झाली चूक ! – क्षमस्व ! वेड असलें जन्मांतुनी लागतें,
तेंही एकच वेळ ! नेत्र उघडे ठेवून ना दोनदा :
मौर्ख्याचा जगणें कलंक न असा लावून घेतां कदा,
सर्वांनाच कुठे शहाणपण हे देवाघरीं लाभतें !
ज्यांना संकट,
आलों -स्वतंत्र तव भाव !-स्वतंत्रतेने
आराधण्या प्रथम तन्मय आर्जवाने,
प्रेमार्तता उघड बोलुनि दाखवीली
-शब्दांत, जे ठरति बालिश अन्य वेळीं.
दोघेंच आपण सुहास, न पाहणारा,
निश्चिन्त- चित्त बघ मांडुनि हा पसारा
विश्वासपूर्ण बसलों मम भावनांचा,
रागानुराग नि विनोदमय स्तुतीचा.
किंचित क्षणांत वरती ताव दृष्टि जावी,
अन हासरी चमक लोचनिं वेड लावी !
होतें निवांत; मन संशयशून्य, भोळें;
अर्थविना सरस-वाक्पटुताहि वोळे.
किंचित पुन्हा नजर ही वरती करून
तूं हासतां बघितले फिरवून मान,
-भांबावलों-स्तिमित-बावरलों- कळेना
कोठे, कसा, कुठुनि मी……..
तों विश्वनाट्यगृहांतुन या दिगंत,
हास्य-ध्वनी दुमदुमून भरे हवेंत;
अन रंगभूमिवरला जगतांत खास
गेलों विदूषक पुरा ठरुनी सुहास !
जातेस तरि सुखाने । जा आपुल्याच ठायां;
हृदयांत साठलेलें । गेलें न रूप वाया.
ही एक मुग्ध कलिका । ताऱ्यास वेड लावी,
परि तत्प्रभात-अश्रू । हृदयी डुजीच ठेवी,
आधार या तरूचा । वरती चढावयाला,
आलिंगणें लतेने । स्नेहें वरी दुजाला.
ही रीत काय नाहीं । येथील कोमलांची,
अपवाद त्यास कैशी । होशील एक तूंची !
रेताड जीवनांत । भवितव्यता-किनारीं,
अति तीव्र वेदनांनी । व्याकूळतां जिव्हारीं,
सौंदर्यरूप ईशा । भावें बघून हृदयीं,
मम पोळल्या जिवाला । लाभेल दिव्य शांती.
तारुण्य-रूप जातां । बघशील बावरून,
शांती अशांततेची । तूतें न तीहि जाण.
मन वाचनिं आज ना रमे; स्मृति होते तव एकसारखी;
हुरहूर भरून ये हृदीं; भर संध्या करि त्यांत आणखी.
बसलों म्हणुनीच येउनी — जग-कोलाहल लांब मागुती —
दगडावर त्याच, ज्यावरी गतकालीं तव स्निग्ध संगती.
पसरे लहरींत वायुच्या मधु छायार्णव सांध्य भोवती;
निमिषांत नभावरी निळ्या किति नानाविध रंग फाकती.
अति संथ समीर-गारवा सुटुनी वाटसरास सांगतो,
“जरि वाट कितीहि चाललां, नच आता तरि अध्व-खेद तो.”
विहरून नभांत स्वैरसें घरटयाला निज शेवटीं त्वरें,
चिंवचींवित सांज-माधुरी बघ हीं जात सुखांत पाखरें.
मिटणार फुलाफुलांतुनी, प्रतिपानावर कंप पावुनी,
लहरीलहरींतुनी जलीं, प्रतिमेघावर गोड रंगुनी,
श्रुतिशांत दिनांत-गीत ये श्रवणीं, “श्रांत जिवा विसाव घे !”
मज हाय कुठे न आसरा; करिती पारध हे विचार गे.
हळुवार सुहास, रात्र ही मखमाली पसरीत हात ये;
अपघात घडून देह हा पडला एक रुळावर इथे,
बघुनी क्षण शांति मन्मनीं न कळे कां परि खास वाटली,
कुठुनी तरि शक्ति ;…………………
प्रीतीची दुनिया सुहास, हसते वाऱ्यावरी भाबडी;
स्वानंदें रमते समुत्सुक जनीं निर्हेतुका बापुडी;
अद्वैतांतिल मंजु गीत-रव तो आलापुनी गुंजनीं,
राही मग्न अशीच गोड अपुल्या स्वप्नांत रात्रंदिनीं.
आशांची बकुलावली विकसली मंदस्मितें भोवती;
ईषत्कंपितकल्पनाकिसलयीं निष्काम डोलेल ती !
चाखावा मकरंद त्यांतिल जरा; जावें, झुलावें जरा;
शंकाही नच की कधी वठुनि हा जाईल गे मोगरा.
सौख्याभाव नि सौख्य एकच इथे संवेदनाजीवनीं;
नीती आणि अनीति संभ्रम फिटे स्नेहार्द्र संभावनीं;
संध्यादेवि उषेसह प्रगटते आकाल निलांबरीं;
येई गे, अजरामत्व मरुनी निर्वेध ताऱ्यांपरी.
नाही हें नशिबीं ! — नसोच ! — मिटती जागेपणीं पापण्या;
आई ! येत म्हणून मस्तक तुझ्या अंकावरी ठेवण्या.