सांग आठवतोय ना तुला ?

सांग आठवतोय ना तुला ?
फिरताना घेतलेला हातात हात तुझा
मोरपिशी मखमली परी
अंगभर शहारलेला स्पर्श तुझा
जेव्हा देशील तो हात हातात कुणाच्या
क्षणभर शहारून .....

..... सांग आठवशील ना मला ?



सांग आठवतोय ना तुला ?
सोबत पाहिलेला तुटताना तारा
काहीतरी मागुया म्हणताना
उजळून आलेला चेहरा तुझा
जेव्हा तुटेल हे मन कुशीत कुणाच्या
सौधात उभी राहून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?


कातरवेळी उगवलेला पुनवेचा चांदवा
दूर राहिलो तरी
न चुकता पहायचा हट्ट तुझा
जेव्हा उगवेल पुन्हा सांजेला देशात कुणाच्या
हलकेच कातरून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?

अवघड वळणावरचा वेडा बहाणा


तू नको नको म्हणताना
श्वासात मिसळलेला श्वास तुझा
जेव्हा भासेल उग्र तो मिठीत कुणाच्या
संकोचात गुदमरून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
हरेक क्षण तो मंतरलेला

तुजवर रचलेल्या कवितांमधून


जिवंत केलेला आभास तुझा
जेव्हा होईल हे शरीर अधीन कुणाच्या
मन माझ्यात गुंतवून .....
..... सांग आठवशील ना मला ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा