त्याचा पाऊस तिचा पाऊस

त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.

मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.

पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.

पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.

पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं

पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पावसासकट आवडावी ती म्हणून ती ही झगडते.

रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात


कवी- सौमित्र

पाऊस

पावसाच्या धारा येती झरझरा
झांकळलें नभ, वाहे
सोंसाट्याचा वारा

रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले
जळ

ढगावर वीज झळके सतेज
नर्तकीच आली गमे लेवुनिया
साज

झोंबे अंगा वारे काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली
पाखरें

हर्षलासे फार नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून
खार

पावसाच्या धारा डोईवरी मारा
झाडांचिया तळी गुरे शोधिती
निवारा

नदीलाही पूर लोटला अपार
फोफावत धांवे जणू नागीणच
थोर

झाडांची पालवी चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें
रंगदार छबी

थांबला पाऊस उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी
प्रकाश

किरण कोंवळे भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें
वस्तुजात खुले

सुस्नात जाहली धरणी हांसली,
वरुणाच्या कृपावर्षावाने
सन्तोषली


कवियत्री - शांता. शेळके

पाऊस

गार वारा हा भरारा, नभं टिपूस टिपूस
रानी वनी, पानोपानी, मन पाऊस पाऊस

माती खाली खोल खोल, ओल मातीच्या मनास
मातीवर थरथरे, ओला सुवास सुवास

पावसाळी पायवाटा, जरा उदास उदास
दाही दिशांत पाखरे, जणू आभास आभास

रान मोकळे मोकळे, बघे भारुन नभास
त्याचा हिरवा हिरवा, आज प्रवास प्रवास


गीतकार : सौमित्र
गायक : सौमित्र
संगीतकार : मिलींद इंगळे
चित्रपट : गारवा

पाऊस

आता आत बाहेर जळत रहातो पाऊस
पुन्हा जखमा ओल्या करत रहातो पाऊस

तुझ्या आठवात कधी तुझ्या विचारात
गाणं तेच तेच म्हणत रहातो पाऊस

चाहूल न लागे , जोवर तुझ्या पावलांची
कसा नभातच झुरत रहातो पाऊस

किती तुज स्पर्शिल्या, अन किती पळ हुकल्या
हिशेब धाराधारांचा करत रहातो पाऊस

तुला न्यायचे पार त्या ढगांचा गावी
कल्पनेत आतल्या आत भिजत रहातो पाऊस

पण पाहुन तव हात , हातात माझ्या
कसा डोंगरा आडूनच परत जातो पाऊस

सोडून तू गेलीस मज, त्या दिवसापासून
मृगातच हस्तासारखा पडत रहातो पाऊस

तुला निभवता नाही आले प्रेम त्या फुलाचे
चिखल चेहर्यावर उडवत रहातो पाऊस

अरे आता बरसणे नाही रे पूर्विसारखे
पांपण्यांवर मेघ ठेवून रडत रहातो पाऊस

आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
न सांगता तुझ्या भेटीला यायला …
धुंद होऊन तुझ्यावर बरसायला …
केसांमधून पाठीवर हळुवार ओघळायला …
अंगावरच्या काट्यांची वाट तुडवायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
गंध होऊनी श् वासात तुझ्या मिसळायला …
श् वासातल्या उबेत मनसोक्त डुंबायला …

काळ्या ढगांमधून पळून यायला …
अलगद तुझ्या कुशीत शिरायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
नकळत हृदयात तुझ्या शिरायला …
हृदयात मेणाचं एक खोपडं बांधायला ..

तुझ्या स्वप्नात येऊन तुला जागवायला ..
काळजाचा तुझ्या वेध घ्यायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
हातात हात घालून तुझ्या रानोमाळ हिंडायला …
पंखात तुला घेऊन भरारी घ्यायला …

आठवण बनून तुझ्या डोळ्यात उतरायला …
अश्रूंमध्ये आनंदाची साखर मिसळायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
एकट्या मनाची सोबत करायला …
कोणाच्यातरी चेहऱ्यावरचं हसू व्हायला …

भाळशील का तू माझ्या या रुपाला
सांग ना जमेल का तुला साथ द्यायला …
तरच आवडेल मला पाऊस व्हायला …

पाऊस असा रुणझूणता

पाऊस असा रुणझूणता
पैंजणे सखीची स्मरली
पाऊस भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली …

ओले त्याने दरवळले अस्वस्थ फुलांचे घोस
ओलांडून आला गंध , निस्तब्ध मनाची वेस
पाऊस असा रुणझूणता

पाउस सोहला झाला , पाउस सोहला झाला
कोसळत्या आठवणीचा
कधी उधाणता
अन केव्हा संथ थेम्बंच्या संथ लयीचा
..
नभ नको नको म्हणताना
पाउस कशाने आला
गात्रातून स्वच्छंदी अन
अंतरात घुसमटलेला..
पाऊस असा रुणझूणता
पैंजणे सखीची स्मरली
पाऊस भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली..

पाऊस कधीचा पडतो…

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने

डोळयात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उतरला पारा, या नितळ उतरणी वरती

पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला

संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती लाटांचा आज पहारा


कवि - ग्रेस