हिंदू आणिक मुसलमान ते भांडत होते तदा
राष्ट्रावरती महदापदा
जिकडेतिकडे हाणामारी दंगेधोपे सुरु
माझा जीव करी हुरहुर
परस्परांच्या खुपशित होते पोटामध्ये सुरे
ऐकुन माझे अंतर झुरे
गेले बंधुभाव विसरुन
गेले माणुसकी विसरुन
गेले पशुच अंध होउन
अविवेकाने परस्परांचे कापित होते गळे
माझ्या डोळ्यांतुन जळ गळे।।
खिन्न होउनी, उदास होउनी निराश होउन मनी
बसलो होतो मी त्या दिनी
एकाएकी अन्यत्र मला आहे बोलावणे
नव्हते शक्यच ते टाळणे
सायंकाळी गाडी होती तिकिट तिचे काढुन
बसलो गाडीत मी जाउन
नव्हते लक्षच कोणीकडे
येई पुन:पुन्हा मज रडे
भारति माझ्या का कलिकिडे
विचार नाना काहुर उडवित मानस शोके जळे
प्रभु दे सुमति कधी ना कळे।।
देव मावळे पश्चिमभागी लाल लाल ते दिसे
रक्तच का ते तेथे असे
काय तिथेही खून चालले? रवि का कुणि मारिला?
कुणि तत्कंठ काय कापिला?
भेसुर ऐसा विचार येउन मनि गेलो दचकुन
पाहू लागे टक लावुन
विरले लाल लाल ते परी
तारका चमकू लागत वरी
शांती पसरे धरणीवरी
लाल लाल रुधिरानंतर का शांति जगाला मिळे
काहिच मन्मतिला ना कळे।।
गाडीमध्ये दिवे लागले, तारका वरि जमकले
तिमिरी प्रकाश जगता मिळे
भारतीय जनता हृदयांबरि प्रेमतारकातती
केव्हा चमकु बरे लागती?
प्रेमदीप कधि भारतीय-हृन्मंदिरि पाजळतिल?
केव्हा द्वेष सकल शमतिल?
वरती ता-यांना पाहुन
ऐसे विचार करि मन्मन
मधुनी पाझरती लोचन
खिडकीच्या बाहेरच मन्मुख जे अश्रूंना मळे
डोळे प्रभुचरणी लाविले।।
गाडीमध्ये नानापरिचे होते तोथे जन
तिकडे नव्हते माझे मन
एकाएकी खिडकीतुन परि आत वळविले मुख
विद्युद्दीप करित लखलख
गोड गोड मी शब्द ऐकिले भरलेले प्रीतीने
गेलो मोहुन त्या वाणिने
होती एक मुसलमानिण
होती गरीब ती मजुरिण
दिसली पोक्त मला पावन
आवडता तत्सुत बाहेरी पुन:पुन्हा पाहत
होती त्याला समजावित।।
गरीब होती बाई म्हणुनी नव्हता बुरखा तिला
होता व्यवहार तिचा खुला
प्रभुच्या सृष्टीमधे उघड ती वागतसे निर्भय
सदय प्रभुवर ना निर्दय
खानदानिच्या नबाबांस ती आवरणे बंधने
गरिबा विशंक ते हिंडणे
होती तेजस्वी ती सती
दिसली प्रेमळ परि ती किती
बोले मधुर निज मुलाप्रती
मायलेकरांचा प्रेमाचा संवाद मनोहर
त्याहुन काय जगी सुंदर?।।
“नको काढु रे बाळा! डोके बाहेरी सारखे”
बोले माता ती कौतुके
“किति सांगावे फार खोडकर पुन्हा न आणिन तुला”
ऐसे बोले प्रेमे मुला
“ये मजजवळी मांडीवर या ठेवुन डोके निज
बेटा! नको सतावू मज
झाली भाकर ना खाउन
जाई आता तरि झोपुन
डोळ्यांमध्ये जाइल कण”
असे बोलुन प्रेमे घेई बाळ जवळ ओढुन
ठेवी मांडीवर निजवुन।।
पाच सहा वरुषांचा होता अल्लड तो बालक
माता करिते तत्कौतुक
क्षणभर त्याने शांत ठेविले डोके मांडीवरी
चुळबुळ मधुन मधुन तो करी
पुनरपि उठला, गोड हासला, मातेसही हासवी
जाया संमति जणु त्या हवी
का रे उठसि लबाडा अता
डोळे मिटुनी झोपे अता
ऐसे अम्मा ती बोलता
फिरुन तिच्या मांडीवरती बाळ गोड झोपला
त्याचा मुका तिने घेतला।।
मुसलमान बाईशेजारी होती एक कुणबिण
होते करुण तिचे आनन
लहान अर्भक बसली होती मांडीवर घेउन
पाणरलेले तल्लोचन
एकाएकी मूल रडाया मोठ्याने लागले
पाजायास तिने घेतले
घाली पदर तन्मुखावरी
लावी स्तनास तन्मुख करी
अर्भक आक्रंदे ते परी
पुन:पुन्हा ती स्तनास लावी अर्भकमुख माउली
परि ते तोंड लाविना मुळी।।
“पी रे बाळा! ही वेल्हाळा! नको रडू रे असा
रडुनी बसला बघ रे घसा
किति तरि रडशिल उगी उगी रे काय तुला जाहले
गेले सुकुन किती सोनुले
उगी उगी रे पहा पहा हे दिवे लागले वरी”
राहे बाळ उगा ना परी
त्याला पायावर घालुन
हलवी आई हेलावुन
बघते अंगाई गावुन
रडे तयाचे कमि न होइ परि अधिकच रडू लागला
वाटे मरण बरे जननिला।।
चहा चिरुट चिवडा भजि यांचे भक्त तदा कोपले
मातेवरि गुरुगुरु लागले
“किति रडविशि गे त्या पोराला ट्यांहा ट्यांहा करी
होतो त्रास इथे किति तरी
दांडक थोपट टाक निजवुनी
घंटाभर रडतसे
लाजच बायांना या नसे”
ऐकून निर्दय ते बोलणे
बालक आपटिले जननीने
बाकावरती निष्ठुरपणे
“तूहि कारट्या आईला या आलास छळावया”
बोले माया विसरुनिया।।
पुन्हा उचलिले तिने तान्हुले प्रेम न रागावते
क्षणभर जणु ते भांबावते
“उगी उगी रे तुला नाहि हो बाळा! मी बोलल्ये
दैवच फिरले रे आपुले
पी रे राजा, पी हो थोडे, वाटेल तुल बरे”
ऐसे बोले ती गहिवरे
बाळ स्तना न लावी मुख
माता खाऊ पाहे विख
करुनी पायांचा पालख
बसली हलवित फिरुनी त्याला अगतिक भरल्या मने
वदवे काहि न तिज वाणिने।।
केविलवाणी हताश होउनि बसली ती माउली
रडते बाळक मांडीवरी
मनात म्हटले मी देवाला ‘बाळ करी रे उगी’
परि मद्वाणी ती वाउगी
प्रेमे हृदयी वोसंडोनी स्वपर सकल विसरुनी
हाती बालक ते घेउनी
असते जरि मी समजाविले
असते किति सुंदर जाहले
नव्हते भाग्य परी तेउले
मदहंकारे दूर राहुनी आळविला मी प्रभु
दंभचि परि तो जाणे विभु।।
मुसलमान बाईचे त्या असे हृदय खरे आइचे
गेले कळवळुनी मन तिचे
पुत्रप्रेमाचा तिज होता पावन तो अनुभव
सुमधुर मंगल सुंदर शिव
मांडीवरती डोके ठेवुन बाळ तिचा झोपला
होता हळुच तिने उचलिला
तेथे चिरगुट मग पसरुन
त्यावर निज बाळक निजवुन
उठली बाई मुसलमानिण
हिंदू बाइच्या जवळी गेली बोले मधुर स्वरे
कुणबिण फारच ते गहिवरे।।
“द्या मजजवळी, द्याच जरासा, घेते त्याला जरा”
ऐसे बोलुन पसरी करा
“फारच आहे रडत सारखा दृष्ट काय लागली
घामाघूम तनू जाहली
रडुनी रडुनी दमला तरिही रडणे ना थांबवी
दूधही अंगावर ना पिई
द्या मजजवळ जरा लेकरा
संकोच न तो इवला करा
घेउन बघते मी त्या जरा”
प्रेमाचे अनकंपेचे ते गोड शब्द बोलुन
घेई बाळक ती ओढून।।
गोड बोलते मुलाजवळ ती “रडू नको रे असा
रडुनी रडविसि आइस कसा”
टिचक्या वाजवि, दिवे दाखवी, हातांनी नाचवी
त्याचे हातपाय खाजवी
कानी त्याच्या कुर्र करितसे भांडे ती वाजवी
अम्मा अर्भक ते खेळवी
तेव्हा चांद उगवला नभी
फुलवी बालकवदनच्छबि
“रो मत उगि हां बेटा अबी”
प्रेमे बोलुन, बाळ डोलवी वात्सल्ये खेळवी
त्याचे रडणे ती थांबवी।।
चमत्कार जाहला खरोखर बाळ-रडे थांबले
हासू खेळू ते लागले
अम्मा त्याला वरती उडवी घेइ करी झेलुन
बाळक हसते ते खेळुन
गोड गोड ते हास्य तयाचे डब्यात पसरत असे
इतरांनाही सुखवीतसे
येती चंद्रकिरण गाडित
अर्भक गोड तसे हासत
माझे मानस मोहावत
कृतकृत्य तया अम्मेलागी मनात जणु वाटले
अमित प्रेम मनी दाटले।।
“उगा राहिला, खेळु लागला, पाजा त्याला अता
झोपले क्षण न लागता”
असे बोलुनी अम्मा देई अर्भक जननीकरी
घेई माता मांडीवरी
पाजायाला मूल घेतले स्तनास लावी मुख
बाळ प्राशी होई सुख
भरले मातेचे लोचन
भरले मातेचे ते स्तन
भरले गहिवरुन तन्मन
बाळराज तो राजस होता पीत पोटभर पय
झाले मातृहृदय सुखमय।।
पुन:पुन्हा ती त्या बाळाला घट्ट आवळुन धरी
माता सुखावली अंतरी
बाळाने हे रिते करावे भरलेले स्वस्तन
ऐसे वांछी किति तन्मन
पोटभरी तो प्याला धाला पदर दूर सारित
बालक निजमुख-शशि दावित
हसणे मधुर किति मनोहर
काळेभोर नयन सुंदर
मुख मोहाचे माहेरघर
अमित सुखाचे भरले आले घेइ मुके कितितरी
माता, तृप्त न परि अंतरी।।
“काय लबाडा! झाले होते, रडावयाला मघा
आता गुलाम हसतो बघा
मघा कोणते आले होते भूत गुलामा तुला
चावट कुठला वेडा खुळा
पहा पहा हो किति तरी हसतो, तुम्हि याला हसविले
अमृत त्याच्यावर शिंपले
ओळख पूर्वजन्मिची जणु
संशय मज न वाटतो अणु”
ऐसे बोलुन हलवुन हनु
मुका तयाचा घेइ आई बाळक ते हासले
पोटी प्रेमाने घेतले।।
कृतज्ञतेने कुणबिण किति ती हृदया भरली असे
गहिवर पोटी मावत नसे
हासत खेळत बाळक निजला क्षणात मांडीवर
आइस आवरे न गहिवर
अम्मेचे मुख कृतज्ञतेने भरल्या नेत्री बघे
शब्द न बाहेरी परि निघे
“तुम्ही हासविला मद्बाळक...”
परि तिज वदवेना आणिक
पाहे भरल्या नेत्री मुख
अम्मेचा ती हात आपुल्या हाती प्रेमे धरी
त्यावरि गळती अश्रुच्या सरी।।
भरलेल्या अंतरातून त्या वच बाहेर न फुटे
नयनी प्रेमझरा परि सुटे
हृदयामधला भाव सकल तो विमलाश्रू दाविती
तेथे शब्द सकळ खुंटती
मुकेपणा तो बेलुन दावी अनंत हृदयातले
अन्योन्यासचि सगळे कळे
थोडी ओसरली भावना
झाला अवसर संभाषणां
पुशिती पदराने लोचना
दोन अशा त्या माता दिसल्या गंगायमुनांपरी
नति मी केली दुरुनी करी।।
कुणबिण मग ती हळुच सोडिते पदराच्या गाठिस
काढी त्यातून सुपारिस
अम्मेला द्यावयास जवळी दुसरे काहिच नसे
कुणबिण दीन दरिद्री असे
कृतज्ञतेला प्रकट कराया उत्सुकता मानवा
त्याविण समाधान ना जिवा
करण्या कृतज्ञता प्रकट ती
पुरते पोद्यांची मूठ ती
असु दे वस्तु कशी वा किती
कृतज्ञतेचा सिंधु मावतो बाह्य-चिन्ह-बिंदुंत
जैसा विश्वंभर मूर्तित।।
सुपारिचे ते खांड काढिले अम्मेला ते दिले
भरले कृतज्ञतेने भले
साधे नव्हते खांड, अमोलिक मंतरलेले असे
जिविचा भाव त्यात तो वसे
माणिकमोत्यांच्या राशीहुन त्रिभुवनलक्ष्मीहुन
अधिकचि कृतज्ञतेची खुण
होती कठिण सुपारी जरी
प्रेमे भिजलेली ती परी
अम्मेच्या ती देई करी
देउन पाही पुन्हा तन्मुखा भरलेल्या लोचनी
अम्मा विरघळली ती मनी।।
होते मांडीवरती निजले मूल गोड गोजिरे
साजिरे दमले रडुनी खरे
रडावयाचे कसे थांबले? काय जादु जाहली
माझी वृत्तिच ती गुंगली
क्षणात पडला प्रकाश माझ्या हृदयी सुंदर परी
कळली गोष्ट मला अंतरी
नवपिढिचा तो बालारुण
होता करित अमित रोदन
होता भुका, न परि घे स्तन
भेदातीत प्रेम पिउन तो बालप्रभु तोषला
खुलला फुलला मग हासला।।
मुसलमान मी, मी हिंदू, हे माता त्या विसरल्या
प्रेमसमुद्री त्या डुंबल्या
माता तेथुन एकच, त्यांचा धर्म एकची असे
एकच वत्सलता ती असे
हास्य, अश्रु ते एकच असती सगळ्यांना समजती
हृदये हृदयाला जोडिती
एक प्रेमधर्म तो खरा
कळतो सकळांच्या अंतरा
परि ना रुचतो अजुनी नरा
हृदयांतील या सद्धर्माला दडपुन पायातळी
जगि या माजविती हे कली।।
परस्परांची वैरे विसरा विरोध ते मालवा
प्रेमे जीवन निज रंगवा
परस्परांची उणी न काढा परगुणगौरव करा
कर धारुनी सहकार्या करा
परस्परांच्या संस्कृतिमधले हितकर मंगल बघा
बघु दे दृष्टि सुंदर शुभा
होऊ प्रभुचे यात्रेकरु
सगळे सुपंथ आपण धरु
जग हे आनंदाने भरु
कधी परी हे होइल? कधि का होइना मी तरी
पूजिन प्रेमधर्म अंतरी।।
मोठे मोठे आग लावणे हाच धर्म मानिती
प्रेते उकरुन ती काढिती
इतिहासातिल जनांपुढे हे भुतावळिच मांडिती
मंगल शिव ना ते दाविती
विझवतील ना वणवे कोणी तेलच ते ओतिती
सार्थक ह्यांतच ते मानिती
खोट्या स्वाभिमान-कल्पना
खोट्या धर्माच्या कल्पना
करिती स्मशान नंदनवना
न अहंतेचे महंत व्हावे धर्म अहंता नसे
धर्म प्रेमी नांदत असे।।
धर्माचे सत्प्रेम हेचि हो सुंदर सिंहासन
दिसती धर्म तिथे शोभुन
द्वेषमत्सरांचे ते आहे धर्माला वावडे
धर्मा प्रेम एक आवडे
प्रेमरुप तो परमेश्वरही प्रेमे त्याला पहा
पूजा प्रेमाची त्या वहा
सकळही देवाची लेकरे
कोठे भेद तरी तो उरे
झाले पाप अता ते पुरे
जीवनपंथा उजळो आता प्रेमदीप शाश्वत
पावू मंगल मग निश्चित।।
कवी -
साने गुरुजी
कवितासंग्रह -
पत्री
-नाशिक तुरुंग, नोव्हेंबर १९३३