गोष्ट तीन आण्यांची - गिरिजा कीर

 आठवडि बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून घराकडे निघाली होती. आया-बाया चपला फरफटत पाय उचलत होत्य. धुरळ्याची रंगपंचमी झाली होती नुसती. म्हातारी बाय पाटी कमरेवर घेऊन ताठ उभी राहिली. फाटक्या चपलेला वादी बांधून त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली. शेवकांडाच्या लाडवांची पुरचुंडी आणि प्लास्टिकच्या पिशवीतल खाजं तिन आवदारपणे चुंबळीच्या पदराखाली सरकवलं. तेवढ्या गडबडीतसुद्धा खाज्याच्या गुळात घातलेल्या आल्याचा दरवळ तिच्या नाकापर्यंत पोहोचला. बाय एस्‌.टी.च्या खांबाशी पोहोचते, तो एस्‌.टी.निघून गेली होती. बांगडीवाल्या मुल्लांन तिला हटकलंच, `म्हातारे, आज उशीरसा?' माल संपेसंपेतो उशीर झाला होता. पण आज बक्कळ पैसे जमले होते. त्यातूनच तिनं बारक्यासाठी शेवंतूसाठि खरेदी केली होती. कुणाला तरी हे उत्साहानं सांगावं, असं तिला पण वाटत होतं. पण दाढीचे केस पांढरे फेक झालेला मुल्ला तिला `म्हातारे' म्हणाला होता. बायला भारीच राग आला. कुणी `म्हातारे' म्हटलेलं तिच्या मुळीच कामी यायचं नाही. म्हातारी काय म्हणून? अजून डोक्यावर पाटी घेऊन ४-४ मैल चालत होत अन्‌ डोळ्याला दिसत होतं. ती स्वभावाप्रमानं काहीतरी फटकून बोलणार होती, पण समोरुन मोटार येताना दिसली. बायनं चकटनं विचार केला, एस्‌.टी.ला दोन आणे पडणारच होते. याला एक आणा जास्त देऊ. पण अंधारायच्या आतं घरी तर पोहोचू! बायनं आपला काळा फाटकोळा हात झेंड्यासारखा हलवला. गाडी कचकन ब्रेक लावून थांबली. ड्रॉयव्हर तसा रुबाबदारगडी वाटला. तो बायकडं बघून हसला. `काय पायजे आजी?' त्यानं विचारलं. बायला त्यातला त्यात बर वाटलं. म्हणाली, `माका सत्तर मैलार जांवचा आसा. सोडशील रे? यष्टी चुकली बग!' ड्रॉयव्हर खाली उतरला. म्हातारीची पाटी डिकीत टाकलि आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर बसायला सांगितलं. बाय हरकली. चक्क पुढं बसून जायचं? आणि गाडीत कोणी पॅसेंजर्च नाही. पण तिला हळहळपण वाटली. बिचाऱ्या ड्रॉयव्हरला आज मिळकतच नाही. ती म्हणाली,`ह्यां बग, यष्टीवाले दोन आने घेता. मियां तुका तीन आणे देतयं. चलात?' `आजे' `बाय म्हणतत माका' ती टेचात उत्तरली. ड्रॉयव्हर हसत म्हणाला,`बाय, तुला परवडतील ते दे. तू मला मायसारखी~' बायचा जीव सुपाएवढा झाला. ती मायच्याच हक्कानं ऐसपैस बसली. गाडी सुरु झाली. बांगडीवाला मुल्ला तोंडवासून आश्चर्यानं पाहत होत. गाडी हलली तसा तो ओरडलाच, `अगे म्हातारे -' पण बायला आता त्याच्याकडे बघायला सवड कुठं होती? मऊ गादीवर बायला फार सुख वाटलं, एस्‌.टी.सारखी गर्दी नाही, कचकच नाही. गाडी कशी भन्नाट निघाली होती. बायनं मनातल्या मनात ड्रॉयव्हरला मार्क देऊन टाकले. दिवसभराच्या उन्हान, धुळीनं ती थकली होती. आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी आली. `बाय, तुझा सत्तर मैलाच्या दगड आला बघं. इथंच उतरायच ना? `बाय खडबडून उठली. कनवटीचे तीन आणे काढून ड्रॉयव्हरच्या हातावर ठेवले. तेवढ्यात त्यान डिकीतून तिची पाटी काढून दिली. म्हाताऱ्या बायला काय वाटलं कोण जाणे. तिनं अलवार हातानं पुडी उलगडली. त्यातला शेवकांडचा एक लाडू काढला. ड्रॉयव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली, `खा माझ्या पुता! ड्रॉयव्हरनं हातातल्या लाडवाकडं आणि म्हातारीकडं डोखं भरुन पाहिलं गाडी निघाली तसा बाजूला उभा असलेला माणूस म्हणाला, `कुणाच्या गाडीतून इलंय?' `टुरिंग गाडीतनं.' बायच बोलणं ऐकून तो माणूस आणखीच बुचकळ्यात पडला. तशी बाय खणखणीत आवाजात म्हणाली `तीन आणे मोजून दिलंय त्येका,' `त्यांनी ते घेतलं? अग म्हातारेम तुझं डोकं फिरलं काय? टुरिंग कार नव्हती ती. आपल्या राजांची गाडी. याआपल्या सावंतवाडिच्या महाराजांच्या शेजारी बसून आलीस तू!' दुसऱ्यानं माहिती पुरवली. `अरे माझ्या सोमेश्वरा, खळनाथा' म्हणत म्हातारी भुईला टेकली. गाडी गेली त्या दिशेनं तिन भक्तिभावानं हात जोडले. आपल्याला `माय' म्हणणाऱ्या आणि गरिबांच्या टोपलीतला शेवकांडाचा लाडू खाणाऱ्या, त्या लोकराजाच्या आठवणीनं, तिच अंतःकरण भरुन आलं.
राजू बाबांबरोबर सर्कस बघायला गेला. तिकिटांच्या रांगेत असतांना त्याची नजर साखळीने बांधलेल्या हत्तीच्या पिल्लाकडे गेली. ते हत्तीच पिल्लू जोरजोरात धडक देत तर कधी सर्व शक्ती लावून साखळी तोडण्याचा प्रयन्त करत होते, पण त्याला यश येत नव्हते.शेजारी त्याच्या आईलाही तसेच बांधून ठेवले होते पण ती स्वस्थपणे उभी होती. राजूची उत्सुकता वाढली. “बाबा त्या हत्तीच्या पिल्लाला ती साखळी तोडणे कठीण आहे. पण त्याची आई ती सहज तोडू शकते ना? मग ती स्वतःची अन् तिच्या पिल्लाची सुटका का करून घेत नाही?” राजू च्या प्रश्नावर बाबा निरुत्तर झाले, पण सर्कसच्या मनेजरने तो प्रश्न ऐकला. “त्याच अस आहे बाळा, ह्या हत्तीच्या आईलाही ती लहान असतांना इथे आणलं गेलं. तिलाही याच साखळी ला आम्ही बांधत असू , सुरवातीला दोन महिने तिनेही सुटकेचा असंच प्रयत्न केला. तेव्हा ती साखळी तोडणे आपल्या शक्तीबाहेर आहे, अशी तिला जाणीव झाली.अन् आता मोठी झाल्यावरही तिच्या मनात तेच बिंबून गेलंय. अशा दहा साखाल्याही ती तोडू शकेल एवढी ताकद तिच्या अंगात आहे, पण पुन्हा प्रयत्न करण्याचा विचारही तिच्या मनात येत नाही. उलट तिच्या पिल्लाचे तिला हसू येत असेल.” आपलही असंच होतं. एखाद्या गोष्टीत अपयश आल्यावर ‘ते आपल्याला जमणार नाही’ असं मनात ठरवून चालतो.कालांतराने गोष्टी बदलतात. अन् आता आपल्याला शक्य असूनही आपण प्रयत्न करीत नाही. म्हणूनच कुणी म्हटलंय..” तुम्ही तो पर्यन्त हरत नाही, जो पर्यन्त तुम्ही प्रयत्न करायचे सोडत नाही !”

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : "स्वामी विवेकानंद"

गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती. जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली. योद्धा, संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी विवेकानंद. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सर्वच स्तरांतील लोकांचे जीवन गतिमान झाले आहे. जीवनात अचानक आलेल्या या गतीमुळे सर्वसामान्यांची स्थिती भांबावल्यासारखी झाली आहे. ज्ञानार्जन करू पाहणार्‍या तरुणांची स्थितीही याहून वेगळी नाही. अशा स्थितीत मनाला स्थैर्य देऊन आपल्या प्रगतीला सहाय्यक ठरणार्‍या विचारांची निकड आहे. अशावेळी ‘फोटोग्राफिक मेमरी’साठी प्रसिद्ध असलेल्या स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्या मदतीला धावून येतात. म्हणूनच विवेकानंद पुण्यतिथीच्या निमित्ताने शक्तीदायी विचारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहे.नोबेल परितोषिक विजेते आणि विख्यात विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ‘‘तुम्हाला जर भारत जाणून घ्यायचा असेल, तर विवेकानंदांचा अभ्यास करा. त्यांच्यात सर्वच सकारात्मक आहे, नकारात्मक काहीही नाही.’’ सकारात्मक विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. सकारात्मक विचारामुळे जीवनाचे नंदनवन होऊ शकते, परंतु केवळ सकारात्मक विचार उपयोगाचे नसून, माणसाला आपल्या ध्येयाची निश्‍चितीही करता आली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘‘एखादे ध्येय निश्‍चित केलेला मनुष्य शंभर चुका करीत असेल, तर ध्येय नसलेला मनुष्य दहा हजार चुका करतो.’’ तात्पर्य असे की, ध्येयामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, परंतु असे असले, तरी ध्येयाची निवड देखील महत्त्वाची बाब असते. स्वामी विवेकानंदांच्या जीवन वाङ्‌मयातून आपल्याला उच्च ध्येयमार्गासाठीची दिशा मिळते.स्वामी विवेकानंदांचे जीवन पाहा. गुरुदेव रामकृष्णांच्या प्रयाणानंतर स्वामीजींनी संपूर्ण भारताचे भ्रमण केले आहे. भारत म्हणजे काही केवळ कागदावरचा नकाशा नाही. भारत म्हणजे भारतातले लोक. इथली गावं, इथल्या नद्या, पर्वत, इथे होऊन गेलेले ऋषीमुनी, इथले तत्त्वज्ञान आणि खूप काही... जोवर आपण खरा भारत समजून घेत नाही, तोवर तिच्याप्रती मनात भक्तीभाव निर्माण होणे कसे शक्य आहे? एखाद्या व्यक्तीप्रती प्रेम किंवा तिरस्कार तेव्हाच निर्माण होते, जेव्हा आपल्याला तिच्या गुण-दोषांची ओळख होते. देशाच्या बाबतीतही हेच तत्त्व लागू आहे. आपण इतिहास वाचलेला असतो. इतिहासातील आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाने आपला ऊर अभिमानाने भरून येतो. हा अनुभव आपल्या सार्‍यांचाच आहे. म्हणूनच केवळ प्राचीन भारत ग्रंथातून अभ्यासून न थांबता स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण वर्तमान भारत पायी फिरून अनुभवला.शेवटी स्वामीजी देशाच्या दक्षिण टोकाला- कन्याकुमारी येथे आले. तिथल्या श्रीपाद शिलेवर की, जिथे देवी पार्वतीने कैलासातल्या शिवशंकरासाठी एका पायावर तपश्‍चर्या केली होती, तिथे २५, २६ आणि २७ डिसेंबर १८९२ या तीन दिवस-रात्री त्यांनी ध्यान केलं. हा पहिला सन्यासी होता की, ज्याने आपल्याला वैयक्तिक मोक्ष अथवा मुक्ती मिळावी म्हणून ध्यान साधना केली नाही. भारताला पुन्हा तिचं गतवैभव कसे मिळवता येईल हा त्यांच्या ध्यानाचा केंद्रबिंदू होता.एकेकाळी वैभवावर असलेल्या या देशाचे भग्नावशेष त्यांनी जागोजागी भ्रमणकाळात पाहिले होते. पाश्‍चात्य देशातील लोकांना जेव्हा कपडे घालण्याचीही बुद्धी नव्हती. तेव्हा या देशात एक प्रगल्भ संस्कृती नांदत होती, हेही त्यांना माहीत होते, परंतु आज मात्र भारत गुलामीत होता. भारताचा स्वाभिमान ब्रिटिशांनी पायदळी तुडवला होता. दारिद्र्याने आणि लाचारीने कळस गाठला होता. जातीभेद स्पृशास्पृशतेसारख्या घातक रूढींनी उच्छाद मांडला होता. अज्ञानाचा अंध:कार गडद झालेला होता. अशा स्थितीतून पुन्हा भारताचे उत्थान घडवून आणायचे तर काय करावे लागेल हा त्यांच्या ध्यानाचा विषय होता. अखेर एक शक्तिशाली विचार घेऊन स्वामीजी त्या शिलेवरून उठले. आपण आत्मविश्‍वास गमावलेला आहे, त्यामुळेच आजची अधोगती झाली. या देशाला पुन्हा आत्मविश्‍वास मिळवून देणे हे विवेकानंदांच्या जीवनाचे ध्येय बनले. जगावर राज्य करणार्‍या लोकांच्या देशात जाऊन आमच्या देशाचा तरुण विजय मिळवतो, ही घटना समस्त भारतीयांना आत्मविश्‍वास देणारी ठरली. यातूनच खर्‍या अर्थाने भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाला बळ मिळाल्याचा इतिहास आहे. स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहायची दृष्टी दिली. स्वामी विवेकानंद म्हणजे साक्षात घनिभूत देशभक्ती. त्यांचा युवा पिढीवर प्रगाढ विश्‍वास होता. भारताच्या पुनरुत्थानच्या कार्यासाठी युवकच पुढे येतील, असा त्यांना विश्‍वास होता. देशभक्तीचे मूर्तीमंत प्रतीक असणारे स्वामी विवेकानंद केवळ भारतासाठीच प्रेरक आहेत असे मात्र बिलकुल नाही. संपूर्ण जगात सुख-शांती नांदण्यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन लाखमोलाचे ठरले होते. म्हणूनच तर सार्‍या जगासाठी असा काय संदेश स्वामीजींनी दिला होता, तेही समजून घेतले पाहिजे. अन्यथा मोठा गोंधळ होईल. दोन वर्षांपूर्वी जपानचे पंतप्रधान भारतात आले होते. संसदेला संबोधित करताना पंतप्रधान ऍबे सिंझो म्हणाले की, जपान भारताचा ऋणी आहे. कारण जपानचे शिल्पकार तेनशिन ओकाकुरा यांनी स्वामी विवेकानंद यांच्यापासून प्रेरणा घेतली होती. ते पुढे असे म्हणाले की, जगाचे नेतृत्व करण्यासाठी जपान आणि भारत या दोन्ही देशांनी पुढाकार घेतला पाहिजे.‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन’ या विख्यात पुस्तकाचे लेखक आणि नामवंत इतिहासकार सॅम्युअल हंटिग्टन म्हणतात की, जगात तिसरे महायुद्ध झालेच तर ते एकांतिक विचारधारा मानणार्‍या धर्मीयांकडून होईल. माझाच धर्म खरा या दुराग्रहामुळे होईल. यातून वाचण्याचा एकच मार्ग असेल, तो म्हणजे भारतीय मार्ग अर्थात हिंदू विचारधारा. आकाशातून पडणारे पाणी शेवटी या ना त्या मार्गाने समुद्राला मिळते. त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही ईश्‍वराची उपासना केली तरी ते अंती एकाच ईश्‍वराला पोचते, अशी भारतीय विचारधारा आहे. हाच हिंदू विचार अर्थात वेदांत हा भावी जगाचा मार्ग असणार आहे असे स्वामी विवेकानंद म्हणतात. हाच विचार आहे की, जो जगात शांती आणू शकतो, परंतु यासाठी हा विचार सांगणारा देश दुर्बल असून, चालणार नाही. भारताने गेल्या दहा हजार वर्षांत कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही. कारण दुसर्‍यांना पायदळी तुडविणे हा भारताचा स्वभाव नाही, परंतु जगाला शांतीचा आणि शाश्‍वत मार्ग दाखवायचा असेल, तर भारताने बलशाली झालेच पाहिजे. त्याला पर्याय नाही. भारताला बलशाली करण्याच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलणे हेच आपल्यासमोरचे सर्वोच्च ध्येय असू शकते. तुम्ही विद्यार्थी असा की, शिक्षक, शिपाई असा की, अधिकारी, शेतकरी असा की, सौनिक तुम्ही कोणीही असा, आपले सर्वोच्च ध्येय भारत पुनरुत्थानाच्या कार्यात योगदान देणे हेच असू द्या. स्वामी विवेकानंदांच्या शब्दांत सांगायचे तर आगामी काळात हे राष्ट्र हेच तुमचे दैवत असू द्या. एकदा ध्येय ठरले की, कार्य करण्याची दिशा आपोआप गवसून जाईल.

ट्यूलिपमॅनिया

 ‘सिलसिला’तलं अमिताभ-रेखा यांचं ‘देखा एक ख्वाब तो…’ हे गाणं नेदरलँडमधल्या कुकेनहॉफच्या प्रसिद्ध ट्यूलिप गार्डनमध्ये शूट केलं होतं. पण त्या गाण्यात बहरलेल्या बागा तिथे प्रत्यक्षात बघताना मला नेहमी एके काळी इतिहासात याच ‘ट्यूलिप्सनी’ घातलेला प्रचंड गोंधळ आठवून अंगावर ‘काटा’ यायचा! १६३६-३७च्या काळात ‘ट्यूलिपमॅनिया’नं नेदरलँडमधे अक्षरश: धुमाकूळ घातला. १८४३ साली चार्लस्‌ मॅकेनं त्याच्या ‘एक्स्ट्रॉऑर्डिनरी पॉप्युलर डिल्युजन्स अँड द मॅडनेस ऑफ क्राऊड्ज’ या पुस्तकात याविषयी बरंच लिहिलंय. १५९३ साली कार्लोस क्लासियस या वनस्पतिशास्त्रज्ञानं ट्यूलिप्स प्रथम हॉलंडला संशोधनासाठी आणले. त्याच्या शेजाऱ्यांनी त्याची फुलं बघितली. त्यांना ती आवडल्यानं त्यांनी ती चोरून विकायला सुरुवात केली. यातूनच हे खूळ चालू झालं. १६०० सालापासून कॉन्स्टॅन्टिनोपोलहूनच व्हिएन्नामार्गे युरोपमधे या फुलांचे कंद यायला सुरुवात झाली आणि मग भराभर ते वादळासारखे पसरले. याच काळात नेदरलँडमध्ये व्यापाराच्या जोरावर श्रीमंत झालेल्या मंडळींना ट्यूलिपची फुलं बाळगणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण वाटू लागलं. ट्यूलिपची फुलं वेगवेगळ्या रंगांची असत. ज्याच्याकडे ही फुलं नसत, त्याला अरसिक समजलं जायचं. यामुळे आणि मागणीच्या मानानं ट्यूलिपच्या फुलांचा पुरवठा कमी असल्यानंही त्यांच्या किमती भरमसाठ वाढायला लागल्या. आणि मग स्वस्त भावानं ट्यूलिप्सचे कंद विकत घेऊन जास्त भावानं ती विकण्याची सट्टेबाजी सुरू झाली! याच काळात या फुलांना कसल्यातरी व्हायरसनं ग्रासलं. पण त्यामुळे त्यांच्यावर रंगांचे जे पट्टे उमटले ते आणखीनच छान दिसत. त्यामुळे ती फुलं आणखीनच दुर्मिळ झाली आणि त्यांचे भाव जास्तच कडाडले! या किमती इतक्या वाढल्या को सामान्य डच लोकांचं वार्षिक सरासरी उत्पन्न दरडोई १५० डच गिल्डर्स किंवा १५० फ्लोरिन्स असताना ट्यूलिपच्या ‘सेम्पर ऑगस्टस’ या प्रसिद्ध जातीच्या एका कंदाची किंमत त्याच्या ४० पट किंवा ६००० फ्लोरिन्स झाली होती! त्या वेळच्या किमती लक्षात घेता त्या वेळचा १ फ्लॉरिन म्हणजे २००२ सालचे १०.२८ युरोज किंवा साधारणपणे ५०० रु. होतात. म्हणजे त्या वेळच्या एका कंदाची किंमत आजच्या रुपयात ६००० x ५०० म्हणजे ३० लाख रु. होत होती! १६३६ सालच्या सुरुवातीला हॉलंडमधे सेम्पर ऑगस्टसचे फक्त दोनच कंद उपलब्ध होते. त्यातल्या हार्लेममधल्या एका कंदासाठी १२ एकर जमीन; तर अॅमस्टरडॅममध्ये त्याचसाठी ४६०० फ्लोरिन्स, २ घोडे आणि नवीन घोडागाडी एका सट्टेबाजानं दिली!! ही कित्येकांची आयुष्याची कमाई होती! कित्येक व्यापारी या व्यापारातून दरमहा ६००० फ्लॉरिन्स कमावत. १६३६ साली ट्यूलिप्सचे कंद चक्क स्टॉक एक्स्चेंजवर जाऊन थडकले. समाजातले तथाकथित प्रतिष्ठित, सर्वसामान्य लोक, मोलकरणी, कामगार, छोटे व्यापारी आणि अगदी सफाई कामगारसुद्धा या ट्यूलिपच्या व्यापाराकडे आपलाही काही फायदा होईल म्हणून आपले उद्योग सोडून वळत होते! यातल्या सट्टेबाजीमुळे काही अतिश्रीमंत झाले तर काही कंगाल! १६३६-३७च्या हिवाळ्यात तर एका दिवसात किमान दहावेळा एकाच कंदाची खरेदी-विक्री प्रत्येक वेळी आधीच्यापेक्षा जास्त दरानं होत होती! स्टॉक एक्स्चेंजेस नसलेल्या गावात चक्क दारूच्या गुत्त्यात नाचगाणी आणि जेवणासमवेत ट्यूलिपचे लिलाव होत. तिथे फुलदाण्यांमधून या फुलांचं प्रदर्शन करत.

नंतर मग कंदाचे भाव एवढे वाढले की ते कंद नगाऐवजी वजनावर विकले जाऊ लागले. पूर्वी खूप कमी वजनाच्या वस्तूंना ग्रेन हे माप असे. ४८० ग्रेन्स म्हणजे १ औंस होई. पण आता पेरिट्स हे ग्रेन्सपेक्षाही कमी वजनाचं माप वापरलं जाऊ लागलं. कारण प्रचंड किमतीमुळे वजनातल्या अगदी थोड्या फरकानंही किंमत खूपच बदलणार होती. ट्यूलिपच्या वेगवेगळ्या जातींप्रमाणे ही किंमत बदलत होती. ४०० पेरिट्स वजनाचे अॅडमिरल लिफकेन या जातीचे कंद प्रत्येकी ४४०० फ्लोरिन्सला तर व्हिसरी जातीचे तितकेच कंद प्रत्येकी ३००० फ्लोरिन्सला मिळत होते!

या सट्टेबाजीचा कहर झाला तो म्हणजे एका गंमतशीर व्यवहारात. सात अनाथ मुलांच्या नावावर त्यांच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी ठेवलेली संपत्ती होती मौल्यवान ट्यूलिपचे ७० कंद! या कंदांच्या लिलावात एका कंदाची बोली ५२०० फ्लॉरिन्स तर एकूण कंदांचा व्यवहार ५३००० फ्लॉरिन्स इतका झाला होता! हार्लेमच्या एका व्यापाऱ्यानं तर त्याच्या अर्ध्या आयुष्याची कमाई नफा न मिळवता केवळ मित्रमंडळींकडून कौतुक करून घेण्यासाठी या ट्यूलिपच्या कंदांसाठी खर्च केली! आणखी एकदा अशीच धमाल झाली. एका श्रीमंत व्यापाऱ्यानं ३००० फ्लोरिन्सला (त्या काळातले २८० पौंड स्टर्लिंग!) सेम्पर ऑगस्टसचे कंद विकत घेतले होते. दुसऱ्या दिवशी ते जागेवर न दिसल्यानं अस्वस्थपणे तो ते शोधत असताना ते घेऊन येणारा नावाडी ट्यूलिपलाच कांदा समजून खाताना त्याला दिसला. भयंकर संतापून त्या व्यापाऱ्यानं त्या नावाड्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि या गुन्ह्याकरता त्या नावाड्याला मग अनेक महिने तुरुंगाची हवा खावी लागली! असंच एकदा एक वनस्पतिशास्त्रज्ही एका डच व्यापाऱ्याकडे पाहुणा म्हणून आलेला असताना पूर्वी न बघितलेला ट्यूलिपचा कंद एक दुर्मिळ कांदा समजून तो त्याचं विच्छेदन करायला लागला. चिडून त्या डच व्यापाऱ्यानं त्या वनस्पतिशास्त्रज्ञाला रस्त्यातून अक्षरश: फरफटत नेऊन मॅजिस्ट्रेटसमोर नेलं, तेव्हा त्याला त्या ‘कांद्या’ची किंमत ४००० फ्लोरिन्स आहे हे कळलं! त्यालाही बराच दंड आणि तुरुंगवास भोगावा लागला होता! असे बरेच किस्से त्या काळात घडत!

ट्यूलिपला मिळणारी प्रचंड मोठी बाजारपेठ बघून अनेकांनी मग भविष्यातल्या भावांच्या अंदाजाप्रमाणे ‘फ्युचर काँन्ट्रॅक्ट्स’ करून कोवळ्या रोपांची सट्टेबाजी सुरू केली. याला ‘विंड ट्रेड’ असं म्हणायला लागले. १६१० साली अशा व्यापाराला कायद्यानं बंदी घालूनही सगळ्यांनीच ट्यूलिपच्या बाबतीत कायद्याचं बेधडकपणे उल्लंघन करायला सुरुवात केली! पण हा वेडेपणा कुठेतरी थांबणारच होता. आणि झालं तसंच! १६२७च्या फेब्रुवारी महिन्यात ३ तारखेला हार्लेमच्या बाजारात एक दिवस अचानकपणे या कंदांसाठी ग्राहक कमी झाले. आणि मग ते कमी होतच गेले. मागणी घटतीय, त्यामुळे आता भाव घटतच राहणार आणि आपला तोटा होणार, त्यापेक्षा आत्ताच ते कंद विकलेले बरे असं समजून सगळ्यांनी ते विकण्यासाठी ही गर्दी केली. मग काय विचारता? मागणीच्या मानानं पुरवठा वाढल्यानं ट्यूलिपच्या किमती आणखीनच धडाधड कोसळायला लागल्या. कालांतरानं मग जे कंद पूर्वी ५००० फ्लॉरिन्सला विकले जात होते ते ४००० फ्लॉरिन्स, ३००० फ्लॉरिन्स असं करत-करत शेवटी जेमतेम १०० फ्लॉरिन्सला विकले जायला लागले! त्याचा परिणाम अर्थातच भयानक झाला. असंख्य व्यापाऱ्यांचं आणि ग्राहकांचंही त्यात अतोनात नुकसान झालं. शेकडो मंडळी कंगाल होऊन भिकेला लागली. पूर्वी वाढीव भावानं खरीदण्याचे जे करार (फ्यूचर काँट्रॅक्ट्स) कित्येकांनी केले होते ती मंडळी आता ते करार पाळेनात. यावर मग भांडणं सुरू झाली. अनेक वादविवाद, चर्चा यांच्यानंतर १६३६च्या नोव्हेंबरपूर्वीचे करार रद्द ठरवले गेले आणि त्यानंतर करार केलेल्या ग्राहकांना एकूण व्यवहाराच्या १०% रक्‍कम विक्रेत्यानं द्यावी, असं सांगितलं गेलं. या निर्णयानं अर्थातच कोणाचंच समाधान झालं नाही. मग मंडळी कोर्टात गेली. फ्यूचर काँन्ट्रॅक्टस्‌ केलेल्यांना कोर्टाकडूनही काही मदत मिळाली नाही. कारण असे व्यवहार अगोदरच बेकायदेशीर ठरवले असल्यानं या काँन्ट्रॅक्ट्समधले लोक अक्षरश: देशोधडीला लागले आणि अनेक रावांचे रंक झाले! ट्यूलिपचा हा बुडबुडा असा फुटल्यानं नेदरलँडस्‌मध्ये नंतर बराच काळ मंदीचं वातावरण निर्माण झालं.

व्हिलन (खलनायक)

 सरंजामशाही पद्धतीतून युरोपमध्ये भांडवलशाही उभी राहत होती. तो काळ होता १५व्या शतकापासून १८व्या शतकापर्यंतचा. सरंजामशाहीमधे जमीनदार आपल्या आलिशान घरात राहत आणि गावातली आजूबाजूची जमीनही त्यांच्याच मालकीची असे. भांडवलशाहीसाठी कामगार, भांडवल आणि भांडवली नीतिमूल्यं/कायदे या सगळ्यांची गरज होती. पण सरंजामशाहीमध्ये भूदास हे जमिनीला बांधलेले होते. जमीनदार स्वत:साठी मोठी जमीन ठेवून उरलेल्यातले लहान-लहान तुकडे भूदासांना भाड्यानं देत. या भूदासांमध्येही फ्रीमेन, व्हिलेन्स, कॉटेजर्स आणि गुलाम असे बरेच प्रकार आणि पातळ्या होत्या. यातले ‘फ्रीमेन’ हे जमीनदाराला भाडं दिल्यावर इतर काहीही करू शकत. ‘व्हिलेस’ या मंडळींना जमीनदाराची जमीन कसून आणि त्याची इतरही बरीच कामं करून उरलेल्या वेळातच स्वत:ची जमीन कसता येई. त्यांना गाव सोडून कायद्यानं कुठे जाताही येत नसे. कॉटेजर्सना तर दिवसभर जमीनदारांकडे काम करून राहायला फक्त झोपडी आणि खाण्यापुरतं अन्न मिळे. गुलामांना सगळ्यात कमी हक्क असत. थोडक्यात, जमीनदाराची मोठी जमीन, भूदासांना ‘भाड्यानं’ कसायला दिलेले जमिनीचे लहान-लहान तुकडे आणि गुरांना चरण्यासाठी एक सामायिक जमीन असं जमिनीचं वाटप त्या काळी असे. त्याच वेळी इंग्लंडमधल्या लोकरीला भाव चांगला यायला लागला. मग स्वत:च्या मेंढ्यांना चरायला जास्त जमीन मिळावी म्हणून जमीनदारांनी सामायिक चरण्याची जमीन कुंपण लावून (एन्क्लोज करून) इतरांच्या गुरांना वापरायला परवानगी नाकारायला सुरुवात केली. यातूनच पुढे ‘एन्क्लोजर’ चळवळ चालू झाली. शेवटी त्या वेळचं सरकार हे जमीनदारांच्याच बाजूनं असल्यानं त्याविषयीचे ‘ॲक्ट्स ऑफ एन्क्लोजर्स’ असे त्याविषयी कायदेही करण्यात आले. यामुळे मग अनेक भूदासांना शेती करणंच अशक्य होऊन बसलं. मग शेतीतल्या लोकांचा लोंढा शहरांकडे यायला लागला. ही मंडळी शहरांत येऊन लहानसहान कामं करणं, भीक मागणं याबरोबरच चोऱ्या-माऱ्याही करायला लागली. तेव्हापासून या ‘व्हिलेन’वरूनच ‘व्हिलन (खलनायक)’ हा शब्द निघाला. पण पुढे-पुढे त्यातली हुशार, तरुण मुलं यंत्रांवर कामं करायला लागली आणि अशा तऱ्हेनं जगातले पहिले औद्योगिक कामगार तयार झाले.

 अशी आली तुझी आठवण अचानक

 जशी झाडांच्या गर्दीतून निघावी पाऊलवाट

 उभा आहे मी घनदाट भूतकाळाच्या जंगलात

 एकदा एक संकटात सापडलेली स्त्री आपल्या मदतकर्त्याला विचारते, “मी तुमच्या मदतीची परतफेड कशी करू?” त्यावर तो म्हणतो, “बाईसाहेब, जेव्हापासून पैशाचा शोध लागलाय तेव्हापासून या प्रश्‍नाला एकच उत्तर आहे.”