नभं उतरू आलं

नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात

अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात

वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात

नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा


गीतकार : ना.धो.महानोर
गायिका : आशा भोसले
संगीतकार : हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट : जैत रे जैत

मी रात टाकली

मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली

हिरव्या पानांत, हिरव्या पानांत
चावंळ चावंळ चालती
भर ज्वानीतली नार
अंग मोडीत चालती

ह्या पंखांवरती, मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाई, चांदन्यात न्हाती

अंगात माझिया भिनलाय ढोलिया
मी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झाली
मी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली

गीत - ना. धों. महानोर
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर, रवींद्र साठे, चंद्रकांत काळे
चित्रपट - जैत रे जैत (१९७७)

चिंब पावसानं रानं झालं आबादानी

चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली, चांदण गोंदणी…
झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रुपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी…

राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी…
तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी…

अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता न येई काही साजणा बोलांनी…

- ना. धो. महानोर

घन ओथंबून येती

घन ओथंबून येती, बनांत राघू भिरती

पंखा वरती सर ओघळती, झाडांतून झडझडती

घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती

डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेती

घन ओथंबून आले, पिकांत केसर ओले

आडोशाला जरा बाजूला, साजन छैल छबिला घन होऊन बिलगला



गीतकार :ना. धो. महानोर
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर

अवेळीच केव्हा दाटला अंधार

अवेळीच केव्हा दाटला अंधार
तिच्या गळा जड झाले काळे सर
एकद मी तिच्या डोळ्यात पाहिले
हासताना नभ कलून गेलेले

पुन्हा मी पाहिले तिला अंगभर
तिच्या काचोळीला चांदण्याचा जर
आणि माझा मला पडला विसर
मिठीत थरके भरातील ज्वार

कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली
तिच्या ओटी कुण्या राव्याची साऊली
तिच्या डोळियात जरा मी पाहिले
काजळात चंद्र बुडून गेले


गीतकार : ना. धों. महानोर
गायक : श्रीधर फडके
संगीतकार : श्रीधर फडके

मी गाताना गीत

मी गाताना गीत तुला लडिवाळा
हा कंठ दाटुनी आला

मी दुःखाच्या बांधुनी पदरी गाठी
जपले तुज ओटी-पोटी
कधी डोळ्यांना काजळ तूज भरताना
गलबला जीव होताना

खोप्यात जिथे चिमणी रोज पिलांना
सांगते गोष्ट नीजताना
ते ऐकुनी का मन तडफड होई
पाळणा म्हणे अंगाई

आयुष्याला नको सावली काळी
इश्वरा तूच सांभाळी
झुलता झोका जावो आकाशाला
धरतीचा टिळा भाळाला

गीत – ना. धों. महानोर
संगीत – आनंद मोडक
स्वर – रवींद्र साठे
चित्रपट – एक होता विदूषक (१९९२)
आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या
एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या

काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
बोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलंना
असा रुतला पुढ्यात भाव मुका जीवघेणा

चांदण्याची ही रात, रात जळे सुनी सुनी
निळ्या आसमानी तळ्यांत लाख रूसल्या ग गवळणी
दूर लांबल्या वाटेला रूखी रूखी टेहाळणी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी



गीतकार: ना. धों. महानोर
गायिका: लता मंगेशकर
संगीतकार: पं. हृदयनाथ मंगेशकर