तुझे नाम मुखी

तुझे नाम मुखी ध्यान तुझे डोळा
व्रुत्ती या चंचळा स्थिरावल्या॥

चिंता भय दुःखे अवघी दूर झाली
अनाथांचा वाली जवळी केला॥

भिकार या जगी इच्छित न मिळे काही
म्हणुनी तुझे पायी भिक्शां-देहि॥

केशवसुत म्हणे देवा दीन-नाथा
तुझे पायी माथा वाहियेला॥


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय

किती पायी लागू तुझ्या

किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तूंते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते

काय गा म्या पामराने
खरडावी बाराखडी
आणि बोलावी उत्तरे
टिनपट वा चोमडी

कधी लागेल गा नख
तुझे माझिया गळ्याला
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला !

सोपेच असतात तुझे केस

सोपेच असतात तुझे केस
सोपीच असते लकेर डोळ्यांची
सोप्याच असतात तुझ्या गाठी
कठीण असते तर्‍हा चोळ्यांची
सोपेच असते मानेचे वळण
सोपीच उतरण निमुळत्या पाठीची
सोपेच असते तुझे पाऊल
कठिण असते वाट दाटीची
सोपाच असतो राग, अनुराग
सोपीच असते तुझी कळ
सोप्या सोपस मांड्यामध्ये
दहा हत्तींचे असते बळ...

कवी-विंदा करंदीकर

दिसली नसतीस तर

रतन अबोलीची वेणी माळलेली
आणि निळ्या जांभळ्या वस्त्रालंकारात
संध्येसारखी बहरलेली तू
तळ्याकाठच्या केवड्याच्या बनात
आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस
तर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावर
हा भुलावणा सप्तरंगी सोहळा
असा सर्वांगांनी फुलारलाच नसता.

आपल्याच नादात तू
पाठ फिरवून परत जाताना
तुझी पैंजणपावले जिवघेण्या लयीत
तशी पडत राहिली नसती
तर माझ्या आनंदविभोर शब्दांतून
कातरवेळची कातरता
आज अशी झिणझिणीत राहिलीच नसती.

अबोलकेपणाच्या गूढ गाढाईने
जाईजुईच्या सान्द्र मंद सुगंधाचा लळा
सहज चुकार स्पर्शाने तू मला लावला नसतास
तर उमलत्या फुलपाखरांची
आणि मुक्याभाबड्या जनावरांची
आर्जवी हळूवार भाषा
इतक्या स्पष्टपणाने मला कळलीच नसती.

तू कशामुळे माझी जिवलग झालीस
ते खरेच मला आता आठवत नाही
पण मला तोडताना
समुद्रकाठच्या सुरुंच्या बनात
मिट्ट काळोखातून चंद्रकोर उगवेपर्यन्त
तू मुसमुसत राहिलीस
हे मात्र मी अजून विसरू शकलेलो नाही.
त्या वेळची तुझी ती आसवे
अजून माझ्या कंठाशी तुडुंबलेली आहेत.
तू तेव्हा तशी मुसमुसली नसतीस
तर माझ्या शृंगाराचा अशोक
आज करुणेच्या आरक्त फ़ुलांनी
असा डवरलाच नसता.

तू तेव्हा आकाशा एवढी विशाल
आणि अवसेच्या गर्भासारखी दारूण
निराशा मला देउन गेली नसतीस
तर स्वत:च्याच जीवन-शोकांतिकेचा
मनमुराद रस चाखून
नि:स्संग अवधूतासारखा
मी या मध्यरात्रीच्या चांदण्यात
असा हिंडत राहिलोच नसतो.

तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस
माझी सशरीर नियती होतीस.
तसे नसते तर आज जो काय मी झालो आहे
तो झालोच नसतो.

कवी-बा.भ.बोरकर

अरे संसार संसार

अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर !

अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं

अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं !

अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड

अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे

ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन्‌ दुःखाले होकार

देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !

अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार

असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार !

कवियत्री - बहिणाबाई चौधरी

मृत्यु

भूक

भूक हव्याशापोटी धावणारी
उपाशीपोटी रहाणारी
पैशासाठी पळणारी
कुणाली ती न समजणारी

माणसात मी पशु पहिला
आले अंगावर शहारे दाटून
भूक पैशाची न कधी समजणारी
भरुनी पोट उपाशी येथे सारे

काहीस नसे शास्वत या जगी
मोह असे साऱ्याचा तुज
जाताना रिते हात असतील
उमगुनी तू पैशामागे धावतोस कारे

सहज मिळत गेले की
भूक जाईल वाढत
कष्ट करुनी दाखव
मग भूक तुझी मिटेल

समाधान थोडक्यात मानण्या
शिकणार तू कधी रे
काहीच नाही ह्या जगी
नको धरू मोह साऱ्याचा

भेदभावाचे असे कारण घातक
नको करू रे भुकेचे नाटक
भुकेची आग हि प्रेमाने विझवा