जाईन दूर गावा

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा

शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा.

देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे
साराच आसमंत घननीळ होत जावा.

पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा.

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा.

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

सद्गुरुवाचोनी

करितो आदरे । सद्गुरुस्तवन
ज्यांनी सत्यज्ञान । वाढवीले.
धन्य पायथॅगोरस । धन्य तो न्यूटन
धन्य आईन्स्टीन । ब्रम्हवेत्ता.
धन्य पाश्चर आणि । धन्य माझी क्युरी
थोर धन्वंतरी । मृत्युंजय.
धन्य फ्राइड आणि । धन्य तो डार्विन
ज्यांनी आत्मज्ञान । दिले आम्हा.
धन्य धन्य मार्क्स । दलितांचा त्राता
इतिहासाचा गुंता । सोडवी जो.
धन्य शेक्सपीअर । धन्य कालीदास
धन्य होमर, व्यास । भावद्रष्टे.
फॅरॅडे, मार्कोनी । वॅट, राईट धन्य
धन्य सारे अन्य । स्वयंसिद्ध.
धन्य धन्य सारे । धन्य धन्य मीही!
सामान्यांना काही । अर्थ आहे!
सद्गुरूंच्या पाशी । एक हे मागणे :
भक्तिभाव नेणे । ऐसे होवो.
सद्गुरुंनी द्यावे । दासा एक दान :
दासाचे दासपण । नष्ट होवो.
सद्गुरुवाचोनी । सापडेल सोय
तेव्हा जन्म होय । धन्य धन्य.


कवी - विंदा करंदीकर

किलबिललेले उजाडताना

किलबिललेले उजाडताना
ओठ उगवतीचा थरथरला
गुलाबलेला ओललालसर

तुंडुंबलेले
संथ निळेपण
पसरत गेले चार दिशांना
तांबुसवेडे

हळुहळु मग नि:स्तब्धातुन
स्वप्ने उडाली गुलाल घेऊन
लालचुटकश्या चोचीमध्ये
पिंजर-पंखी,
आणिक नंतर
’आप’ खुशीने अभ्र वितळले
उरले केशर
आणि भराभर
उधळण झाली आकाशावर
आकारांची
रंगदंगल्या.

नाहि उमगले
केव्हा सरला रजतराग हा
ही अस्ताई,
आणि उमटला रौप्यतराणा
झगमगणा-या जलद लयीतील
... असा विसरलो, विसावलो अन
नीरवतेच्या गुप्त समेवर
आणिक नंतर
न कळे कैसी
मनात माझ्या - काहि न करता-
जाणिव भरली कृतार्थतेची


कवी - विंदा करंदीकर

सर्वस्व तुजला वाहुनी

सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी?

घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया ?
अंधार होतो बोलका, वेड्यापिशा स्वप्नांतुनी

माझ्या सभोती घालते, माझ्या जगाची भिंत मी
ठरते परी ती काच रे, दिसतोस मजला त्यातुनी

संसार मी करिते मुका, दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती, आज्ञा तुझी ती मानुनी

वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे
अन्‌ प्राक्तनावर रेलते, छाती तुझी ती मानुनी


कवी - विंदा करंदीकर

सांजवेळी सोबतीला

सांजवेळी सोबतीला, सावली देऊन जा...
भैरवी गाईन मी, तू मारवा गाऊन जा...

मी जपोनी ठेविल्या, संवेदना स्पर्शातल्या,
त्या खुणांचे ताटवे, तू एकदा फुलवून जा...

पेरला श्वासातुनी मी गंध ओल्या प्रीतिचा,
धुंद मी माझ्यात आहे, धुंद तू होऊन जा...

घेतला झोळीत माझ्या, मी व्यथेचा जोगवा,
एकदा हातात माझ्या, हात तू देऊन जा...

या पुढे जमणार ना तुज, ओळखीचे, पाहणे,
त्या तुझ्या नजरेत मजला, तू जरा भिजवून जा...

नववधू होऊन तू, जाशील जेव्हा, त्या घरी,
त्या घराच्या वळचणीला, आठवण, ठेवून जा...

- इलाही जमादार

तीर्थाटण

तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी;
अन तुझिया देहात गवसली
सखये मजला तीर्थे सारी

अधरावरती तव वृंदावन
प्रयाग सापडले नेत्री;
भालावरती ते मानसरोवर,
मानेवरती गंगोत्री

गया तुझ्या गालात मिळाली
रामेश्वर खांद्यावरती
मिळे द्वारका कमरेपाशी
अन काशी अवतीभवती

मोक्षाचीही नुरली इच्छा
नको कृपा याहून दुसरी
तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी.


कवी - विंदा करंदीकर

देह मंदिर चित्त मंदिर प्रार्थना

देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना


कवी - वसंत बापट