म्हणालो नाही. . .

तू गेलीस तेव्हा ' थांब ' म्हणालो नाही
'का जाशी ? ' ते ही ' सांग ' म्हणालो नाही
होतीस जरी बाजूस उभी तू माझ्या
' हे अंतर आहे लांब ' म्हणालो नाही. . .

मज स्मरते ना ती वेळ कोणती होती
घन ओले का नजरच ओली होती
निपटून काढता डोळ्यांमधले पानी
' जा ! फिटले सारे पांग ! ' म्हणालो नाही. . .

बोलून इथे थकले मौनाचे रावे
कोणास कळाले म्हणून तुज उमगावे !
असहाय्य लागला आतून वणवा सारा
पणा वणव्याला त्या आग म्हणालो नाही. . .

बघ अनोळख्यागत चंद्र टेकवून भाळी
ओलांडून गेलीस तू कवितेच्या ओळी
तुज अन्य नको काही तर सोबत म्हणुनी
जा घेऊन माझा राग – म्हणालो नाही. . .

हे श्रेय न माझे ! तुझेच देणे आहे !
मन माझे अजुनी नितळ शुभ्रसे आहे
जो एकच उरला ठसा तुझ्या स्पर्शाचा
तो चंद्रावरचा डाग – म्हणालो नाही. . .


कवी - संदिप खरे
कवितासंग्रह - मौनाची भाषांतरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा