आनंद ! कोठें आहे येथें ?

देवानें शेवटी माझी अशी निराशा केली !
हाय !
स्वर्गलोकाला सोडून मी येथें कशाला बरें आलों ?
जिकडे तिकडे अगदीं अंधार - अंधार आहे येथें !
भूलोक समजून मी चुकून नरकांत तर नाहीं ना आलों ?
अरे मला घोडाघोडा खेळायला कोणी एक तरी सूर्यकिरण द्या रे !
तीन दिवस झाले, पण मला प्यायला, एकसुद्धां स्वच्छ व गोड असा वायूचा थेंब अजून मिळाला नाहीं !
देवा !
तूंच नाहीं का मला सांगितलेंस कीं, या मृत्युलोकांत आनंद आहे म्हणून ?
मग कोठें आहे रे तो आनंद ?
हाय ?
नऊ महिने सारखा अंधारांत धडपडत, ठेंचा खात, वारंवार नरड्याला वेलीनीं घट्ट बसविलेले कांटेरी फांस सोडवीत खोल अशा घाणेरडया चिखलाच्या डबक्यांतून रडत रडत, मोठ्या आशेनें मीं प्रवास केला, पण शेवटी काय ?
- नको !
अरे काळोखा !
असे कडकडा दांत खाऊन जिकडे तिकडे अशी तेलकट घाण पसरुं नकोस !
- माझ्या जिवाला आग लागली !
मला तडफडून मारुं नका रे !
- आ !
माझ्या तोंडावरचा हा धुराचा बोळा काढा !
नाहीं !
मी पुनः येथें येणार नाहीं !
अरेरे !
माझ्या आशेचा उंच डोलारा शेवटीं या काळोखांत विरुन गेला ना !
काय ?
येथें मोठमोठ्यानें रडायला सुरवात झाली ?
चला !
आधीं आपल्या स्वर्गाला परत चला ! ...

अवघें पाउणशें वयमान

अहो छे हो !
तिला आणखी तिच्या मुलाला मरुन अजून पुरते दोन महिनेसुद्धां झाले नाहींत !
प्लेगचेच दिवस होते ते !
कांही फार दिवसांची गोष्ट नाहीं मी सांगत तुम्हांला - हं !
तिला विचारीला स्मशनांत एकटीला चैन पडलें नसेल, म्हणून माझ्या दामूलाही घेऊन गेली असेल झालें !
असो, जशी ईश्वराची इच्छा !
- यमू म्हणजे माझी प्रत्यक्ष सख्खी चुलत बहीण !
ती प्लेगानें आजारी पडून, तिला वायु झाला आहे, हीं अक्षरें दामूच्या पत्रांत दिसायचा अवकाश, तों मला जें कांहीं रडूं कोसळलें, तें कांहीं पुसूंच नका !
किती वेळां तरी मनांत आलें कीं, तिच्याकडे जावें म्हणून !
पण अगदी नाइलाज होता !
- एक तर ते प्लेगचेच दिवस; व दुसरें असें कीं, घरामध्यें इकडे माझ्या नातवाचा दिवाळसण !
आणि त्यांतून, पुण्यापासून मुंबईपर्यतच्या प्रवासाची दगदग !
या वृद्धावस्थेंत, दम्यानें अगदीं गांजलेल्या या जिवाला, कशी बरें सहन झाली असती !
नाहीं, तुम्हीच सांगा !
- अनंतराव, काय सांगूं तुम्हांला !
ते दोन दिवस माझा जीव कसा अगदीं काळजीच्या भोंवर्‍यांत सांपडला होता !
- अहो पुढें काय ?
प्रारब्ध माझें !
दामूच्या पत्रानंतर अगदीं चौथ्या दिवशी सकाळींच, त्याच्या एक स्नेह्याचें पत्र आलें कीं, माझी यमू व तिचा तो दामू, दोघेंही बिचारी प्लेगाच्या वणव्यांत सांपडून तडफडून मेली म्हणून !
दुःखाचा अगदीं पर्वत कोसळला होता माझ्यावर !
- पण तसाच धडपडत कसा तरी एकदांचा चार - पांच तास मुंबईस जाऊन, दामूच्या मित्रानें - मोठा सच्चा माणूस !
जें कांहीं त्यांचें किडूकमिडूक ठेवलें होतें, तें सगळें कांहीं मी येथें घेऊन आलों !
- आतां त्यांच्या घरादारांची व शेतांची कांहीं तरी व्यवस्था मला नको का करायला ?
माझ्या यमूला आतां मीच काय तो एकटा वारस - हर हर !
या प्लेगाच्या वादळानें त्यांचा वंशवृक्षच किं हो कोसळून पडला !
कठीण !
- काळ मोठा कठीण येत चालला आहे !
असो !
पण का हो अनंतराव, माझ्या यमूची घरेंदारें व शेतें आतां माझ्या कबजांत यायला मार्गात कांहीं अडचणी तर नाही ना येणार ? ....

मग तो दिवा कोणता ?

सखे !
दुसरा दिवा आणतेस ना ?
- अरेरे !
या माझ्या दिव्यांत कितीतरी किड्यांचा बुजबुजाट झाला आहे !
माझ्या तेलाची घाण झाली !
- घाण झाली !!
- काय ?
काजळाचा बर्फ पडत आहे !
- सखे !
अग सखे !
येतेस ना लवकर ?
- अग, माझ्या खोलींत जिकडेतिकडे हा दिवा काजळ उधळीत आहे !
अरे दिव्या !
माझ्यावर जितका काजळाचा वर्षाव करावयाचा असेल तितका कर !
- पण माझ्या या शेक्सपीअरवर व ब्राउनिंगवर एक कणसुद्धां टाकूं नकोस !
- हाय !
हें तेल किती स्वच्छ होतें !
पण आतां !
- हे किडे उसळून उडया मारायला लागले म्हणजे हेंच तेल, निळें, पिंवळें, हिरवें, तांबडे लाल !
- पहा, पहा !
कसें आतां काळें झालें आहे तें !
 - दिवा भडकला !
- काय म्हटलेंस ?
दुसरा दिवा नाहीं ?
तुला कोणीं धरुन ठेवलें आहे !
- हाय !
माझ्या तुळईला आग लागली !
- माझें घर पेटलें !
 - धांवा ! धांवा !!
मी भाजून मेलों !
मला कोणी तरी वांचवा हो !
 काय हा आगीचा डोंब !
देवा ! देवा !!
 - हं !
येथें तर कांहीं नाहीं !
शांततेच्या मांडीवर काळोख तर स्वस्थ घोरत आहे !
आग नाहीं, कांही नाहीं !
मग, तो दिवा कोणता बरें भडकला होता ? ....

दिव्याभोंवती पतंग उडत आहेत

काय म्हटलेंस ?
आपल्या जीविताचा तुला कंटाळा आहे ?
- हे बघ, हे बघ, या दिव्याभोंवती कसे पतंग उडत आहेत
- कसे पण प्रेमानें अगदी तर्रर्र होऊन भोंवतलच्या जिनसांवर तडातड उड्या मारीत आहेत !
हा पहा, या लहानशा पुस्तकावर कसा सारखा धिरट्या घालीत आहे !
- प्रेमशोधनच आहे हं !
- अग नको, नको, त्याला हात नको लावूंस !
- बाबांनो, या दिव्याच्या ज्योतीला खुशाल आनंदानें प्रदक्षिणा घाला !
- काय पहा ! त्या ज्योतीच्या लाटांमध्ये पोहण्यासाठीं, बिचारे चिमणीवर कसे धडक्यावर धडक्या घेत आहेत !
- कशाला !
- अंतः करणातील प्रेमाची प्रखरता, प्रकाशाच्या - ईश्वरी प्रेमाच्या - प्रखरतेमध्यें मिसळायला !
- तें ज्योतीमध्यें बुडून गेलेलें दीपगृह आहे ना ?
 अग तें अंगुस्तानासारखें दिसत आहे तें ?
- तेथें जायचें आहे त्यांना !
अरेरे !
बिचारे पहा कसे मरुन पडले आहेत ते !!
धडपड, धडपड केली खरी, त्यासारखें, यांच्या आत्म्यांना तर तें दीपगृह मिळालें !
- त्या लहानशा ठिकाणीं कितीतरी जोडपीं आनंदानें, प्रेमानें नांदत असतील नाहीं !
- आपल्या या अफाट जगांत सारखा कलह सुरु आहे !
पण तोंच त्या चिमुकल्या स्वर्गातून, कलहाचा एक तरी - अगदीं लहानसा तरी - सुस्कारा आपल्याला ऐकूं येत आहे का ! खरेंच ! या पतंगांचें जीवित कितांतरी सुखाचें, प्रेमाचें आहे ! आपलेंही - ! ...

अहो, आज गिऱ्हाईकच आलें नाही !

काय करावें !
आज दारुलाबी खिशांत पैशे नाहींत !
- काय कोंडाबाई !
अहो कोंडाबाई !
काय तुमचें भांडण तरी काय आहे ?
अशा आमच्यावर रागावलांत कां ?
- काय म्हटलेंत ?
काल तुम्हांला ओझ्याला बोलावलें नाहीं, म्हणून तुम्ही माझ्यावर इतक्या रागावलां ?
जाऊं द्या कीं !
उद्यां लागतील तितकीं गिर्‍हाइकें येतील !
मग सगळ्या गवर्‍या तुम्हीच मसणांत नेऊन टाका !
मग तर झालें ?
अहो, गिर्‍हाइकें येऊं द्या कीं, मग तुम्हांला पैशेच - पैशे !
- काय त्रास आहे पहा !
अग ए !
कां उगीच गागत आहेस ?
गांवांत कोण प्लेग चालला आहे !
- अहो, कोणाचे जीव बी सुचित नाहींत, - आणि ही सटवी मधासधरुन उगीचच भांडत आहे !
- बरें झालें घरांत तेल नाहीं तर !
आणूं कोठून पैशे ?
- काय सांगूं कोंडाबाई !
हिच्या रोजच्या या काहारामुळें मला आपल्या जिवाचा अक्शी कंटाळा आला आहे !
- कोण आहे ?
दौलतशेट !
या शेटजी, जयगोपाळ, बसा.
खरोखर, तुम्हीं तर माझी अगदीं पाठ पुरवली आहे बुवा !
किती पंचवीसच रुपये बाकी राहिली आहे ना ?
देऊन टाकीन,
- उद्यां संध्याकाळच्या आंत, सगळे पैशे चुकते करतों !
- आतां काय सांगावें !
रामाशपथ, या वेळेला खिशांत एक पैसुद्धं नाहीं !
अहो, आतांपर्यंत मुळी गिर्‍हाइकच आलें नाहीं ! ...

अहो कुंभारदादा !

' कां रडतों ! ' रावसाहेब, मी आपल्या जन्माकरतां रडतों आहें !
हीच ती जागा !
आणखी, याच दिवशीं सकाळीं - नुकतें अकरावें वर्ष लागलें होतें मला - कोंवळ्या उन्हामध्यें, वार्‍यानें भुरभुर उडणार्‍या या भट्टीतल्या विस्तवाच्या कुरळ केसांवर हात फिरवीत, मोठ्या मजेमध्यें बसलों होतों मी !
इतक्यांत दोन गोळ्या माझ्या पाठींत शिरल्या !
बाबा अन आई रडायला लागलीं !
पण मी मात्र येथें, मृत्युलोक व परलोक यांच्यामध्यें झोके घेत खुशाल निजलों होतों !
पुढें, अंधारांत वाट चुकलेल्या कालाचा चुकून माझ्या जखमेवर हात पडला मात्र, तोंच सगळ्याच शिरा झणाणून ' नको ! ' म्हणून ओरडल्या !
डोळे उघडून जों पाहतों तोंच, एक मोठी थोरली बंदूक घेतलेला धिप्पाड पुरुष - त्याच्या अंगाभोंवतीं किती तरी लहानमोठे तारे इकडून तिकडे फिरत होते !
- माझ्या हदयावरुन आपला हात उचलतांना दृष्टीस पडला !
- व हंसत हंसत तो काय म्हणाला, ' नको ! तर राहिलें !
असाच रडत बैस, पुनः मात्र मी लवकर येणार नाहीं ! '
- पुढें काय ? अंधार !
रावसाहेब, या गोष्टीला आज पन्नास वर्षे झाली.
आई मेली, बाप मेला !
पण मी मात्र दुर्दैवामध्यें तडफडत आहें !
मधून मधून काय सुखाचे झुळझुळ वारे वाहतील तेवढेच !
- ऐका, सातांचे ठोके पडत आहेत.
रावसाहेब, हा शहराच्या मध्यावर असलेला घड्याळाचा उंच मनोरा या माझ्या भट्टींतून तयार झालेल्या विटांनीं बांधलेला आहे !
हा मनोराच काय, पण गांवांत दिसणार्‍या मोठमोठ्या इमारतींनाही मींच विटा पुरविल्या आहेत !
- हा मनोरा बांधल्याला जवळजवळ आठ वर्षे झालीं; पण आकाशांत मोठमोठ्या वावटळी सुटून जरी सारखा धो धो पाऊस पडत होता, वर आणखी विजाही कडकडत होत्या, तरी हा आपला छाती काढून त्यांच्याकडे टक लावून पाहत उभाच !
कितीही कडक ऊन पडो, पण एक वेळसुद्धां यानें हुश्श म्हणून केलें नाहीं !
माझ्या हातच्या विटांचा मनोरा हा !
- नरकामध्यें माझ्या पापकर्माची मनोरा उभारलेला आहे !
नाहीं असें नाहीं !
- पण हाय !
माझीं ही व्यसनी मुलें व त्यांचे फाजील लाड करणारी माझी बायको, या प्राण्यांच्या दुर्दैवाला मदतीला घेऊन सर्व जण, रोज सकाळपासून रात्री दिसेनासें होईपर्यत मी रावून तयार केलेला
- या हदयांतील प्रचंड असा आशेचा मनोरा रोजच्या रोज भांडणांची वादळे उत्पन्न करुन ढासळून कीं हो टाकतात !
काय सांगूं !
रात्रीं झोपेकरतां डोकें टेकायचा अवकाश, की ' नको ! नको ! म्हणून भेसूर गळा काढून माझी उशी रडायला कीं हो लागते !
- अरे पांडुरंगा ! हाय रे पांडुरंगा !! ....

तनू त्यागितं कीर्ति मागें उरावी !

.... या आळीला का ?
' ख्राइस्ट लेन ' असें म्हणतात.
त्या समोरच दिसणार्‍या खांबाच्या कपाळावर काळ्या अक्षरांनीं लिहिलेली पाटी ठोकलेली आहे, तिकडे आपण पाहिलेंच नाहीं वाटतें ?
- ते पहा, अजून रक्ताचे डाग आहेत त्या खांबावर !
फळीवरही थोडेसे शिंतोडे उडालेच आहेत.
- अहो, परवां रात्रीचीच गोष्ट.
दारुबाज नवर्‍यानें घराबाहेर हाकून दिलें म्हणून ज्या बिचारीनें
- किती गरीब आणि सद्गुणी होती ती !
- रागाच्या आवेशांत त्याच, त्याच, खांबावर आपलें कपाळ फोडून जीव दिला, त्याच बाईच्या आत्म्यानें जातां जातां ' ख्राइस्ट ' या अक्षरांवर ते रक्ताचे शिंतोडे उडविले आहेत !
- हें झालें ?
तसेंच एकदां त्या खांबाजवळ एक मूल
- अरेरे ! त्या अर्मकाच्या नरड्याला व छातीला पांच, पंचवीस खिळे ठोकलेले !
- असें तें मूल, कोणीं चांडाळानें आणून टाकलें होतें !
- जाऊं द्या कीं !
आपल्याला काय करायचें आहे या गोष्टीशी म्हणा !
- काय चिरुट ?
कोणत्या छापाचा आहे ?
वेलिंग्टन चिरुट असेल, तर मग हरकत
- नाहीं !
अहो परवां काय झालें !
जवळच इमर्सन चौकांत विस्मार्क कंपनीचें दुकान आहे
- तेथें मीं जवळजवळ दोन शिलिंगाचे पैगंबर छापाचे चिरुट, जो तो त्यांची स्तुति करायला लागला, म्हणून मोठ्या हौसेनें विकत घेतले !
- झालें !
थोड्या वेळानें मी जो त्यांतला एक ओढून पाहातों तों काय !
सारखा अर्धा तास ठसका !
- असा कांहीं संताप आला कीं, ते सगळे चिरुट घेतले, अन् लागलीच शेजारच्या गटारांत फेंकून दिले !
- नांवें मात्र मोठमोठ्यांचीं, पण येथून तेथून बदमाषगिरी !
- अरे वा !
तुमचा नेपोलियन शू बराच टिकला आहे कीं !
- मी तुम्हांला सांगत नव्हतों कीं तो सॉक्रेटिस बूट घेऊं नका म्हणून ?
असो.
आपण आमच्या देशामध्यें, माझ्या घरीं पाहुणचार घेत कांहीं दिवस तरी राहिलेंच पाहिजे.
पहिल्यानेंच येथें आलां आहांत
- तो पहा !
आमच्या वाइजमनच्या बहिरी ससाण्यानें कसा पक्षी धरुन आणला आहे !
- मोठा चलाख आहे !
जवळजवळ रोज तीसपासून पस्तीसपर्यत पांखरें धरुन आणतो !
त्याचें नांव काय ठेवलें आहे ठाऊक आहे का ?
- शेक्सपीअर ?
- कारण तो म्हणतो कीं, जसा कविराज शेक्सपीअर, माणसाच्या अंतःकरणांत अगदीं सांदीकोपर्‍यांत दडून बसलेले विचार पकडून आणण्यांत मोठा हुशार होता, तस्सा माझा हा ससाणा पांखरें धरुन आणण्यांत मोठा वस्ताद आहे !
हः हः हः का ?
आहे कीं नाहीं ! ....