कंदील विकणारी मुले

उत्साहाने घरचा कंदील करण्याचा वयात त्यांना
परोपरीने सजवून विकणारी ही मुले या
दिवाळीची खरेदी केरीत हिंडणार्या
श्रिमंत गर्दीची कुणीच लागत नाहीत..
त्यांचे खांदान मुळातच वेगळे
ती आली आहेत उपासमारीचा अर्धपोटी संसारातून
किंवा संप-टाळेबंदीत हकनाक
देशोधडीला लागलेल्या कुटुंबातून,
किंवा कर्त्याच्या अपमृत्युने
छप्पर उडालेल्या घरामधून;किंवा
आपल्याच आईने नवा यार शोधल्यावर
जमलेल्या अवघ्या नामुष्कीच्या अंधारतून...
थोडक्यात म्हणजे, कायमची
रात्र असलेल्या प्रदेशातील ही अभागी मुले...
त्यांना आहे एकदम मान्य तुमचा
सर्वाधीकार प्रकाशावरचा; म्हणून तर ती
तुमचाच प्रकाश अधीक वैभवशाली दिसावा यासाठी
काठ्यांना रंगीबेरंगी आकाशकंदील अडकवून
भर बाजारात
तुमचीच वाट पहात उभी आहेत


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह - बरेच काही उगवून आलेले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा