पोशिंदा

अवघ्या सृष्टीचा भार
घेऊनिया खांद्यावरी
सदा पोसण्या तयार
सार्‍या जगाचा कैवारी...

कधी ओला कधी सुका
हसे कोरडा दुष्काळ
तुझ्या पाचविला सदा
रिते फ़सवे आभाळ...

काळ्या मातीतले सोने
पीक डोलते शिवारी
भाव मातीमोल येता
घाव बसतो जिव्हारी...

रात दिसाला राबून
सोसुनिया उनवारा
रान पिकवुनी आता
हाती उरला कासरा...

सार्‍या जगाचा पोशिंदा
जग तुझ्याविन खूज
धन्य धन्य आहे राजा
तुझं शेतकरी राज..!

- शिवाजी विसपुते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा