शब्दांनो ! मागुते या !

तेजाचे पंख वार्‍यावरि हलवित ती चालली शब्दपंक्ति,
देव्हांहीं चित्तभूमी विकसित हिरवी तों मदीया बघूनी,
देव्हारा माझिया तो उतरुनि ह्र्दयीं स्थापिला गौरवूनी.

शब्दांसंगें तदा मीं निजह्रदयवनामाजीं संचार केला,
तेथें मी कल्पपुष्पें खुडुनि नमुनि तीं वाहिलीं शारदेला,
शब्दांच्या कूजितानें सहजचि मम ह्रत्प्रान्त गुंगूनि गेला;
मीं त्या स्वप्नांत गद्यग्रथित जग मुळीं लोटिलें तुच्छतेला !

रागानें या जगानें अहह ! म्हणुनियां शापिलें या जनाला,
तेणें चित्ताग्नि माझी ह्रदय हरितता नाशिता फार झाला;
गाणारे शब्द सारे झडकरि उडुनी दूर देशास गेले,
वाग्देवीपीठ येथें परि मम ह्रदयीं दिव्य तें राहियेलें.

वाग्देवी शारदे गे ! फिरवुनि अपुले शब्द पाचार येथें !
साहाय्यावीण त्यांच्या भजन तव कसें सांग साधेल मातें ?
आशामेघालि चिन्तानल अजि विझवूं जाहलीसे तपार,
शब्दांनो ! मागृते या ! बहर मम मनीं नूत्न येईल फार !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- स्त्रग्धरा
- १५ सप्टेंबर १८९२

दिव्य ठिणगी

या लोकीं बघुनी कभिन्न सगळा अंधार कोंदाटला,
सारावा दूरि तो जरातरि, असा हेतू मनें घेतला;
स्फूतींचें अवलम्बुनी म्हणुनियां मी यान तें उद्धर.
तेजाच्या उगमाकडेस सहसा तै चाललों सत्वर

एका सुन्दर वेदिकेजवळ मी जाऊनियां पोंचलों,
ज्वाला दिव्य चिरन्तनी बघुनि त्या वेदीवरी, थांबलों,
ती ज्वाला नव्हती निजद्युतिमधीं छाया मुळीं पाडित.
त्या ज्वालेपुढती तपश्चरण तें मी वांकलों साधित.

ज्वालेनें रमणीय एक ठिणगी माझ्याकडे घाडिली,
ती मीं आपुलिया उदास ह्रदयीं सानन्द हो स्थापिली;
पृथ्वीनें मज आणण्यास वरतीं होतें जिला घाडिलें.
प्रीतीनें मग त्या फिरूनि मज या लोकामधीं आणिलें.

तेथे येउनि पोंचतां, बलि दिला ज्वालेस त्या मीं किती,
तें मातें कळलें पुरें---परि तुम्हां त्याची कशाला मिती ? ---
ज्याला मी मुकलीं विषाद मजला त्याचा मुळींही नसे,
जें पृथ्वीवर आणिलें जन तया धिक्कारिती हा ! कसे !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- दादर, २७ ऑगस्ट १८९०

सृष्टि, तत्त्व आणि दिव्यद्दष्टि

तारा निष्प्रभ जाहल्या निजपथीं, प्राची दिशा रंगली,
गायाला खग लागले, मधुर निश्वासूं फुलें लागलीं,
प्रावारून उषा तुषारपटला सूर्यंप्रतीक्षा करी; ---
होतों पाहत डोंगरीवरि उभा मोहूनि मी अंतरीं.

‘ पश्यात्रास्मि ’ म्हणोनि एक घुमला गम्भीर तेथें ध्वनि,
‘ भो ! कुत्रासि ? ’ विचारलें निजमुखें तेव्हां तयालागुनी,
‘ कुत्राप्यस्मि च सर्ववस्तुषु ’ असें ये तेधवां उत्तर;
तें ऐकूनि जरा करीत मनना मी ठाकलों नन्तर.

धोंडा एक समीप हो पडुनियां होता तिथें, त्यावरी
गेली दृष्टि मदीय, कौतुक तधीं झालें मनाभीतरीं,
कांकीं त्या ध्वनिचें खरेंपण मला धोंडयांत त्या भासलें;
काढूं बाहिर तें झटूनि, मग हें चित्तांत मी घेतलें,

टांकींचे, म्हणुनी, तयांवरि जधीं आघात मीं वोपिले,
तों-सांगूं म्हणुनी किती मज मनीं आश्चर्य जें जाहलें ! ---
मूर्ति दिव्य अशी अहा ! उतरली धोंडयामधूनी भली !
माझी दृष्टि असे अलौकिक, मला जाणीव ही जाहिली.


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित 
- खेड, २८ मार्च १८९०

प्रतिभा

ती अत्यद्‍भुत गूढ शक्ति सहसा संचारतां अंतरीं,
मुक्तात्मा गगनीं उडे, बिथरतो इन्द्राश्व तें पाहुनी;
दैत्यांचे बल देवसत्त्वहि तसें अंगीं चढे त्या क्षणीं ;
सायुज्यत्व विराट पूरूष अहा ! देतो स्वयें लौकरी.

स्वान्तीं मण्डल जें हिरण्मय तधीं दिव्य प्रभा विस्तरी,
त्याच्या पाजळिती अरांवरि सुखें देव स्वशस्त्रें जुनीं;
येती दानव मोहुनी दुरुनि जे त्याचेकडे धांवुनी,
ते नाशाप्रत पावती झडकरी तेथें पतंगांपरी !

पिण्डीं जाय विलोपुनी विरुनियां ब्रह्मांड हें सत्वर;
शब्दब्रह्म उचंबळून मग जें दाही दिशा व्यापितें,
त्याच्यांतून भविष्यवाद निघती, ऐकून ते सादर
ब्रहम्यातें क्षमता नवीन---रचना---कार्य---कार्य---क्रमीं लाभते !

देवांची जननी प्रसन्न जर का ही शक्ति कोणावर,
नाहीं यांत विशेष, तुच्छ जग हें त्यालागुनी वाटतें !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- धारवाड, २८ जुलै १९०४

कवि

मज्जेचीं निज जो फुलें पसरितो आयुष्यमार्गावरी,
आहे अद्भुत रम्य का अधिक तें त्याहूनि कांही तरी ?
चाले तो धरणीवरी, तर पहा ! जेथूनि तो चालिला,
धूली तेथिल होतसे कनकिता ! – घेऊं नका भ्रान्तिला.            १

तो गम्भीर वदे रवा, तर, मुक्या पृथ्वीस या वाटतें.
कीं “मातें श्रुति लक्षसंख्य फुटल्या,” आणीक ती ऐकते !
दृष्टी ती फिरवी वरी, तर लवे आकाश तें खालती,
तारांचे गण गावयास वरुनी स्तोत्रें अहा ! लागती !                 २

लीलेनें स्वकरांत तो धरितसे कांडी बरुची जधीं
सा-या सुन्दर वस्तु त्या झडकरी येती समाधीमधीं –
त्याच्या, येउनि त्या तयास वदती “आम्हांस दे भूषणें
दिव्यें, आणि शिकीव लौकरि अम्हा तीं अप्सरोगायनें !”          ३

श्वासोच्छ्वास करी, परी नवल हें :- जीवित्वसंहारक
वायू घेउनि आंत, तो त्यजितसे वायूस त्या पोषक !
राही तो, तर देव भूमीवरतीं येतात हिंडावया,
जातां, स्वर्ग सवें धरेस उतरे त्यालागिं धुडांवया !                 ४


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
वृत्त - शार्दूंलविक्रीडित
- दादर १४ मार्च १८९१

फिर्याद

( चाल-उद्धवा शांतवन कर जा. )

जिनें मला वेडा केलें   तिच्यावरी ही फिर्याद ! ॥ध्रु०॥

ऋतु वसन्त येउनि कुसुमीं   उपवनास शोभा आली;
कुंजीं मीं बसलों एका   हर्षित मम वृत्ती झाली;
आली तों कोणी युवती   त्या स्थळीं रूपगुणखाणी;
चुम्बुनि मज गुणगुणली ती   मधुर गीत माझे कानीं !

तल्लीन सवें झालों,
विकलगात्र होउनि गेलों,
निर्वाणीं पूर्ण बुडालों ---
नुरलीच जगाची याद !

जिनें मला वेडा केलें   तिच्यावरी ही फिर्याद !
अन्तर्हित झाली रामा   भानावरि येतां कळलें;
विरही मी पीडित झालों   ह्रदयीं उत्कण्ठा---अनलें;
ध्यास तिचा घेउनि फिरलो  शून्य दिशा रानोमाळ,
तिचेवरी गाणीं वेडीं   गाइलीं क्रमाया काळ !

“ पुरतां न अनुग्रह करितां,
गेलीस कशी सुखसरिता ?
धांव ! करीं न दयाब्धि रिता !”---
ही तिला घातली साद !

जिनें मला वेडा केलें   तिच्यावरी ही फिर्याद !
स्वप्नांतचि केव्हां भेटे   नेते तों स्वर्गद्वारीं,
लोटिते मागुती खालीं   भूतलावरी अन्वारीं !
तेणें मी विव्हल भारी   संसारीं परि करमेना;

धन न करीं; वणवण करितों जम कोठ नीट जमेना !

तरि तिलाच चित्त ध्यातें,
निद्रेविण रजनी जाते !
आप्तवर्ग म्हणती ” यातें ---
कुठली ही जटली ब्याद !”

जिनें मल वेडा केलें   तिच्यावरी ही फिर्याद !
हीन दीन झालों छंदी   फंदी मी तुझिया नादीं,
त्यामुळें परी न मनाला  घालितों कधींहि विषादीं;
बूज तुवां या दासाची   केली गे नाहीं अजुनी,
दुःख हेंचि वाटे म्हणुनी   गातसें अशीं गार्‍हाणीं

तूंच चित्त आधीं हरिलें,
मज आतां कां दुरी धरिलें;
चिर चरण तुझे मीं स्मरले !---
हो प्रसन्न नुरवीं खेद !

जिनें मला वेडा केलें   तिच्यावरी ही फिर्दाद !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- १९०२

रुष्ट सुन्दरीस

( चाल --- वीरा भ्रमरा )

नादीं लावुनि वेडा केलें ज्याला तूं सुन्दरी !
रुष्ट कशी होऊनि बैसशी आतां त्याच्यावरी ॥ध्रु०॥

सकल दैवतें तुच्छ करुनि मी तव भजनीं लागलों,
व्यर्थ का आजवरी भागलों ?

तुझ्या कृपेचा प्रसाद व्हावा म्हणुनी झटलों किती,
असे का त्याला कांहीं मिती ?

कधीं मला तूं उत्तेजनही दिलें ---
स्मरत नसे का ? --- स्मित मजला दाविलें !

अर्थपूर्ण --- वीक्षणेंहि केव्हां श्रम मम केले दुरी !
लहर कां आतां फिरली परी ?

कितीक माल्यें श्रमसाकल्यें गुम्फुनियां तीं भलीं
तुला गे सन्तत मीं वाहिलीं !

आभरणेंही असाधारणें दिधलीं तुजकारणें,
फिटाया दासाचें पारणें !

परि दुर्भग मम कसें उभें राहिलें ?
काय तयानें न्य़ून बरें पाहिलें ?

तेणेंकरुनी रोष असा तव उद्‍भवला अन्तरीं,
मम मना चिन्तावश जो करी !

हाय ! हाय ! हें विफल जिणें तव सहवासावांचुनी,
निघूं कीं निवटूं मनुजांतुनी !

प्रीतिविषय तो जर का परका प्राण्याला जाहला,
तयाचा जन्महेतु खुंटला !

विषण्ण तो मग विषवृक्षाचीं फळें
सुधारसाचीं मानुनि गिळिलचि बळें !

दोष तयाचा काय त्यामधें ?--- वद मधुरे ! सत्वरी ---
करूं ना मीहि अतां त्यापरी ?

तुजवरि पद्यें, हे अनवद्ये ! कितीतरी गाइलीं,
भक्तिविण कोणीं तीं प्रेरिलीं ?

तुजला वाहुनि असे घेतलें; म्हणुनि निदानीं असें
निखालस तुजला मी पुसतसें :---

निष्ठा माझी काय लाविसी कसा ?
कीं मज पिळिसी रुचि चढवाया रसा ?

किंवा तुझिया कुपेस नाहीं पात्रच मी लवभरी ?
सोक्ष कीं मोक्ष बोल लौकरी !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- जुलै १८९७