बहुला गाय

भगवान श्रीकृष्ण गोकुळात अवतरले होते. नंदराजाच्या घरी गाईंचे मोठे खिल्लार होते. स्वत: कृष्ण गाईंना रानात चरावयास घेऊन जाई. त्या गाईंमध्ये बहुला नावाची एक सुंदर गाय होती. तिचा रंग काळासावळा होता. ती पुष्कळ दूध देई म्हणून तिला बहुला म्हणत. तिची कृष्णदेवावर फार भक्ती होती. एक क्षणभरसुद्धा कृष्णदेवाला ती विसंबत नसे. नेहमी कृष्णाच्या जवळजवळ असावयाची मधून मधून त्याच्याकडे बघावयाची.

कृष्णाची मुरली वाजूलागली तर खाणेपिणे सारे ती विसरत असे व तिच्या डोळयांतून आनंदाश्रू घळघळ गळत. एके दिवशी ह्या बहुला गाईचे सत्व बघावे अशी कृष्णदेवास इच्छा झाली. भक्तांचा अंकित होण्यापुर्वी परमेश्वर त्यांची परीक्षा घेत असतो. गाई घेउन राजेच्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा वनात गेला. यमुनेच्या तीरावर गाई चरू लागल्या. गोपाळ खेळू लागले. त्या दिवशी बहुलेला श्रीकृष्णाने भूल पाडली. बहुला हिरवे हिरवे गवत पाहून चरत चरत लांबवर गेली. कृष्णापासून दूर न जाणारी बहुला कृष्णाला सोडून दूर गेली. तिला स्थळाचे व वेळेचे भान राहिले नाही.

सायंकाळ होत आली. सूर्य मावळण्याची वेळ झाली. कृष्णदेवाने घरी परत जाण्याची खूण म्हणून मुरली वाजवली. सार्‍या गाई गोळा झाल्या. गुराखी कृष्णासह गाई घेऊन घरी निघाले. गोठयातून वासरे हंबरत होती. हंबरून गाई उत्तर पाठवीत होत्या. गाई गोठयात घूसल्या. वासरे कासेला लागली व ढुशा देऊन देऊन भरपूर दूध पिऊ लागली. परन्तु बहुला कोठे आहे बहुलेचा बाळ घरी होता. तिच्या वासराचे नाव डुबा होते .

गोजिरवाणा || बहुलेचा बालक तान्हा ||
काळे त्याचे आंग सुंदर
कपळावरी चांद मनोहर
जसा चन्द्रमा निळया नभावर
तैसा जाणा || बहुलेचा बालक तान्हा ||
खुंट रुप्याचा बांधायाला
सोन-साखळी घालायाला
डुबा आवडे अति सकळांला
मोहन साना || बहुलेचा बालक तान्हा ||

असा तो डुबा. परंतु आज त्याची आई कोठे आहे? आज त्याला पान्हा कोण पाजणार? त्याचे अंग प्रेमाने कोण चाटणार? डुबा एकसारखा हंबरत होता परंतु बहुलेचे प्रेमळ उत्तर त्याला मिळाले नाही. डुबा कावराबावरा झाला. केविलवाणा दिसू लागला.

सायंकाळी बहुला भानावर आली. आपण घोर रानात आहोत हे तिला कळले. तिला यमुना दिसेना; कृष्ण दिसेना; गाई-गोप दिसेनात. कृष्णाची गोड मुरली ऐकू येईना. बहुला घाबरली. तिला रस्ता दिसेना. सर्वत्र घोर रान माजलेले होते. रानकिडयांचा किर्र आवाज होत होता. अरण्यातील श्रापदांचे भयंकर गदारोळ तिच्या कानी पडत होते. बहुला भगवंताचा धावा करू लागली. देवा तुला सोडून मी आज कशी रे गेल्ये? तू मला का धरून ठेवल नाहीस? तुझी मुरली मला का ऐकू आली नाही? हिरव्या हिरव्या गवताला भुलून मी तुला सोडून गेल्ये. मीच पापी आहे;लोभी आहे देवा. कृष्णा ये. मला भेट. मला थोपट. पुन्हा मी तुझे पाय सोडणार नाही.'

इतक्यात काय चमत्कार झाला झाडीत सळसळ आवाज झाला. बहुलेला वाटले कृष्णाच्या पीतांबराचाच आवाज. ती आशेने पाहू लागली. ते पाहा दोन हिरे का तारे ? कृष्णाच्या मुगुटावरचे का ते हिरे? छे! ते हिरे नव्हते ते तारे नव्हते. ते वाघाचे डोळे होते. अरे बाप रे! केवढा प्रचंड वाघ. तो वाघ गुरगुरत बाहेर आला. तो वाघ जिभल्या चाटीत होता. गाईला पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले होते.

वाघ पाहून बहुला घाबरली. वाघ बहुलेवर आता उडी मारणार;तिच्या मानेचा घोट घेणार;तोच बहुला करुणवाणीने त्याला म्हणाली;वाघोबा मी तुझ्या तावडीत सापडल्ये खरी. तू मला खा. मी जीवदान मागत नाही;कारण मरणाचं भय मला वाटत नाही. कृष्णाच्या भक्ताला मरणाची डर वाटत नसते, परंतु एक मागणं तुला मागते. माझा बाळ डुबा घरी वाट पाहात असेल. तो हंबरत असले. त्याला शेवटचा पान्हा पाजून; त्याला निरोप देऊन मी येते. मी खचित येईन.

वाघ म्हणाला; 'एकदा निसटून गेल्यानंतर तू पुन्हा कशाला येशील? मरणाच्या तोंडात आपण होऊन पडण्याइतकी मुर्ख तू खचित नसशील. हातातील शिकार भोळेपणाने सोडून देण्याइतका मूर्ख मीही नाही. चल; मी तुला मारणार व खाणार. तुझं काही मांस माझ्या आजारी वाघिणीला व तिच्या पिलांना नेऊन देणार. माझी वाघीण वाट पाहात असेल.'

बहुला म्हणाली; 'वाघोबा तुलाही मुलंबाळं आहेत. मुलांची माया तू जाणतोस. माझ्या मुलांची तुला दया येऊ दे. मी खरंच परत येईन; मी कृष्णदेवाची सखी आहे. मी दिला शब्द पाळीन. सूर्य वरून पडेल पृथ्वी उडेल; सागर कोरडे होतील अग्नी थंड होईल; परंतु बहुला सत्यापासून दूर जाणार नाही. माझी परीक्षा तर घेऊन पाहा. वाघोबा दाखव; जवळचा रस्ता दाखव. मी आत्ता जाऊन येंते.'

व्याघ्ररूपी भगवंत म्हणाला;'बरं आज परीक्षाच घेतो. जा लौकर जाऊन ये. मी इथं या दगडावर बासून राहातो. तुझा बाळ भुकेला आहे;तशी माझी बाळेही भुकेली आहेत हे लक्षात ठेव.'

बहुलेला एकदम जवळ रस्ता दिसला. इतका वेळ तिला कसा दिसला नाही; कोणास ठाऊक ! सन्मार्ग जवळच असतो; परंतु पुष्कळ वेळा तो माणसाला दिसत नाही. बहुला धावपळ करीत निघाली. पुत्रप्रेमाने तिच्या कासेला गळती लागली होती. तिचे ते चार सड म्हणजे जणू दुधाने थरलेले चार समुद्रच होते. पृथ्वीला; वाटेतील दगडधोंडयांना दुधाचा अभीषेक करीत ती चालली. पळताना तिला ठेचा लागत होत्या; काटे बोचत होते; परंतु तिचे कशाकडेही लक्ष नव्ह्ते.

घरी डुब्याचा ओरडून ओरडून घसा बसला होता. आज कृष्णदेव आपल्याला आंजारागोंजारायला आला नाही; ह्याचेही त्याला वाईट वाटले. गरीब बिचारा सारखा आईची वाट पाहात होता. ती पाहा हंबरत बहुला आली. डुबा हंबरला. बहुला डुव्याजवळ उभी राहिली. डुबा आईच्या कासेला झोंबला. तो तान्हा अपार पान्हा पिऊ लागला. आज बहुलेचा पान्हा संपता संपेना. डुब्याचे पोट भरता भरेना.

डुबा बहुलेचे दूध पीत होता. बहुला त्याचे अंग चाटत होती; परंतु एकाएकी डुबा चमकला. त्याचे दूध पिणे थांबले. आईच्या डोळयांतील कढत अश्रू त्याच्या अंगावर पडले. डुबा आईच्या तोंडाजवळ आला. आईच्या तोंडाला तोंड लावून डुबा रडत रडत म्हणाला; आई का ग रडतेस ? तुला काय झालं ? तू कुणाच्या शेतात चुकून गेलीस होय ? त्यानं तुला मारलं होय ? हे तुझ्या अंगावर खरचटे उठले आहेत. काटेरी काठीनं तुला कोणी झोडपलं वाटतं ?' बहुला म्हणाली; बाळ मला कुणी मारलं नाही. तुझ्यासाठी पळत येत होत्ये. वाटेतील काटेझुडपे लागली व अंग खरचटलं.'

डुबा : मग तू का रडतेस ? कृष्णदेव तुझ्यावर रागावला ? आज मला खाजवायला तो आला नाही. तुला त्यानं इतर गाईंबरोबर का आणलं नाही ? त्यानं तुला हाकलून दिलं होय ? तुला यायला इतका उशीर का झाला ?

बहुला : कृष्णदेव माझ्यावर रागावला नाही. मीच त्याला सोडून दूर निघून गेल्ये.

डुबा : तू का निघून गेलीस ? तू माझ्यावर रागावलीस वाटतं ? दूध पिताना मी तुला ढुश्या देतो; म्हणून रागावलीस ? मी तुझ्याबरोबर वनात येण्याचा हट्ट धरतो म्हणून रागावलीस ? आई मी हट्ट करणार नाही. तू वनात नेशील तेव्हाच येईन. आता मी गवत खाऊ लागलो आहे. पिताना तुला त्रास होत असेल तर मी दूध पिणार नाही. आई माझ्यावर रागावू नको. मी का वाईट आहे ?

बहुला गहिवरून म्हणाली; ' बाळ; तुला कोण वाईट म्हणेल ? तू गुणांचा आहेस. सारं जग तुझ्यावरून ओवाळून टाकावं असा तू आहेस. तुझ्यावर का मी कधी रागावेन ? अरे; पिताना मला ढुश्या देतोस; त्यात तर माझं खरं सुख. तुझी एकेक ढुशी लागते व मला अपार पान्हा फुटतो. तुझ्यावर नाही हो मी रागावल्ये.'

डुबा : मग तू का रडतेस ? तुझं दु:ख मला का सांगत नाहीस ? मी का फक्त तुझं दूधच पिऊ ? तुझं दु:ख नको ऐकू ? आई जगात तुला मी व मला तू. तू मला तुझं दु:ख सांगणार नसशील तर मी कशाला जगू ?

बहुला : बाळ; सारं सांगत्ये; ऐक. आज हिरवं हिरवं गवत पाहून मी लांब चरत गेल्ये. कृष्णाला अंतरल्ये. मला मोह पडला. रात्र पडली तेव्हा मी भानावर आल्ये; तो जवळ ना यमुना; ना गाई; ना गोपाळ; ना कृष्ण; सभोवती भयंकर जंगल. मला रस्ता दिसेना. एकाएकी एक वाघ आला व तो मला खाणार; तोच मी त्याला म्हटलं; ' वाघोबा; माझ्या बाळाला मी शेवटचा पान्हा पाजून येते. त्याला निरोप देऊन येते; मग मला खा. मी खरोखर परत येईन.' डुब्या ! वाघाला मी वचन दिलं आहे. आता मला जाऊ दे. मी सत्वापासून च्युत कशी होऊ ? तू एकटा जगात राहाणार; अजून अंगावर पिणारा म्हणून थोडं वाईट वाटलं; परंतु कृष्णदेव तुला आहे. त्याची कृपा सर्वांना पुरून उरेल. बाळ; आता नीट वाग. फार उडया मारू नकोस. फार झोंब्या घेऊ नकोस. रानात कृष्णाला सोडून दूर जात नकोस; चांगला मोठा हो. देवाचा लाडका हो.' असे म्हणून बहुलेने डुब्याचे अंग चाटले. डुबा म्हणाला; 'आई; मीच त्या वाघाकडे जातो. तू जगात राहा. तुला माझ्यासारखी आणखी बाळं होतील. मी तुझ्याच पोटी पुन्हा येईन; तुझं बाळ होईन. मला जाऊ दे. तुझ्या दुधावर व तुझ्या कृपेवर पोसलेला हा देह तुझ्याच कामी येऊ दे. माझं सोनं होईल. मी कृतार्थ होईन'

बहुला सदगदित होऊन बोलली; 'बाळ; तू अजून लहान आहेस. वाघाचे कठोर पंजे तुझ्या कोवळया शरीराला कसे सहन होतील ? तू मोठा हो. एक दिवस सत्वासाठी मरण्याचं भाग्य तुलाही लाभेल; परंतु आज हट्ट नको करू. आईचं ऐकावं हो बाळ.'

डुबा म्हणाला; 'आई; तुझं दुसरं सारं ऐकेन; परंतु या बाबतीत नाही. मी एक तोड सुचवतो. आपण वाघोबाकडे दोघेजण जाऊ व त्याला मी सांगेन; 'मला खा.' तू सांग; 'मला खा.' बाघाला ज्याचं शरीर आवडेल त्याला तो खाईल.'

बहुला व डुबा रानात जाण्यासाठी निघाली. अजून प्रहरभर रात्र उरली होती. आकाशात तारे स्वच्छ चमकत होते . हजारो डोळयांनी आकाश त्या मायलेकरांकडे पाहात होते. डुबा पुढे चालला होता. वनातून येताना आईचे दूध वाटेवर सांडले होते; त्या खुणेने तो चालला होता. बहुलेचे वाटेवर सांडत गेलेले ते गोड दूध साप पीत होते; परंतु त्या सांपाकडे त्या गायवासरांचे लक्ष नव्हते. रानातील तरुवेलीवर असंख्य फुले फुलली होती. त्यांचा सुगंध सर्वत्र भरून राहिला होता. मंद वार्‍याबरोबर सर्वत्र पसरत होता. जणू तो बहुलेच्या सत्यनिष्ठेचा सुगंध होता ! वृक्षांच्या पानांवर टपटप बिंदू पडत होते. जणू निसर्गदेवता त्या मायलेकरांसाठी अनंत अश्रू ढाळीत होती.

बहुला व डूबा कोणी बोलत नव्हते; बोलणे त्यांना शक्यच नव्हते. भरलेल्या अंत:करणाने; भरलेल्या डोळयांनी दोघे मुकाटयाने चालली होती. दोघे वाघाच्या जवळ आली. वाघ करकर दाढा खात होता. वाघाला पाहून डुबा जरा घाबरला. तो बहुलेच्या अंगाला बिलगला. बहुला त्याला म्हणाली; 'बाळ माघारी जा.' डुबा म्हणाला; 'मी भ्यायलो नाही काही; हा बघ पुढं होतो.' असे म्हणून उडया मारीत डुबा वाघासमोर जाऊन उभा राहिला. तो वाघाजवळ बोलू लागला.

डुबा : तू का रे तो वाघोबा ? माझ्या आईला खाणारा तूच ना ? वाघोबा; माझ्या आईला खाऊ नकोस. तू मला खा. माझी प्रार्थना ऐक.

बहुला : नको रे वाघोबा. त्याचं काय ऐकतोस ? तू आपला मला खा हो.

वाघ : बहुले; इतका उशीर का झाला ? मी म्हटलं; तू येतेस की नाही ? न येण्याचं ठरवीत होतीस ना ?

बहुला : नाही रे वाघोबा. हा डुबा ऐकेना. रोज सांगितलेलं ऐकतो. इवलासुद्धा हट्ट धरून बसत नाही; परंतु आज ऐकेना. म्हणे; 'मलाच जाउ दे. त्याची समजूत घालण्यात वेळ गेला. शेवटी तो आलाच बरोबर. रागावू नकोस काही. फसवण्याचं स्वप्नातसुद्धा माझ्या मनात आलं नाही. ही मी तयार आहे. तुझी वाघीण; तुझी पिलं भुकेली असतील. त्यांना लौकर माझा ताजाताजा घास नेऊन दे.'

डुबा : वाघोबा; नको रे आईला खाऊ. माझं अंग बघ कसं लोण्यासारखं मऊमऊ आहे माझं अंग तुला आवडेल; तुझ्या पिलांना आवडेल.

बहुला : त्याला खाऊन सार्‍यांची भूक कशी शमणार ? वाघोबा; तू मलाच खा. मी हाडापेरानं मोठी आहे; तुम्हा सर्वांचं पोट भरेल.

वाघ : मी तुम्हाला दोघांना मारून टाकतो. तुम्हा दोघांना आमच्या पोटात ठेवतो. गोठयात एके ठिकाणी असता; आता पोटात एके ठिकाणी राहा. डुब्याचं मांस - कोवळं कोवळं - माझ्या पिलांना फारच आवडेल. तुझं वाघिणीला आवडेल. चला; तयार व्हा. आता उशीर नको. बहुला; डुबा; माना खाली घालून तिथं बसा. देवाचं स्मरण करा.

मायलेकरे खाली माना घालून बसली; परंतु डुबा पुन्हा उठून म्हणाला; 'वाघोबा; खायचंच तर मला आधी खा. आईला फाडलेलं माझ्यानं पाहावणार नाही; परंतु आई मोठी आहे. धीराची आहे. तिच्या सत्वाला सीमा नाही. मला फाडलेलं पाहाण्याचं धैर्य तिच्याजवळ आहे.'

द्यघ : गप्प बस. बालणं पुरे. मरायची वेळ आली तरी चुरूचुरू बोलतच आहे.

डुबा : मला मरणाची भीती थोडीच आहे.

बहुला : बाळ; आता पुरे. कृष्णदेवाचं स्मरण कर. आता बोलू नको. मरणाच्या वेळेस गर्व नको. फुशारकी नको.

मायलेकरे तयार झाली. मरणाची वाट पाहू लागली. वाघाचे भयंकर पंजे आधी कुणाच्या अंगावर पडतात; त्याचे तीक्ष्ण दात आधी कोणाला फाडतात; ह्याची वाट पाहू लागली; परंतु छे:; ह्या गोष्टीकडे त्यांचे लक्ष नव्हते. कृष्णदेवाचे ध्यान करण्यात ती दोघे रंगली होती. वाघबीघ विसरून गेली होती. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. बहुला व डुबा ह्यांच्या अंगावर वाघाची उडी पडण्याएवजी फुले पडली. मायलेकरे चपापली. ती वर पाहू लागली; तो फुलांचा वर्षाव होत होता. वाघाला ती पाहू लागली. वाघ कोठेच दिसेना. बहुला व डुबा उभी राहिली; तो त्यांना समोर कोण दिसले ?

पालनवाला | श्रीकृष्ण तिथे अवतरला |
मोरमुकुट तो माथ्यावरती
मंजुळ मुरली धरली ओठी
गळयात डोले सु-वैजयंती
प्रभुवर आला | श्रीकृष्ण तिथे अवतरला |
रक्षण भक्तांचे करणारा
भक्षण असुरांचे करणारा
श्यामसावळा गिरी धरणारा
धावत आला | श्रीकृष्ण तिथे अवतरला |
उभा राहिला देव येउनी
हृदयी गेला उचंबळोनी
बहुलेच्या सत्वास पाहुनी
अतिशय धाला | श्रीकृष्ण तिथे अवतरला |


कृष्ण परमात्म्यास समोर पाहून बहुलेने आपले मस्तक त्याच्या चरणांवर ठेवले. डुब्यानेही तसेच केले. कृष्णदेवाने आपल्या अमृतस्पर्शी हस्ताने दुब्याला थोपटले. देव म्हणाला; 'बहुले; बाई कष्टी होउ नकोस. तू माझ्या परीक्षेत उतरलीस. आता मी कायमचा तुझा सेवक आहे आणि डुब्या तूही आईला शोभेसा आहेस. आईची परंपरा पुढे चालवशील. बहुले तुला जे मागावयाचं असेल ते माग. मी प्रसन्न झालो आहे.' बहुला म्हणाली; देवा; हिरवं हिरवं गवत पाहून तुझ्याजवळुन दूर जाण्याचा मोह मला कधीही न होवो. नेहमी तुझ्याजवळ राहाण्याचीच इच्छा आम्हा मायलेकरांस होवो. दुसरं काय मागू ?'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा