किनार्‍यावर

पुढे पसरला अथांग दरिया

सखे, किनार्‍यावरती आपण

कोर शशीची शुभ्र बिलोरी

टाकी निज किरणांची रापण !

चित्रासम निःशब्द गमे जग

प्रकाश-काळोखाचा संगम

क्वचित भंगते गाढ शान्तता

जातां झापुन रात-विहंगम !

दूर तमांतुन दिसती अंधुक

नगरांतिल त्या ज्योती तेवत

संसारांतिल समूर्त दुःखे

बसलेली वा जागत, जाळत !

क्षितिजावर दीपांकित तारू

चाले पश्चिम दिशेस धूसर

ज्योतींचा जणुं जथा निघे हा

शोधाया मावळला भास्कर !

हळुहळु खळबळ करीत लाटा

येउनि पुळणीवर ओसरती

जणूं जगाची जीवन-स्वप्ने

स्फुरती, फुलती, फुटती, विरती !

होय किनार्‍यावरती अपुले

आज सखे, हे मङ्गल मीलन

जीवित दर्यापरी, नसे ते-

केवळ सुंदर केवळ भीषण !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा