“ऐक जरा ना”

ऐक जरा ना…….
अंधाराने कडे घातले
घराभोवती;
जळधारांनी झडप घातली
कौलावर;
एकाकीपण आले पसरत
दिशादिशातुन.

घेरायास्तव…..
एकटीच मी
पडते निपचित मिटुन डोळे.

हळुच येते दार घराचे
अंधारातुन;
उभे रहाते बाजुला.

“ऐक जरा ना….”
आठवते मज ती… टकटक
त्या बोटांची;
शहारते अन रंगरोगणाखाली
एक आठवण,
गतजन्मीची;
आभाळातुन पडणार्या त्या थेंबाची

“ऐक जरा ना”
दंडावरती हात ठेवुनी
कुजबुजते आरामखुर्ची.

“आठवते का अजुन तुला ती
कातरवेळा.
माहित नव्हते तुजला,
वाट तुझी तो पहात होता
मिटून डॊळे.
होते दाटुन असह्य ओझे;
होती धुमसत विद्युत काळी;
अजुन होते मजला जाणिव
निबिड वनांतिल….
मध्यरात्रिच्या वावटळीची
-झपाटल्याची”

“ऐक जरा ना “
कौलारांतुन थेंब ठिबकला
ऒठांवरती.

“ऐक ना जरा….एक आठवण.
ज्येष्ठामधल्या – त्या रात्रीच्या
पहिल्या प्रहरी,
अनपेक्षित से
तया कोंडले जलधारांनी
तुझ्याच पाशी.

ऊठला जेंव्हा बंद कराया
उघडी खीडकी,
कसे म्हणाला…….
मीच ऐकले शब्द तयाचे…
’या डोळ्यांची करील चोरी
वीज चोरटी
हेच मला भय’

-धडपडले मी, उठले तेथुन;
सुटले धावत
त्या वस्तुतुन , त्या पाण्यातुन,
दिशादिशातुन,
हात ठेवुनी कानावरती;
ऐकु न यावे शब्द कुणाचे;
“ऐक जरा ना”
“ऐक जरा ना”
“ऐक जरा ना”


कवियत्री - इंदिरा संत
कवितासंग्रह - म्रुगजळ

आली बघ गाई गाई

आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात
फुललासे निशिगंध, घोटळली ताटव्यांत

आली बघ गाई गाई, चांदण्यांचे पायी चाळ
लाविले का अवधान ऐकावया त्यांचा ताल?

आली बघ गाई गाई, लावी करांगुली गाली
म्हणुन का हसलीस, उमटली गोड खळी

आली बघ गाई गाई, लोचनांचे घेई पापे
म्हणून का भारावले, डोळे माझ्या लाडकीचे?

आली बघ गाई गाई कढितसे लांब झोका
दमलीस खेळूनिया, झाक मोतियांच्या शिंपा

   
    कवियत्री  – इंदिरा संत
    संगीत     – कमलाकर भागवत
    स्वर        – सुमन कल्याणपूर

आई

कळ्या माझ्या आनंदाच्या
साठवील्या माझ्याकडे,
फुलवाया तुझ्यापुढे.

आसवे मी साठवली
पापणीच्या काठोकाठ,
तुझ्यापाशी देण्या वाट.

ठरवले मानापाशी,
बोलावयाचे कितितरी,
निजुनिया मांडीवरी.

किती लांब वाटे काळ,
आई कधी भेटशील?
जीव झाल उतवीळ.



कवियत्री -  इंदिरा संत

बाहुली

एक बाहुली हरवते तेव्हा
दुसरई साठी हटुन बसते;
नवी मिळता,नाचतं नाचतां
ती ही कुठे हरवून जाते.
किती किती नि कसल्या कसल्या
बाहुल्या माझ्या हरवुन बसल्या;

पिवळी रंगीत लाकडाची ठकी,
तांबुस काळी चंदनाची कंकी,
आवाज काढणारी रबराची पिंपी,
उघड मीट डोळ्यांची कचकड्यांची चंपी,
मण्यांच्या झग्याची काचेची सोनी,
बिंदी बिजवऱ्यांची कापडाची राणी
किती किती नी कसल्या कसल्या
बाहुल्या माझ्या हरवुन बसल्या.

खेळाचा पेटारा उघडुन पाहिला,
संसार सारा धुंडुन पाहिला,
ढगात धुक्यात शोध गेतला,
स्वप्नांचा ढीग उपसुन झाला…
किती किती नी कसल्या कसल्या
माझ्या मी हरवुन बसल्या.


 कवियत्री - इंदिरा संत

कुब्जा

अजुन नाही जागी राधा
अजुन नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतिरावर
आज घुमे का पावा मंजुळ ॥ १ ॥

मावळतीवर चंद्र केशरी,
पहाटवारा भवती भणभण
अर्ध्या पाण्यामधे उभी ती
तिथेच टाकून आपुले तनमन ॥ २ ॥

विश्वच अवघे ओठा लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डॊळ्यामधले थेंब सुखाचे
हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव ॥ ३ ॥


कवियत्री : इंदिरा संत (१९७५)
गायिका: सुमन कल्याणपूर
संगीतकार: दशरथ पुजारी

तवंग

शेतावरती इथे नाचणी कशी बिलगते पायाभवती;
थरथरणारी नाजुक पाती इतुके कसले गूज सांगती

इवली इवली ही कारंजी, उडती ज्यांतुन हिरव्या धारा;
हिरवे शिंपण अंगावरती, रंग उजळतो त्यांतुन न्यारा

त्या रंगाची हिरवी भाषा, अजाण मी मज मुळि न कळे तर;
तरंगतो परि मनोमनावर त्या रंगाचा तवंग सुंदर….!!


कवियत्री - इंदिरा संत

आक्रोश

दिसु नको, दिसु नको,
नवी रीत मांडु नकॊ
येउ नको, येउ नको,
प्राण माझा कोंडू नको…

नवे अनोखे बेट,
नवे रेशमाचे फास
आणि मनाच्या तळाशी
नको नको चा आक्रोश..


कवियत्री - इंदिरा संत