ब्रम्हगुप्त
ब्रम्हगुप्त हा एक प्रतिभाशाली भारतीय खगोलशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याचा जन्म शके ५२० (इस. ५९८) मध्ये झाला.
ब्रम्हगुप्त व्याघ्रमुख राजाच्या राज्यसभेत खगोलशास्त्रज्ञ होता. व्याघ्रमुख राजा उत्तर गुजरातचा प्रमुख होता. त्याची राजधानी भिनमाळ येथे होती. भारतात सातव्या शतकात ह्युएनत्संग ह्या परदेशी प्रवाशाचे आगमन झाले. त्याचेही आपल्या प्रवास वर्णनात भिनमाळसंबंधी मोठ्या गौरवाने लिहिले आहे. अल्बेरुणी हा व्यासंगी इतिहासकारही भिनमाळसंबंधी आवर्जून लिहितो. ब्रम्हगुप्तच्या वडिलांचे नाव जिष्णुगुप्त असून आजोबांचे नाव विष्णुगुप्त असे होते. ब्रम्हगुप्त जातीने वैश्य होता. ब्रम्हगुप्त हा वराहमिहीराचा शिष्य असावा. वराहमिहीराचे वास्तव स्थान उजनी होते. ते भिनमाळच्या जवळपास आहे. त्यावरून ह्या गुरू-शिष्यसंबंधास एक प्रकारे दुजोराच मिळतो. ब्रम्हगुप्तास 'आर्यभटीय', 'पंचसिद्धांतिका', 'बृहतजातक', 'लघुजातक' ह्या ग्रंथांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. कल्याणवर्मा ह्याचा 'सारावली' ग्रंथ त्याने अभ्यासला. ग्रीकांच्या खगोलशास्त्र विषयक ग्रंथाचे ब्रम्हगुप्ताने अवलोकन केले असावे असा अल्बेरुणी चातर्क आहे. त्यामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व अधिक संपन्न झाले.
ग्रंथसंपदा
ब्रम्हगुप्ताने विविध ग्रंथांचे परिशीलन करून ब्रम्हसिद्धान्त व खंडखाद्य ह्या ग्रंथांची रचना केली. ब्रम्हसिद्धान्त हा ग्रंथ ब्रम्हस्फुटसिद्धान्त म्हणून विख्यात आहे. ह्या ग्रंथात खगोलीय गणित व गणित विषयाचा समावेश आहे. खंडखाद्य ग्रंथात प्रामुख्याने खगोलगणिताचा विचार केलेला आहे. ग्रहांचे मंदोच्चे, चंद्र-सूर्य ग्रहणे, दिनमान, ग्रह-नक्षत्रस्थिती ह्याचे सांगोपांग विवेचन त्यात केलेले आहे. ब्रम्हगुप्ताच्या ग्रंथावर सोमेश्वर, वरुणाचार्य, भटोत्पल, पृथूदकस्वामी, आमराज व त्रीविक्रमाचार्य ह्यांनी टीका लिहिल्या आहेत. कोलब्रुकने ब्रम्हसिद्धान्तामधिल अंकगणित व बीजगणिताच्या भागाचे इंग्रजीत भाषांतर केले. ब्रम्हसिद्धान्त लिहिल्यानंतरही लोकांनी आर्यसिद्धान्तच प्रमाण मानला. त्यामुळे लोकांना आकर्षण वाटेल असा खंडखाद्य हा ग्रंथ ब्रम्हगुप्ताने लिहिला. खंडखाद्याचे पूर्व व उत्तर असे दोन विभाग असून त्यात खगोलशास्त्रीय विवेचन आहे. खंडखाद्य म्हणजे गोड मावा हा खगोलशास्त्रज्ञ अभासकांमध्ये फार प्रिय आहे.
ब्रम्हसिद्धान्त का लिहिला याचे विवेचन करताना ब्रम्हगुप्त म्हणतो. :-
ब्रम्होक्तं ग्रहगणितं महताकालेन यत्खिलीभूतं ।
अभिधीयाते स्फुटं तञ्ञिष्णुसुतब्रम्हगुप्तेन ॥
ससाध्य स्पष्टतरं बीज नलिकादियंत्रेण ।
तत्ससंस्कृतग्रहेभ्यः कर्तव्यौ निर्णयादेशौ ॥
ह्या ब्रम्हगुप्ताच्या उद्गारात अगदी स्पष्ट दिसते की, पूर्वीचे ग्रहगणित हे अर्थहीन झाले होते म्हणून नलिका दियंत्राने वेध घेऊन ब्रम्हगुप्ताने पूर्वीच्या सर्व चुका सुधारून आपला सिद्धांत प्रस्थापित केला.
बलख येथील खगोलशास्त्रज्ञ अबू मशार ह्याच्या पुस्तकात ब्रम्हगुप्तच्या सिद्धान्तावरील ग्रहगणित समाविष्ट आहे. खलिफा अलमन्सूर याच्या आज्ञेवरून महंमद-बीन-इब्राहिम-अलफजारी ह्याने ब्रम्हसिद्धान्ताचे अरेबीत भाषांतर केले व त्यास सिंदहिंद असे नाव दिले ब्रम्हगुप्तच्या सिद्धान्ताची त्याच्या आयुष्यात वाखाणणी झाली नाही. परंतु भास्कराचार्यांनी ब्रम्हगुप्तचाच मार्ग स्वीकारला. हे त्याचे सुयश नव्हे काय?
भारतीय खगोलशास्त्राचा सर्वांगीण प्रगतीकार
भारतीय खगोलशास्त्राचा पाया आर्यभटाने घातला हे खरे असले तरी त्याची सर्वांगीण प्रगती ब्रम्हगुप्तानेच केली. ग्रहांचे आकाशातील भ्रमण, मंदोच्चे, पात ह्याचे त्याने संशोधन केले आहे. ह्या संशोधनात त्याची स्वतंत्र बुद्धी दिसून येते. आकाशस्थ ज्योतींचे वेध घेण्यासाठी ब्रम्हगुप्तने स्वतःची यंत्रे तयार केली होती. ब्रम्हगुप्तास अयनगतीचे ज्ञान नव्हते. अयनचलनाची कल्पना त्यास आली असती तर आज भारतीय पंचांगात जो गोंधळ दिसतो त्याचे प्रमाण खात्रीने कमी झाले असते.
ब्रम्हगुप्तने भुव्यास १५८१ योजने आहे म्हणून सांगितले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा