काय मिळत मोठ होवून..?

आईच्या अन्गाई गीताने लागणारी झोप,
आता लागते झोपीच्या गोळ्या खावून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

बाबान्नी बोट धरून शिकवलेले चालणे,
आता चालावे लागते काठीचा आधार घेवून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

आईने तेलाचा मारा करून वाढवीलेले केस,
आता ते ही लवकरच जातात डोक सोडून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

मित्रान सोबत रात्रन-दिवस असायच्या गप्पा,
आता फ़क्त-"हाय! कसा आहेस..?" ते ही फ़ोने वरून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

शाळेत सरांच्या रागवण्यातही असायची एक मज्जा,
आता फ़क्त संताप -चिडचिड बॉसच्या बॉसीन्ग वरून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

सारेच जगतात लहानपणीच्या आठवणिन्च्या जगात,
आनि जगतात-"आय मीस माय टीन-एज" म्हणुन..,
काय माहित काय मिळत मोठ होवून............

ह्र्दयात नकार होते

तिलाच द्याव मन हेच विचार होते
तीच्या निशब्द ह्र्दयात नकार होते.

ती दोष देउन जरी नियतीस गेली
माझे तिच्याहुन नशीब सुमार होते.

कर्जात बूडुन पुर्ण जगलो असाच
आयुष्य जणु नुसतेच उधार होते.

तिला अर्थ समझला हसण्याचा जेव्हां
आले गळुन नयनात तुषार होते.

अश्या अनेक ह्रदयात निवास तीचा
माझेच ते ह्र्दय जणू चुकार होते.

काळोख तो सहज नशेत तोल गेला
झाली सकाळ तर तेच गटार होते.

आता कुठे लपवु ओघळत्या अश्रुंना
माझे अश्रुच गळण्यात हुशार होते.

आभारी आहे

तु दिलेल्या दुःखांसाठी मी आभारी आहे
कीचांळत्या जखमांसाठी मी आभारी आहे.

कुठे होता खिशात रुमाल माझ्या कधी
तु दिलेल्या आसवांसाठी मी आभारी आहे.

कुणाचा हा प्रवास कधी पुर्ण झाला आजवर
तुझ्या त्या चार पावलांसाठी मी अभारी आहे.

आज रात्र जाते चादंण्या मोजण्यात माझी
कधी तु दिलेल्या स्वप्नांसाठी मी आभारी आहे.

आजवर किनाराच माझ्या नशीबात होता
तुझ्या त्या सागर लाटांसाठी मी आभारी आहे.

आयुष्य तुझे रंग पाहण्यात गेले माझे
तु बदलेल्या रगांसाठी मी आभारी आहे.

काल तो रस्ता ही म्हणाला सांग तिला
तु दिलेल्या वळणांसाठी मी आभारी आहे.

अगंण कानात कुजबुजुन गेल रात्री, म्हणे
न तुटणा-या गुलाबांसाठी मी आभारी आहे.

मी शब्दांचा सौदागर म्हणून जगलो सदा पण
तु दिलेल्या त्या शब्दांसाठी मी आभारी आहे.

आज हा निवंडूग ह्या शब्दात लोळतो सदा
तु दिलेल्या ह्या छदांसाठी मी आभारी आहे.

जयोऽस्तुते

जयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,
स्वतंत्रते, भगवती, त्वामहम्,
यशोऽयुतां वंदे, यशोऽयुताम् वंदे ||धृ||

राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू, नीतिसंपदांची,
स्वतंत्रते भगवती श्रीमती, राज्ञी तू त्यांची,
परवशतेच्या नभात तुची, आकाशी होशी,
स्वतंत्रते भगवती, चांदणी चमचम लखलखशी ||१||

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गालीं,
स्वतंत्रते भगवती, तूच ती विलसतसे लाली,
तू सूर्याचे तेज, उदधिचे गांभीर्यही तूची,
स्वतंत्रते भगवती, अन्यथा ग्रहण नष्ट तेचि ।।२।।

मोक्षमुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती, योगिजन परब्रह्म वदती
जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती, सर्व जन सहचारी होते ।।३।।


हे अधमरक्तरंजिते, हे अधमरक्तरंजिते, सुजनपूजिते,
श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते!
तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण,
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण,
श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! ||४||

जयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,
स्वतंत्रते, भगवती, त्वामहम्,
यशोऽयुतां वंदे, यशोऽयुताम् वंदे


कवि - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

चिमणा राजा

गृहराज्यावर गाजवि सत्ता राजा चिमणा एक
जन्मजात हा! नको कराया यास कुणीं अभिषेक! ।।१।।

कटि आईची मृदुल आपुलें सिंहासन बनवून
मधुर बोबड्या अस्फुट वचनीं सोडि हुकूम तिथून ।।२।।

बसावयाला सुंदर घोडा त्यास असे काठीचा
परि आवडता अधिक त्याहुनी ताईच्या पाठीचा! ।।३।।

त्या घोड्यावर डौलें बैसे, चाबुक नाजुक हातीं
सहल करोनी देखरेखही ठेवी राज्यावरतीं ।।४।।

राजदंड जड राजे दुसरे वागविती स्वकरांत
मनें दुज्यांची मुठींत परि हा ठेवितसे दिनरात! ।।५।।

मृदुल करांची मिठी सोडवूं येइ न मल्लांनाही
अमोघ याची शक्ति यापरी, उपमा कसली नाहीं ।।६।।

पराभवाचें लक्षण दिसतां रुदनास्त्रा सोडीत
प्रबल शत्रुही मग त्यायोगें सहजचि होई चीत!।। ७।।


कवी - दामोदर अच्युत कारे

ऐकव तव मधु बोल

ऐकव तव मधु बोल, कोकिळे,
ऐकव तव मधु बोल ॥ध्रु॥

नकोत मजला मैना, राघू,
साळुंकी, चंडोल
नकोत मजला विविध सुरांचे
कृत्रिम हे हिंदोल ॥१॥

एक तुझा स्वर आर्त खरोखर
वाटे मज बिनमोल,
वसंत नाहीं अजुन संपला,
कां झालीस अबोल? ॥२॥

सुखें वसंतासंगें जा मग
पहावया भूगोल,
गा शेवटचा बोल लपुनहि
पर्णांमाजीं खोल ॥३॥

पाहिन नंतर वाट वर्षभर
दाबुनि चित्त विलोल
नको करूं पण आस एवढी
जातां जातां फोल! ॥४॥


कवी - माधव जुलियन

पावसाच्या धारा

पावसाच्या धारा येती झरझरा
झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा

रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागोजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ

झळके सतेज, ढगांवर वीज
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज

झोंबे अंगा वारे, काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली पाखरें

हर्षलासे फार, नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून खार

झाडांचिया तळी, डोईवरी मारा
रानातील गुरे शोधिती निवारा

नदीलाही पूर, लोटला अपार
फोफावत धावे जणू नागीणच थोर

झाडांची पालवी, चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें रंगदार छबी

थांबला ओझर, उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश

किरण कोंवळे भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें पक्षीजात खुले

धरणी हासली, सुस्नात जाहली
वरुणाच्या वर्षावाने मनी संतोषली


कवयित्री - शांता शेळके