मुलगा बोलतो

“बाबा होत किती मदीय हृदयी कालवाकालव
अस्पृश्यापरि मानुतो तरि कसे ते आपुले बांधव
श्रेष्ठाश्रेष्ठ समस्त ढोंग, न असे अस्पृश्य हा मानव
नाही थोर विचार तात दिसतो लोकांतरंगी लव।।

देवाचे घरि पाप घोर करितो अस्पृश्य या लेखुनी
आले नाही जगात खास समजा अस्पृश्य ते होउनी
आम्ही मानव हीन दीन तरितो त्या धर्म हो मानितो
ऐसा धर्म जळो मनुष्यहृदये जो भाजण्या सांगतो।।

कुत्री पोपट डास ढेकुण तशा मुंग्या तशी मांजरे
यांनी ती न विटाळती अपुलि हो स्वप्नांमध्येही घरे
येती पक्षिपशू खुशाल बसती देवालयी निर्भर
जाता ये परि मानवास न तिथे धिक् धिक् असा हा नय।।

कोल्ही ओरडती, स्मशान-वसती, तेथे तया राखुनी
धंदे सर्व गलिच्छ जे सकळ ते प्रेमे तया देवुनी
‘तुम्ही स्वच्छ बना, सुसंस्कृत बना, मालिन्य दूरी करा’
ऐसे हे वदणे गमे खुपसणे घोरव्रणी तो सुरा।।

बाबा एकही त्याजला न दिधला ज्ञानप्रकाशांशु तो
बाबा क्रूरपणा असीम बघुनी मज्जीव हा कापतो
वर्षे कैक हजार मानव परी केले तयांना पशू
नाही दाखविले कधीहि चुकुनी ते प्रेम वा ते असू।।

बाबा घोर कलंक हा अपुलिया ह्या थोर धर्मावरी
डागा मानितसो सुभूषण सदा हा! हा! कसे अंतरी
मानव्या अवमानितो मनुज तो धिक्कारितो प्रौढिने
पाषाणासम जाहलो जरि कशी ही आपुली हो मने।।

देवा मानितसा करी झणि उठा अस्पृश्यता ना उरो
त्यांचे क्लेश विपन्नता विकलता दुर्भाग्य सारे सरो
सारे बंधु बनू खरे निज मने प्रेमे अता रंगवू
मातेला कलहादिकी मुळि अता ना तात हो खंगवू।।”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा