झाडे सत्तेवर आली की

माणसे
निरपराध झाडांवर प्राणांतिक हल्ले करतात
त्यांचे हात्पाय तोडून त्यांना
बेमुर्वतखोरपणे
उघ्ड्यावर रचून ठेवतात...
माणसांच्या राज्यात हे असेच चालायचे

उद्या झाडे सत्तेवर आली की तीही
तोड्लेल्या माणसांची हाडे
अशीच उघ्ड्यावर रचून ठ्वतील;
व्रुक्षकुळातील कुणी मेला तर
माणसांच सर्पण म्हणून उपयोगही करतील
फिरून माणसांचे राज्य येण्यापूर्वी
खुनाच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्याची कला
झाडेही आत्मसात करतील...
फक्त एकदा
त्यांचे राज्य आले पाहिजे


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह -प्राक्तनाचे संदर्भ

वही मोकळी करताना

कवितेची वहि गच्च भरून गेल्ये:
आता पाने सुटि करून मोकळे करायला हवीत...
काही अशी वार्यावर सोडून द्यावित
ज्यांची दूर विजनवासात गाणी होतील
काही नदीत सोडावीत
म्हणजे शब्द नव्याने वाहू लागतील
काही पाखरांना द्यावीत
त्यांचा सूर्य बुडतानाचा कोलाहल
त्यांनाच परत केल्यासारखी
काही ढगांवर डकवावीत
जी दीशा ओलांडताना
आपोआपच रुपांतरीत होतील...

नंतर
ज्यांची दूर विजनवासात गाणी होणार नाहीत
जी नाकारतील वाहणे नव्याने
ज्यांचा कुठल्याही कोलाहलाशी संबंध नाही
ज्यांना देशाच्या सीमा ओलांडायचा नाहीत
अशी काही पाने उरतीलच; ती सर्व
कुठल्याहि झाडाचा तळाशी ठेवावीत:
तुम्हीच झाडांचे बहर आहात.असे
मीच त्यंना कितीदा सांगितलेले आहे


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह -प्राक्तनाचे संदर्भ

कुंती

प्रत्येकीलाच राहतो गर्भ कौमार्यावस्थेत,
अवांछीत नपुसक राद्न्यिपदापूर्वि;
फरक इतकाच की तिची ताकद होती
एक प्रतिसुर्य वाढवण्याची,
गंगेत सोडून देण्याची निर्मम
जी प्रत्येकीची नसते.
हिरण्यगर्भ पोसावा
इतकी जबरदस्त कूस कुणाची आहे?
म्हणून तर हे असंख्य, निरपराध गर्भपात
दिशा लाल लाल करणारे सकाळ-संध्याकाळ...
म्हणून तर ही वस्त्रहरणे दिवसांची,
उलटे फासे नियतीचे परत परत,
वनवास विराट अद्न्यातघरचे,
फजीत करणारे मायावी इंद्रप्रस्थ,
मुल्यांची अणुभट्टीच असे युध्दाचे प्रसंग
आपल्याशीच,
आणि स्वर्गाच्या फक्त प्रवेशद्वारापाशीचे मरण-
मग सारेच संपते ते...


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह -प्राक्तनाचे संदर्भ

हस्तांतर

विसर्जनासाठी गणपती नेताना
मला मूर्ती अवजड झाली, तेंव्हा
उसळत्या तारुण्याचा
माझा मुलगा मला म्हणाला: द्या इकडे

मी मूर्ती तात्काळ मुलाचा हातावर ठेवली
चौरंगासहित
मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून,तर
मी एका दैवी आनंदात अकल्पित
परंपरा पुढे सरकल्याचा....

मी पुन्हा तरूण ययातिसरखा;
माझा मुलगा जख्ख म्हातारा
परंपरेचा ओझ्याने वाकलेला...


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह -प्राक्तनाचे संदर्भ

कंदील विकणारी मुले

उत्साहाने घरचा कंदील करण्याचा वयात त्यांना
परोपरीने सजवून विकणारी ही मुले या
दिवाळीची खरेदी केरीत हिंडणार्या
श्रिमंत गर्दीची कुणीच लागत नाहीत..
त्यांचे खांदान मुळातच वेगळे
ती आली आहेत उपासमारीचा अर्धपोटी संसारातून
किंवा संप-टाळेबंदीत हकनाक
देशोधडीला लागलेल्या कुटुंबातून,
किंवा कर्त्याच्या अपमृत्युने
छप्पर उडालेल्या घरामधून;किंवा
आपल्याच आईने नवा यार शोधल्यावर
जमलेल्या अवघ्या नामुष्कीच्या अंधारतून...
थोडक्यात म्हणजे, कायमची
रात्र असलेल्या प्रदेशातील ही अभागी मुले...
त्यांना आहे एकदम मान्य तुमचा
सर्वाधीकार प्रकाशावरचा; म्हणून तर ती
तुमचाच प्रकाश अधीक वैभवशाली दिसावा यासाठी
काठ्यांना रंगीबेरंगी आकाशकंदील अडकवून
भर बाजारात
तुमचीच वाट पहात उभी आहेत


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह - बरेच काही उगवून आलेले

घर

माझी मुलगी सकाळीच
जागा शोधण्यासाठी बाहेर पडते
त्याचाबरोबर नवे घरकूल थाटायचे आहे..

ती उशिरा परत येते तेंव्हा आत माझे
जेवण चाललेले. मी कमालीच उत्सुक
ती आत यावी म्हणून;तर ती
बाहेरच कितीतरी वेळ-
हिला, बहिणीला जागेविषयी सांगत रहिलेली
तिचा आवाज इअतक्या दुरुनही
जाणवतो आहे बराचसा विकल आणि
सारे पर्युत्सुक प्रश्न, त्यांना न कळत तिला
सतावीत रहिलेले..

माझे जेवण होते तेंव्हा
कोलाहल केंव्हाच संपलेला; म्हणून मी
बाहेरचा खोलीत डोकवतो तर
माझी मुलगी पूर्ण थकलेली
कपडे न बदलताच सोफ्यावर
भिंतीकडे तोंड करून निजलेली
मी पुन्हा निरखून पहातो तर
मुलगी नसतेच; असते कुणी
प्रौढ स्त्री डोळे मीटून
पराभूतशी पडलेली.तिचा कपाळावर
ओळीमागून ओळी आखलेल्या सुस्पष्ट
ज्याचावर घर नावाचा म्रुगजळाविषयीचे
काही सुरवातीचे निष्कर्ष अक्षरश:
रक्ताचा पाण्याने लिहिलेले...


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह - बरेच काही उगवून आलेले

समुद्राविषयी

१.
सर्व नद्या, इच्छा असो-नसो,
समुद्राला मिळतात. त्यांच्या
निमुट आसवांनी सारा समुद्रच
खारट करून टाकलेला.

२.
समुद्र आपल्यासारखाच : दुःखी.
त्याच्या विव्हळण्याचा
समुद्रगर्जना म्हणून प्रथम
कुणी अधिक्षेप केला?
आवेगाने किनार्‍यापर्यंत
वाहत आलेल्या त्याच्या अश्रूंना
भरती कुणी म्हटले आणि
डोळ्यात जमणारे पाणी मागे
खेचणार्‍या निग्रहाला ओहोटी?


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह - बरेच काही उगवून आलेले