मौसम... (नज्म)

 मौसम हा आशिकाना, पाउस दाटलेला
 माझ्या उरी ढगांनी, संसार थाटलेला...
 बेधुंद होत तुही, म्हटले सूरेल गाणे
 तुझिया स्वरांत भिजण्या, पाउस थांबलेला...
 मौसम हा आशिकाना...

 ओठांत गीत होते, डोईवरी सरी या
 मल्हार सांडला होता, दोन्हीच अंतरी या
 कळलेच ना कधी ते, हातात हात आला
 क्षण तोच सांगण्याला, पाउस लांबलेला...
 मौसम हा आशिकाना...

 ओलावल्यात येथे, भिंती अता मनाच्या
 भांबावल्यात आणि, जाणिवा इथे तनाच्या
 प्रत्येक पावलाशी, जणू ओल पावसाची
 ओलावल्या उराशी, पाउस साठलेला...
 मौसम हा आशिकाना...

 हातात हात आहे अन साथ ही युगाची
 पाउस साक्ष आहे अन बात ही सुखाची
जेव्हा मला दिलेली, तू वचने सखे गुलाबी
 तेव्हा हवाहवासा, पाउस वाटलेला...

 मौसम हा आशिकाना...

कवी - महेश घाटपांडे

अबोल तुझ्या शब्दातले

अबोल तुझ्या शब्दातले
 बोल तो बोलून गेला
 निरागस तुझ्या डोळ्यातली
  आसवे तो पुसून गेला

 तरंगत्या प्रेमाचे भाव मनी
 उमटवूनी तो निघून गेला
 ओठांवरचे नाजूक काहीतरी
 नकळत तो खूलवून गेला

 कोपर्‍यात हृदयाच्या
 प्रेमाचा हिंदोळा तो झुलवून गेला
 दरवळ सुगंधी फुलांचा तुझ्यात
 पसरवूनी तो निघून गेला

 दडवूनी आस प्रेमाचि खर्‍या
 मैत्रीत तो जगून गेला
 सतत तुझी काळजी करणारा
 तो स्वतःच्याच काळजीत निघून गेला

 आयुष्यभर चित्र काढणारा तो चित्रकार
 अखेर तुझ्यासाठी तो कविता बनवून गेला
 असतानाही प्रेम तुझ्यावर मनापासून
 मैत्री तुटेल म्हणून प्रेमाचे हे गुपित तो कायमचा घेऊन गेला............

मला शाळेत न्या ना

मला शाळेत न्या ना
बाबा, मी आता मोठा झालो
किलबिल वर्गातून बालवाडीत गेलो
माझ्या इवल्या पाठीवर नवीन दप्तर द्या ना
बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

तुमची जुनीच स्कूटर परत नव्याने हसतेय
पाव्हणं नवीन आहे म्हणून अलगद धक्के सोसतेय
शाळेत नेताना मला पुढयात घ्या ना 
बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

मी शाळेत पुन्हा एकदा 'नमस्ते बाssssई' म्हणीन
मधल्या सुटीत रोज मुरांबा पोळी खाईन
माझं 'ध्यान' पाहून तुम्ही खुदकन हसा ना
बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

ते खेळण्यांच दुकान अजूनही तिथेच आहे
तिथले काका तसेच हसरे आणी प्रेमळ आहेत
मी धावेन तिकडे, मला उचलून घ्या ना
 बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना      

घरचा अभ्यास मी अजूनही नाहीच केलाय
शाबासकी म्हणून आईने धम्मकलाडू ही दिलाय
ससा कासवाची कविता परत माझ्यासाठी गा ना
 बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

रिमझिम आठवणीत सरलेत दिनरात्र
मुर्दाड बनलोय मी अन थकलीयेत तुमची गात्र
ते आधारचं बोट पुन्हा हातात द्या ना
 बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

कवी
मकरंद केतकर

रडू नकोस उगीच

रडू नकोस  उगीच
चांगले नाही ते  जाताना
माझे रडणे राहूनच गेले
तुला सगळे समजावताना…………….


आभाळं  भरले आहे
अगदी जसे होते तु जाताना
पण आता तेही बरसत नाही
उगीचच कारण नसताना………………..


अजूनही  जातो त्याच  बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना……………….


झालेच नाही आपले बोलणे
सगळा एकान्त असताना
आज सगळं सुचत जातय
एकटा कविता करताना…………….


माहीत  नाही पुन्हा  कधी भेटु
वेगळ्या  रस्त्यावर चलताना
अन जुळतील का आपल्या तारा
वेगळ्या जगात राहताना…………..


विषय  शोधावे लागतील  आता
संभाषण चालु असताना
सगळे तसेच राहील   का गं
पुन्हा एकत्र असताना…………………


शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग  तु
सोडुनच जायचे असताना……………


सोन्यासारखा  संसार करशील
दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला
ती बागेतली रातराणी फ़ुलताना……….

ड्युटी

एका सुंदर युवतीच्या मागे एक मवाली लागला.ती युवती घाबरली.ती या गल्लीतून त्या गल्लीत सारखी पळू लागली.मात्र त्या मवालीने तिचा पाठलाग काही सोड्ला नाही.धावत धावत ती एका चौकापाशी आली.नशीबाने तेथे एक ट्राफ़िक पोलिस उभा होता.ती सुंदर युवती धापा टाकत त्याच्याजवळ आली आणि बोलली...."तो माणूस मघापासून माझ्यामागे लागलाय....मला वाचवा !"


तो पोलिस क्षणभर थांबला.
मग त्या सुंदर युवतीकडे पाहून हळूच बोलला.


"आता मी ड्युटीवर आहे.खरं सांगू.....नाही तर मीही तुमच्या मागे लागलो असतो.."

ऑपरेशनची जागा

तिला घेऊन तो गाडीतून long drive वर निघाला होता

बसल्या बसल्या तो तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करत होता पण ती दाद देत नव्हती

शेवटी ती बोलली- तुला माझी 'ती' जागा दाखवू का जिथे माझे appendix चे ऑपरेशन झाले होते

'ती' जागा पाहायला तो उतावीळ झाला

गाडी थांबवून ती त्याला बोलली - समोर पहा जिथे माझे appendix चे ऑपरेशन झाले होते ते "हॉस्पिटल"

सरकार

एक माणूस दुःखी अवस्थेत रस्त्याच्या कडेला बसुन बडबडत होता….कमाई माझी आणि उधळणारे दुसरे,काम करणार मी आणि मजा मारणार कूणी,सगळाच गोंधळ माजलाय .कमाल म्हणजे दोन वेळची भाकर सुद्धा देत नाहि म्हणजे काय ? ?

त्याच वेळी तेथून जाणा‍र्‍्या हवालदाराने कडक आवाजात विचारले,काय रे सरकारला का शिव्या देतोस?

नाही,हवालदारसाहेब,मी माझ्या बायकोबद्दल बोलतोय…..तो माणूस काकूळतीनं म्हणाला.