श्यामले

तू छोकरी, नहि सुन्दरी । मिष्कील बाल चिचुन्दरी,
काळा कडा मी फत्तरी । तू काश्मिरांतिल गुल-दरी !
पाताळिंचा सैतान मी । अल्लाघरींची तू परी,
तू मद्रदेशिय श्यामला । मी तो फकीर कलन्दरी !

मैदान मी थरर्पाकरी । तू भुमि पिकाळ 'गुर्जरी,
अरबी समुद्रहि मी जरी । तू कुद्रती रसनिर्झरी !
आषाढिंचा अन्धार मी । तू फाल्गुनी मधुशर्वरी !
खग्रास चंद्र मलीन मी । तू कोर ताशोव सिल्व्हरी !

बेसूर राठ 'सुनीत' मी । कविता चतुर्दश तू खरी,
'हैदोस' कर्कश मी जरी । 'अल्लाहु अक्बर' तू तरी!
माजूम मी, तू याकुती । मी हिङ्ग काबुलि; तू मिरी,
अन् भाङ्ग तू चण्डोल' मी, । गोडेल मी, तू मोहरी !

मी तो पिठ्यातील बेवडा । व्हिस्कीतली तू माधुरी,
काडेचिराइत मी कडू । तू बालिका खडिसाखरी
पँटीस तू, कटलेट मी । आँम्लेट मी, तू सागुती,
कांदे-बटाटे-भात मी । मुर्गी बिर्‍यानी तू परी !

अक्रोड मी कन्दाहरी । तू साहर्‍यातील खर्जुरी,
इस्तम्बुलीय अबीर मी । नेपाळची तू कस्तुरी !
मी घोङ्गडे अन् लक्तरी । मख्मूल तू मउ भर्जरी,
बेडौल वक्र त्रिकोण मी । तू लम्बवर्तुळ गे परी ।

तू वाढली कितीही जरी । मज वाटसी पण छोकरी,
जरी मूल हे कमरेवरी । तरी तू मला छकुल्यापरी !
गाम्भीर्य आणि वयस्कता । जरि ही तुझ्या मुखड्यावरी,
स्मरते मला तव सानुली । मूर्ती मनोहर पर्करी !

लव हासरी, लव लाजरी । लव कावरी, लव बावरी,
चिनिमातिची जणु बाहुली । मउ शुभ्र, सफेत नि पांढरी !
चल सोनुले, छकुले, घरी । वात्सल्य गे दाटे उरी,
निर्दोष तो देशील का । पापा छुपा फिरुनी तरी?

तू दोन इच्च जरी दुरी । फलाङ्ग भाससि गे परी,
चल श्यामले, म्हणूनी घरी ! बसु खेटुनी जवळी तरी !
घे माडगे, घे गाडगे । घे गुलचमन् घे वाडगे,
ताम्बूल घे, आम्बील घे, । घे भाकरी, घे खापरी !
किति थाम्बु मी? म्हण 'होय' ना । खचली उमेद बरी उरी,
झिडकारुनी मजला परी । मत्प्रीतिचा न 'खिमा' करी !




कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें
वृत्त - तुङ्गभद्रा, मिथुनराशी, राक्षसगणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा