नागपंचमी

अजि नागपंचमीचा। आला पवित्र वार
निज अंतरंगी आज। राखा मुळी न वैर
हृदयात प्रेमपूर। भरपूर आज वाहो
आनंद सर्व जीवा। जगतात आज राहो
हा नागपंचमीचा। दिन थोर थोर साचा
जो सर्प मूर्त मृत्यु। त्यालाहि पूजण्याचा
मृत्युहिही गोड माना। सर्पाहि पूज्य माना
जो दुष्ट घेइ चावा। त्यालाहि देव माना
सर्वांतरी सदंश। सर्वात सच्चिदंश
आहे शिकावयाचे। हे नागपंचमीस
प्रेमा सदैव देऊ। अवघ्या चराचरास
आहे शिकावयाचे। हे नागपंचमीस
नागाहि पूज्य मानू। त्या प्रेम गोड देऊ
मग बंधुबंधु आम्ही। किति गोड रीति राहू
हा थोर थोर दिवस। दिधला तुम्हां आम्हांस
घालून पूर्वजांनी। प्रेमा शिकावयास
वर्षात एक दिवस। ना सुष्ट दुष्ट पाहू
दिनी ह्या तरी निदान। सर्वांस प्रेम देऊ
अद्वैत तत्त्व थोर। कर्मात आणण्यास
आहे शिकावयाचे। हे नागपंचमीस
ती संस्कृती उदात्त। अपुली शुभा अनंत
जणु साठवीत एका। ऋषि नागपंचमीत
त्या थोर पूर्वजांची। पाहून थोर दृष्टी
मज येतसे भरुन। ही होइ अश्रुवृष्टि
डोळ्यांमधून आज। वाहोत प्रेमगंगा
सौख्यांबुधीत सारे। या रे विशंक डुंबा
वाणीमधून आज। माधुर्य ते स्त्रवू दे
करणीमधून सर्व। स्नेहामृता झरू दे
वेलीवरील फूल। तेही न आज तोडा
हिरव्या तणांकुराला। त्याही न आज तोडा
काडी न आज मोडा। लावा कुणा ढका न
प्रेमात आज राहो। सृष्टी उभी बुडून
घ्या फावडे न कुदळ। असतील जीवजंतू
दुखवा न त्यांस आज। आणा न त्यांस अंत
भूमाय ही क्षमेची। मूर्ती तिला न दुखवा
न खणा मुळीच आज। गाऊन गीत सुखवा
जगतात आज कोणा। भयभीति ती नसू दे
आजी परस्परांत। विश्वास तो वसू दे
लघु जीव कीड मुंगी। तृणपर्ण मृत्कणाही
दुखवी न आज बंधो। सर्वत्र देव पाहि जीव
सर्वत्र आत्मतत्त्व। समदृष्टि थोर ठेव
सकलांहि त्या सणांत। ह्या नागपंचमीस
आहे महत्त्व फार। वाटे मदंतरास


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९२८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा