अशक्य तों तुम्हां नाही नारायणा । निर्जीवा चेतना आणावया ॥१॥
मागें काय जाणों स्वामीचे पवाडे । आतां कां रोकडे दावूं नये ॥२॥
थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे । म्हणवितों दास काय थोडें ॥३॥
तुका म्हणे माझे निववावे डोळे । दावूनि सोहळे सामर्थ्याचे ॥४॥
शंखचक्रगदापद्म । पैल आला पुरुषोत्तम ॥५॥
ना भी ना भी भक्तराया । वेगीं पावालों सखया ॥६॥
दुरूनि येतां दिसे दृष्टी । धाकें दोष पळती सृष्टी ॥७॥
तुका देखोनि एकला । वैकुंठीहूनि हिर आला ॥८॥
- संत तुकाराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा