'बाटा' रुते कुणाला - विडंबन

मुळ गीत-काटा रुते कुणाला

'बाटा' रुते कुणाला,
आक्रंदतो इथे मी,
मज बूट हे रुतावे,
हा दैवयोग आहे!
(आहे वर तान घ्यावी,
नाहीतर बूट चावतो आहे
हे लक्षात कसे येणार?)
रुते कुणाला....!

सांगु कशी कुणाला,
कळ हाय अंगठ्याची,
हे बूट घालता मी,
अस्वस्थ फार आहे!
(आ.व.ता.घ्या.)
रुते कुणाला....!

चांभार हाय वैरी,
असतो कुठे दुपारी,
म्हणूनी जुनीच आता,
पायी वहाण आहे!
रुते कुणाला.....!

अंगठा विभक्त झाला,
तळवा फकस्त राहे,
हे चालणे बघा ना,
भलतेच मस्त आहे!
रुते कुणाला....!

फुटले नशीब आता,
ह्या दोन पावलांचे,
माझ्या जुन्या वहाणा,
ढापून चोर 'जा', 'ये'!
(म्हणजे चोर माझ्या जुन्या
वाहाणा घालुन माझ्यासमोरुनच
'ये-जा' करतोय)
रुते कुणाला..!

हा 'पायगुण' माझा,
आहे असा करंटा,
नुकताच मंदिरी त्या,
बदलुन बूट राहे!
रुते कुणाला..!


कवी - मानस

कणा (विडंबन)


ओळखलंत का परवेझ मला
पाकिस्तानात आला कोणी
तारवटलेल्या डोळ्यांमध्ये
कणभर नव्हतं पाणी

क्षणभर बसला, भेसूर हसला
बोलला वरती पाहून
मुंबईमधून आत्ताच आलो
आलो बॉम्ब लावून

माज चढल्या सैतानासारखा
लोकल्स मधून नाचलो
साथी सारे पकडले जातील
मीच एकटा वाचलो

वाटलं होतं बॉम्ब लावून
मुंबईची वाट लागली
मुंबईमात्र नेहमी सारखीच
पुन्हा धावायला लागली

खिशाकडे हात जाताच
वर बघून म्हटला
पैसे नकोत सरदार
मनात भकासपणा दाटला

मुंबईकरांचं धैर्य पाहून
मोडलाय माझा कणा
छातीवरती बंदुक ठेवून
फक्त मर म्हणा!

सत्र - विडंबन

ढोसण्याचे सत्र होते
मद्यपी सर्वत्र होते

सुरमईचा गंध आला
तंदुरी इतरत्र होते

पापडांच्या कुरकुरीला
वेफ़रांचे छत्र होते

बाटल्या बरसून गेल्या
'वारुणी' नक्षत्र होते

शेवटी संत्रेच माझे
द्राक्ष ते सावत्र होते

"मी बुवा पाणीच प्यालो!"
(बरळणे एकत्र होते)


कवी - चक्रपाणी चिटणीस.

आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो...

मूळ गीत: आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो

आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो
लाचारीने फिरवून कार्डे सहीस मागवतो

शर्ट नको मज कुठलाही अन पँट नको आहे
बक्कल कुठले मुळात मजला बेल्ट नको आहे
बायकोसंगे परवा माझ्या करार मी केला
सर्व खरेदी तिला करावी, काही नको मजला
बायकोजीच्या पुंगीवर मी नवरोबा डुलतो!

आता आता खरेदीस मज बायको पाठवते
काउंटर बघता लुंगी नाही, साडी आठवते!
आता कुठल्या दिलखुष गप्पा काउंटरवाल्यांशी
आता नाही शॉपिंग उरले पूर्वीगत हौशी
बिलंदरीने दिसतील त्या त्या साड्या मी बघतो!

कळून येता कार्ड लिमिटची इवलिशी त्रिज्या
उडून जाती अत्तरापरी शॉपिंगच्या मौजा
दारी फिरकत नाही कोणी नवा कार्डवाला
राखण करीत बसतो येथे जुना कार्डवाला
कर्जांनाही आता माझा कंटाळा येतो!

आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो
लाचारीने फिरवून कार्डे सहीस मागवतो


कवी - प्रसाद शिरगांवकर

गंऽऽऽ भाजणी

चाल: गं साजणी, कुण्या गावाची तू गं राणी

गंऽऽऽ भाजणी
थालि पीठाची
किंवा चकलीची
आहे कशाची तू गं राणी
गं ऽऽऽ
आली थापुन
आणि भाजुन
थोडी लाजुन माझ्या पानी

थप थप थापण्याच्या
तालावर झाली दंग
तालावर झाली दंग
पाणीथोडं फार
मऊ मऊ झालं अंग
मऊ मऊ झालं अंग
कांदे दोन चार
लाभला तयांचा संग
लाभला तयांचा संग

माझ्या घरात
तुझी परात
येते वरात मझ्या पानी
गं ऽऽऽ
आली थापुन
आणि भाजुन
थोडी लाजुन माझ्या पानी

लोणच्याची फोड तुझ्या
चुरडतो अंगावरी
चुरडतो अंगावरी
तुपाचीही धार तुझ्या
ओततोय अंगावरी
ओततोय अंगावरी
ताजं ताजं दही लोणी
ठेवलंय बाजुवरी
ठेवलंय बाजुवरी

तुज्या वासानं
जीव हैरान
भूक बेभान येड्यावानी
गं ऽऽऽ
आली थापुन
आणि भाजुन
थोडी लाजुन माझ्या पानी


कवी - प्रसाद शिरगांवकर.

रेशमाच्या बाबांनी

रेशमाच्या बाबांनी, काल लाथा बुक्क्यांनी
बाकपुरा आहे माझा काढीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

चूक झाली माझी लाखमोलाची
विचारल मी ही पोर कोणाची
विसरलो आहे कोण, आहे कोण जोडीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

जात होती वाटेनं ती तोऱ्यात
अवचित आला बाप मोऱ्यात
आणि माझ्या नरडीला, धरूनीया ओढीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

भीड नाही केली आल्यागेल्याची
मागितली माफी मी त्या मेल्याची
म्हणेन मी आता ताई, तुमच्या या घोडीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !



कवी - केशवसुमार

रेशमाच्या रेघांनी

(चाल - रेशमाच्या रेघांनी)

रेशमियाच्या गाण्यांनी
भुंकणाऱ्या प्राण्यांनी
कर्ण माझा कसा की हो फोडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला.

नवी कोरी कॉपी सुफ़ी साजाची
'टोपी' चढवली रिमिक्स बाजाची
बाजाची हो बाजाची
माईक आडवा ऐटीमध्ये, तोंडाजवळ ओढीला
हात नका लावू त्याच्या सीडीला.

गात जाई प्रत्येक गाणे नाकात
रसिकांच्या उठते तिडिक डोक्यात
डोक्यात हो डोक्यात
चुंबनखोर इम्रानहाश्मी, आणिक असतो जोडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला.

कृपा त्याच्यावर सल्लूमियाँची
बाजारात चलती आज कचऱ्याची
कचऱ्याची हो कचऱ्याची
काय म्हणू देवा देवा, जनतेच्या आवडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला.

फायदा एक दिसतो त्याच्या गाण्यात
गाढवही गाते वाटे सुरात
सुरात हो सुरात
न्यूनगंड कित्येकांचा, दूरदेशी धाडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला।


कवी - मिलिंद छत्रे