घोर मनाला लाऊ नका..
पाठ जगाला दावू नका..
तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा..
जहर खावू नका..!
आली लग्नाला लाडाची ताई..
हुंड्यावाचून जमेना काही..
असे लाचार होवू नका..
टोपी गहाण ठेवू नका..
ताई तयार आहे लढायला बाबा ..
जहर खाऊ नका..!
कर्ज घेवून दिवाळी आली..
वार यंदाही नापिकी झाली..
नवे कपडे घेवू नका..
काही खायाला देवू नका..
पाणी पिवून दिवाळी करू ना बाबा..
जहर खावू नका..!
आहे साथीला सोन्याची शेती..
घाम गाळून पिकवू मोती
तीर्थ यात्रेला जावू नका,,
चुना खिशाला लावू नका..
आमच्या रुपात देवाला बघा ना बाबा..
जहर खावू नका..!!