दु:ख ना आनंदही

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.

मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा.

एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा,
मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा.

प्रश्न की उद्गार नाही, अधिक नाही वा उणा,
जीवनाला ऐल नाही, पैल, तैसा मध्य ना.

याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती,
नाद आहे या घड्याला अन घड्याच्या भोवती.

सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली, दूरची हाले हवा.

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

साधन मदिरा

व्यथा वेदना विसरायाचे साधन मदिरा
स्वतः स्वतःला फसवायाचे साधन मदिरा

गतकाळाच्या रंगमहाली मैफल सजते
भणंग स्वप्ने सजवायाचे साधन मदिरा

बंद उसासे , बंद हुंदके , बंद ओठही
दोन आसवे ढाळायाचे साधन मदिरा

जी काही नासाडी होते ती देहाची
झुरणारे मन रिझवायाचे साधन मदिरा

आनंदोत्सव असेल अथवा असो दुखवटा
झुलवायाचे फुलवायाचे साधन मदिरा

कुरतडणार्‍या कातरणार्‍या कातरवेळी
एकाकीपण रिचवायाचे साधन मदिरा

तुटले फुटले कुस्करले वा जरी चिरडले
सारे काही सांधायाचे साधन मदिरा

रोखुन धरलेल्या श्वासासम कितीक गोष्टी
बंद कवाडे उघडायाचे साधन मदिरा

उजाड झाल्या नगरामध्ये पुन्हा एकदा
नवीन इमले बांधायाचे साधन मदिरा

जे काही कोरले " इलाही" ह्रुदयावरती
पुसण्यासाठी गिरवायाचे साधन मदिरा

- इलाही जमादार

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता
स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर,
- मला वाटते क्षणभर फुटतो
दगडाला इच्छेचा अंकुर.

ऊन हिवाळ्यांतिल हळदीचे
किरिट घालते वृद्धा वडावर !
- मला वाटते तळ्यांत पाहुन
हात फिरवितो तो दाढीवर!

ऊन हिवाळ्यांतिल कुडकुडते,
कुशीत शिरते दिसतां डोंगर;
-मला वाटते त्यालाही मग
गरम झऱ्याचा फुटतो पाझर.

ऊन हिवाळ्यांतिल भुळभुळते
आजीच्या उघड्या पाठीवर;
- तिच्या भ्रमाला गमते आपण
पुन्हा जरीचा ल्यालो परकर.

ऊन हिवाळ्यांतिल हिरमुसते;
रुसते; अन माळावर बसते;
- मला वाटते त्यालाही पण
असेच भलते वाटत असते.


कवी - विंदा करंदीकर

जगण्यामध्ये ब्रम्हानंद

बरगड्यांच्या तुरुंगातून
मी हृदयाला मुक्त केले;
जिथे जिथे धमनी आहे
तिथे माझे रक्त गेले.

दिक्कालाच्या जबड्यामधील
लवलवणारी जीभ मी;
आसक्तीच्या गर्भामधील
धगधगणारे बीज मी.

माझ्या हातात महायंत्र;
माझ्या मुखात महामंत्र.

सगळे मिळून सगळ्यांसाठी
मरण्यातही मौज आहे;
सगळे मिळून सगळ्यांसाठी
जगण्यामध्ये ब्रम्हानंद.


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - स्वेदगंगा

प्रेम

सत्य युगाच्या अखेर झाली
प्रेम-द्वेष यांच्यात लढाई
द्वेषच होई विजयी आणि,
प्रेम लपे आईच्या हृदयी!

कवी - विंदा करंदीकर

पेर्ते व्हा

पेरनी पेरनी
आले पावसाचे वारे
बोलला पोपया
पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!

पेरनी पेरनी
आभायात गडगड,
बरस बरस
माझ्या उरी धडधड!

पेरनी पेरनी
आता मिरुग बी सरे.
बोलेना पोपया
पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!

पेरनी पेरनी
अवघ्या जगाच्या कारनी.
ढोराच्या चारनी,
कोटी पोटाची भरनी


कवियत्री - बहीणाबाई चौधरी

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

जीवनातून तू.. एवढं सहज दूर जाशील..
अनोळखी नजरेनं अशा.. माझ्याकडे पाहशील..
पाहून नंतर.. हळूच मनाशी हसशील..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

मनाच्या बागेत, भावनेचं रोपटं..
एवढ्या खोलवर जाईल..
मुळापासून उखडलं तरी..
थोडी आठवण शिल्लक राहील..
ती आठवण सुद्धा वेदनाच देईल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

तुझी निरागसता संपून..
निष्ठुरता डोळ्यांत उरेल..
माझ्या डोळ्यांत मात्र..
काकुळतीने.. पाणी तरेल..
भयाण हे स्वप्न, कधी वास्तवातही उतरेल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

ठसठसणारी वेदना..
तुझीच आठवण करुन देईल..
वेडं.. मनाचं पाखरु..
पुन्हा तुलाच शोधत राहील..
अवघड प्रयत्नानं त्याचा मात्र जीव जाईल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

मी सुद्धा.. अडखळत..
पुन्हा उभा राहीन..
तुझ्या पलीकडे असणाऱ्या..
अंतिम ध्येयाला पाहीन..
आयुष्य पुढचे, त्याच्या चरणांवर वाहीन..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

आयुष्याच्या पानांवर पुढे..
प्रेमाचं पर्व अधुरंच राहील..
तुझ्या उल्लेखाशिवाय माझं जीवनसुद्धा..
अपुरंच जाईल..
मरताना सुद्धा ओठांवर तुझंच नाव घेत जाईन..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..


~ आशिष