श्वान अथवा शूकर हो का मार्जार । परि वैष्णवाचें घर देईं देवा ॥१॥
तेणे समाधान होय माझ्या जीवा । न भाकीं कींव आणिकासी ॥२॥
उच्छिष्‍ट प्रसाद सेवीन धणिवरी । लोळेन परवरी कवतुकें ॥३॥
चोखा म्हणे कोणी जातां पंढरीसी । दंडवत त्यासी घालीन सुखे ॥४॥

  - संत चोखामेळा

आतां कासया हा दाखवितां खेळ । म्यां तंव सकळ जाणितला ॥१॥
जेथें ब्रह्मादिक वेडे पिसे झाले । न कळे वहिलें तयांलागीं ॥२॥
कोणासी हा पार न कळे तुमचा । काय बोलों वाचा कीर्ति तुमची ॥३॥
चोखा म्हणे तुमचा अविट हा खेळ । भुललें सकळ ब्रह्मांडचि ॥४॥

  - संत चोखामेळा
आतां याचा अर्थ पुरे पुरे देवा । येऊं द्या कनवळा तुम्हांलागीं ॥१॥
गुंतलोंसे काढा यांतोनी बाहेरी । माझें तो हरि कांहीं न चाले ॥२॥
वारंवार करुणा करितों देवराया । कां न ये कनवळा तुम्हांलागीं ॥३॥
चोखा म्हणे आतां न करा उदास । पुरवावि आस मायबाप ॥४॥

  - संत चोखामेळा
जन्मांचें साकडें नाहीं माझें कोडें । जेणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥
कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण । हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥
वैष्णवांचे द्वारीं लोळेन परवरी । करीं अधिकारी उच्छिष्‍टाचा ॥३॥
चोखा म्हणे जया घडे पंढरीची वारी । तयाचिये घरीं पशुयाती ॥४॥

  - संत चोखामेळा
नेणपणें मिठी घालीन पदरा । बैसेन द्वारांत तयाचिया ॥१॥
आशा हे पाठी घेवोनी सांगातें । निचेष्‍ट निरुतें भरीन माजी ॥२॥
लाभाचा हा लाभ येईल माझे हातां । मग काय चिंता करणें काज ॥३॥
चोखा म्हणे मज हेंचि वाटे गोड । आणिक नाहीं चाड दुजी कांहीं ॥४॥

  - संत चोखामेळा
इतकेंचि देईं रामनाम मुखीं । संताची संगती सेवा सार ॥१॥
निरंतर घोष जयाचे मंदिरीं । तयाचिये घरीं सुख मज ॥२॥
उच्छिष्‍ट धणिवरी पोटभरी धाये । दुजी नको सोय देवराया ॥३॥
चोखा म्हणे माझी पुरवावी आळी । माय तूं माउली कृपाळू देवा ॥४॥

  - संत चोखामेळा
आतां माझा सर्व निवेदिला भाव । धरोनी एक ठाव राहिलोंसे ॥१॥
जेथें काळाचाहि न पुरे हात । तयाचे पायीं चित्त समर्पिलें ॥२॥
भय नाहीं चिंता कोणता प्रकार । झालोंसे निर्भय नामबळें ॥३॥
चोखा म्हणे आतां लागलासे झरा । विठोबा दातारा याचि नामें ॥४॥

  - संत चोखामेळा