ग्रीष्माची चाहूल

हे काय अनामिक आर्त पिसें

हुरहूर अकारण वाटतसे !

कांति जगावर अभिनव शिंपित

चराचरांतुन फुलवित जीवित

वसंत ये जगिं गाजत वाजत

कां अभ्र अवेळीं दाटतसे !

नवा फुलोरा नव पर्णावलि

हिमशीतल चहुंकडे सावली

जीवनगंगा जगिं अवतरली

तरि उदास मानस होइ कसें !

दिशा दिशा या उज्जवल मंगल

आम्रांतुनि ललकारति कोकिल

दुमदुमतो वनिं तो ध्वनि मंजुल

मनिं रात्रिंचर कां कण्हत असे !

सरेल किंवा वसन्त म्हणुनी

सुकतिल कुसुमाकुल पुष्करणी

करपुनि जाइल अवघी धरणी

ती आंच अगोदर भासतसे !

अग्नीचा घट खांद्यावरती

घेउनि, अग्नी पेरित भंवती

ग्रीष्म निघाला येण्या जगतीं

चाहूल तयाची लागतसे !

हें काय अनामिक आर्त पिसें !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा