अजून झोपली सखी.. !

थांबल्या पहा कळ्या , उषाही थांबली
अजून झोपली सखी .. पहाट लांबली !

तिचीच वाट पाहते , गोठले धुके
रान रान , पान पान जाहले मुके
तिचे बघून हाय ! सुस्त जाहली घरे
थांबली उडायची अजून पाखरे ...
मनातली मिठी मीही मनात कोंबली !

अजूनही नभात थांबल्यात तारका
घुटमळे अजून चंद्र हाय ! सारखा
फुलात गंध थांबला, मनात प्रार्थना..
प्रभू तरी उठायचा कसा तिच्याविना ?
तिची भुते इथे तिथे अशीच झोंबली !


कवी - ज्ञानेश वाकुडकर

ऋण

तुझ्या शेतात राबून
माझी सरली हयात
नको करू हेटाळणी
आता उतार वयात ॥ १ ॥

नाही राजा ओढवत
चार पाउले नांगर
नको बोलूस वंगाळ
नको म्हणूस डंगर ॥ २ ॥

माझ्या ऐन उमेदीत
माझी गाईलीस ओवी
नको चाबकासारखी
आता फटकारु शिवी ॥ ३ ॥

माझा घालावाया शीण
तेव्हा चारलास गूळ
कधी घातलीस झूल
कधी घातलीस माळ ॥ ४ ॥

अशा गोड आठवणी
त्यांचे करीत रवंथ
मला मरण येऊ दे
तुझे कुशल चिंतीत ॥ ५ ॥

मेल्यावर तुझे ठायी
पुन्हा एकदा रुजू दे
माझ्या कातड्याचे जोडे
तुझ्या पायात वाजू दे ॥ ६ ॥


कवी - श्री. दि. इनामदार

बाबांचा अचरटपणा

तीन मुले आपापल्या  वडीलांबद्दल बोलत असतात.

पहिला म्हणतो :- माझे बाबा इतके उंच आहेत, इतके उंच आहेत कि ते आरामात जीराफाला कीस करु शकतात'

दुसरा म्हणतो :- 'माझे बाबा उंच आहेइतके त, इतके उंच आहेत कि ते उडत्या हेलीकोपटरला कीस करु शकतात'

तीसरा म्हणतो :- माझे बाबा  खूप उंच आहेत पण ते असला अचरटपणा करत नाहीत.'

मी श्रीमंत कसा झालो !

एकदा एका श्रीमंत माणसाची मुलाकात झाली त्यांना विचारल,"तुम्ही श्रीमंत कसे झालात ?"

श्रीमंत माणूस : आम्ही फार गरीब होतो. मला नोकरी करायची नव्हती व व्यवसाय करायचा होता. मी एकदा माझ्याकडे असलेल्या वीस रुपयांतुन काही फळे घेतली. त्यांना दिवसभर घासुन पुसुन साफ केल व संध्याकाळी चाळीस रुपयांना विकले. दुसर्‍या दिवशी त्या चाळीस रुपयांची फळे घेतली व साफ करुन सत्तर रुपयांना विकली. असे मी महिनाभर करित होतो.

मी : असे तुम्ही किती कमावलेत ?

श्रीमंत माणूस : महिन्याभरात मी पन्नास रुपये कमावले.

मी : तर श्रीमंत कसे झालात ?

श्रीमंत माणूस : दिड महिन्यात माझे सासरे वारले त्यांनी माझ्या बायकोच्या नावाने एक कोटी ठेवले होते !!!

प्रामाणिक माणूस

एकदा एका कारखान्याच्या अध्यक्षांनी आपल्या सर्व अधिकार्‍यांची वार्षिक बैठक बोलावली.
अध्यक्षांनी बैठक संपवताना घोषणा केली कि थोड्या वेळाने सर्वांना एक मातीची कुंडी, एका पिशवीत माती व काही बियाणे देण्यात येतील.
जो कुणी पुढच्या वर्षी वार्षिक बैठकीत सर्वात चांगले झाड दाखवेल त्याचा त्या बैठकीत सत्कार करण्यात येईल.
सर्व अधिकार्‍यांनी घरी गेल्यावर ते बियाणे दिलेल्या मातीतच पेरले. वर्ष उलटले व परत वार्षिक बैठकीची वेळ आली.
बैठकीचा हॉल विविध प्रकारांच्या सुंदर झाडानी भरुन गेला. काही झाडांना तर फुलेही आली होती.
पण या सर्वात एक अधिकारी हिरमुसलेला पडल्या चेहर्‍याने दिलेली कुंडी व माती तशिच घेऊन एका कोपर्‍यात बसुन होता.
सर्वांची झाडे बघितल्यावर अध्यक्षांनी मंचावर जावून माईक हाती घेतला व भाषण आटोपतांना त्या हिरमुसलेल्या अधिकार्‍याला बक्षिस जाहिर केलं.
सर्व थक्क झाले.
त्याने तर फक्त कुंडी व माती तशिच आणली होती.
सत्कार झाल्यावर अध्यक्ष बोलले," तुम्हा सर्वात हा एकच प्रामाणिक माणूस आहे. तुम्हाला देण्यात आलेले बियाणे पाण्यात उकळण्यात आले होते. त्यामुळे त्यातुन झाडे लागणे अशक्य होते !!!"

वकिली सल्ला.

शेतकरी : वकिलसाहेब, कोणाची म्हैस माझ्या शेतात शिरली व तिने शेतातले पिक खाल्ले तर मी काय करावं ?
वकिल : तुम्ही त्या म्हशीच्या मालकाला झालेली नुकसान भरपाई मागु शकता.
शेतकरी : द्या तर मला ४०० रुपये. काल राती तुमचीच म्हैस माझ्या शेतात शिरली होती.
वकिल : खर तर तुम्हीच मला १०० रुपये देणे लागता. ५०० रुपये माझा सल्ला घेतल्याचे. त्यातुन तुमचे नुकसान झाल्याचे ४०० रुपये वजा करा व माझे १०० रुपये आणा.

उत्सुकता

न्यायमूर्ती : तुझे वकिल आजारी आहे म्हणून सुनावणीची तारीख पुढे धकलावी असे तु म्हटलेय. पण तुला रंगेहात पकडलंय आणि चोरीचा आरोप ही तु मान्य केलाय. तर तुझे वकिल तुझी बाजू मांडणार तरी काय ?
आरोपी : साहेब, तुमच्या प्रमाणेच मलाही तीच उत्सुकता आहे !!!

नोटीस

 एकदा माझ्या एका मित्राला आयकर खात्याकडून आयकर कमी भरल्याची दूसरी नोटीस आली. त्याने ताबडतोब पहिल्या नोटीसला उत्तर न दिल्याबद्दल खेद व्यक्त केला व सविस्तर उत्तर लिहून आयकर कार्यालयात गेला.
तेथे संबंधित अधिकार्‍याला भेटल्यावर तो अधिकारी म्हणाला, "फार वाईट वाटून नका घेऊ. आम्ही पहिली नोटीस पाठवलीच नव्हती. आमचा अनुभव असा आहे की दुसरी नोटीसच फार प्रभावकारी असते !!!" 

मंदी

मंदीच्या काळात एका सिंधी व्यापार्‍याने काढलेला उपाय.
व्यापारी रात्री घरी आला व मुलांना म्हणाला, आज रात्री जो न जेवता झोपेल त्याला मी ५ रुपये देणार.
त्या रात्री त्याची मुले ५- ५ रुपये घेऊन झोपली.
दुसर्‍या दिवशी सकाळी तो मुलांना म्हणाला, "जो ५ रुपये देईल त्यालाच नाश्ता मिळणार."
:-( 
डॉक्टर : तुम्हाला मलेरिया झाला आहे.
रुग्ण : डॉक्टर, खरच मलेरिया झालाय ना ? एकदा एकाला डॉक्टरांनी मलेरियाची औषधे दिलीत पण तो टॉयफाईडने मेला.
डॉक्टर : नाही, माझे रुग्ण मलेरियाचे औषध दिल्यावर मलेरियानेच मरतात.

ऑक्सिजनचा शोध

बांता : ऑक्सिजन जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. या वायूचा शोध १७७३ साली लागला.


सांता : अरे देवा, बरं झाल माझा जन्म त्यापुर्वी नाही झाला.

उद्या जगेन

उद्या जगेन उद्या जगेन म्हणून आजवर मरत राहीलास
न पाहीलेल्या भविष्यासाठी वर्तमानात झुरत राहीलास
सागं कधी जगलास का ते उद्याच जीवन तु आजवर?
आजही तेच करतोस जे आयुष्यभर करत राहीलास

मर मर मरुन उद्यासाठी तु खूप काही केलंस
तो उद्या आलाच नाही तु तुझ्यासाठी काय केलस?
आज भुतकाळाच्या जखमा पाहून का रडतोस तु
सुखासाठी हजारदा मन मारलस हे तु काय केलस?

एक दिवस तरी सागं जेव्हा नव्हता दु:खाचा चोप
आठवतय का कधी मिळाली शेवटची साखर झोप
अरे तो दिवस आलाच नाही ज्याची तु वाट पाहीलीस
आठवतय का कधी केलीस अखेरची मन मौज

तु म्हणतोस जे केलं त्यामुळे मी आजवर जगलो
आणि एवढ करुनही आजवर ही नाही मी थकलो
घरासाठी दारासाठी संसारासाठी मी खुप काही केलं
हा माझ्यासाठी मी आजवर काही नाही करु शकलो.

आयुष्यभर धावलास तु न पाहीलेल्या उद्यासाठी
तु राहीलास उपाशी नाही केलास आराम जीवासाठी
सागं हा जिवनाचा खेळ होता का नशिबाचा तमाशा
तु जगलास खरा पण कोणासाठी आणि कशासाठी?

सोडणांर आहेस त्या जगासाठी की तुला विसरणा-या घरासाठी
कपाटातल्या तिजोरीसाठी का त्या पोष्टातल्या खात्यासाठी
आता तरी सागं कशासाठी जगलास तु आजवर बोल?
हातातल्या काठीसाठी की डोळ्यावरच्या जाड भिगांसाठी
बघ आजही तरी तुला चींता पुन्हां त्या उद्याची
चदंनाच्या लाकडाची आणि शुद्ध वनस्पती तुपाची.

तुझी आठवण येताना

तुझी आठवण येताना
गंध तुझा घेउन येते,
हरवलेल्या स्वप्नांना
रंग तुझा देउन जाते..

तुझ्या पैजणांची रुणझुण
कानांमध्ये दाटुन येते,
मी मिटुन घेतो डोळे तेव्हा
तु मिठीत हळुवार भेटुन जाते...

स्वप्नांतले जगणे माझे
वास्तवाचे भान सुटुन जाते,
मनात तुझ्या आठवांचे
पुन्हा रान पेटुन येते....

तुझी आठवण येताना
गंध तुझा घेउन येते..,
हरवलेल्या स्वप्नांना
रंग तुझा... देउन जाते.....

आनंदाने

हसता-हसता सरून जावे आनंदाने
मागे केवळ उरून जावे आनंदाने

डोळ्यांमधले सर्व चेहरे जिवंत व्हावे
अकस्मात घर भरून जावे आनंदाने

जिथे जिथे जाशील तू तुझ्या मागेमागे
बोट सुखाचे धरून जावे आनंदाने

पुन्हा मनाने अवखळ पोरासमान व्हावे
घरात यावे, घरून जावे आनंदाने

घरास जेव्हा पाय लावणे अशक्य व्हावे
नुसते दारावरून जावे आनंदाने

मिळालीच तर अशी देखणी व्यथा मिळावी
जिला पाहुनी झुरून जावे आनंदाने

सल कुठलाही जपून कोणा स्मरण्यापेक्षा
हेच बरे विस्मरून जावे आनंदाने

दोन घडींच्या भेटीसाठी यावे आणिक
जन्मासाठी ठरून जावे आनंदाने

जाण्याची घटका आली की अवतीभवती
जिवलग गोळा करून जावे आनंदाने


कवी - चित्तरंजन भट

जमेल तितका जुलूम

जमेल तितका जुलूम जो तो करून गेला!
मला खुबीने हरेकजण वापरून गेला!!

किती बघा काळजी तयाला असेल माझी.....
मला गलबतापरीच तो नांगरून गेला!

न थांगपत्ता, अजून त्याची न गंधवार्ता....
वसंत आला कधी? कधी तो सरून गेला?

तुझ्या दुराव्यामधे अशी जाहली अवस्था....
तुझ्या स्मृतींनीच प्राण हा मोहरून गेला!

हरेक वस्तू घरातली ओरडून सांगे....
कुणी तरी वादळापरी वावरून गेला!

कळे न केव्हा असा शिशिर जीवनात आला!
मलाच आतून पूर्ण तो पोखरून गेला!!

विनाशकारी थरार केदारनाथमधला;
दुरून पाहून जीव हा गुदमरून गेला!

पहाड तो उंच एवढा ढासळून गेला!
क्षणात पाऊस त्यास, बघ, कातरून गेला!!

अशा प्रकोपासमोर माणूस काय टिकतो?
कृमीकिड्यांसम हरेकजण चेंगरून गेला!

न राहिली एकही इमारत, सपाट सारे!
अता कुठे पूर तो जरा ओसरून गेला!!

क्षणात काही, प्रलय म्हणे तो निघून गेला....
सडा शवांचा चहूकडे अंथरून गेला!

स्वत: पुरानेच काळजी घेतली शवांची.....
शवांवरी सर्व रेत तो पांघरून गेला!

नशीब होते, तसेच ते धेर्यवान होते!
मुठीत धरूनीच जीव जो तो तरून गेला!!

दिला मला हात एकदा अन् निघून गेला....
तमाम आयुष्य मात्र तो सावरून गेला!

कुणी न डोकावले, तृषा पाहिली न माझी!
जथा  ढगांचा निमूट दारावरून गेला!!


कवी - प्रा.सतीश देवपूरकर
वृत्त: सती जलौघवेगा
लगावली: लगालगागा/लगालगागा/लगालगागा
रुणझुणत राहिलो, किणकिणत राहिलो
जन्मभर मी तुला, 'ये' म्हणत राहिलो

सांत्वनाला तरी, हृदय होते कुठे?
रोज माझेच मी, मन चिणत राहिलो

ऐकणारे तिथे, दगड होते जरी
मीच वेड्यापरी, गुणगुणत राहिलो

शेवटी राहिले, घर सुनेच्या सुने
उंबऱ्यावरच मी, तणतणत राहिलो

ऐनवेळी उभे, गाव झाले मुके
मीच रस्त्यावरी, खणखणत राहिलो

विझत होते जरी, दीप भवतालचे,
आतल्या आत मी, मिणमिणत राहिलो

दूर गेल्या पुन्हा, जवळच्या सावल्या
मी जसाच्या तसा, रणरणत राहिलो

मज न ताराच तो, गवसला नेमका
अंबरापार मी, वणवणत राहिलो


कवी - सुरेश भट

जगत मी आलो असा

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!

जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!

कैकदा कैफात मझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी;
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही!

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे;
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही!

वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत;
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!

संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा....
लोक मज दिसले अचानक; मी कुठे दिसलोच नाही!


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

व्यर्थ

सुर मागू तुला मी कसा?
जीवना तू तसा,मी असा!

तू मला ,मी तुला पाहिले,
एकमेकांस न्याहाळिले;
-दुःख माझातुझा आरसा!

एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा;
-खेळलो खेळ झाला जसा!

खूप झाले तुझे बोलणे,
खूप झाले तुझे कोपणे,
-मी तरीही जसाच्या तसा!

रंग सारे तुझे झेलुनी,
शाप सारे तुझे घेउनी
-हिंडतो मीच वेडापिसा!

काय मागून काही मिळे?
का तुला बात माझे कळे?
-व्यर्थ हा अमृताचा वसा


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

पहाटे पहाटे

पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली!

मला आठवेना...तुला आठवेना...
कशी रात्र गेली कुणाला कळेना.
-तरीही नभाला पुरेशी न लाली!

गडे हे बहाणे,निमित्ते कशाला?
असा राहू दे हात माझा उशाला
मऊमोकळे केस हे सोड गाली!

कसा रामपारी सुटे गार वारा
मला दे उशाशी पुन्हा तू उबारा
अता राहू दे बोलणे,हालचाली!

तुला आण त्या वेचल्या तारकांची,
तुला आण त्या जागणाऱ्या फुलांची;
लपेटून घे तू मला भोवताली!


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

वय निघून गेले

देखावे बघण्याचे वय निघून गेले
रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले

गेले ते उडुन रंग
उरले हे फिकट संग
हात पुढे करण्याचे वय निघून गेले

कळते पाहून हेच
हे नुसते चेहरेच
चेहऱ्यांत जगण्याचे वय निघून गेले

रोज नवे एक नाव
रोज नवे एक गाव
नावगाव पुसण्याचे वय निघून गेले

रिमझिमतो रातंदिन
स्मरणांचा अमृतघन
पावसात भिजण्याचे वय निघून गेले

हृदयाचे तारुणपण
ओसरले नाही पण
झंकारत झुरण्याचे वय निघुन गेले

एकटाच मज बघून
चांदरात ये अजून
चांदण्यात फिरण्याचे वय निघून गेले

आला जर जवळ अंत
कां हा आला वसंत?
हाय,फुले टिपण्याचे वय निघून गेले


कवी - सुरेश भट
गझलसंग्रह - एल्गार

दर्जेदार

ती कुणाची झुंज होती? तो कसा जोहार होता?
जो निखारा वेचला मी तो निखारा गार होता!

हा कसा आता उन्हाचा निर्दयी पाऊस आला?
मी मघाशी पाहिलेला मेघ काळाशार होता

गांजले ज्यांनी मला ते शेवटी माझेच होते..
हा कळीचा दंश होता! तो फुलांचा वार होता!

ह्या करंट्यांनी स्वतःचे फोडले आधीच डोळे..
(त्यांचियासाठी उद्याचा सूर्य अत्याचार होता!)

स्वागतासाठीच माझ्या भुंकले ते आदराने
थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता!

गाढल्या त्यांनी पिढ्या अन् ठेवला नाही पुरावा
ह्या स्मशानाच्या धन्याचा देव ताबेदार होता!

लागला आहे अताशा वेदनेचा शौक त्यांना
(एरवी,त्यांचा सुखाचा चोरटा व्यापार होता!)

चोरली माझ्या घराची राखही त्याने परंतू
मी न केला ओरडा.. तो चोर अब्रूदार होता!

पाहिला नाही जरी मी चेहरा मारेकऱ्य़ाचा
लोकहो,माझा तरीही खून दर्जेदार होता!


कवी - सुरेश भट

भल्या पहाटे निघून आले !

सख्या तुला भेटण्यास मी या भल्या पहाटे निघून आले !
घरातुनी चोरपावलांनी लपून आले.. जपून आले !

तुझ्याच स्वप्नात रात गेली…तुझ्याच स्वप्नात जाग आली…
तुझ्याच स्वप्नात जागणा~या जगातुनी मी उठून आले !

विचारले मी न अंबराला.. विचारले मी न वारियाला …
तुझ्या मिठीचा निरोप आला- मिठीत मी मोहरून आले !

अताच हा दूर तारकांचा कुठेतरी काफिला निघाला
आताच हे चांदणे गुलाबी हळूच मी पांघरून आले

गडे मला बोलता न आले, कुणीकुणी बोललेह नाही…
अखेर माझ्याच आसवांना तुझा पता मी पुसून आले !


कवी - सुरेश भट

अबोलाही तिचा बोलून गेला!

अबोलाही तिचा बोलून गेला!
मला काही तरी सुचवून गेला!!

कसा मी वेंधळा इतका कळेना;
मला जो तो पहा हटकून गेला!

जरासे दार झाले किलकिलेसे....
नको तो आत डोकावून गेला!

जणू मी झाड जे रस्त्यामधोमध!
मला रस्ता स्वत: छाटून गेला!!

न पासंगासही माझ्या पुरा तो....
तरी टेंभा किती मिरवून गेला!

फळांनी मी लगडलो....चूक झाली!
दगड जो तो मला मारून गेला!!

फुले तोडून गेला....दु:ख नाही!
पहा काटेच तो पसरून गेला!!

पहा लोंढाच आला सांत्वनांचा....
जखम प्रत्येक अन् भिजवून गेला!

निसटला भोवऱ्यामधुनी जरी तो;
किनारा शेवटी बुडवून गेला!

दऱ्या बाजूस दोन्ही, बिकट रस्ता....
सुरक्षित जो मला घेऊन गेला!

विचारांचा जथा आला अचानक!
मनाला पार भंडावून गेला!!

न इतके दु:ख ग्रीष्माच्या झळांचे!
मला पाऊस वेडावून गेला!!

मतांची भीक मागायास आला...
हरेकालाच गोंजारून गेला!

खिरापत वाटुनी आश्वासनांची;
गरीबांनाच तो चकवून गेला!

किती पेरून साखर बोलला तो!
शिताफीने किती फसवून गेला!!

अशी बरसात शेरांचीच केली!
सभेला चिंब तो भिजवून गेला!!

न केले काय गझलेस्तव तयाने?
उभे आयुष्य तो उधळून गेला!

गझलसम्राट ना झाला उगा तो!
गझल जगला, गझल पेरून गेला!!


कवी - प्रा.सतीश देवपूरकर
वृत्त - मृगाक्षी
लगावली - लगागागा/लगागागा/लगागा

माझिया डोळ्यात आसवे जगाची

माझिया डोळ्यात होती आसवे साऱ्या जगाची!
शेवटी साऱ्या नद्यांना ओढ असते सागराची!!

पावसाळी या हवेला मी तरी भुलणार नाही!
मी दिले सोडून आता वाट बघणे पावसाची!!

चार दिवसंचीच असते रोषणाई उत्सवाची!!
रोज थोडी रात्र येते, पौर्णिमेच्या चांदण्याची?

गारव्याला माझिया होते विषारी साप सुद्धा!
जिंदगी माझी जणू होती सुगंधी चंदनाची!!

पाय आपोआप माघारी घरी परतायचे हे.....
केवढी गोडी मनाला रेशमी या बंधनाची!


कवी - प्रा.सतीश देवपूरकर

नाहूनिया उभी मी ...........

नाहूनिया उभी मी सुकवित केस ओले
वेड्या मुशाफिराने त्याचेच गीत केले.

अवकाश भारलेला माझे मला न भान,
अनिवार एक होती ओठावरी तहान
श्वासाचिया लयीत संगीत पेरलेले.........

साधुनी हीच वेळ ;आला कुठून वारा
सुखवित फूल त्याने लुटला पराग सारा
मग होय चंदनाचे; आस्तित्व तापलेले...........

दाही दिशात तेंव्हा आली भरून तृप्ती
अथांग तेवणारी होई निवांत ज्योती
येई न सांगता जे असले घडून गेले.........


कवी - सुधीर मोघे

घननीळ

घननीळ सागराचा घननाद येतो कानी
घुमती दिशा दिशात लहरीमधील गाणी

चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत
कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत

आकाश तेज भारे माडांवरी स्थिरावे
भटकी चुकार होडी लाटात संथ धावे

वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा
जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा

जलधीबरोबरीचे आभासमान नाते
त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे

सांनिध्य सागराचे आकाश पांघराया
परी साथ ना कोणाची अस्तित्व सावराया


कवी - विंदा करंदीकर

घाबरू नकोस

घाबरू नकोस
दारावरची अवेळी टकटक ऐकून
बघ दार उघडून…
अनाहूत अंगणात येऊन नाचणारा
मोर असेल कदाचित…किंवा
शेकडो वर्षांपूर्वी उगवता उगवता
जमिनीत गाडल्या गेलेल्या इच्छांमधून
उमललेल्या अनाम फुलांचा गंध असेल..!
किंवा असेल थकून परतलेला पक्षी
आकाश जाणण्याची इच्छा
व्यर्थ वाटायला लागली असेल त्याला
तुझ्या आस-याला आला असेल..!
किंवा असेल सकाळचं कोवळं ऊन
समुद्राच्या लाटांवर नाचून
काही निरोप द्यायला आलं असेल
दुपारच्या उन्हाची दाहक नजर चुकवून
रात्र व्हायच्या आत तुला भेटावं म्हणून आलं असेल..!
गोंधळू नकोस…
परकं कोणी नसेल तिथे…
शाश्वत सुख मिळवण्याच्या भ्रमात
लाख नाकारशील तू
अंतरंगी निनादणारी बासरीची धून
प्रतिध्वनी होऊन, परतत राहील ती पुन्हा पुन्हा
बंद दरवाजावर टकटक करत राहील
तू दार उघडेपर्यंत..!


कवी - आसावरी काकडे

एकटं

माती बाजूला सारत
उगवून येताना

आणि नि:संगपणे
गळून पडताना

अगदी एकटं असावं
दु:खागत निमूट गळणा-या
पागोळ्यांकडे
कुणी पाहात नसावं !


कवियत्री - आसावरी काकडे

मेणा

डोळ्यांत तरारून आला
अश्रूचा इवला थेंब
जग धूसर झाले तेव्हा
कायाही गेली लांब

मी होते तशीच होते
काही ना कळले कोणा
अश्रूच्या अल्याड होता
व्याकूळ सखीचा मेणा

तिज मीच घातली होती
ती साद आर्त हाकांनी
सामोरी जाऊ न शकले
पण मातीच्या हातांनी

डोळ्यात तरारून आला
नग थेंब अश्रुचा इवला
मी सावरले जग तेव्हा
तो मेणा निघून गेला.


कवियत्री - आसावरी काकडे

आपल्यामध्ये जुळू लागलेल्या

आपल्यामध्ये जुळू लागलेल्या
नव्या नात्याची चिमुकली नाव
संभ्रमाच्या अथांग पाण्यात घालताना
मी कसनुशी झाले आहे !
माझे सज्ज सुकाणू
मी सर्व ताकदीनिशी
हातात गच्च धरून ठेवले आहे.
अनेकांच्या सवयीचे असलेले
हे पाणी तितकेसे गढूळ नाही.
शिवाय
दुरुन दिसणारी आतली खळबळ
आणि बसणारे हेलकावे
यांना न जुमानता
आतापर्यंत अनेक नावा
पैलतीरापर्यंत सुखरुप गेल्याच्या
कितीतरी नोंदी
परंपरेच्या बासनात
स्वच्छ नोंदलेल्या आहेत !
तरीही
पाणी संभ्रमाचेच आहे
आणि आपली पुरती ओळखही नाही
आपल्या सुकाणूची ताकद
आपण आजमावलेली नाही
आणि आपल्या सामानाचेही
आपल्याला हवी तशी माहीती नाही !
एकमेकांच्या सोबतीनं
थोडं पुढे गेल्यावर,
आपले अंदाज चुकले
आणि नाव हेलकावे घेऊ लागली
तर कुणाच्या स्वप्नांचे ओझे कमी करायचे
हेही आपले ठरलेले नाही !
म्हणुन
मी जरा बावरलेच आहे
आपली चिमुकली नाव
या अथांग पाण्यात घालताना !


कवियत्री - आसावरी काकडे

समजावना

किती सहज उतरवून ठेवलीस तू
पिकलेली पानं
हिरव्याच्या स्वागतासाठी !
मी मात्र
उगीच केली खळखळ
नि आता आपसुक होत असलेल्या
पानगळीला घाबरते आहे !
किती सहज गृहीत धरलंस
तू हिरव्याचं आगमन
आणि गिळून टाकलीस पानगळ !
मला मात्र
पानगळच गिळते आहे !
आपसुकच होईल
हिरव्याचं आगमन
हे मलाही समजावना !


कवियत्री - आसावरी काकडे

समज

तुझ्याशी वाद करताना
आताशा माझा आवाज
तितकासा चढलेला नसतो
आणि तुझी प्रतिक्रियाही
झोंबण्याइतकी तिखट नसते!
तुझ्या मागोमाग निमूटपणे येताना
मी फारशी खळखळ करत नाही
पण कधी तरी मी यायचं नाकारलंच
तर तूही हट्ट धरत नाहीस
तुझ्या निशीगंधाचं मला अप्रूप वाटावं
यामुळं तू भारावून जात नाहीस
नि मी लावलेल्या गुलाबाची
मला हवी तशी दखल
तू घेतली नाहीस तरी
मीही हळवी होत नाही!
आपल्या हातून निघून गेलेल्या संवत्सरांनी
जाता जाता समंजसपणाची शाल
आपल्यावर पांघरली आहे?
की बरेच श्रावण बरसून गेल्यावर
आता सरावाने कोसळणार्या पावसात
तितकासा आवेग उरलेला नाही?



कवी - आसावरी काकडे

ग्लोबल मेंदीची नक्षी


माणसे रोजगारासाठी बाहेर पडल्यावर
दिवस मोहल्ल्यातल्या बायाबापड्यांचा,
गुलगुले विकल्यानंतरच्या
जब्बारच्या टोपलीसारखा.
मन भकास: लोडशेडिंग वेळेतल्या पिठगिरणीसारखे.


गरजाच्या चाकांनी धावणारे आयुष्य;
वाटा आव्हानांच्या नागमोडी;
विसावत नाही पळभरासाठी
लाकूड अपेक्षांचे भेदणारी कर्वत.
उजाडताच डोक्यांवर प्रश्नांचा पर्वत:
आदळाताहेत कोणत्या प्रदेशात ग्लोबली लाटा?
गेल्या नाहीत मोहल्ल्याला खेटून
बिगबाजाराच्या चकाचौंद वाटा.


न्याहाळतात बाया नजरेने अचंबित
उंच इमारतीवरच्या लबालब टाक्या,
चघळतात कुतूहलाने शॉवरच्या
थंड-गरम पाण्याच्या नळ्यांचा विषय.
गातात रांजणे कोरडी वाळवंटी गाणी:
येते आठवडा उलटल्यावर नळाला पाणी.
पडझड वारसाहक्काने आलेली,
प्रवास माहेर ते सासरपर्यंतचा,
दैन्याचा दारिद्र्याकडे मुक्काम,
उपासमारीचा रमझान रोज्याला सलाम.
दळणकांडण, भांडीकुंडी, धुणीधाणी, बाळंतपण
होत नाहीत जगण्याची मुळे पक्की;
गिळते स्वप्नांच्या पोष्टरला
वास्तवाची जळजळीत चिक्की.


वेस परिसरात सकाळी
टमरेल घेऊन जाणार्‍या बाया
पाने झडलेल्या एरंडासारख्या,
सांगतात पदराने डोळे पुसत
मारझोड दारुड्या नवर्‍याची,
छळवणूक सासरची जीवघेणी;
दाखवतात पाठीवरचे वळ काठीचे.
करते एक भार दुसरीचा हलका
खर्चून शब्द ठेवणीतले मायाळू;
दाटतो सांत्वन करणारीच्या डोळ्यांसमोर
पडदा धुक्याचा ओलसर.


तारुण्य बहरताना कोळपून गेलेले
जगणे वशिलाहीन विधवांचे होरपळून गेलेले,
निराधारांच्या तुटपुंज्या अनुदानासाठी
येरझारा तहसिलच्या मारणार्‍या
म्हातार्‍या मरणाला टेकलेल्या.
बंदुका कठोर शक्यतांकडे रोखलेल्या.
वागतो फटकून चंद्र पौर्णिमेचा,
पंख अमावस्येचे मोहल्लाभर पसरलेले.


काळजी जमान्याला शेअरबाजाराची,
वाहिन्यांच्या टीआरपीची,
स्टार्सच्या मानधनाच्या चढ-उतारांची.
बोकांडी प्राथमिक गरजांच्या स्कोअर क्रिकेटचा.


मोसमात पानगळीच्या वसंताचे कागदी नकाशे,
येताहेत कोणत्या वरातीसाठी डिजीटल ढोल-ताशे.
घेणार भरारी कशी पंखतुटले पक्षी?
कोरणार कोणत्या हातांवर ग्लोबल मेंदीची नक्षी?



कवी - अजीम नवाज राही

पांढरे निशाण

पांढरे निशाण उभारण्याची
घाई करु नकोस
मूठभर हृदया,
प्रयत्न कर
तगण्याचा, तरण्याचा.

अवकाश भोवंडून टाकणा-या,
या प्रलयंकारी वादळाचाही,
एक अंत आहे.

काळाच्या त्या निर्णायक बिंदूपर्यंत
लढत रहा
तुझ्या नाजुक अस्तित्वानिशी.

वादळे यासाठीच वापरायची असतात
आपण काय आहोत
ते तपासण्यासाठी नव्हे
काय होऊ शकतो
हे आजमावण्यासाठी..


कवी - पद्मा गोळे.

आत्मबल

अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।

अट्टाहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।

लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते
हलाहल । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।


कवी - स्वातंत्र्यवीर सावरकर

तुळस वेल्हाळ

कसे केंव्हा कलंडते
माझ्या मनाचे आभाळ
आणि चंद्र चांदण्यांचा
दूर पोचतो ओघळ

उरे तुडुंब तयांत
काळोखाचे मृगजळ
रितेपणाच्या डोहाची
आत ओढी उचंबळ

मंत्रविद्ध मध्यरात्र
उभी झुकून काठाशी
जन्मोजन्मीच्या दु:खाचा
राळ धरूनी उशाशी

ओढ घेऊन पाण्याची
सूर मारते सरल
एक गाठायचा तळ
आणि तळींचा अनळ

पेट घेई मध्यरात्र
पेटे काळोखाचे जळ
दिवसाच्या राखेमध्ये
उभी तुळस वेल्हाळ


कवी - इंदिरा संत

शब्दारण्य

शब्दारण्याची सैर करण्या
निघालो मी प्रवासी |
उलगडून पाहिले अर्थ
तरी उरले प्रश्न मनाशी ॥

गर्द सावल्यातला अर्थ
शोधण्याचा केला मी यत्न |
काळोख्या कोप-यांना
उजळण्याचा केला मी प्रयत्न ॥

शब्दांच्या अगणिक पारंब्यांनी
वेढले अंतर्मन |
शब्द नगरीच्या स्वैरविहारात
बरसले शब्द घन ॥

शब्दांचे कवडसे कवेत घेण्याचा
केला मी प्रयास |                                                
गर्द सावल्या अंतर्मुख होत
क्षणात पावल्या र्‍हास ॥

कोवळे उन्ह डोळ्यात साठवताना
डोळे दिपले नाही |
सुख-दुःखाचे गर्द आसवे
नयनातून ओसंडत वाही ॥

अलगद काढूनी शब्द कुंचला
ओसांडले शब्दांचे द्रव्य |
आभाळाच्या कॅनव्हासवर
चित्तारले हळवं काव्य ॥


कवी - अनिल शिंदे

तिच्यासाठी

काय करु शकाल तुम्ही तिच्यासाठी?
द्याल तिच्या तान्ह्या श्वासांना
जखमी न होता मोकळं जगण्याचं एक साधं आश्वासन?
तिचा वाढता बहर वेचण्यासाठी
उतावीळ तुमच्या अभिलाषा,
ठेवाल मुळाशी निरोगी माती घालण्याची मायेची आठवण?
स्वप्नचुटुक वाटेवर चालणारी
तिची तरुण नाचरी पावलं आणू शकाल माघारी,
तुम्ही पेरुन ठेवलेल्या स्फोटक आणि भयकारी वास्तवापासून?
अडवू शकाल तिच्या निरागस इच्छांवर
तुमच्या विषारी स्पर्धांच्या अग्निलोलकांतून कोसळणारं
संवेदनांची ओल गाभ्यापासून नष्ट करणारं उग्र आणि निर्मम ऊन?
रोजच्या रोज घरात बळी जाणारं
सोशिक विवाहितेचं कौमार्य कराल परत
तिच्या अनीह रतिकर्माची दु:सह आठवण पुसून?
उमलण्याच्या आणि दरवळ्ण्याच्या सगळ्या शक्यता सांभाळून
जडवाल तिला तिच्या इच्छांच्या सगळ्या कळ्या, पुन्हा फुलवून
ज्या गळून पडल्या तिच्या देहावरुन?
कसं काही करु शकाल तुम्ही तिच्यासाठी,
हजारो वर्षांच्या संकेताच्या झगमगीनं तुमचे डोळे दिपल्यानंतर?
आणि अंधारात पूर्ण जागी असलेली ती तर जाणूनच आहे
तुमचं मस्तक आणि हृदय यातलं अहंभावाचं अटळ अंतर...


कवियत्री - अरुणा ढेरे

माथ्यावरती उन्हें चढावी

माथ्यावरती उन्हें चढावी
पावलात सावल्या विराव्या
घाटावरती शुभ्र धुण्यांच्या
पाकोळ्या अन् मंद झुलाव्या.


डोंगर व्हावे पेंगुळलेले
पोफळ बागा सुस्त निजाव्या
अंगणातल्या हौदावरती
तहानलेल्या मैना याव्या.


लुकलुकणारे गोल कवडसे
लिंबाच्या छायेत बसावे
खारीचे बावरे जोडपे
बकुळीखाली क्षणिक दिसावे.


कुरणाच्या हिरवळीत ओल्या
ऊनही हिरवे होउन जावे
कुठे कधीचे नांगरलेले
शेत पावसासाठी झुरावे.


कवी - सदानंद रेगे

एक श्वास कमी होतो

नाही विजेचे वादळ, नाही पावसाचा मारा
वारासुद्धा फार नाही, साध्या झुळकीने येतो

दारी सायलीला नुक्ती जरा फुलू येते कळी
कसा कोण जाणे तिचा देठ सुटू सुटू होतो

हाती येणार वाटतो, जातो निसटून क्षण
आणि भिजतात डोळे, उगा हुंदकाच येतो

शोक करावा सा~यानी असा नसतो प्रसंग
फक्त आतल्या सुखाचा एक श्वास कमी होतो.


कवयित्री - अरूणा ढेरे

काया काया शेतामंधी

काया काया शेतामंधी
घाम जिरव जिरव
तव्हा उगलं उगलं
कायामधून हिरवं !

येता पीकाले बहर
शेताशेतात हिर्वय
कसं पिकलं रे सोनं
हिर्व्यामधून पिवयं !

अशी धरत्रीची माया
अरे, तीले नही सीमा
दुनियाचे सर्वे पोट
तिच्यामधी झाले जमा

शेतामंधी भाऊराया
आला पीकं गोंजारत
हात जोडीसन केला
धरत्रीले दंडवत

शेतामधी भाऊराया
खाले वाकला वाकला
त्यानं आपल्या कपायी
टिया मातीचा लावला

अशी भाग्यवंत माय
भाऊरायाची जमीन
वाडवडीलाचं देवा,
राखी ठेव रे वतन !


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

मुक्ताई

माझी मुक्ताई मुक्ताई
दहा वर्साचं लेकरू
चांगदेव योगियानं
तिले मानला रे गुरू

"अरे संन्याश्याची पोरं"
कुनी बोलती हिनई
टाकीदेयेलं पोराचं
तोंड कधी पाहू नई

"अरे असं माझं तोंड
कसं दावू मी लोकाले?"
ताटीलायी ग्यानदेव
घरामदी रे दडले

उबगले ग्यानदेव
घडे असंगाशी संग
कयवयली मुक्ताई
बोले ताटीचे अभंग

घेती हिरिदाचा ठाव
ऐका ताटीचे अभंग
एकाएका अभंगात
उभा केला पांडुरंग

गह्यरले ग्यानदेव
डोये गेले भरीसनं
असा भाग्यवंत भाऊ
त्याची मुक्ताई बहीन


कवियित्री  - बहिणाबाई चौधरी

पावसाच्या काय मनात ग.....

उन्हे उलटता, सांजवेळी,,,श्रावण ओल्या घनात ग
दाटून आले आभाळ सारे...पावसाच्या काय मनात ग...


रिमझिम रिमझिम झिरमिरती...इवलेइवले तुषार ग...
हळूच मागून खोडी काढी ...वारा किती हुशार ग...

उघडीप झाली मेघाआडूनी...तळ्यात चमचम बिंब ग...
तिरिप कोवळी पिवळीपिवळी...पानांत टपटप थेंब ग...

श्रावण सा-या चराचरांत...नवचैतन्याचा पूर ग
अलगद जैसे मनात कोणी...छेडत राही सूर ग...


कवयत्री  - अनुराधा म्हापणकर

प्यारे

दगडाला देव मानून
नका तोडू अकलेचे तारे |
माणसातला देव जाणा,
ओसांडतील प्रेम झरे ॥

स्वार्थ अन् हव्यासाने,
माणूसपण विसरले सारे |
आयुष्याचा अटळ अंत
का विसरलास प्यारे ?

माणूसकीचा झरा आटला,
सद्गुणांचा कंठ दाटला |
बेईमानी आणि क्रुरतेत,
मानव नखशिखांत माखला ॥

दुष्कृत्याचे जाळे विणता,
दुर्गुणांचा मंत्र तू जपला |
सद्गुणांची झालर ओढता,
बेईमानीचा कळस गाठला ॥

केसाने गळा कापताना,
इमानीचा बुरखा झाकला |
जैसी करणी वैसी भरणी कळली,
परी तू नाही वाकला ॥


कवी - अनिल शिंदे

अबोल तू ही अबोल मी ही

नात्यांमधले बंध अनामिक
मला उमजले असे अचानक

तटस्थ जरी तू या वळणावर
परतुनी येशील नकळत अवचित,

अभिसारीका तुझ्या मनीची
व्हावे मीच ही आस जीवाची

दूर उभा तू सागर तीरी
तरंग उठता का वळून पाहशी,

तुला ही कळले बंध मनाचे
नाते आपुले युगायुगाचे

अबोल तू ही अबोल मी ही
तरीही घडले लोभस काही,

अशीच असते का रे प्रिती
अमूर्त, निरामय तरी युगांती

तुला उमजले मला ही कळले
शब्दाविण हे बंध अनामिक

अशीच राहो प्रित चिरंतन
भूलोकी या अनंत अविरत...


कवियत्री - अंजली राणे वाडे

माझ्या खिशातला मोर

माझ्याजवळ,
माझ्या खिशात
नेहमी एक मोर असतो
पण माझ्या खिशातला हा मोर
साधासुधा मोर नाही.

कधीमधी उदासलं
किंवा मनावर काळे ढग दाटून आले
की हा शिकवलेला मोर
खिशातून आपोआप बाहेर येतो,
देहभर पिसारा फुलवतो अन नाचतो..
मनसोक्त...मनमुराद.

त्याला नाचताना पाहून
मुसळधार पाऊस पडतो,
उदास काळे ढग निघून जातात
अन माझं मन
पुन्हा शुभ्र होतं...निरभ्र होतं

एक गंमत सांगू?
असाच एक मनकवडा मोर
तुमच्याही खिशात आहे:
फक्त तुम्ही,
त्याला नाचणं शिकवायला हवं !


कवी - प्रशांत असनारे

छोटीसी आशा

झाली तयारी पुर्ण?
तुझा चाकू कुठाय?
हा असा बोथट का?
नीट धार करुन घे-
टेकताच रक्त आलं पाहीजे!

तुझं पिस्तूल व्यवस्थित आहे ना?
साफ केलं?
ठीक आहे,
मग आता लोड करुन ठेव.

तुझा हा वस्तरा असा का?
जुना वाटतोय;
नवीन घे.
उगाच रिस्क नको!
आणि...

...आणि हे काय?
एवढी जय्यत तयारी सुरु असताना
हा कोण मूर्ख
माउथऑर्गन वाजवतोय?

असू दे! असू दे!!
तोही खिशात असू दे.
कुणी सांगावं-
कदाचित तोच उपयोगी पडेल!


कवी - प्रशांत असनारे

सुख बोलत नाही

सुख बोलत नाही;
ते कणाकणातून फक्त झिरपत राहतं
कडेकपारीतून ठिबकणा-या सहस्त्रधारेसारखं
फेसाळत्या दुधासारखं ते जिवणीच्या कडेकडेनं सांडत असतं.
तीराला बिलगणा-या फेसासारखं ते नाच-या डोळ्यांतून खेळत असतं.
सुख बोलत नाही;
बोलू शकतही नाही.
आभाळाला ओढून घेणा-या सरोवरासारखं
ते जीवाला स्वत:त ओढून घेतं, लपेटून घेतं.
—- निरोपाच्या थरथरत्या क्षणी बोलू पाहतं ते सुखच असतं
तेव्हाही त्याची भाषा असते हुंकाराची, खुणेची,
डोळ्यांत साकळलेल्या आसवांची
सुख बोलत नाही;
बोलू शकतही नाही.
ते असतं…. फक्त असतं.


कवयित्रि  - अनुराधा पाटील

आपणच आपल्याला

आपणच आपल्याला लिहलेली
पत्रं वाचता वाचता
ओले होणारे डोळे पुसून
फडफडू द्यावित वा~यावर पानं....

थोडसं हसून आपणच आपल्याला
सांगावी कधीतरी एखादी गोष्ट
आपणच गावं आपल्यासाठी
रिमझिमत्या स्वरांच एखादं गाणं.......

आपणच जपावेत मनात;
वा~यावर झुलणारे गवताचे तुरे
एखादी धावणारी पायवाट, अन्
जपावेत काही नसलेले भास्......

जिथं आपल्यासाठी फुलं उमलतील
अशी जागा सगळ्यानाच सापडत नाही
मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना
आपणच द्यावेत थोडेसे श्वास........


कवियत्री - अनुराधा पाटील

माझ्या जीवनाचा झालो मी गायक !

कान देऊनीया बैसलो ऐकत

जीवन-संगीत माझे मीच

विविध रागांचे सुरेल मीलन

जाहले तल्लीन मन माझे

आज मी जाहलो पुरा अंतर्मुख

माझे सुखदुःख झाले गाणे

बाहेरील जगी तीव्र कोलाहल

त्यात हे मंजूळ गाणे माझे

माझ्या जीवनाचा झालो मी गायक

आणिक रसिक श्रोता मीच !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

कुतूहल

लवले होते फ़ुलुनी ताटवे नव्या वसंतात
चंद्र बिलरी शिंपित होता रजताने रात
बसलो होतो हिरवळीत गुणगुणत भावगीत
आशा पक्षांपरी उडाल्या होत्या गगनात

तोच अचानक फ़ुले कोठोनि पड्ली ओंजळ्भर
आणि खोडकर तुझे हात ते आले खांद्यावर
कलेकलेने चंद्रापरी ते प्रेमहि मावळ्ले
शिड फ़िरवुनी तारु आपले माघारी वळ्ले

आज पुन्हा त्या जागी येता तुट्लेले धागे
ताट्व्यात या दिसती अजुनि हो अंतर जागे
आज नसे ती व्याकुळ्ता ,ना राग ना अनुराग
विझुनि गेलि कधिच जी तु फ़ुलवलीस आग

मात्र कुतुहल केवळ वळ्तांना पाउले
किती जणांवर उधळलीस वा उधळ्शील तु फ़ुले


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

मातृभूमीप्रत

जन्मा येउनिया कुशीं तव; तुझ्या स्कंधीं उरीं वाढुनी
प्रेमाचा नच गोड शब्द वदलों केव्हां तुला आजुनी,
नाहीं एक विचारही अजुनिया त्वत्सेवनीं योजिला;
ऐशाला म्हणशील काय मजला तूं सांग गे आपुला ?  || १||

जे त्वत्पुत्र उदारधी झिजविती काया तुझ्या सेवनीं,
जाळाया निज पोट ही शिणविली वाणी तयां निंदुनी;
व्हावा तोष धन्यास यास्तव सदा मी हासलों त्यांजला,
आतां तूं कुरवाळशील वद का ऐशा कुपुत्रा मला ?  ||२||

'खोटी ही दुबळी, गुलाम, भरला वृद्धापकाळीं चळ,'
ऐसा दोष दिला तुला वश परां होवोनिया केवळ;
आतां हें स्मरतां मना हळहळे तें; गे गळा दाटला-
डोळे तूं पुसशील काय पदरें घेवोनि अंकीं मला ?  ||३||

जें त्वां जीवन हें दिलें, सकळ ही सत्ता तुझी ज्यावरी
जातां तें परसेवनीं न तिळही संकोचलों अंतरीं;
धिग्धिग् जीवन हें ! असें मन अतां धिक्कारितें गे मला,
त्यातें तूं धरिशील काय ह्रदयीं पान्हा फुटोनी तुला ? || ४||

आहाहा ! सुत ते असिव्रत जईं त्वत्सेवनीं पाळितां
धैर्याचे गिरि ते कधीं न डगले आकाशही फाटतां,
नेतां त्यांस दिगंतरास फुटला आई, उमाळा तुला-
डोळे तूं पुसशील का निज, यमें नर्कास नेतां मला ?  ||५||


कवी - भा. रा. तांबे

विंडो

बायको - ( फोनवर)
हॅलो... अहो ,विंडो उघडत नाहीय. काय करू?
नवरा - असं कर , थोडं तेल गरम कर आणि ते त्यावर ओत.
बायको - ( आश्चर्याने) खरंच त्यामुळे उघडेल ?
नवरा - अगं हो. करून तर बघ.
थोड्या वेळाने नवऱ्याने पुन्हा फोन केला.
नवरा - केलंस का मी सांगितलं तसं ?
बायको - अहो , केलं. पण आता पूर्ण लॅपटॉपच बंद पडलाय
नवरा - च्या आईला.........

भेट अशी की...

भेट अशी की जिला पालवी
कधीच फुटली नाही
कोर शशीची घनपटलातून
कधीच सुटली नाही

मिठीविना कर रितेच राहिले
दिठीही फुलली नाही
ओठांमधली अदीम ऊर्मी
तशीच मिटली राही

युगायुगांचा निरोप होता
तोही कळला नाही
समीप येऊनी स्वर संवादी
राग न् जुळला काही

खंत नसे पण एक दिलासा
राहे हृदयी भरूनी
अलौकिकाची अशी पालखी
गेली दारावरूनी


कवी - कुसुमाग्रज
काव्यसंग्रह - पाथेय

मंथर नाग

ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालित आला मंथर नाग,
मधुनीच उभारी फणा, करी फूत्कार
ये ज्वालामुखिला काय अचानक जाग!

कधि लवचिक पाते खड्‍गाचे लवलवते,
कधि वज्र धरेवर गगनातुन कडकडते,
कधि गर्भरेशमी पोत मधे जरतार
प्रमदेचे मादक वस्त्र जणू सळसळते.

मार्गावर याच्या लवत तृणाची पाती
पर्णांवर सुमने मोडुनि माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.

चालला पुढे तो-काय ऐट!आनंद!
अग्नीचा ओहळ ओहळतो जणु मंद,
टाकली यमाने कट्यार वा कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.

वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली
रक्तात नाहली,शिरमुंडावळ भाली
थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,
हे कंकण निखळुनि पडले भूवर काली.

चालला पुढे तो लचकत मुरडत मान,
अवतरे मूर्तिमान्‌ मल्हारातिल तान
चांचल्य विजेचे,दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान!

हा थांब-कुणाची जाळीमधे चाहूल,
अंगारकणापरि नयन कुणाचे लाल,
आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,
रे नकूल आला!आला देख नकूल!

थबकलाच जागी सर्प घालुनी वळसा,
रिपु समोर येता सोडुनि अन्‌ आडोसा,
भूमीस मारुनी मागे तीव्र तडाखा,
घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.

पडलीच उडी! की तडितेचा आघात!
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,
विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प,
फुंफाट करी अन्‌ पिशापरी त्वेषात!

रण काय भयानक, लोळे आग जळात!
आदळती,वळती,आवळती क्रोधात,
जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनांशी झुंजे वादळवात!

क्षणि धुळीत गेली वहात तो विषधार
शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूतुनि उपसुनि काढुनि दात
वायापरि गेला नकुल वनातुनि दूर.

संग्राम सरे , रक्ताचे ओघळ जाती,
आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,
पिंजून कापसापरी पडे तो नाग,
ते खंड गिळाया जमले किटक भोती!


कवी - कुसुमाग्रज

गुलाम

घणघणती चक्रें प्रचंड आक्रोशात

फिरतात पिसाटापरी धुंद वेगात !

अणुअणूस आले उधाण वातावरणी

जणु विराट स्थंडिल फुलवी वादळवात !

तो गुलाम होता उभा अधोमुख तेथे

शूलासम कानी सले उग्र संगीत !

आक्रंदत काळीज विदीर्ण वक्षाखाली

फुटलेल्या पणतित जळे कोरडी ज्योत.

ओठावर होती मुकी समाधी एक

पोटात जिच्या विच्छिन्न मनाचे प्रेत !

बेहोष घोष तो ऐकुनिया चक्रांचा

क्षण मनास आली मादकता विक्लान्त

हिमगिरीप्रमाणे विरघळलेले जग भवती

अन् जागी झाली माणुसकी ह्रदयात !

क्षणि दुभंग झाल्या ह्रदयांतील समाधी

पांगळी पिशाच्चे उठली नाचत गात !

वर पुन्हा पाहता उरी कसेसे होई

डोळ्यांचे खन्दक-जमे निखारा त्यात !

आकुंचित होई आवेगात ललाट

थरथरुनी किंचित हलला उजवा हात

पाहिले सभोती फोडुनि अन् किंकाळी

चक्रात घातले मनगट आवेशात !

कक्षेत रवीच्या तुटून ये ग्रहखण्ड

ओढला जाउनी तसा फिरे चक्रात

तनु दुभंग झाली आणि थांबले चाक

घंटाध्वनि घुमला गभीर अवकाशात !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

लिलाव

उभा दारी कर लावुनी कपाळा

दीन शेतकरी दावुनी उमाळा,

दूत दाराशी पुकारी लिलाव,

शब्द कसले ते-घणाचेच घाव !

पोसलेले प्राशून रक्त दाणे

उडुनि जाती क्षणी पाखरांप्रमाणे

निघत मागुनि वाजले आणि थाळि,

गाडग्यांची ये अखेरीस पाळी !

वस्तुवस्तूवर घालुनिया धाड

करित घटकेतच झोपडे उजाड

स्तब्ध बाजूला बसे घरधनीण

लाल डोळ्यातिल आटले उधाण

भुके अर्भक अन् कवळुनी उरास

पदर टाकुनि त्या घेइ पाजण्यास

ऊर उघडे ते तिचे न्याहळोनी

थोर थैलीतिल वाजवीत नाणी

"आणि ही रे !" पुसतसे सावकार,

उडे हास्याचा चहुकडे विखार


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

बळी

दूर देशी राहिलेले दीन त्याचे झोपडे !

बापुडा अन् आज येथे पायवाटेला पडे !

शोधण्याला भाकरीचा घास आला योजने

आणि अन्ती मृत्युच्या घासात वेडा सापडे !

लाज झाकाया कटीला लावलेली लक्तरे

अन् धुळीने माखलेले तापलेले कातडे !

आर्त डोळ्यांतून सारी आटलेली आसवे

आत दावाग्नीच पेटे ओढ घेई आतडे !

झाकल्या डोळ्यास होती भास, दोही लेकरे

हात घालोनी गळ्याला ओढती खोप्याकडे

नादला झंकार कानीं कंकणांचा कोठुनी

काळजाला तो ध्वनी भिंगापरी पाडी तडे !

भोवतीचे उंच वाडे क्रूरतेने हासती

मत्त शेजारून कोठे आगगाडी ओरडे !

आणि चक्रे चालली ती-हो महाली गल्बला

चाललाही प्राण याचा, पापणी खाली पडे !

थांबल्या त्या हालचाली, थांबले काळीज हो

आणि माशांचा थवा मुद्रेवरोनी बागडे !

ना भुकेचा यापुढे आक्रोश पोटी चालणे

याचनेचे दीन डोळे बंद झाले यापुढे !

यापुढे ना स्वाभिमाना लागणे आता चुडा

अन्तराला आसुडाचे घाव माथी जोखडॆ !

मानवांच्या संस्कृतीची काय लागे ही ध्वजा

तीस कोटी दैवतांच्या की दयेचे हे मढे !

मूक झालेल्या मुखाने गर्जते का प्रेत हे

घालिती हे बंद डोळे का निखार्‍याचे सडे !

अन् अजुनी हासती उन्मत्त हो प्रासाद ते

वेग-वेड्या वाहनांचा घोष ये चोहीकडे

भेकडांनो, या इथे ही साधण्याला पर्वणी

पेटवा येथे मशाली अन् झडू द्या चौघडे !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

आस

करि मुक्त विहंगम हा रमणी !

रहावया मज प्रिये, मनोहर

कनकाचा घडविलास पंजर

छतास बिलगे मोत्यांचा सर

या सलत शृंखला तरि चरणीं !

करि मुक्त विहंगम हा रमणी !

तुझ्या कराचा विळखा पडता

तव वृक्षाच्या उबेत दडता

गमे जिण्याची क्षण सार्थकता

परि अंतरि करि आक्रोश कुणी

करि मुक्त विहंगम हा रमणी

नकोस पसरूं मोहक बाहू

मृदुल बंध हे कुठवर साहू

नभ-नाविक मी कुठवर राहू

या आकुंचित जगि गुदमरुनी

करि मुक्त विहंगम हा रमणी !

जावे गगनी आणिक गावे

मेघांच्या जलधीत नहावे

हिरव्या तरुराजीत रहावे

ही आस सदा अंतःकरणी

करि मुक्त विहंगम हा रमणी !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

मूर्तिभंजक

जगाचा गल्बला

जगात सोडुन

प्रेमाची मृणाल-

बंधने तोडून-

होता तो भ्रमिष्ट

भ्रमत एकला

नादात अगम्य

टाकीत पावला

वर्तले नवल

डोंगर-कपारी

गवसे प्रतिमा

संगमरवरी !

हर्षाचा उन्माद

आला त्या वेड्याला

घेऊन मूर्ति ती

बेहोष चालला,

आढळे पुढती

पहाड उभार

वेड्याच्या मनात

काही ये विचार

थांबवी आपुला

निरर्थ प्रवास

दिवसामागून

उलटे दिवस-

आणिक अखेरी

राबून अखण्ड

वेड्याने खोदले

मंदिर प्रचंड

चढवी कळस

घडवी आसन,

जाहली मंदिरी

मूर्त ती स्थापन !

नंतर सुरू हो

वेड्याचे पूजन

घुमते कड्यात

नर्तन गायन

रान अन् भोतीचे

स्फुंदते सकाळी

ठेवी हा वेलींना

ना फूल, ना कळी !

विचारी आश्चर्ये

तृणाला ओहळ

कोण हा हिरावी

रोजला ओंजळ ?

परन्तु मूर्त ती

बोलेना, हलेना,

वेड्याचे कौतुक

काहीही करीना !

सरले गायन

सरले नर्तन

चालले अखेरी

भीषण क्रंदन

पडून तिच्या त्या

सुन्दर पायाशी

ओरडे रडे तो

उपाशी तापाशी !

खुळाच ! कळे न

पाषाणापासून

अपेक्षा कशाची

उपेक्षेवाचून !

वैतागे, संतापे,

अखेरी क्रोधाने

मूर्तीच्या ठिकर्‍या

केल्या त्या भक्ताने !

रित्या त्या मंदिरी

आता तो दाराशी

बसतो शोधत

काहीसे आकाशी.

वाटेचे प्रवासी

मंदिरी येतात

आणिक शिल्पाची

थोरवी गातात.

पाहून परंतू

मोकळा गाभारा

पाषाणखंडांचा

आतला पसारा-

त्वेषाने बोलती

जाताना रसिक

असेल चांडाळ

हा मूर्तिभंजक !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

तरीही केधवा

दोघांत आजला
अफाट अन्तर
जुळून पाकळ्या
उडाल्या नंतर-
जीवनावाचून
जळला अंकुर
प्रश्नहि राहिला
राहिले उत्तर !

संग्रामी आजला
शोधतो जीवित
उरींचे ओघळ
दाबून उरात-
उठती भोवती
धुळीचे पर्वत
अखण्ड फिरते
वरून कर्वत !
वादळी रणांत
करणे कोठून
नाजूक भावांचे
लालनपालन-
तरीही केधवा
पडता पथारी
थडगी दुभंग
होतात अंतरी-
आठवे तुझ्या ते
प्रीतीचे मोहळ
आणि हो बिछाना
आगीचा ओहळ !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

जा जरा पूर्वेकडे

चीन-जपानी युद्धांत चाललेले राक्षसी अत्याचार या कवीतेत अभिप्रेत आहेत.

जा जरा पूर्वेकडे !

वाळवण्टी कोरता का एक श्वानाचे मढे ?

जा गिधाडांनो, पुढे

जेथ युद्धाची धुमाळी गंज प्रेताचा पदे,

जा जरा पूर्वेकडे !

आणि रक्ताच्या नद्या हो वाहती धारोष्णशा

भागवा तेथे तृषा,

ढीग साराया शवांचा तेथ लागे फावडे,

जा जरा पूर्वेकडे !

गात गीते जाउ द्या हो थोर तांडा आपुला,

देव आहे तोषाला

वर्षता त्याचा दयाब्धी राहता का कोरडे ?

जा जरा पूर्वेकडे !

तेथ देखा आग वेगाने विमाने वर्षती,

थोर शास्त्रांची गती

धूळ आणि अग्नि यांच्या दौलती चोहीकडे

जा जरा पुर्वेकडे !

खङ्ग लावूनी उराला बायकांना वेढती,

आणि दारी ओढती,

भोगती बाजार-हाटी मांस आणि कातडे

जा जरा पूर्वेकडे !

आर्त धावा आइचा ऐकून धावे अर्भक

ना जुमानी बंदुक

आणि लोंबे संगिनीला छान छोटे आतडे

जा जरा पूर्वेकडे !

हा दयेने ईश्वराच्या काळ आहे चालता,

व्यर्थ येथे राबता,

व्यर्थ तेथे शोणिताचे वाहुनी जाती सडे

जा जरा पूर्वेकडे !

आणि येताना पवाडे संस्कृतीचे गा जरा,

डोलु द्या सारी धरा,

मेघमालेतून आम्हा शांततेचे द्या धडे

जा जरा पूर्वेकडे !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

गोदाकाठचा संधिकाल

गर्द वनी वा गिरीकंदरी

लपलेला दिनि तम, गरुडापरि

पंख आपुले विशाल पसरुन ये विश्वावरती.

पश्चिम-वारा वाहे झुळझुळ

कंपित होउनि हेलावे जळ

दूर तरूंच्या काळ्या छाया हळुहळु थरथरती.

जीर्ण वडाच्या पारंब्यातुनि

पंखांची क्षण फडफड करुनी

शब्द न करता रातपाखरे नदीकडे उडती.

कपारीत अन् दूर कुठोनी

सांदीमध्ये लपुनी बसुनी

अखंड काढी रातकिडा स्वर ते कानी पडती.

वळणाच्या वाटेवर चाले,

आतुर अंतर कातर डोळे,

झपझप पाउल टाकित कोणी खेड्यातिल युवती.

निळसर काळे वरती अंबर,

धूसर धूराच्या रेषा वर

पलिकडच्या घन राईमधुनी चढुनी मावळती.

अभ्रखंड तो अचल पांढरा

पडे पारवा झडुनि पिसारा

तेजहीन अन् दोन चांदण्या डोकावुनि बघती.

परि शुक्राचा सतेज तारा

पसरित गगनी प्रकाश-धारा

वीरापरि आत्मार्पण करण्या आलेला पुढती.

आणिक इकडे क्षितिजावरती

विडंबण्या शुक्राची दीप्ती

शहरामधल्या क्षीण दिव्यांच्या मिणमिणती ज्योति.

वाडा पडका नदीतटावर

भग्न आपुल्या प्रतिबिंबावर

गंगेमधल्या, खिन्नपणाने लावितसे दृष्टी.

देउळ ते अन् भग्न, हटाने ध्येयनिष्ठ जणु जनाप्रमाणे

पडले तरिही जपुनी ठेवी ह्रदयातिल मूर्ति.

पाचोळ्यावर का ही सळसळ

कसली डोहावरती खळबळ

पाउल वाजे रजनीचे का येताना जगती ?


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

अवशेष

माला स्वप्नांची ओघळली !

जपली ध्येये जी ह्रदयाशी

गमली मजला जी अविनाशी

कोसळुनी ती जमल्या राशी

अवशेषाच्या या भवताली.

रवि येतां क्षितिजावर वरती

दवापरी विरल्या आकांक्षा

जागिच जिरल्या मनी जिगीषा

हासत झाकुनि त्या अवशेषा

करणे आहे प्रवास पुढती.

वास्तव जगताच्या हेमन्ती

स्वप्नांचा उत्फुल्ल फुलोरा

ढाळि तळाला वादळ -वारा

रात्रीच्या त्या प्रदीप्त तारा

काचेचे कण आता गमती.

पण अद्यापी स्मृतिचे धागे

गुन्तुन मागे जिवा ओढती

अद्यापी त्या विझल्या ज्योती

कधिं एखाद्या भकास राती

पहाट ये तो ठेवति जागे.

दृश्ये मोहक अद्यापी ती

स्वप्नामध्ये समूर्त होती

थडग्यामधुनी छाया उठती

धरावया जो जावे पुढती

थडग्यामध्ये विलीन होती.

वसन्त सरला, सरले कूजन

सरले ते कुसुमांकित नंदन

सरले आर्त उराचे स्पंदन

मूर्तीवरिल मुलामा जाउन

सरले आता मूर्तीपूजन.


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

किनार्‍यावर

पुढे पसरला अथांग दरिया

सखे, किनार्‍यावरती आपण

कोर शशीची शुभ्र बिलोरी

टाकी निज किरणांची रापण !

चित्रासम निःशब्द गमे जग

प्रकाश-काळोखाचा संगम

क्वचित भंगते गाढ शान्तता

जातां झापुन रात-विहंगम !

दूर तमांतुन दिसती अंधुक

नगरांतिल त्या ज्योती तेवत

संसारांतिल समूर्त दुःखे

बसलेली वा जागत, जाळत !

क्षितिजावर दीपांकित तारू

चाले पश्चिम दिशेस धूसर

ज्योतींचा जणुं जथा निघे हा

शोधाया मावळला भास्कर !

हळुहळु खळबळ करीत लाटा

येउनि पुळणीवर ओसरती

जणूं जगाची जीवन-स्वप्ने

स्फुरती, फुलती, फुटती, विरती !

होय किनार्‍यावरती अपुले

आज सखे, हे मङ्गल मीलन

जीवित दर्यापरी, नसे ते-

केवळ सुंदर केवळ भीषण !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

ग्रीष्माची चाहूल

हे काय अनामिक आर्त पिसें

हुरहूर अकारण वाटतसे !

कांति जगावर अभिनव शिंपित

चराचरांतुन फुलवित जीवित

वसंत ये जगिं गाजत वाजत

कां अभ्र अवेळीं दाटतसे !

नवा फुलोरा नव पर्णावलि

हिमशीतल चहुंकडे सावली

जीवनगंगा जगिं अवतरली

तरि उदास मानस होइ कसें !

दिशा दिशा या उज्जवल मंगल

आम्रांतुनि ललकारति कोकिल

दुमदुमतो वनिं तो ध्वनि मंजुल

मनिं रात्रिंचर कां कण्हत असे !

सरेल किंवा वसन्त म्हणुनी

सुकतिल कुसुमाकुल पुष्करणी

करपुनि जाइल अवघी धरणी

ती आंच अगोदर भासतसे !

अग्नीचा घट खांद्यावरती

घेउनि, अग्नी पेरित भंवती

ग्रीष्म निघाला येण्या जगतीं

चाहूल तयाची लागतसे !

हें काय अनामिक आर्त पिसें !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

स्वप्नाची समाप्ति

स्नेहहीन ज्योतीपरी

मंद होई शुक्रतारा

काळ्या मेघखंडास त्या

किनारती निळ्या धारा.

स्वप्नासम एक एक

तारा विरे आकाशांत

खिरे रात्र कणकण

प्रकाशाच्या सागरांत.

काढ सखे, गळ्यांतील

तुझे चांदण्याचे हात

क्षितिजाच्या पलिकडे

उभे दिवसाचे दूत.

रातपाखरांचा आर्त

नाद नच कानीं पडे

संपवुनी भावगीत

झोंपलेले रातकिडे.

पहांटचे गार वारे

चोरट्यानें जगावर

येती, पाय वाजतात

वाळलेल्या पानांवर.

शांति आणि विषण्णता

दाटलेली दिशांतुन

गजबज गर्जवील

जग घटकेनें दोन !

जमूं लागलेले दंव

गवताच्या पातीवर

भासतें भू तारकांच्या

आसवांनीं ओलसर.

काढ सखे, गळ्यांतील

तुझे चांद्ण्यांचे हात

क्षितिजाच्या पलिकडे

उभे दिवसाचे दूत

प्राजक्ताच्या पावलाशीं

पडे दूर पुष्प-रास

वार्‍यावर वाहती हे

त्याचे दाटलेले श्वास.

ध्येय, प्रेम, आशा यांची

होतसे का कधीं पूर्ती

वेड्यापरी पूजतों या

आम्ही भंगणार्‍या मूर्ती

खळ्यामध्यें बांधलेले

बैल होवोनिया जागे

गळ्यांतील घुंगरांचा

नाद कानीं येऊं लागे.

आकृतींना दूरच्या त्या

येऊं लागे रूप-रङ्ग

हालचाल कुजबूज

होऊं लागे जागोजाग.

काढ सखे, गळ्यांतील

तुझे चांद्ण्याचे हात

क्षितिजाच्या पलिकडे

उभे दिवसाचे दूत.

होते म्हणूं स्वप्न एक

एक रात्र पाहिलेलें

होतें म्हणूं वेड एक

एक रात्र राहिलेले.

प्रकाशाच्या पावलांची

चाहूल ये कानावर

ध्वज त्याचे कनकाचे

लागतील गडावर.

ओततील आग जगी

दूत त्याचे लक्षावधी

उजेडांत दिसूं वेडे

आणि ठरूं अपराधी.


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

हिमलाट

हिमलाट पहांटे पहा जगावर आली !

मुखिं पिळून मद्यास्तव द्राक्षांचे घोस

पाडीत मळे मोत्यांचे चरणीं ओस

उद्दाम धावते करित दुभङ्ग धरेस

करकरां पांखरें रगडी दाताखालीं

हिमलाट पहांटे पहा जगावर आली !

श्रीमन्त महालीं तिथें हिला न थारा

मखमाली दुलया देती मधुर उबारा

डोकावुन पळते कापत हीच थरारा

हो काय दरारा कनकाचा भयशाली

हिमलाट पहांटे पहा जगावर आली !

पाहून परन्तू कुठें कुडाचीं खोपीं

कंगाल कांबळीं टाकुन गेले झोंपी

शेंकडों कवाडे ! वाट जावया सोपी

कडकडून पडते तेथें लांब भुकेली

हिमलाट पहांटे पहा जगावर आली !

ज्योतींतुनि धावत या तेजःकण सारे

या यज्ञांतिल अन्‌सरणांतील निखारे

रे ढाळ नभा, तव ते ज्वालामय तारे

पेटवुं द्या वणवा कणाकणांत मशाली

हिमलाट पहांटे पहा जगावर आली !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

तोवर तुला मला

याच वस्तीतून आपला सूर्य येईल
तोवर मला गातच राहिले पाहिजे
नगरवेशीत अडखळतील ऋतू
तोवर प्रिये जागत राहिले पाहिजे

तुझे कुंतलहि आताच विंचरून ठेव
अंबाडय़ाच्या पेडात फुले मी खोवीन
माझ्या डोळ्यांच्या ऐन्यात पाहून घे रूप
तुझ्या कानांच्या पाळीत तारे मी खोवीन

कालच्या सभेत गाईलेले मी गीत
ज्यात तुझ्या-माझ्या आशांचे खजिने होते
त्या ओळीहि ओठांवर घोळवून ठेव
ज्यात तुझ्या-माझ्या सुखाचे छबिने होते

आणखी एक काम करावे तू लगेच
फाटक्या कोटासहि टाके घालून ठेव
फुले हुंगीतच जाऊ दोघेहि गर्दीतून
तुझी रेशमासम बोटे दंडात ठेव

याच वस्तीतून आपले सुख येईल
तोवर तुला- मला जागलेच पाहिजे
दारावर येतील सोनेरी मनोरथ
तोवर प्रिये वाट पाहिलीच पाहिजे.


कवी - नारायण सुर्वे

माझी आई

जेव्हा तारे विझू लागत
उंच भोंगे वाजू लागत
पोंग्याच्या दिशेने वळत
रोज दिंडय़ा जात चालत
झपाझप उचलीत पाय
मागे वळून बघीत जाय
ममतेने जाई सांगत
नका बसू कुणाशी भांडत
वर दोन पैसे मिळत.

दसऱ्याच्या आदल्या दिनी
जाई पाचांसह घेऊनी
फिरू आम्ही आरास बघत
साऱ्या खात्यांतून हुंदडत
किती मज्जा म्हणून सांगू
शब्दसाठे झालेत पंगू
भिंगऱ्या पेपेटे घेऊन
फुग्यांचे पतंग झोकून
जात असू पक्षी होऊन.

एक दिवस काय झाले
तिला गाडीतून आणले
होते तिचे उघडे डोळे
तोंडातून रक्त भळभळे
जोडीवालीण तिची साळू
जवळ घेत म्हणाली बाळू
मिटीमिटी पाहात होतो
माझे छत्र शोधीत होतो
आम्ही आई शोधीत होतो.

त्याच रात्री आम्ही पाचांनी
एकमेकांस बिलगूनी
आईची मायाच समजून
घेतली चादर ओढून
आधीचे नव्हतेच काही
आता आईदेखील नाही
अश्रूंना घालीत अडसर
जागत होतो रात्रभर
झालो पुरते कलंदर.


कवी - नारायण सुर्वे 

क्षितीज रुंद होत आहे

आज माझ्या वेदनेला
अर्थ नवा येत आहे
आणि मेघांच्या डफावर
थाप बिजली देत आहे

आज मरण आपुल्याच
मरणाला भीत आहे
आणि मृत्युंजयी आत्मा
पुन्हा धडक देत आहे

आज शुष्क फांद्यावर
बहर नवा येत आहे
भूमीच्या गर्भामधुनी
बीज हुंकार देत आहे

आज सारे गगन थिटे
नजरेला येत आहे
काळोखाच्या तबकडीत
सूर्य गजर देत आहे

आज तडकलेले मन
एकसंध होत आहे
आणि उसवलेले धागे
गुंफूनीया देत आहे

आज माझ्या कोरड्या गा
शब्दात आग येत आहे
आणि नव्या सृजनाचे
क्षितीज रुंद होत आहे.


कवी - नारायण सुर्वे

असाच

वेगळीच जात तुझी;
वेगळाच ताल
तूं अफाट वाट तुझी
एकटाच चाल.

एकटाच चालत जा
दूर दूर दूर
गात गात तूंच तुझा
एकटाच सूर

एकटाच चालत जा
उंच आणि खोल;
बोल आणि ऍक पुन्हा
तूं तुझा बोल.

तूं असाच झिंगत जा
विस्मरून पीळ
तूं असाच फुंकीत जा
अर्थशून्य शीळ

अंतरात पाहत जा
भास तूं तुझेच्;
शांततेत ऍकत जा
श्वास तूं तुझेच.

खोल या दरीत अशा
गर्द साऊलीत
हो निमग्न तूंच तुझ्या
मंद चाहुलीत.


कवी - ना. घ. देशपांडे

मानस

मानस माझ्या मनीचा केवळ
सांगण्या इथे आलो मी
दोन मनांचा सुरेख संगम
घडवण्या इथे आलो मी

अर्थातूनही अर्थ निघाया
शब्द सांडतो येथे मी
बीज फुलांचे येथ रोवण्या
शाब्दिक सुमने खुडतो मी

कवनाला या बंध न कसले
पाशही सारे सोडून मी
कवित्त्वतेची चढवूनी वस्त्रे
कवनमंदिरी रमतो मी

दोन झरोके दोन क्षणांचे
येथ उघडूनी पाहतो मी
कवनवराला प्रणाम करूनी
काव्य दालनी येतो मी


कवियत्री - सौ. जुई जोशी.

निष्काम कर्म

सांगशी निष्काम कर्म, कृष्णा अरे वेदांत तू
समजला की काय आम्हा किर्लोस्करांचा पंप तू
मोक्ष हा परमार्थ ऐसे सांगशी जेथे तिथे
तू तरी देवा कधी आहेस का गेला तिथे?

भोगीशी ऐश्वर्य, सारे वंदिति एच्छा तुझी
सन्यास पण सार्‍या जगाने, घ्यावा अशी एच्छा तुझी

निष्कामता अंगी, थोडी जरी असती तुझ्या
धावूनी सार्‍या येता, आमच्याकडे गोपी तुझ्या

अरे भगवंता भेटुनीया, मज काय देशील तू?
मंत्र्या परी येशील, थोडा हासूनी जाशील तु

प्रारब्ध जर अमुचे, आम्हा आहे भोगायचे
सांग तर आम्ही कशाला,कुंकू तुझे लावायचे


कवी - भाऊसाहेब पाटणकर

वाट पाहतोय

वाट पाहतोय अल्लड क्षणांची
स्वप्नातल्या तुझ्या सोबतीची
न उमगलेल्या अनामिक नात्याची
भूरळ पडणाऱ्या त्या हास्याची

वाट पाहतोय तुझ्यात हरवून जाण्याची
मिठीत तुझ्या सहज विरून जाण्याची
निवांत तुझ्या कुशीत निजण्याची
नितांत बडबडनारे होठ पाहण्यची

वाट पाहतोय माझी होण्याची
हळुवार पाऊलांनी तुझ्या येण्याची
अनामिक्तेला एक नाव देण्याची
फक्त तुझाच होऊन जाण्यची

आता फक्त वाट पाहतोय..
आता फक्त वाट पाहतोय..
तुझी त्या क्षणांची आणि माझी..
आता फक्त वाट पाहतोय.
पेट्रोल आणि मुलींमध्ये काय समानता आहे???
?
?
?
?
?
?
?
जेंव्हा त्यांना समजते कि आपणल्याला त्यांची खूप गरज आहे,
तेंव्हा झटकन त्यांचा भाव वाढतो. 

अनंता तुला कोण पाहु शके

अनंता तुला कोण पाहु शके
तुला गातसा वेद झाले मुके
मतीमंद अंधा कसा तू दिसे
तुझी रूप तृष्णा मनाला असे

तुझा ठाव कोठे कळेना जरी
गमे मानसा चातुरी माधुरी
तरू वल्लरींना भुकी मी पुसे
तुम्हा निर्मिता देव कोठे वसे

फुले सृष्टीची मानसा रंजिती
घरी सोयरी गुंगविती मती
सुखे भिन्नही येथे प्राणी चुके
कुठे चिन्मया ऐक्य लाभू शके

तुझे विश्व ब्रम्हांडही निःस्तुला
कृति गावया रे कळेना मला
भुकी बालका माय देवा चुके
तया पाजुनी कोण तोषु शके

नवी भावपुष्पे तुला वाहिली
तशी अर्पिली भक्ती बाष्पांजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्र्भू कल्पना जल्पना त्या हरो


कवी  - बा.भ.बोरकर

दारू वर उपाय - दात घासा

डॉक्टर ने विचारले काय झाले?

महिला म्हणाली डॉक्टर साहेब मला समजत
नाही की मी काय करू? माझा नवरा रोज दारू पिऊन येतो आणि मला मारतो.

डॉक्टर म्हणाले यावर माझ्याकडे फारच चांगला उपाय आहे. जेव्हा तुझा नवरा दारू पिऊन येईल तेव्हा तू दात घासायला सुरुवात करत जा आणि दातच घासत जा.

तीन आठवड्या नंतर महिला परत आली. ती आता व्यवस्थित दिसत होती आणि आनंदी वाटत होती.

महिलेने डॉक्टरांना सांगितले तुम्ही सांगितलेला उपाय मी केला. त्याचा फारच चांगला परिणाम दिसून आला. आता माझा नवरा मला मारत नाही आणि भांडण सुध्दा करत नाही.

डॉक्टर म्हणाले पाहिलेस जर तोंड बंद ठेवलेस तर किती फरक पडतो...

रजेवर

“काय हो, तुम्ही पोलीस कां ? ” एक माणूस पोलीसाच्या गणवेशातल्या माणसाला म्हणाला.
“नाही, मी गुप्तहेर आहे.”
“मग तुम्ही हा गणवेश का घातला आहे”
“आज मी रजेवर आहे !” 

चौथ्याचा शोध

पोलिस खात्याच्या मुख्य कार्यालयातून एका गुन्हेगाराचे चार वेगवेगळी छायाचित्रे देण्यात आली.
दोन दिवसानंतर एका शिपायाने फोनवर कळवले की- सर, चार पैकी तिघांना अटक केली आहे, चौथ्याचा शोध करत आहोत.