मृती माझी परि नसे तुला बाई !

खिन्न होउनि बागेंत भटकतांना,

गुलाबांचा हो स्पर्श कपोलांना;

ह्रुदय दचके-तनु कंटकिता होई ,

स्मृती माझी परि नसे तुला बाई !

ध्वनी मंजुळ कधिं कर्णपथीं येती

तुझी हांकच जणुं !---गोड पडे भ्रांती.

निराशेनें मम ह्रुदय भग्न होई,

स्मृती माझी परि नसे तुला बाई !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ३ सप्टेंबर १९२४

थांब थांब, बाले आतां

थांब, थांब बाले आतां, ठेव दिलरुब्याला !

सूरसागराच्या लाटा बुडविती जिवाला !

विश्व शांत, रजनी शांत, चांदणेंहि फुललें शांत,

शांतिचेंच घुमतें का हें गीत दिलरुब्यांत ?

दिव्य तुझ्या संगीताची साथ आणि त्यांत !

देहभान सुटलें आतां, ठेव दिलरुब्याला !

ह्रुदयाच्या तारा माझ्या होति एकतान !

एकसुरीं लागुनि गेलें सृष्टिंचेंहि गान !

जीव उडे दिव्यीं करुनी नादमय विमान !

धराखर्ग मिळुनी गेलीं सूर सागराला !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- २४ ऑक्टोबर १९२४

प्रीतिची हूल फुकट ना तरी !

'तूं माझी अन्‌ तुझा मीच,' ही खातर ना जोंवरी,

प्रीतिची हूल फुकट ना तरी !

गालाला पडते खळी मला पाहुनी,

ही नजर पाहते धरणी न्याहाळुनी !

भयभीत प्रीत थरकते लीन लोचनीं,

ऒंठाची थरथरत पाकळी,----बोल गडे, झडकरी !

प्रीतिची हूल फुकट ना तरी !

जिवाजिवाची अभंग जडली जोड असे ही जरी,

भिति मग कोणाची अंतरीं ?

ही गांठ भिडेची तांत गळ्या लाविल ;

हिरव्याचीं पिवळीं पानें हीं होतिल !

प्रीतिच्या फुलाचा वास उडुन जाइल ;

फसाल पुरत्या, बसाल गाळित घळ्घळ अश्रू-झरी !

प्रीतिची हूल फुकट ना तरी !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

३१ डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र

 रातकाळची पसरे शांती,

मुलें माणसें स्वस्थ घोरती;

धूम्रदीप रस्त्यांत तेवतो;

फ़िकट पांढरी दीप्ति पसरितो.

मध्यरात्रिचा निर्जन रस्ता,

प्रकाशांत त्या वितरि विकटता.

दचकचुनी तों-बारा ठणठण

घडयाळ साङ्गे स्पष्ट वाजवुन,

" वर्षाची या सरती घटिका,

पहा,चालली सोडुनि लोकां !"

वर्ष बिचारें गेलें, गेलें

करपलों जणूं वियोगानलें !

अन्त:करणीं ये कालवुनी,

विषादतमिं मी गेलों बुडुनी !

अगणित वर्षे आली गेलीं,

कितीक लोकें जन्मा आलीं;

हंसली, रडली, म्हुनी गेलीं,

'उदो' 'उदो' हो त्या त्या कालीं ,

स्मृतिहि न त्या अमरांची उरली !

आजहि अगणित जगती मरती,

त्यांत कुणी अजरामर होती !

किति अमरत्वा परि पचवोनी,

काळ बसे हा ' आ ' वासोनी !

उदास असले विचार येती,

लाज परी मज वाटे चित्ती.

असेल काळाहाती मरणें,

परी आमुच्या हाती जगणें !

कां नच मग वीरोचित जगणें,

अभिमानाने हांसत मरणे ?

विचार असले जो मनिं आले,

अंत:करणहि पार निवळलें,

दिव्य कांहि तरि मनि आठवुनी,

झोंपी गेलों अश्रू पुसुनी.


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

नावात काय आहे ?

का आग्रह ? रसिका ! नाव सांग मज म्हणसी ?

नावात मोहिनी भासो सामान्यासी !

घननीलमणिप्रासादचंद्रशालांत,

ते असंख्य सुंदर तारे चम्‌चम्‌तात,

अनिवार इंद्रजालाते-टाकिती,

वसुधेस मंत्रमुग्धते-भ्रमविती,

संगूढ नेत्रसंकेते-वाहती,

हे विलास हरिती वस्तुजातह्रदयासी,

वद ! त्यांची नावे काय पुसाया जाशी ?

तरुलता प्रसूनान्विता राहती रानी,

संपूर्ण भारिती वनश्रेणी गंधांनी,

ह्या प्रमदवनांतरि शिरले-जे जन,

तरुलताचि अंगे झाले-आपण,

निज नामरूपही गेले-विसरुन,

आनंदसमीरण डोल देतसे त्यांसी,

टपटपा पडति खालती लूट कुसुमांसी !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

कविनंदन

कविजनसंस्तुत काव्यदेवते वंदन तव पायी
क्षराक्षराचे जननी, व्यक्त प्रणवाचे आई !

’बालकवीचा’ जीवननिर्झर जाता ओसरुनी
दूर्वांकुरपुष्पांची त्यावर चादर पसरूनी,

चंदेरी दरियाचे काठी प्रेमप्रळयात,
निजल्या ’रामा’ अक्षयतेच्या वेष्टुनि शेल्यात,

ह्या दोघा रस-रंगा घेउनि अंतर्हित होशी
कोठे ? मागे टाकुनि उघडा कविजन परदेशी.

जाशी का तू पडली पाहुनि तख्ते दोन रिती
चिरंतनाच्या निर्झरिणीवरि पैलाडापरती ?

शाश्वतेचे भरूनि पाणी आणावा कलश
कुणा भाग्यवंताचे तेणे न्हाणावे शीर्ष,

अम्लान प्रतिभेची अद्वय लेणी लेववुनी
स्वानंदाचे लगबग उतरुनि लिंबलोण वरुनी,

दोन्ही सिंहासनी तया एकाते बसवावे
प्रयाण करिती झालिस का तू देवी या भावे ?

कविजनसंस्तुत काव्यदेवि ये परतुनि लवलाही
मुग्धमधुर वसुधा ग ! सारखी वाट तुझी पाही !

आधुनिकांचे कविते बाई ! अझुनी तुजवरचा
रोष न सरता होई काही विद्वद्वर्यांचा.

नूतन चालीरीती नूतन भूषावेषांना
भावाविष्करणाच्या नूतन घेशी धाटींना.

बाळपणे तू उथळ जराशी, अल्लड वृत्तीची,
सौंदर्याची अस्फुट अंगे कोर्‍या रंगाची,

लाजेच्या सांजेचा नाही मुखमंडळि मेळ
अवगत नाही अझुनि चोरटा नेत्रांचा खेळ,

नटचंचल बावरा झडे फुलछडीचा न नाच
जाणपणाची अझुनि लागली नच मंदहि आच,

कोमल कलिकेमधली अस्फुट मधुसौरभसृष्टी
बादलछायेआडिल किंवा चंद्राची दृष्टी,

अथवा, दृष्टीपुढची अस्थिरसृष्टी बाळाची
लाट जणो तू स्वर्भूःसरितासंगमलीलेची.

प्रौढ कलाढ्यत्वाचे वारे अंगि न जरि वाजे
मुग्धदशेची चंचलता तुज कुलजेते साजे.

कारकसंधीरूपे व्याकरणातिल सूक्ष्मतर
रसरीत्यादिक साहित्यांतिल दगडांचा चूर,

बूझ कशी या नियमे व्हावी तव माधुर्याची,
अगाध लावण्याची, निस्तुळ रूपारीतीची ?

ह्रस्वदीर्घवेलांटीमात्राशास्त्री जी घेती
जुनी मापकोष्टके जराशी बाजुस सारा ती.

होता केव्हा, काही, किंचित्‌, संप्रदायभंग
रंगाचा बेरंग काय हा अथवा बेढंग ?

कवितेच्या साम्राज्यामधली ही का बंडाळी
तेणे होते काहो त्याची राखरांगोळी ?

शुद्ध मराठी धाटी साधो कोणा अथवा न
गीर्वाणप्रचुरा रचना ती केव्हाही हीन.

शब्दरूपसंपदा ’रांगडी’ वाळावी म्हणुनी,
’रांगड’ अथवा ’नागर’ हे तरि ठरवावे कोणी ?

संस्कृतभाषानियमांची का तुजवरि बळजोरी
स्वतंत्र अस्तित्व न तुजला की झाली वाढ पुरी ?

नागर कुल तव, नागर लोकी सारा व्यवहार,
नागर वाङ्मयदेशी सतत करिशी संचार.

इथुन आणखी तिथुनि आणिशी रत्‍नांचे हार
समृद्ध आम्हाकरिता करिशी भाषाभांडार

बिंदु बिंदु रक्ताचा, कण कण देहाचा, उमले,
विकास सौंदर्याचा र्‍हासानासाविण चाले !

अथांग अव्यक्तांतुनि होशी निजलीला व्यक्त
तुझे तूच निर्मिशी प्रसाधनशासन अभियुक्त.

मृगजळ पाणी भरुनि रांजणी पढिका फुंजू दे
सौंदर्याच्या कुंजी आम्हा रुंजी घालू दे.

कविजनसंस्तुत काव्यदेवि ये परतुनि लवलाही
मुग्धमधुर वसुधा ग ! सारखी वाट तुझी पाही

काव्य नव्हे शब्दांचा सुंदर नादमधुर मेळ
अर्थचमत्कृतिचाही नोहे डोंबारी खेळ.

निसर्गसृष्टीची सादृश्ये, नीतिपाठ भव्य,
थाटदार घाटाची रचना केवळ नच काव्य.

ऐश्वर्यात्मक सामर्थ्याची निर्माणक्षमता
अंतरंग ओथंबुन ओसंडे ती ’सुंदरता’

केवळ सौंदर्याची स्फुरणे प्रस्फुरणे दिव्य
जिव्हार हेच स्वानंदाचे. -’सौंदर्यचि’ काव्य.

या सौंदर्यस्फुरणा म्हणती ’चैतन्य-स्फूर्ती-
प्रसाद-भगवंताचे देणे-नैसर्गिक शक्ती’.

देवी शारदा हीच. न हे स्थल अभ्यासा साध्य
लोकोत्तर काव्याचे हेचि प्रसवस्थल आद्य.

यास्तव कविजन अहंभाव सोडोनी संपूर्ण
प्रसादसिद्धीसाठी पहिले करिती तुज नमन.

देवि ! जशी तू, तसे तुझे ते भक्तहि, मज पूज्य
वंदन माझे गतास, त्यासहि असती जे आज.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

प्रणयपत्रिका

प्रणति मम सख्याच्या पूज्य पादद्वयासी,
विजय सतत चिंती आपुली लीन दासी.

कितिक दिवस झाले ! आपले पत्र नाही
म्हणुनि बहुत चिंताग्रस्तचित्ता असे ही

सकल कुशल आहो श्रीहरीच्या दयेने,
किमपिहि न करावी काळजी मत्प्रयाने.

परि मम मन आहे खिन्न अत्यंत बाई !
कुशल कळविणारे पत्र ते कान येई?

किति तरि दिन झाले ! भेट नाही पदांची,
करमत मज नाही; वेळ वाटे युगाची.

सुखकर सखया ती आपली रम्य मूर्ती
निशिदिनि दिसताहे पूर्ण साठूनि चित्ती

क्षणभर अपुल्या मी दृष्टीच्या आड होता
करमत नव्हते ना आपल्या होर चित्ता ?

विविध मिष करावे काम काही करिता
मजविण मग कैसा कंठिता काळ आता ?

दिनभरि सरकारी काम सारूनि येता
लगबग गृहभागी भागले, सांज होता

कवण तरि प्रतीक्षा सेर्ष्य दारी करील
श्रम मधुर विनोदे कोण सारा हरील ?

मदितर असताना जेवता वाढण्याला
खचित, खचित गेला घास ना आपणाला ?

निरलस दिनरात्री आपणाला जपाया
नच जवळ कुणीही काळजी योग्य घ्याया.

रजनिसमय येता झोप घ्यावीत भारी
परि कर नसताना आपुल्या त्या शरीरी

दचकुनि किति वेळा नित्य तुम्ही उठावे
गति कशि अपुली हो संप्रती, हे न ठावे.

प्रकृति कितितरी ती सत्य नाजुक आहे
विरम मम तुम्हाला, जाणते मी, न साहे

सुतनु अमित बाई ! क्षीण झाली असेल
मजसम अपणाला ध्यास माझा असेल.

तरल मन नराचे राहते ऐकते मी
विसर बघुनि पावे अन्य पात्रास नामी.

कमलिनि भ्रमराला नित्य कोशात ठेवी
अविरत म्हणुनी तो पंकज प्रेम दावी.

विसर पडुनि गेला काय माझाही नाथा ?
म्हणुनिच धरिले हे वाटते मौन आता

सदय, पण, सख्याच्या मानसा पूर्ण जाणे
तिळभर असली ही कल्पना व्यर्थ घेणे !

मम विरह तुम्हाला जागवी शीण देई
स्थिति जरि असली का आपुली सत्य होई

तरि मग मज आहे इष्ट ही गोष्ट साच
सतत छळ सख्याचा हो मदर्थी असाच

जपुनि सतत वागा. काळ्जी सर्व सोडा.
प्रणय मजवरीच आपुला होन थोडा.

लिहुनि सकल धाडा वृत्त सोडूनि काम.
बहुत नच लिहिणे, हा मदीय प्रणाम.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ