आला केसराचा वारा

प्रभातीच्या केशराची कुणि उधळली रास
आणि वाऱ्यावर रंगला असा केशरी उल्हास!

रंगा गंधाने माखून झाला सुखद शितळ
आणि ठुमकत चालला शीळ घालीत मंजुळ!

हेलावत्या तळ्यावर वारा केशराचा आला
लाटा -लहरी तरंगानी उचंबळुन झेलला!

नीळे आभाळ क्षणात तळ्यामधे उतरले!
एकाएकी स्तब्ध झाले!!

नऊ सुर्याची मुद्रीका सीतामाईने टाकली
इथे काय प्रकटली!

तळ्याकाठी माझे घर , उभी दारात रहाते
हेलावत्या केशरात स्वप्ने सुंदर पहाते

केशराचे मंज माझा मनावर चमकले!
आली किरणे तळ्याशी दारातुन आत आले

मनातील बिंदु बिंदि निगुतीने गोळा केले
तळ्यावरच्य़ा शेल्यात घट्ट गाठीने बांधले


कवियत्री - इंदिरा संत
कवितासंग्रह - निराकार

चुकून चुकून

चुकून चुकून कधींतरी डोळ्यांना डोळे
भेटले असतील, नसतील.
चुकून-चुकून कधींतरी चार शब्द
दिले घेतले असतील, नसतील …

शुकून-चुकूनमधले अचूक उभें करणारे-
असतील-नसतील मधल्या क्षणांचे स्पंदन
स्थिर करणारें
एकामागून एक कवचें निघळून मनासारख्या
नितळ संगमरवराचें घडलेलें तें शिल्प …

त्याचें अस्तित्व हेंच सर्वस्व. जोखीम जपून ठेवायची.
त्याचें दर्शन हीच शिक्षा. मुकेपणानें सोसायची.


कवियत्री - इंदिरा संत
कवितासंग्रह - गर्भरेशीम

कधि कुठे न भेटणार

कधि कुठे न भेटणार
कधि न काहि बोलणार
कधि कधि न अक्षरात
मन माझे ओवणार

निखळे कधि अश्रू एक
ज्यात तुझे बिंब दिसे
निखळे निःश्वास एक
ज्यात तुझी याद असे

पण तिथेच ते तिथेच
मिटुनि ओठ संपणार
व्रत कठोर हे असेच
हे असेच चालणार


गीत – इंदिरा संत
संगीत – गजानन वाटवे
स्वर – रंजना जोगळेकर

बाकी

होते का ते नुसते
येणे आणिक जाणे
होत्या का त्या नुसत्या गप्पा
क्षेमकुशल अन स्मरणे ;होते का ते नुसते फिरणे -
करड्या चढणीवरुणी
हिरवी उतरण घेणे
होते का ते नुसते बघणे
क्षितीजावरची चित्र लिपी अन
पायाखालील गवतावरची
तुसें रेशमी
निवांतवेळी
आभाळाच्या पाटीवरती
हिशोब मांडू बघता
उरते बाकी
चंद्र घेतला जरी हातचा
तरीही उरते बाकी.




कवियत्री - इंदिरा संत

तुला विसरण्यासाठी

तुला विसरण्यासाठी
पट सोंगट्या खेळते;
अकांताने घेता दान
पटालाही घेरी येते!

असे कसे एकाएकी
फासे जळले मुठीत
कशा तुझ्या आठवणी
उभ्या कट्टीत.. कट्टीत!

दिला उधळुन डाव
आणि निघाले कुठेही
जिथे तुझे असें…
तुजे असे कांही नाही!

द्रुष्टी ठेविली समोर,
चालले मी ’कुठेही’त;
कुठेही च्या टोकापाशी
उभी मात्र तुझी मुर्त!

वाट टाकली मोडुन
आणि गाठला मी डोह;
एक तोच कनवाळु
माझे जाणिल ह्रुदय!

नांव तुझे येण्याआधी
दिला झोकुन मी तोल;
डोह लागला मिटाया
तुझी होऊन ओंजळ!!


कवियत्री - इंदिरा संत

पत्र लिही पण

पत्र लिही पण नको पाठवू
शाईमधुनी काजळ गहिरे
लिपीरेषांच्या जाळीमधुनी
नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भुवईमधली
नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तिळ गालीचा
पूर्णविरामाच्या बिंदूतून

नको पाठवू अक्षरातुनी
शब्दामधले अधिरे स्पंदन
कागदातुनी नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सुवासिक
उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा
सांगितले मी: तू हट्टी पण...

पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्र पुढचे त्यानंतर पण
वाचायाचे राहून जाते


कवियत्री - इंदिरा संत
कवितासंग्रह - रंगबावरी

अजूनही तिन्ही सांज

चंदनाचा की चौरंग वर चांदीचे आसन
मायबाई अन्नपूर्णा रांगणारा बालकृष्ण
बाजूलाच सोनहंसी उभी चोचीत घेऊन
कांचनाची दीपकळी तिचे हळवे नर्तन
ओवाळाया आतुरसे पुढे तांब्याचे ताम्हन
हिलारती निरांजन उदवात धूपदान
तजेलशी गुलबास आणि नैवेद्याचा द्रोण

समोरच्या पाटावर लक्ष्मी घराची येणार
रोजचीच तिन्हीसांज मागे उभी राहणार

अजूनही तिन्हीसांज रोज येतच राहते
निरागस विध्वंसाच्या ढिगावरती टेकते
काळा धूर, लाल जाळ रास राखेची पाहते
काळोखाच्या ओढणीने डोळे टिपत राहते


कवियत्री - इंदिरा संत
कवितासंग्रह - निराकार