बाप

(बाप म्हणतो, “आपणात भांडणे किती धर्मही बुडत चालला. महारांना म्हणतात शिवा. आचार उरला नाही तर कसे होणार?”)

काय सांगाल लोकांस लोकांमध्ये नसे बळ
ऐक्य नाही धर्म नाही कोठे दाबाल रे कळ।।

स्पृश्यास्पृश्य तसे अन्य वाद माजून राहिले
भ्रष्टता माजली सारी हलकल्लोळ माजले।।

ब्राह्मणब्राह्मन्यांची खडाजंगी असे सदा
जागा न उरली कोठे बाळा टाकावया पदा।।

हिंदू आणि मुसलमान पाण्यात बघती जसे
विश्वास लव ना उरला बाळ होईल रे कसे।।

धर्मास लागतो डाग धर्म श्रेष्ठ सनातन
आचारा बुडवितात माझे हे करपे मन।।

धर्म हा प्राण जीवाचा धर्मार्थ सर्व पाहिजे
त्याच धर्मास टाकोनी बाळा चित्तांत लाजिजे।।”

मुलगा बोलतो

“बाबा होत किती मदीय हृदयी कालवाकालव
अस्पृश्यापरि मानुतो तरि कसे ते आपुले बांधव
श्रेष्ठाश्रेष्ठ समस्त ढोंग, न असे अस्पृश्य हा मानव
नाही थोर विचार तात दिसतो लोकांतरंगी लव।।

देवाचे घरि पाप घोर करितो अस्पृश्य या लेखुनी
आले नाही जगात खास समजा अस्पृश्य ते होउनी
आम्ही मानव हीन दीन तरितो त्या धर्म हो मानितो
ऐसा धर्म जळो मनुष्यहृदये जो भाजण्या सांगतो।।

कुत्री पोपट डास ढेकुण तशा मुंग्या तशी मांजरे
यांनी ती न विटाळती अपुलि हो स्वप्नांमध्येही घरे
येती पक्षिपशू खुशाल बसती देवालयी निर्भर
जाता ये परि मानवास न तिथे धिक् धिक् असा हा नय।।

कोल्ही ओरडती, स्मशान-वसती, तेथे तया राखुनी
धंदे सर्व गलिच्छ जे सकळ ते प्रेमे तया देवुनी
‘तुम्ही स्वच्छ बना, सुसंस्कृत बना, मालिन्य दूरी करा’
ऐसे हे वदणे गमे खुपसणे घोरव्रणी तो सुरा।।

बाबा एकही त्याजला न दिधला ज्ञानप्रकाशांशु तो
बाबा क्रूरपणा असीम बघुनी मज्जीव हा कापतो
वर्षे कैक हजार मानव परी केले तयांना पशू
नाही दाखविले कधीहि चुकुनी ते प्रेम वा ते असू।।

बाबा घोर कलंक हा अपुलिया ह्या थोर धर्मावरी
डागा मानितसो सुभूषण सदा हा! हा! कसे अंतरी
मानव्या अवमानितो मनुज तो धिक्कारितो प्रौढिने
पाषाणासम जाहलो जरि कशी ही आपुली हो मने।।

देवा मानितसा करी झणि उठा अस्पृश्यता ना उरो
त्यांचे क्लेश विपन्नता विकलता दुर्भाग्य सारे सरो
सारे बंधु बनू खरे निज मने प्रेमे अता रंगवू
मातेला कलहादिकी मुळि अता ना तात हो खंगवू।।”

भलेबुरे सा-यांत आहेत

(बाबा मुसलमानांस आपण सदा नावे ठेवतो परंतु ते सारेच वाईट नसतात. भलेबुरे सा-यांत आहेत.” अशी विचारसरणी मुलगा मांडतो.)

“हिंदु धर्म सामनतेस शिकवी आचार उल्टा परी
इस्लामी जन वागती अधिक ते एकत्र बंधूपरी
अन्या बंधुस आगगाडिमधि तो भेटे मुसलमान जरी
बोलू लागति, एक होति, मिळती, खातील एकत्रही।।

आम्हां संकुचितांतरांस गमते की तो मुसलमान अरी
दृष्टी नाहि विशाल, तीन शतके मागे विहारा करी
देऊ घालवुनी अम्हांस गमते येथून बाहेर त्या
ज्यांच्या येथ अनेक आजवरि त्या झाल्या पिढ्या नांदत्या।।

मातेचे परशत्रु ते विसरतो, आहे मुसलमान तो
ऐसे नित्य कथांतुनी अजुनही काव्यांतुनी दावितो
पोवाडे अजुनी म्हणू गरजती कापा मुसलमान जे
राष्ट्राचे नव प्रश्न खोल बघण्या धी आमुची ना धजे।।

इस्लामी म्हणजे कठोर ठरला दुर्वृत्त पापी ठक
नाही तद्-हृदयास पाप म्हणुनी वस्तू जणू ठाउक
हिंदूंच्या बळजोरिने पळवुनी न्याव्या स्त्रिया सतत
ऐसे नित्य अम्ही जना शिकवितो की हे मुसलमान-व्रत।।

ना हे सत्य मुळी, तयातहि पहा ते नांदती सदगुण
प्रामाणीकपणात नाहि कमती ते तात हिंदुहुन
इस्लामी गवळी न नीर मिसळी, हिंदु कसा तो असे
जो पूर्वग्रह-दूषितांतर नसे त्या सर्व काही दिसे।।

नाना गाव पहा, घरोघर तिथे ते भृत्य प्रामाणिक
इस्लामी दिसतील खेळविति जे प्रेमे मुले बाळक
जे श्रीमंत कुबेर तदभवनिही इस्लामि ते चाकर
निष्ठापूर्वक कामधाम करिती संपादिती भाकर।।

होतो घेत समस्त एकवटुनी अन्योन्य-सत्- संस्कृती
ती रामायणभारतोपनिषदे भाषांतरीली किती
इस्लामी कविंनी, सुकाव्य लिहिले येथील भाषांतुनी
प्रेमे वाढविले कलांस नमुने उत्कृष्ट ते निर्मुनी।।

केली जी रणकंदने विसरुनी हिंदुमुसलमान जनी
माता भारत एक ही सकळिकी वृत्ती मनी आणुनी
जो जो भारतभूमिला पदतळी ठेवील तो तो रिपू
मानोनी, करण्या स्वतंत्र निजभू या तात सारे खपू।।

मोठे संकट दूर आधि करु या बारीक राहो दूरी
मातेच्या हृदयात खोल घुसली ही दास्यरुपी सुरी
होऊ या झणि एक, एक हृदयी तो राष्ट्रधर्म स्मरू
इस्लामी जन तोहि बंधू समजू वृत्ती उदारा करू।।

धर्माचा जरि खोल पाहु तरि तो आत्मा असे एकच
आम्हालाच नको, पहा पडतसे रुढ्यादिकांचा खच
जे तुम्हां दिसतात भेद असती काळ स्थितीच्यामुळे
त्या भेदांसच मुख्य मानुन पहा हे भांडताती खुळे।।

का हा सनातन प्रथित हो, त्याचा कळे अर्थ का
रुढीच्या भजकांस तात मुळि तो नाहीच हो ठावुका
जे सतत्व कुठे दिसेल जगती जे सत्य कोठे दिसे
ते ते घेइ सनातनी जरि खरा, तददृष्टि कोती नसे।।

तत्त्वाची महती असे, न महती व्यक्तीस; सत्याप्रत
सांगो शंकर, बुद्ध, ख्रिस्त, मनु वा पैगंबर प्रेषित
ज्ञानोबा कथु वा कबीर कथु दे एका तुका नानक
जो जो धर्म सनातनी असत तो सतत्त्व-संग्राहक।।

देखा धर्मि सनातनी सगुणही आहे तसे निर्गुण
आहे यज्ञच फक्त देवहि नसे मीमांसकालागुन
बुद्धाला अवतार मानित असो, केला तया आपुला
ही संग्रहकता असे म्हणुन हो हा धर्म आहे भला।।

जैसे ते अवतार मानित असो श्रीरामकृष्णादिक
बुद्धख्रिस्तमहंमहासहि चला मानू जगत्तारक
होते सांगत सर्वदा शिकवित श्रीरामकृष्ण प्रभु
आलिंगील जगा सनातन जरी हा धर्म आहे विभु।।

धर्मनिंदा नको

(बाबा, इतर धर्मांतील उदात्त गोष्टीच आपण बघाव्या. महान धर्मसंस्थापकांची निंदा करणे बरे नव्हे.)

“जो देवास भितो असे अधिक तो, तो उच्च, तो सत्कृती
नाही वंश कुळास मान लिहिले ऐसे कुराणी किती
झाल्या थोर विभूति या जगति ज्या हे विश्व ज्या वंदिते
त्यांना तुम्हिहि मान द्या अरब हे ऐसे कुराण सांगते।।

लोखंडाहुन अग्नि थोर, जल ते अग्नीहुनी उदबळ
वारा वारिहुनी, तयाहुन असे मोठा गिरी निश्चळ
त्या अद्रीहुन थोर जे सदय जे निष्पाप जे अंतर
ऐसे या जगतास नित्य करिते श्रीमत्-कुराण जाहिर।।

आकारी प्रभु तो नसे, विभु महान ना मूर्तिमर्यादित
तुम्ही बंधु समस्त, ईश्वर मनी भावोन जा वागत
शेजा-यास जरी नसे तुझी तू देत जा भाकर
साध्या, सुंदर गोष्टि सांगत अशा शिष्यांस पैगंबर।।

बुद्ध प्रीती कथी अनंत, न असे जी वस्तुमर्यादित
युष्मत्प्रेमजलामबुधीत सगळे राहो जगत् डुंबत
कोणाला दुखवा मुळी न, न कुणा जीवास लावा ढका
आचारा मधुरा सुरम्य असल्या बुद्धोपदेशी शिका।।

पश्चात्ताप खरा मनास तरि तो घेईल विश्वंभर
प्रेमाने जवळी, जरीहि असला दुर्वृत्त पापंकर
घाली बंध्वपराध पोटि सगळे, जैसे तुझे देव तो
तत्त्वे ऐशि उदार सुंदर जगा तो ख्रिस्त हो अर्पितो।।

जे जे सुंदर सत्य हृद्य, उचलू सर्वांहि धर्मातुनी
होऊ थोर सनातनी तरि खरे थोरांस या सेवुनी
‘अकाशामधला तुझा मज असे ठाऊक तो बाप रे’
ऐसे बोलु न पूज्यनिंदन करी तो जीव कैसा तरे।।

काही अन्य म्हणोत मी करिन मच्चित्तास मोठे खरे
जे जे सत्य दिसेल ते नमुनि मी घेईन अत्यादरे
ऐशी वृत्ति सनातनी कुठुनही येवो प्रकाशप्रभा
ओलावा कुठलाहि तो मिळवुनी सदवृक्ष राहे उभा।।

ओलावा हृदयास द्या मिळवुनी ठेवा न ते कोरडे
द्वेषाने जगतात तात उपजे तो द्वेष वाढे नडे
प्रेमाते प्रकटोनिया गुण दिसे तो मुख्य मानूनिया
दूरी दुर्गुण ते करून, झगडू तो स्वर्ग निर्मावया।।

रामोपासक गाणपत्य कुणि वा श्रीकृष्णनामी रत
जैसे एक घरात आज दिसती प्रेमे सुखे नांदत
ख्रिस्तोपासक रामभक्त अथवा पैगंबराला नत
हे एक्या घरि नांदण्यास नसती का तात हो संगत।।

बाबा थोर अपाय ह्या सकळही श्रीमद्विभूती शुभा
पूजावे मनुजे तयांस मिळते जेथून ज्याला प्रभा
सन्यत्सेन असून ख्रिस्ति, बनला तो चीनराष्ट्राग्रणी
राष्ट्राच्या जनकापरी समजती त्या लोक सारे चिनी।।

तो सेनापति नोगि ख्रिश्चन जगद्विख्यात शौर्याकर
त्याते देइ जपान मान न मनी आणीत धर्मांतर
तैसे आपणही खुशाल कुठल्या धर्मास मानो कुणी
होऊ चित्ति उदार, सत्यमय तो पूजू बनोनी गुणी।।

निष्ठा राखुन आपुली, न दुखवू जी अन्यनिष्ठा खरी
अन्याच्या हृदया जरा दुखविणे ती होय हत्या तरी
सांभाळून परस्परांस करुनी घेऊ विकासा चला
देणे हाच धडा समग्र जगता या भारताने भला।।

राहे जीव धरुन देश अपुला कंगाल दु:खी मुका
आहे ध्येय तयास काय? पडतो चित्ति प्रकाशांशु का?
आहे हा जगला कशास जगती प्राचीन हो भारत
देवोनी टकरा अनंत टिकला काळाशि हा झुंजत?।।

स्वातंत्र्या मिळवून काय जगती सांगेल हा भारत?
दास्यी लोटिल काय अन्य जनता होऊन सत्तारत?
ऐश्वर्यी मिरवेल काय जगती मत्तोन्मदांधापरी,
विश्वाला लुटुनी जगास करुनी दुर्मिळ ती भाकरी।।

व्हावा भारत शीघ्र मुक्त तरि तो व्हावा किमर्थ वदा
नाही खास जगामधील असती त्या पोसण्या आपदा
शांताचा जगतास सत्पथ भला दावावया भारत
होतो मुक्त, म्हणून ईश्वरकृपे तो जाहला ना मृत।।

युद्धाचा जगतास वीट लढुनी येईल तो अंतरी
शांतीचा मग त्या तहान हृदयी लागेल तीव्रा खरी
तेव्हा भारत हा स्वतंत्र जगता दावावया सत्पथ
अग्रे होइल, नीट चालविल हा विश्वंभराचा रथ।।

नाना धर्म विभिन्न ते असुनिही प्रेमादरे राहती
शेजारी, शिकवील सर्व जगता ही भारती संस्कृती
हिंदु ख्रिश्चन पारसीक शिखही ते जैन बौद्धादिक
इस्लामी अणखी कुणीहि सगळे नांदोनि निर्मू सुख।।

घेऊ सर्वहि तात! थोर हृदये अन्योन्य जे चांगले
होऊ उन्नत उत्तरोत्तर गळा घालून भावे गळे
शांती शांतिविहीन युद्धनिरता दावावया भारत
आहे हा जगला, न ईश्वरकृपे तो जाहला हो मृत।।

बाबा उदार शुभ उन्नत हे विचार
सर्वत्र भारतजनी करणे प्रसार
नि:शंक निर्भय बनोनी कथावयास
यावे पुढे जनहितास करावयास।।

ते आग पेटविति सर्वहि हाय बाबा
खोटीच दाखविति ऐट आणि रुबाबा
ना भांडणे मिटविती परि वर्धमान
बाबा करोनि अजि कापिति देश-मान।।

लावावया सजति लोक समस्त आग
ना शांतिचा कुणिहि दाखविण्यास मार्ग
ओतीत तेल सगळे विझवी न कोणी
प्रत्येक देशहित हेच मनात मानी।।

लागे कधी तरि जगी मनुजा शिकाया
ना भांडणे हित असे. श्रम वेळ वाया
होऊनिया स्वमनि केणि तरी उदार
लागेच शांत करणे हलके विकार।।

ना ह्यांत तो कमिपणा मच हानि यात
होण्यात उन्नत सदा सुख थोर तात
तो देव ना हृदयि मात्र समीप ओठा
पूजीतसो सकळही अभिमान खोटा।।

जो व्यापितो सकल विश्व, तदर्थ तात
भांडावया उठति, दुर्मति वाटतात
ना देवभक्ति हृदयी अभिमान-भक्त
भांडोनिया सतत सांडिति बंधुरक्त।।

बेधूवरी कर कधी न कुणी उगारी
जो लेकरे प्रभूचि मनि मनात सारी
ना बंधु-रक्त सुखवी जगदीश्वराला
देवा न पूजिति, परी अभिमानतेला।।

होऊन सर्द मनि एक, स्वतंत्र होऊ
विश्वास विक्रम अनंत सुतेज दाऊ
स्वातंत्र्यही मिळविणे न मुळी रणाने
मारू न, आम्हि मिळवू अमुच्या मृतीने।।

न तात युद्धमार्गाने स्वातंत्र्य भारता मिळे
न अत्याचार करुनी सत्य हे मन्मना कळे।।

ऐक्याचा एकजूटीचा नि:शास्त्राचा तसा नव
संदेश द्यावया लोका हजारो लागती युव।।

विचार-जागृती मोठी यदा देशात होइल
उठतील भय-त्यागे तेव्हा स्वातंत्र्य येइल।।

तात म्या काय सांगावे उठोनी मातृभूस्तव
प्रेमे त्यागे जरी शोभू वेळ मोक्षार्थ ना लव।।

बाप बोलतो

विचार बाळ हे खोल जनास रुचतील का
शंका चित्तांत ही माझ्या म्हणून बसतो मुका।।

धर्माच्या कल्पना रुढ स्वातंत्र्यप्राप्तिच्या तशा
तद्विरुद्ध जना गोष्टी वद तू रुचतील का।।

(हे ऐकून मुलगा एकदम आवेशाने म्हणतो.)

ध्येयाचा एक माणूस हलवील उभी वरा
तात! गंभीर चित्तांत विचार करणे जरा।।

म्हणेल जनता मूर्ख हसेल अवमानिल
ध्येयाचा नर तो थोर पद मागे न घेईल।।

नवीन कल्पना लोका रुचते नच तत्क्षणी
उपहासास्पद ठरे कल्पनाप्रसु जो जनी।।

निश्चयाने परी ठाण मांडितो वीर तो यदा
वंदाया येति तत्पाद टाकुन स्वमनोमदा।।

धैर्याने प्रथम नभात एक तारा
ठाके नंतर उडुवृंद येत सारा,
छातीचा नरच धजे जली शिराया
येती मागुन सगळेच येति बाया।।

निर्मी जो पदसगरा तयास मान
त्याला या जगि मिळते महोच्चस्थान
लागे ही पुढति कुणीतरी घुसाया
लागेच प्रथम कुणी तरी मराया।।

कोणीच प्रथम जरी पुढे न येई
सारे प्रेक्षक, जगदुन्नती न होई
ध्येयाचे नरच वरी समाज नेती
घेऊन ध्वज पुढती सदैव हो ती।।

सददृष्टी नच रममाण पार्थिवात
आकर्षी निशिदिन यन्मना उदात्त
श्रद्धेने मरति असे कितीक संत
ध्येयाते जगि करण्यास मूर्तिमंत।।

ध्येयाला चिकटुन नित्य राहतात
आघाता निजशिरि सर्व साहतात
ना घेती पदहि कधी भिऊन मागे
ज्योति प्रज्वलीत यदंतरंगि जागे।।

सत्याला धरुनि मनात सर्वदाही
तेजाने नरवर तो पुढेच जाई
सांगाती मिळति जरी तरी बरेच
थांबे ना पुढति निघेच एकलाच।।

मोहाला करुन दुरी असत्य सांडी
लोभाते करुन दुरी मदा विभांडी
श्रद्धेचा धरुन करी प्रशांत दीप
ध्येयाचे हळुहळु जातसे समीप।।

लोकांचा प्रबळ सुटे निरोध-वारा
दीपाते विझवि विनिर्मि अंधकारा
आशेने ज्वलित करी पुन:पुन्हा तो
पाऊल स्थिरमतिने पुढेच घेतो
सत्याचा धरुन मनी प्रचंड जोर
विघ्नांचा करुन समस्त चूर चूर
निद्रा न, तळमळ होत फार जीवा
अत्युत्कंठित बघण्या स्वध्येय- देवा।।

चित्ताची तगमग होइ, नाहि शांति
दृष्टीला दिसत अखंड दिव्य सृष्टी
कष्टा आमरण करीत, कार्यनिष्ठा
ही दिव्या उठविल अंति सुप्त राष्ट्रा।।

लोकांच्या कळकळ जिंकिते मनाला
विश्वास प्रगटवुनी, करी कृतीला
सौख्याचा अनुपम सोहळा पहाया
लागेल प्रथम जगात या मराया।।

निंदेने न खचत ना चढे स्तुतीने
अंधारी बिकट चढे कडे धृतीने
ज्यावेळी सकळहि बंधू झोपलेले
थोरांनी समयि तशाहि कष्ट केले।।

ज्यावेळी सकळहि बंधु घोरताती
हाकांनी मुळि न कदापि जाग घेती
खोली ना नयन जरीहि हालवीले
थोरांनी समयि अशाहि कष्ट केले।।

एकाकी झटति जगास हर्षवाया
एकाकी उठति तमास संहराया
एकाकी निघति विपत्ति दूरवाया
एकाकी मरति समस्त उद्धाराया।।

ध्येयाचे वरि अपुले सदैव डोळे
ठेवून स्थिर, करि काम तो न बोले
सत्याचा मम पथि अंश तो असेल
माते सद्यश तरि अंति ते मिळेल।।

ऐशी ती हृदयि अखंड वृत्ति शुद्ध
ठेवोनी, करित विरुद्धतेशि युद्ध
सत्याचा धृव नयनांसमोर तारा
राखोनी करित अखंड यत्न सारा।।

एकाकी शिरत पुढे, पडोहि काया
एकाकी धजति पहाड वाकवाया
एकाकी करित कमाल शर्थ यत्न
बांधाया निज पदरात सत्यरत्न।।

लावोनि तनमनवित्त ते पणाला
ध्येयार्थी झिजवित, तात, आपणाला
ओतोनी सकल सुखावरी निखारे
कष्टांना करित सदा मरे अहा रे।।

जाताती मरुन असे जगात थोर
हालांना सहन करुन घोर घोर
मेलेली मति अजिबात ना जयांची
ते तेव्हा उघडिति दृष्टि एकदाची।।

सत्याला कसुन पहाति मृत्युपाशी
सत्त्वाला बघति कसून संकटाशी
ज्वाळांच्या मधुन घुसून वीर जाई
लाटांशी प्रबळ करीत हातघाई।।

घालोनी स्वशिरि किरीट कंटकांचा
हालाचा मिरवुन कंठी हार साचा
मृत्यूला निरखुनिही करीत चाल
भेटाया मुदित अशास विश्वपाळ।।

सोसोनी छळ करुनी अहिंस युद्ध
त्यागाते तळपति दिव्य ख्रिस्त बुद्ध
आपत्ती कितिक तया महंमदाला
आल्या त्या तुडवुन विश्ववंद्य झाला।।

ब्रूनोला हरहर जाळिले जिवंत
सॉक्रेटीसहि मरणा वरीत शांत
सोसोनी सकलहि हाल ते अपायो
प्रस्थापी स्थिरमति सत्य गॅलिलीओ।।

एकाकी प्रथम महान उठे शिवाजी
होते ना प्रथम कुणी तयास राजी
निष्ठेने जनमन तो करी स्वकीय
त्यागाने मिळवित अंति दिव्य ध्येय।।

ऐसा या भुवनि सदा असे प्रकार
ध्येयार्थी बनून जिवावरी उदार
वाटेल न बघत होइ अग्रगामी
ईक्षेने विफल करी न आयु नामी।।

मागोनी मग अनुकारशील लोक
येती हो, धरुन मनात नीट रोख
यासाठी प्रथम कुणी तरी उठावे
लागे, हे खडतर तत्त्व आयकावे।।

महात्माजी व रवींद्रनाथ

(ध्येयार्थी पुरुषांचे वर्णन करुन मुलगा म्हणतो की, आज ह्या भारतात कवींद्र रवींद्रनाथ व मुनींद्र महात्मा गांधी हे दोन थोर ध्येयवादी पुरुष जगाला मार्ग दाखवीत आहेत.)

आजी या सकलहि भारतात दोन
ध्येयार्थी अचल विशालधी महान
ध्येयाच्यास्तव झटती सदैव तात
अश्रांत श्रम करिती पुढेच जात।।

टागोर प्रथित तसेच थोर गांधी
पुण्यात्मे उभय प्रसिद्ध ध्येयवादी
दोघांनी बघुन जगातले प्रकार
केला हो निशिदिन अंतरी विचार।।

युद्धे ही बघुन जगातील अघोर
स्वार्थाची निरखुन लालसा अपार
सत्तेची बघुन जगातील घमेंड
दोघांचे हृदय ते विदीर्ण ते दुखंड।।

सत्तेचा कारुन विशंक दुष्प्रयोग
लोकी या सृजन अनंत दु:खभोग
तोफांनी करुन जगास या गुलाम
गर्वाने मिरवित हे खल प्रकाम।।

लोकांना लुटुन करुन स्वीय दास
शक्तीने हरुन मुखामधील घास
दावोनी अहरह पाशवी कृतीते
गर्वाने स्तविति पुन्हा स्वसंस्कृतीते।।

कल्याणा करित असो अम्ही जगाचे
टेंभा हा मिरविति, सर्व दंभ साचे
मारोनी शर, वदतात पुष्पवृष्टि
दु:खाने भरिति नृशंस सर्व सृष्टी।।

पाहोनी सकल जगामधील दंभ
दुष्टावा बघुन जगातला अबंध
स्वार्थाचे बघुन हिडीस हे स्वरुप
दोघांच्या हृदयि विचार ये अमूप।।

जीवात्म्या करित निबद्ध यंत्रशक्ति
निर्मोमी हृदयि अदम्य स्वार्थभक्ति
देहाचे सकळ गुलाम होत दास
आळा ना मुळिहि तसेच वासनास।।

मी मोठा प्रबळ जगात श्रेष्ठ मीच
तोरा हा मिरविति उद्धतांत नीच
देहाला सुखविति पुष्ट तो करोनी
जाते हे हृदय सदा परी मरोनी।।

लाभावी निजवनलागि तूपपोळी
अन्यांची करित खुशाल राखहोळी
बांधाया निज रमणीय बंगल्यास
ठेवावे करुन जगास सर्व दास।।

होवोनी सकल जगात जेवि देव
दास्या ठेवुन इतरांस सर्वदैव
ना लज्जा तीळहि मनात, थोरवीच
वाटे ही, किति तरि लोक होत नीच।।

मोटारी उडविति तेवि ती विमाने
मोठाले अमित अजस्त्र कारखाने
याला ते वदति समस्त संस्कृती की
ठेवावे खितपत मात्र अन्य पंकी।।

‘मारावे इतर’ वदेल संस्कृती न
चित्ताची पशुसम वृत्ति ही निहीन
सर्वांचा जरि रमणीय तो विकास
जागा ती तरिच असेल संस्कृतीस।।

तुम्हाला जरि रुचते स्वतंत्रता ती
अन्या का पकडुन ठेविता स्वहाती
पृथ्वीचा जणु दिधलाच ताम्रपट्ट
राष्ट्रांना अबल करीत नित्य गट्ट।।

गर्वांध प्रबळ बनून पाश्चिमात्य
औद्धत्या प्रगट करी सदैव व्रात्य
ना त्याला हृदय जणू नसेच भाव
चोराचेपरि लुटुनी फिरुन साव।।

‘ज्याची ही प्रियकर भूमि तेथ त्याने
नांदावे, प्रगति करीत ती सुखाने
राष्ट्रे ही सकळ असोत ही स्वतंत्र
सांभाळू सकल मिळून विश्वयंत्र।।

घेऊ या करुन समस्तही विकास
दावू दे निखिल जन स्वयोग्यतेस
दावू दे अखिल जना स्व-सुंदरत्व
सर्वांना प्रकटवु दे विशिष्ट स्वत्व।।

उद्यांनी सकल फुलोत या जगाच्या
जावे ना पथि मुळिही कुणी कुणाच्या
राष्ट्रांनी करुनि अशी जगी व्यवस्था
निर्मावे मधुर अपूर्व शांतिगीता।।

घेवोनी गुणलव जो असे पराचा
साठा तो करु हृदयी अमोल त्याचा
वक्षाची पसरति दूर दूर मूळे
ओलावा मिळविति, ना म्हणून वाळे।।

तैसे या जगति करुन मानवांनी
घेवोनी किरण समीप वा दुरूनी
उत्कर्षा झटुन करीत हो रहावे
वाढोनी, जगति सुखास वाढवावे।।

सत्पुष्पे विविध फुलोत संस्कृतीची
अर्पू त्या प्रभुस मनोज्ञ माळ त्यांची
ती निर्मी मधुर जसा ध्वनी सतार
सदगंधा वितरिल हाहि दिव्य हार।।

भेटू या, ग्रहण करु परस्परांचा
आनंदे जरि दिधला सदंश साचा
ना घ्यावा ग्रह विपरीत तो करून
मोती ते मिळत बघाल जै बुडून।।

शेवाळ प्रथम वरी तुम्हां दिसेल
मोती ना वरवर खोल ते असेल
पंकाते विसरुन पंकजा विलोकी
नांदावे गुणवरणार्थ सर्वलोकी।।

लोकी या किति तरी दु:ख हो स्वभावे
भांडोनी सतत किमर्थ वाढवावे
केला या भुवनि विनाश मानवांनी
सामक्षा दिसती पहा स्वलोचनांनी।।

झाले जे विसरुन सर्व आज जाऊ
देवाला निशिदीन अंतरंगि गाऊ
निर्मू या सकल जगात बंधुभाव
वाढाया विपुल असो सदैव वाव’।।

संदेशा वितरित ह्या जगा रवींद्र
वाणीने मधुर नितांत हा कवींद्र
वाटे हा रवि म्हणजे मुकुंद-वेणु
वंदावा निजशिरि तत्पदाब्ज-रेणु।।

विश्वाला विसरविती दुराग्रहाते
सध्याची उपनिषदे यदीय गीते
आकाशी विहरत जो सदा पवित्र
मांगल्या पसरित नित्य यच्चरित्र।।

जो अंतर्बहि रमणीय निष्कलंक
मोठे यद्-हृदय गंभीर जे विशंक
जेथे ते अगणित स्वार्थ माजलेले
तेथेहि धृतिमति हे रवींद्र गेले।।

गावोनी गव हृदयंगम स्वगीते
स्थापोनी गुरुतर विश्वभारताते
एकत्र स्थिर करि पूर्व-पश्चिमेला
जो होता भ्रम विलयास आज गेला।।

गांधीही असुन असेच ध्येयवादी
स्वातंत्र्य स्वजनहितार्थ घेति आधी
होईल स्वजन यदा खरा स्वतंत्र
देता येइल जगतास शांतिमंत्र।।

गांधी हे परम पवित्र दीनबंधु
दारिद्रयी समरस होति प्रेमसिंधु
उद्धारा कथिति नवीनसा उपाय
त्यागाने तळपति तेज ते न माय।।

फुलासमान कोमळ मुलासमान निर्मळ
विशाल अंबरासम गंभीर अंबुधीसम।।

वसुंधरेसम क्षमी गिरीपरी सुनिश्चळ
पवित्र गांगतोयसा विशुद्ध सत्य यदबळ।।

अपाप कोकरापरी सतेज केसरी जसा
अथांग प्रेमसागर तमास दूर सूर्यसा।।
अनाथ-दीन-वत्सल उदार अब्द-सदृश
सहानुभूतिनिर्झर सुधेसमान यद्यश।।
विरक्त जो शुकापरी सहा रिपूंस जिंकिता
प्रबुद्ध वाक्पतीसम धुरीण सर्व जाणता।।

गाणे

धरु चरणासी। वंदु या महापुरुषासी।।
फासावरि जरि कुणि चढवील
देइल त्याला प्रेम-निर्मळ
अशुभ मनी ना कधीहि चिंतिल
मंगलराशी।। वंदु....।।

दारिद्रयाशी समरस होत
कटिला पंचा एक लावित
अनाश-रोगग्रस्ता धरित
निजहृदयासी।। वंदु....।।

अगणित अनुभव नानापरिचे
मेळवुनी ते बहुमोलाचे
प्रश्न सोडवीत जीवनाचे
थोर महर्षी।। वंदु....।।

लाखो लोकांची चपल मने
घेतो वेधुन निज वचनाने
सर्वांनाही शांत ठेवणे
यत्कृति ऐशी।। वंदु....।।

घोर समयिही पुढे जो सदा
पुढे टाकिले फिरवी न पदा
लागू देई ना मदबाधा
निजचित्तासी।। वंदु....।।

स्वकीय दोषां उघडे करितो
दुस-याचे गुण सदैव बघतो
चूक पदरि घेउनी दावितो
थोर मनासी।। वंदु....।।

अविरत करणे सत्यशोधन
अविरत करणे सत्यचिंतन
अविरत करणे सत्याचरण
ध्यास हा ज्यासी।। वंदु....।।

जगा अहिंसा व्यापक शिकवी
मनानेहि जो कुणा न दुखवी
आपण करुनी इतरां करवी
कृति-शूरासी।। वंदु....।।

नि:शस्त्राचे शस्त्र निर्मुनी
पद-दलितांचे करी देउनी
प्रयोग पही सदैव करुनी
कर्मयोग्यासी।। वंदु....।।

क्षमा सहनशीलता अभयता
सत्यभक्ति तशि सत्याग्रहता
यांच्या जोरावरी मिळविता
स्वातंत्र्यासी।। वंदु....।।

जगातून या तरवारीला
जगातून पाशवी बलाला
दूर कराया उभ्या राहिल्या
धृति-मूर्तासी।। वंदु....।।

जगातून या दारिद्र्याला
जगातून या गुलामगिरिला
दूर कराया घेता झाला
संन्यासासी।। वंदु....।।

गरिबांना जो बंधू वाटे
पतितांना जो पावन वाटे
दु:खितास जो त्राता वाटे
अहा ऐशासी।। वंदु....।।

बुडत्याला जो तारक वाटे
बद्धांना जो मोचक वाटे
स्फूर्तिप्रद जडजीवा वाटे
चला हो त्यासी।। वंदु....।।

हास्य जयाचे अतीव सुंदर
संकटातही शांत मनोहर
प्रेम पिकविणे या पृथ्वीवर
ठावे ज्यासी।। वंदु....।।

लोकां कैशा मिळेल भाकर
स्वातंत्र कसे मिळेल लौकर
हृदयि कसा येइल परमेश्वर
चिंता ज्यासी।। वंदु....।।

विश्वधर्म सत्याचा पाळी
विश्वधर्म प्रेमाचा पाळी
सत्यप्रेमास्तव ती जगली
मूर्ती ज्याची।। वंदु....।।

स्वतंत्रता अर्पिणे भारता
परिहरणे ही जगत्क्रूरता
दाखवुनी प्रेमाच्या पंथा
ध्येय हे ज्यासी।। वंदु....।।

केवळ सुखलालसा नसावी
सत्यसुंदरा कृती असावी
प्रेमाने ही सृष्टि भरावी
इच्छा ज्यासी।। वंदु....।।

असे हे गांधि पुण्यात्मे करीत चिंतना सदा
भारतामधली माझ्या कशी ही हरु आपदा।।

सदैव ही मना चिंता लागली शांति ना असे
अंतर्ज्वलित ज्वालाद्रि तेवि तन्मूर्ति ती दिसे।।

हसे वरी जरी गोड आत ती आग पेटली
कशी मी हसवू माझी थोर भारत माउली।।

पस्तीस कोट हे बंधु दरिद्रदेव हे सखे
गुलाम, सुखशांतिला ज्ञानाला सर्व पारखे।।

संस्कृती मारिली जाते व्यसनेही बळावती
कशी मी थांबवू माझ्या राष्ट्राची ही अधोगती।।

उपाशी असती लोक शोकपीडित आर्तसे
अंधार भरला सारा यांना मी सुखवू कसे।।

तळमळे तडफडे जीव महात्मा गांधिंचा सदा
स्वातंत्र्य-सुख- ल्लाभ बंधुंना होइ तो कदा।।

लढला आफ्रिकेमाजी चंपारण्यामध्ये लढे
खेडाजिल्ह्यातही भांडे, भांडे बार्डोलिच्या मध्ये।।

हजारो करिती कष्ट नाम गेले दिगंतर
वंद्य स्तव्य महान गांधी वेधी सर्व जनांतर।।

लोकांच्या सुखदु:खाशी एक होईल जो नर
जिवाचे करुनी रान तन्मने तोचि जिंकिल।।

महात्मा गांधि हे थोर दु:खार्त-जन-तारक
मरतात जनांसाठी म्हणुनी होति नायक।।

त्याग प्रेम तथा सेवा विशाल मतिही तया
उलगडी जाहले गुंते म्हणून मिळवी जया।।

ध्येयवादी असोनीही व्यवहार न सोडितो
समोर संकटे देखे ध्येय ना परि टाकितो।।

निर्भय-स्वांत शांतात्मा व्यवहार-विदग्रणी
स्फूर्ति दाता भीर्ति-हर्ता तो धुरीण बने जनी।।

ठेवून दिव्यदृष्टीही व्यवहारपटुत्वही
जनांस उठवी कार्या संन्यासी दिपवी मही।।

विशाल दृष्टि ती आहे अपार त्याग तो असे
धडाडी शांतिही आहे उणे काहीहि ते नसे।।

उदार नीतिधर्माने सत्याने जगि निर्भय
सार घेती, करोनीया सर्वधर्मसमन्वय।।

अजातशत्रूसे झाले मुक्तात्मे रिपु ना जया
परि हे दास्य दारिद्र्य पाववीन, वदे, लया।।

रूढींचा दंभपापांचा अन्याय्य- राजनीतिचा
कराया नाश हा ठाके हराय भार भूमिचा।।

भारतातील हे हाल बघून उठती आता
प्रतिज्ञा करिती घोर मिळवीन स्वतंत्रता।।

माझे नि:शस्त्र हे युद्ध असे अंतिम जीवनी
आणील मजला मृत्यु न वा स्वातंत्र्य मज्जनी।।

जिथे चिंतन ते केले सोडिती स्वीय आश्रम
भारत करण्या मुक्त निघती करण्या श्रम।।

अनवाणी दंडधारी सानुली मूर्ति ती उभी
राहिली निकरे धैर्ये दिपली धरणी उभी।।

सोडी सात्त्विक शक्तींचे फवारे भारतामधी
सत्स्फूर्ति संचरे दिव्य उठती मृत तो मढी।।

चालला विश्ववंद्यात्मा निघाला हलले जग
तेजाचे झोत ते सोडी उठले बंधुही मग।।

धर्मयुद्धार्थ ती मूर्ति निघे बाहेर उज्ज्वल
असे युद्ध कधी झाले? नि:शस्त्राचे जिथे बळ।।

धर्मयुद्ध नसे झाले असे कोठे महीवर
अपूर्व घडवी गोष्ट भारती परमेश्वर।।

तात, ते चालले गांधी पायांनी जरि ऊन ते
सत्त्वाची दिव्य शक्तीची प्रभा विश्वात फाकते।।

लाखो येऊन ते लोक घेती दर्शन मर्तिचे
अंतरी स्फूर्तिचे लोट उठती देशभक्तीचे।।

‘मदीय रणविद्येत सेनानी पहिला मरे
या तुम्हां दावितो’ बोले ‘मरावे केवि ते खरे’।।



असे बोलून तो दिव्य धीर गंभीर उत्कट
निघतो मरण्यासाठी तेज:संदीप्त उद्धट।।

माते, रात्रंदिन तळमळे थोर गांधी महात्मा
भूमातेची बघुन विपदा तो जळे अंतरात्मा।।

वार्धक्यीही अनुपम तपे पेटवी राष्ट्र सर्व
कष्टे मोठ्या भरतभुवनी आणिती मोक्षपर्व।।

मोठ्या कष्टे जशि भगिरथे आणिली मर्त्यलोका
स्वर्गंगा, तत्कृतिसम महात्मा करी हे विलोका
आणयाते किति तरि महायास स्वातंत्र्यगंगा
तत्त्यागाला मिति न तुलना निश्चया ना अभंगा।।

आई पूर्वी सुखरत असे जे विलासी अमीर
देशासाठी त्यजुन सगळे आज होती फकीर
लोळावे गे पसरुनी मऊ गादिगिर्दी पलंगी
देशासाठी उठुन बनती आइ ते झाडु भंगी।।

जाते कारागृहि सकळ ते नेहरूंचे कुटुंब
देशप्रीती हृदयि भरली शुद्ध त्यांच्या तुडुंब
होते लाखोपति परि भिकारी जवाहीरलाल
देशासाठी श्रमति किति, ते जसे लाल बाल।।

टाकावे गे मजसम तुवा कोटि ओवाळुनिया
आई! ज्यांचेवरुन मरती देति ते स्वीय काया
मायामोहा तुडवुन अम्हां देशकार्यार्थ जाणे
प्राणा देणे गुणगुणत गे अंतरी दिव्य गाणे।।

जो जो आहे तरुण म्हणुनी त्यास ना राहवेल
सौख्ये त्याला विषसम, पलंगी तया आगलोळ
दीपी घाली उडिस निकरे त्या पतंगासमान
जावू धावू भडकलि चिता देउ देशार्थ प्राण।।

तारुण्याचे समयि असते वृत्ति नि:स्वार्थ माते
तेजस्वी जे झणि रुचत ते मोहिते अंतराते
भीती चित्ता तिळ न शिवते भावनाही उदार
माते, ऐशा तरुण युवकांचेवरी देशभार।।

देशोदेशी तरुण करिती क्रांती ताता सदैव
त्यांचे हाती जननि असते सर्वदा देश-दैव
तुर्कस्थानी तशिच रशियामाजि तैशी चिनात
केली क्रांती तरुण युवकी तत्त्व आणा मनात।।

होतो अग्रेसर तरुण जो, वृद्ध तो पाय ओढी
उन्मात्ताते तरुण नमवी, वृद्ध त्या हात जोडी
उत्साहाते तरुण वरितो, वृद्ध नैराश्यवादी
स्वतंत्र्याते तरुण वितरी, वृद्ध तो नित्य बांधी

भूमातेला सतत विपदी अस्मदाधार एक
आम्ही तीते सजवु करुनी आमुचा रक्तसेक
देशामाजी तरुण जन ज्या कल्पना बाळगीती
तैसी देशस्थिति बनतसे सांगती वंद्य मर्ती।।

‘माझ्यासाठी मरतिल मुदे पुत्र माझे’ जपान
बोले, तेवी वदति सगळे अन्यही देश जाण
ऐशी प्रौढी परि न वदता येइ या भारताला
आई आम्हां तरुणतरुणां लागला डाग काळा।।

भूमातेच्या बघुनि विपदा चैन ना गे पडावे
तद्दास्याला झणि चुरडण्या आइ आम्ही मरावे
आनंदाने निज तनु सुखे मातासेवेस द्यावी
काळोखी जी निजशुभयशा लागली ती पुसावी।।

तान्हाजीची कृति कशि? अम्हां काय बोलेल बाजी?
आई, सारे वरुन वदती ‘प्राण द्या मातृकाजी’
आलिंगावे निज सुत तया राखणे गे घरात
आईबाबा परम अघ ते घ्या विचारा मनात।।

आई वातावरण भरले दिव्य- विद्युत्प्रवाहे
राहे गेही कवण युव तो आज गे सौख्यमोहे
नाही तो गे तरुण, दिसतो वृद्ध नामर्द षंढ
राहे स्वस्थ स्वगृहि जरि है पेटता यज्ञकुंड।।

यावी स्फूर्ति प्रबळ-तर ती रक्त ते सळसळावे
भूमातेच्यास्तव मृति वरावयासआम्ही उठावे
राहो ना ती अशनशयनाची स्मृती अंतरंगा
वेडावोनी अम्हि जननीच्या धावणे बंधभंगा।।

नांदे गेही जननि सुत जो आजला खातपीत
आलापीत स्वनित कवने तो पशू गे खचित
नीच प्राणी परम तदध:पात गे जन्म सात
मातेच्या उद्धृतिसमयि जो लक्ष तेहि न देत।।

आई माझ्याहुन कितिक ते कोवळे सान बाळ
हालांमध्ये हसत असती नाहि का गे कमाल?
‘देशासाठी तनु झिजवु ही’ बाळ ते बोलताती!
मोठ्यांच्याही वच परिसुनी अश्रु नेत्रांत येती।।

स्वातंत्र्याची घुमघुमतसे भारती आज भेरी
व्हावे जागे झणि तरि अता, झोपलो अवेरी
माते, माते अडविशि कशी पाडिशी केवि मोह?
देशद्रोहा करु म्हणशि का? मी असे घट्ट लोह।।

मायापाशी झटदिशि झुगारुन देतात बंधू
होती सिद्ध प्रमुदित मने तो जरि क्लेश-सिंधू
गेही राहू? मरण बरवे त्याहुनी ते विशंक
लावू कैसा प्रियभरतभूमायिला मी कलंक।।

प्राणत्यागे निजयश टिको, नीति ही पूर्वजांची
रोमी रोमी भरलि अमुच्या गोष्ट ही सत्य साची
देऊ प्राणां फिकिर न करु सोडु ना स्वाभिमान
सत्त्वासाठी करित असती थोर ते देहदान।।


न करा अल्पही शोक आईबाबा मदर्थ तो
दु:खाची ही नसे गोष्ट पारतंत्र्यास मी धुतो।।

उपाशी बंधु जे कोटी त्यांना अन्न मिळावाया
करिती यत्न जे थोर त्यात गेलो मरोनिया।।

धन्य या निधना माना वदवे मज फार ना
आईबाबा सुखा माना नीर आणा न लोचना।।”

(इतक्यात एकदम एक गाणे ऐकू येते. तेव्हा मुलगा विचारतो.)

“तात, कोठून हे येते गीत ऐकावया बरे
कोण गातो दिव्य गाणे मोहितो मन्मना खरे।।”

(बाप सांगतो)

“बाळ शेजारच्या गेही कवि एक रहातसे
देशाचा ध्यास त्या नित्य पहाटे रोज गातसे।।

स्वातंत्र्याची दिव्य गाणी खिडकीत बसूनिया
गातसे होत तल्लीन वृत्ति ती पावुनी लया।।”

(मुलगा म्हणतो)

“तात ते ऐकु या गीत अपूर्व मज वाटते
अधीर मम हे कान ऐकाया गान दिव्य ते।।”