राष्ट्रध्वजाचा अपमान टाळावा

२६ जानेवारी व १५ ऑगस्ट या दिवशी आपण राष्ट्रीय ध्वज उभारतो. आपल्या सदऱ्यावर
लावतो; परंतु नंतर हेच राष्ट्रीय ध्वज दुसऱ्या दिवशी, रस्त्यावर, कचऱ्यात,
बसस्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर, कुठेही चुरगळलेल्या अवस्थेत, फाटलेल्या
अवस्थेत पायदळी तुडविले जातात. याचा अर्थ आपण आपल्या देशाची शान पायदळी
तुडवितो. असे इतस्तत: विस्कटलेले राष्ट्रध्वज पाहिले की मनाला प्रचंड यातना
होतात.
याबाबत सरकारने, सामाजिक संस्थांनी ज्येष्ठ नागरिकांनी, दक्ष
नागरिकांनी काही उपाय शोधले पाहिजेत. राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्याकरिता
पुढील काही उपाययोजना सुचवाव्याशा वाटतात.
सर्व शाळांमध्ये राष्ट्रध्वज
उभारून राष्ट्रीय सण सााजरे होतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रत्येक
वर्गातून राष्ट्रध्वज गोळा करावेत व मुख्याध्यापकांकडे सुपूुर्द करावेत.
सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा जवळच्या शाळेत अथवा जवळच्या पोलीस
स्टेशनमध्ये राष्ट्रध्वज जमा करावेत. याकरिता शाळेने पोलीस स्टेशनने डबे
ठेवावेत. रेल्वे स्टेशन अगर बसस्टॉप वा इतर सार्वजनिक ठिकाणी पडलेले
राष्ट्रध्वज नागरिकांनी कर्तव्यदक्ष भावनेने जवळच्या बस डेपोमध्ये अथवा
सरकारी कार्यालयात, पोलीस स्टेशनमध्ये जमा करावेत. स्थानिक समाजसेवक
संस्थांनी आपआपल्या विभागातील रस्त्यांवरील व कचऱ्यात पडलेले राष्ट्रध्वज
गोळा करण्याची व शासनाकडे जमा करण्याची जबाबदारी स्वीकारावी. शासनाने सर्व
जमा केलेले राष्ट्रध्वज योग्य रीतीने नष्ट करण्याकरिता तात्पुरत्या
स्वरूपात विशेष कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वज
नष्ट करताना आदरपूर्वक व सन्मानाने नष्ट करावेत. देशातील प्रत्येक राज्यात
याबाबत दक्षता घेऊन राष्ट्रध्वजाचा अपमान टाळावा.
कागदी लहान आकाराचे
राष्ट्रध्वज, प्लास्टिकचे काडीवाले राष्ट्रध्वज, धातूचे राष्ट्रध्वज असे
वेगवेगळे ध्वज जमा करावे. धातूचे राष्ट्रध्वज पुन्हा वापरता येणे शक्य
असते. ते जपून ठेवावेत. शासनाने अशा जमा केलेल्या विविध प्रकारच्या
राष्ट्रध्वजांची आदरपूर्वक व योग्य रीतीने विल्हेवाट लावावी.
वरील
उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत यात शासनाला सुधारणा करणेही शक्य आहे.
यातील किमान ५० टक्के उपाययोजना जरी अंमलात आणल्या तरी राष्ट्रध्वजाचा
होणारा अपमान टाळता येईल. त्याकरिता देशातील सर्व शाळांनी, समाजसेवी
संस्थांनी, सरकारी कर्मचाऱ्यांनी, कर्तव्यदक्ष नागरिकांनी ही गोष्ट मनावर
घेतली पाहिजे.

-दर्शाना मंचेकर
manchekardarshana@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा