बघ तिला सांगुन

कधी कधी कोणासाठी असलेले आपले शब्द मनातच रहातात.
कधी ते ओठांवर येतात पण तिथेच अडतात.
कधी प्रयत्न करतो पण धाडस होत नाही
असेच काही ‘दुसरी’ कडेही होत असेल…
शेवटी तेच शब्द मुके होतात. आणि म्हणुनच…
म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन !

किती दिवस पहाणार तिला तू खिडकीतुन
तो गुलाबही जाईल एक दिवस कोमेजुन
राहशील फक्त तू जगशील मरुन मरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

किती दिवस बोलणार तू पडद्या आडुन
पोहोचवशील जरी भावना तिला दुसऱ्यांकडुन
“थॅंक्स!” म्हणेल तूला ती त्याचाच हात धरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

किती दिवस घालवणार तू वायफळ बोलुन
बोलायला जाता एक वेगळाच विषय काढुन
एवढ्यात जाईल कोणतरी तेच तिला विचारुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

रोज रोज देशील एसएमएस तू पाठवुन
आतुरतेने हसत तॊ काढेल ती वाचुन
मेमरी फुल झाली की टाकेल डिलीट करुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

तुझा एक एक गुलाब ठेवील ती साठवुन
एक दिवस येईल गुलकंदाची बरणी घेवुन
लग्न ठरतय म्हणत जाईल ती निघुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

घरटा

चिव चिव चिव रे
तिकडे तू कोण रे ?

कपिलामावशी कपिलामावशी
घरटा मोडून तू का जाशी ?

नाही गं बाई मुळीच नाही
मऊ गवत देईन तुशी

कोंबडीताई कोंबडीताई
माझा घरटा पाहिलास बाई ?

नाही गं बाई मुळीच नाही
तुझा माझा संबंध काही

कावळेदादा कावळेदादा
माझा घरटा नेलास बाबा ?

नाही गं बाई चिमणुताई
तुझा घरटा कोण नेई ?

आता बाई पाहू कुठे ?
जाऊ कुठे ? राहू कुठे ?

गरीब बिचाऱ्या चिमणीला
सगळे टपले छळण्याला

चिमणीला मग पोपट बोले
का गं तुझे डोळे ओले?

काय सांगू बाबा तुला
घरटा माझा कोणी नेला

चिऊताई चिऊताई
माझ्या घरट्यात येतेस बाई ?

पिंजरा किती छान माझा
सगळा शीण जाईल तुझा

जळो तुझा पिंजरा मेला
त्याचे नाव नको मला

राहीन मी घरट्याविना
चिमणी उडून गेली राना

कवी - बालकवी

उंट

क्षितिज नाचले वाळूभवती
वाळु बरळली, ’नाही, नाही.’
अशाच वेळी उंट उगवला;
आणि म्हणाला, ’करीन काही.’
अन मानेच्या बुरुजावरती
चढले डोळे अवघड जागी;
क्षितिज पळाले दूर दूर अन
वाळु जाहली हळूच ’जागी’.
रूप असे पाहुनी अजागळ
भुलले वाळूचे भोळेपण;
आणि तिच्या त्या वांझपणावर
गळला पहिला सृजनाचा क्षण.


उंट चालला वाळूवरुनी
वाळु म्हणाली, ’आहे, आहे.’
...खय्यामाने भरले पेले;
महंमदाने रचले दोहे.
हा यात्रेकरु तिथे न खळला.
निळा पिरॅमिड शोधित जाई!
तहानेसाठी प्याला मृगजळ;
भूक लागता तहान खाई.
निळा पिरॅमिड दिसला का पण?
...खूण तयाची एकच साधी...
निळा पिरॅमिड दिसतो ज्याला
तोच पिरॅमिड बनतो आधी.

कवी - विंदा करंदीकर

आधीच ठरले होते

आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
एकांतपणी ही माझ्या साथ तु येते
कळत न कळत गीत तयार होते
योगा योग म्हण नाही तर अंधश्रधा
पण लाखोंच्या दुनियेत मन तुझेच का होते ?
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
टाळतो मी , जाळतो मी, तरी ही
मनापुढे कित्येकदा हारतो मी
स्वप्नात ही तुझाच वावर
झोपेत ही मुखी नाव तुझेच येते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
नाही कळत जगाला जगापलिकडे हे जाते
"कृष्ण, कृष्ण "करीत मीरा विष ही पीते
ठरविले होते आधीच त्याने म्हणुन हे होते
मान न मान तु पण मन गीत तुझेच गाते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते

तू

तू तेव्हा अशी,
तू तेव्हा तशी,
तू बहराच्या बाहूंची.

तू ऐल राधा,
तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची.

तू काही पाने,
तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची.

तू नवी जुनी,
तू कधी कुणी,
खारीच्या गं डोळ्यांची.

तू हिर्वीकच्ची,
तू पोक्त सच्ची,
खट्टीमिठ्ठी ओठांची.

तू कुणी पक्षी:
पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

तुझे नाम मुखी

तुझे नाम मुखी ध्यान तुझे डोळा
व्रुत्ती या चंचळा स्थिरावल्या॥

चिंता भय दुःखे अवघी दूर झाली
अनाथांचा वाली जवळी केला॥

भिकार या जगी इच्छित न मिळे काही
म्हणुनी तुझे पायी भिक्शां-देहि॥

केशवसुत म्हणे देवा दीन-नाथा
तुझे पायी माथा वाहियेला॥


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय

किती पायी लागू तुझ्या

किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तूंते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते

काय गा म्या पामराने
खरडावी बाराखडी
आणि बोलावी उत्तरे
टिनपट वा चोमडी

कधी लागेल गा नख
तुझे माझिया गळ्याला
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला !

सोपेच असतात तुझे केस

सोपेच असतात तुझे केस
सोपीच असते लकेर डोळ्यांची
सोप्याच असतात तुझ्या गाठी
कठीण असते तर्‍हा चोळ्यांची
सोपेच असते मानेचे वळण
सोपीच उतरण निमुळत्या पाठीची
सोपेच असते तुझे पाऊल
कठिण असते वाट दाटीची
सोपाच असतो राग, अनुराग
सोपीच असते तुझी कळ
सोप्या सोपस मांड्यामध्ये
दहा हत्तींचे असते बळ...

कवी-विंदा करंदीकर

दिसली नसतीस तर

रतन अबोलीची वेणी माळलेली
आणि निळ्या जांभळ्या वस्त्रालंकारात
संध्येसारखी बहरलेली तू
तळ्याकाठच्या केवड्याच्या बनात
आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस
तर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावर
हा भुलावणा सप्तरंगी सोहळा
असा सर्वांगांनी फुलारलाच नसता.

आपल्याच नादात तू
पाठ फिरवून परत जाताना
तुझी पैंजणपावले जिवघेण्या लयीत
तशी पडत राहिली नसती
तर माझ्या आनंदविभोर शब्दांतून
कातरवेळची कातरता
आज अशी झिणझिणीत राहिलीच नसती.

अबोलकेपणाच्या गूढ गाढाईने
जाईजुईच्या सान्द्र मंद सुगंधाचा लळा
सहज चुकार स्पर्शाने तू मला लावला नसतास
तर उमलत्या फुलपाखरांची
आणि मुक्याभाबड्या जनावरांची
आर्जवी हळूवार भाषा
इतक्या स्पष्टपणाने मला कळलीच नसती.

तू कशामुळे माझी जिवलग झालीस
ते खरेच मला आता आठवत नाही
पण मला तोडताना
समुद्रकाठच्या सुरुंच्या बनात
मिट्ट काळोखातून चंद्रकोर उगवेपर्यन्त
तू मुसमुसत राहिलीस
हे मात्र मी अजून विसरू शकलेलो नाही.
त्या वेळची तुझी ती आसवे
अजून माझ्या कंठाशी तुडुंबलेली आहेत.
तू तेव्हा तशी मुसमुसली नसतीस
तर माझ्या शृंगाराचा अशोक
आज करुणेच्या आरक्त फ़ुलांनी
असा डवरलाच नसता.

तू तेव्हा आकाशा एवढी विशाल
आणि अवसेच्या गर्भासारखी दारूण
निराशा मला देउन गेली नसतीस
तर स्वत:च्याच जीवन-शोकांतिकेचा
मनमुराद रस चाखून
नि:स्संग अवधूतासारखा
मी या मध्यरात्रीच्या चांदण्यात
असा हिंडत राहिलोच नसतो.

तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस
माझी सशरीर नियती होतीस.
तसे नसते तर आज जो काय मी झालो आहे
तो झालोच नसतो.

कवी-बा.भ.बोरकर

अरे संसार संसार

अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर !

अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं

अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं !

अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड

अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे

ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन्‌ दुःखाले होकार

देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !

अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार

असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार !

कवियत्री - बहिणाबाई चौधरी

मृत्यु

भूक

भूक हव्याशापोटी धावणारी
उपाशीपोटी रहाणारी
पैशासाठी पळणारी
कुणाली ती न समजणारी

माणसात मी पशु पहिला
आले अंगावर शहारे दाटून
भूक पैशाची न कधी समजणारी
भरुनी पोट उपाशी येथे सारे

काहीस नसे शास्वत या जगी
मोह असे साऱ्याचा तुज
जाताना रिते हात असतील
उमगुनी तू पैशामागे धावतोस कारे

सहज मिळत गेले की
भूक जाईल वाढत
कष्ट करुनी दाखव
मग भूक तुझी मिटेल

समाधान थोडक्यात मानण्या
शिकणार तू कधी रे
काहीच नाही ह्या जगी
नको धरू मोह साऱ्याचा

भेदभावाचे असे कारण घातक
नको करू रे भुकेचे नाटक
भुकेची आग हि प्रेमाने विझवा

घर

घर थकले संन्यासी : हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यांमधले नक्षत्र मला भासवते

ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
धग ओढुनी संधेवानी आभाळ पसरले होते

पक्षांची घरटी होती : ते झाड तोडले कोणी
एक एक ओंजळी मागे असतेच झर्यांचे पाणी

मी भिऊन अंधाराला, अडगळीत लपूनी जाई
ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई

कवी-ग्रेस

फुलपांखरूं

फुलपांखरूं !
छान किती दिसतें । फुलपाखरूं

या वेलीवर । फुलांबरोबर
गोड किती हसतें । फुलपांखरूं

पंख चिमुकलें । निळेजांभळे
हालवुनी झुलतें । फुलपांखरूं

डोळे बरिक । करिती लुकलुक
गोल मणी जणुं ते । फुलपांखरूं

मी धरुं जाता । येई न हाता
दूरच तें उडते । फुलपांखरूं

कवी- ग.ह.पाटील

गवतफुल

रंगरंगुल्या, सानसानुल्या
गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे सांग लागला
सांग तुझा रे तुझा लळा

मित्रासंगे माळावरती
पतंग उडवित फिरताना
तुला पाहिले गवतावरती
झुलता झुलता हसताना

विसरुनी गेलो पतंग नभिचा
विसरून गेलो मित्राला
पाहुन तुजला हरवुन गेलो
अशा तुझ्या रे रंगकळा

हिरवी नाजुक रेशिम पाती
दोन बाजुला सळसळती
नीळ निळुली एक पाकळी
पराग पिवळे झगमगती

मलाही वाटे लहान होऊन
तुझ्याहुनही लहान रे
तुझ्या संगती सदा रहावे
विसरून शाळा, घर सारे

कवियत्री-इंदिरा संत

डोक किर्र करू नको

कधी हे करू नको
कधी ते करू नको
बस झाली राणी आता
डोक किर्र करू नको

कधी म्हणते हे आण
कधी म्हणते ते आण
खिसा फाटतो माझा इथे
बापाच माझ्या नाही दूकान

तुला ते गिफ्ट देण नको
ते रोज लिफ्ट देण नको
बस झाली राणी आता
डोक किर्र करू नको

कधी म्हणते मुलशि डयाम
कधी म्हणते खड़कवासला
माय बाप आहेत माझे
उभा आडवा त्यांनीच पोसला

ते तुझ रुसन नको
रस्त्याच्या कड्याला बसन नको
बस झाली राणी आता
डोक किर्र करू नको

कधी म्हणतेस खोट बोलतोस
कधी म्हणतेस कशाला झेलतोस
भेटायची इच्छा नव्हती तर
कशाला एवढा त्रास घेतोस

बेसिकली आता तूच नको
दूर नको.. जवळ नको..
इथ भेटली तर भेटली
वर पुन्हा भेटू नको
- शशांक प्रतापवार

प्रणयी सकाळ

आयुष्य कसं जगायचं

चांदणं माळून स्वप्नांना लेऊन

चांदणं माळून स्वप्नांना लेऊन
शब्द फुलांचा सुगंध घेऊन तू येतेस
आनंदाची पखरण जेव्हा तू करीत जातेस
काय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस..

अंबराची शाल निळी अंगावर ओढून
निळाईच्या रंगाने तू अशी बरसतेस
श्रावणाच्या उन्हात, इंद्रधनुष्य फुलवतेस
काय सांगू तेव्हा, तू कित्ती गूढ दिसतेस

निराश मनाला, पुन्हा उभारी,
हळुवार साद, शब्दात तुझ्या, अलवार तू घालतेस
बेभान भरारी, माझ्या स्वप्नांना, पंख तुझे तू देतेस
काय सांगू तेव्हा, तू निळाईच असतेस !!!


कवी - अनिल

ती मधुरात्र

आजही आहे माझ्या मधुरात्र ती लक्षात ग,
चांदणे अवघ्या तनुवर चंद्र अन् वक्षात ग।

उत्तररात्रीतही उतरेना उन्मत्त ते आवेग ग,
उत्तर ना यास उतारा लगाम ना वेग ग।

स्मित ते विसरु कसे स्मरतो हरेक नखरा ग,
लज्जा खोटी रागही लटका, हां भाव तुझा न खरा ग।

करू नकोस उगाच सये रुसण्याचे रूक्ष बहाणे,
मार्दवाची आर्जवे करून वेडावती शहाणे।

खेळ केला तारकांनी चंद्र वेडावला बिचारा,
पूर ओसरून गेला कोरडा वेडा किनारा।

घे मला जवळि आता दूर लोटू नको गडे,
कोसळावे काय आता संयमाचे उंच कड़े।

रातराणीच्या फुलांचा गंध हां विरेल ग,
निशेस्तव रातकिडा रातदिन झुरेल ग.

स्वप्नांची परीक्रमा…..!!!

सांभाळते आता मीच माझं स्वप्नं….
देणार नाही तूला…..चुकूनही उसनं….
जमतील तसे फटकारे मारीन ब्रशचे…..
मागणार नाही तूझ्याकडे आभाळ रंगाचे…..!!
माझी स्वप्नं अलगद पापण्यांवर ठेवेन माझ्या….
मागीतली तरी तु ……देणार नाही तूला….

तशी आधीपसूनच जपते …..फूलपाखरं स्वनांची….
फूलपाखरंच ती रे……एकजात हळवी….!!!
पायवाट होती फूलांची……काळजात छळवी….
स्वप्नांचे वेचे घातले ओच्यात माझ्या…..
दिली गर्भरेशमी नक्काशी….तूच ना रे पदराला….

बघून येते माझी मीच आधीसारखी…
नाहीतरी एकटीच होते….राहीन एकटी…
येवू नकोस… आता तिथेच तु थांब…..अस्साच रहा उभा….
मी करून येते स्वप्नांची परीक्रमा…..
फूलांसारखी स्वप्ने येतात का रे आभाळाला…??

कारण…..
कोणाच्यातरी स्वप्नांनी आज…
केली म्हणे…..आत्महत्या…!!!

माणसाचे मन

घर असावे घरसारखे

घर असावे घरसारखे नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती

त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी
सूर जुळवे परस्परांचे नकोत नुसती गाणी

त्या अर्थला अर्थ असावा नकोत नुसती नाणी
अश्रूतुनी प्रीत झरावी नकोच नुसते पाणी

या घरट्यातूनी पिलू उडावे दिव्य घेऊनी शक्ति
आकाश्याचे पंख असावे उंबरठयावर भक्ति

संत नामदेव आरती




जय जयाजी भक्तरायां | जिवलग नामया |
आरती ओवाळिता | चित्त पालटे काया ||धृ.||

जन्मता पांडुरंगे | जिव्हेवरी लिहिले |
शतकोटी अभंग| प्रमाण कवित्व रचिले ||१||

घ्यावया भक्तिसुख | पांडुरंगे अवतार |
धरुनियां तीर्थमिषें | केला जगाचा उद्धार || जय.||२||

प्रत्यक्ष प्रचीती हे | वाळवंट परिस केला |
हारपली विषमता | द्दैतबुद्धी निरसली || जय.||३||

समाधि माहाद्वारी श्रीविठ्ठलचरणी |
आरती ओवाळितो | परिसा कर जोडूनी | जय जयाजी ||४||

संत तुकाराम आरती

आरती तुकारामा | स्वामी सदगुरुधामा |
सच्चिदानंद मूर्ति | पाय दाखवी आम्हां ||१||
आरती तुकारामा ||ध्रु.||

राघवें सागरांत । पाषाण तारियेलें |
तैसें तुकोबाचे । अभंग रक्षियेले ||२||

तुकितां तुलनेसी | ब्रह्मा तुकासी आले |
म्हणोनि रामेश्वरें | चरणी मस्तक ठेविलें ||३||

एकनाथ महाराजांची आरती




आरती एकनाथा | महाराजा समर्था |
त्रिभुवनीं तूंचि थोर | जगद् गुरु जगन्नाथा || धृ.||

एकनाथ नाम सार | वेदशास्त्रांचें गुज |
संसारदु:ख नासे | महामंत्राचें बीज || आरती. ||१||

एकनाथ नाम घेता | सुख वाटलें चित्ता |
अनंत गोपाळची | घणी न पुरे गुण गांता|| आरती. ||२||