मूर्तिभंजक

जगाचा गल्बला

जगात सोडुन

प्रेमाची मृणाल-

बंधने तोडून-

होता तो भ्रमिष्ट

भ्रमत एकला

नादात अगम्य

टाकीत पावला

वर्तले नवल

डोंगर-कपारी

गवसे प्रतिमा

संगमरवरी !

हर्षाचा उन्माद

आला त्या वेड्याला

घेऊन मूर्ति ती

बेहोष चालला,

आढळे पुढती

पहाड उभार

वेड्याच्या मनात

काही ये विचार

थांबवी आपुला

निरर्थ प्रवास

दिवसामागून

उलटे दिवस-

आणिक अखेरी

राबून अखण्ड

वेड्याने खोदले

मंदिर प्रचंड

चढवी कळस

घडवी आसन,

जाहली मंदिरी

मूर्त ती स्थापन !

नंतर सुरू हो

वेड्याचे पूजन

घुमते कड्यात

नर्तन गायन

रान अन् भोतीचे

स्फुंदते सकाळी

ठेवी हा वेलींना

ना फूल, ना कळी !

विचारी आश्चर्ये

तृणाला ओहळ

कोण हा हिरावी

रोजला ओंजळ ?

परन्तु मूर्त ती

बोलेना, हलेना,

वेड्याचे कौतुक

काहीही करीना !

सरले गायन

सरले नर्तन

चालले अखेरी

भीषण क्रंदन

पडून तिच्या त्या

सुन्दर पायाशी

ओरडे रडे तो

उपाशी तापाशी !

खुळाच ! कळे न

पाषाणापासून

अपेक्षा कशाची

उपेक्षेवाचून !

वैतागे, संतापे,

अखेरी क्रोधाने

मूर्तीच्या ठिकर्‍या

केल्या त्या भक्ताने !

रित्या त्या मंदिरी

आता तो दाराशी

बसतो शोधत

काहीसे आकाशी.

वाटेचे प्रवासी

मंदिरी येतात

आणिक शिल्पाची

थोरवी गातात.

पाहून परंतू

मोकळा गाभारा

पाषाणखंडांचा

आतला पसारा-

त्वेषाने बोलती

जाताना रसिक

असेल चांडाळ

हा मूर्तिभंजक !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

तरीही केधवा

दोघांत आजला
अफाट अन्तर
जुळून पाकळ्या
उडाल्या नंतर-
जीवनावाचून
जळला अंकुर
प्रश्नहि राहिला
राहिले उत्तर !

संग्रामी आजला
शोधतो जीवित
उरींचे ओघळ
दाबून उरात-
उठती भोवती
धुळीचे पर्वत
अखण्ड फिरते
वरून कर्वत !
वादळी रणांत
करणे कोठून
नाजूक भावांचे
लालनपालन-
तरीही केधवा
पडता पथारी
थडगी दुभंग
होतात अंतरी-
आठवे तुझ्या ते
प्रीतीचे मोहळ
आणि हो बिछाना
आगीचा ओहळ !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

जा जरा पूर्वेकडे

चीन-जपानी युद्धांत चाललेले राक्षसी अत्याचार या कवीतेत अभिप्रेत आहेत.

जा जरा पूर्वेकडे !

वाळवण्टी कोरता का एक श्वानाचे मढे ?

जा गिधाडांनो, पुढे

जेथ युद्धाची धुमाळी गंज प्रेताचा पदे,

जा जरा पूर्वेकडे !

आणि रक्ताच्या नद्या हो वाहती धारोष्णशा

भागवा तेथे तृषा,

ढीग साराया शवांचा तेथ लागे फावडे,

जा जरा पूर्वेकडे !

गात गीते जाउ द्या हो थोर तांडा आपुला,

देव आहे तोषाला

वर्षता त्याचा दयाब्धी राहता का कोरडे ?

जा जरा पूर्वेकडे !

तेथ देखा आग वेगाने विमाने वर्षती,

थोर शास्त्रांची गती

धूळ आणि अग्नि यांच्या दौलती चोहीकडे

जा जरा पुर्वेकडे !

खङ्ग लावूनी उराला बायकांना वेढती,

आणि दारी ओढती,

भोगती बाजार-हाटी मांस आणि कातडे

जा जरा पूर्वेकडे !

आर्त धावा आइचा ऐकून धावे अर्भक

ना जुमानी बंदुक

आणि लोंबे संगिनीला छान छोटे आतडे

जा जरा पूर्वेकडे !

हा दयेने ईश्वराच्या काळ आहे चालता,

व्यर्थ येथे राबता,

व्यर्थ तेथे शोणिताचे वाहुनी जाती सडे

जा जरा पूर्वेकडे !

आणि येताना पवाडे संस्कृतीचे गा जरा,

डोलु द्या सारी धरा,

मेघमालेतून आम्हा शांततेचे द्या धडे

जा जरा पूर्वेकडे !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

गोदाकाठचा संधिकाल

गर्द वनी वा गिरीकंदरी

लपलेला दिनि तम, गरुडापरि

पंख आपुले विशाल पसरुन ये विश्वावरती.

पश्चिम-वारा वाहे झुळझुळ

कंपित होउनि हेलावे जळ

दूर तरूंच्या काळ्या छाया हळुहळु थरथरती.

जीर्ण वडाच्या पारंब्यातुनि

पंखांची क्षण फडफड करुनी

शब्द न करता रातपाखरे नदीकडे उडती.

कपारीत अन् दूर कुठोनी

सांदीमध्ये लपुनी बसुनी

अखंड काढी रातकिडा स्वर ते कानी पडती.

वळणाच्या वाटेवर चाले,

आतुर अंतर कातर डोळे,

झपझप पाउल टाकित कोणी खेड्यातिल युवती.

निळसर काळे वरती अंबर,

धूसर धूराच्या रेषा वर

पलिकडच्या घन राईमधुनी चढुनी मावळती.

अभ्रखंड तो अचल पांढरा

पडे पारवा झडुनि पिसारा

तेजहीन अन् दोन चांदण्या डोकावुनि बघती.

परि शुक्राचा सतेज तारा

पसरित गगनी प्रकाश-धारा

वीरापरि आत्मार्पण करण्या आलेला पुढती.

आणिक इकडे क्षितिजावरती

विडंबण्या शुक्राची दीप्ती

शहरामधल्या क्षीण दिव्यांच्या मिणमिणती ज्योति.

वाडा पडका नदीतटावर

भग्न आपुल्या प्रतिबिंबावर

गंगेमधल्या, खिन्नपणाने लावितसे दृष्टी.

देउळ ते अन् भग्न, हटाने ध्येयनिष्ठ जणु जनाप्रमाणे

पडले तरिही जपुनी ठेवी ह्रदयातिल मूर्ति.

पाचोळ्यावर का ही सळसळ

कसली डोहावरती खळबळ

पाउल वाजे रजनीचे का येताना जगती ?


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

अवशेष

माला स्वप्नांची ओघळली !

जपली ध्येये जी ह्रदयाशी

गमली मजला जी अविनाशी

कोसळुनी ती जमल्या राशी

अवशेषाच्या या भवताली.

रवि येतां क्षितिजावर वरती

दवापरी विरल्या आकांक्षा

जागिच जिरल्या मनी जिगीषा

हासत झाकुनि त्या अवशेषा

करणे आहे प्रवास पुढती.

वास्तव जगताच्या हेमन्ती

स्वप्नांचा उत्फुल्ल फुलोरा

ढाळि तळाला वादळ -वारा

रात्रीच्या त्या प्रदीप्त तारा

काचेचे कण आता गमती.

पण अद्यापी स्मृतिचे धागे

गुन्तुन मागे जिवा ओढती

अद्यापी त्या विझल्या ज्योती

कधिं एखाद्या भकास राती

पहाट ये तो ठेवति जागे.

दृश्ये मोहक अद्यापी ती

स्वप्नामध्ये समूर्त होती

थडग्यामधुनी छाया उठती

धरावया जो जावे पुढती

थडग्यामध्ये विलीन होती.

वसन्त सरला, सरले कूजन

सरले ते कुसुमांकित नंदन

सरले आर्त उराचे स्पंदन

मूर्तीवरिल मुलामा जाउन

सरले आता मूर्तीपूजन.


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

किनार्‍यावर

पुढे पसरला अथांग दरिया

सखे, किनार्‍यावरती आपण

कोर शशीची शुभ्र बिलोरी

टाकी निज किरणांची रापण !

चित्रासम निःशब्द गमे जग

प्रकाश-काळोखाचा संगम

क्वचित भंगते गाढ शान्तता

जातां झापुन रात-विहंगम !

दूर तमांतुन दिसती अंधुक

नगरांतिल त्या ज्योती तेवत

संसारांतिल समूर्त दुःखे

बसलेली वा जागत, जाळत !

क्षितिजावर दीपांकित तारू

चाले पश्चिम दिशेस धूसर

ज्योतींचा जणुं जथा निघे हा

शोधाया मावळला भास्कर !

हळुहळु खळबळ करीत लाटा

येउनि पुळणीवर ओसरती

जणूं जगाची जीवन-स्वप्ने

स्फुरती, फुलती, फुटती, विरती !

होय किनार्‍यावरती अपुले

आज सखे, हे मङ्गल मीलन

जीवित दर्यापरी, नसे ते-

केवळ सुंदर केवळ भीषण !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

ग्रीष्माची चाहूल

हे काय अनामिक आर्त पिसें

हुरहूर अकारण वाटतसे !

कांति जगावर अभिनव शिंपित

चराचरांतुन फुलवित जीवित

वसंत ये जगिं गाजत वाजत

कां अभ्र अवेळीं दाटतसे !

नवा फुलोरा नव पर्णावलि

हिमशीतल चहुंकडे सावली

जीवनगंगा जगिं अवतरली

तरि उदास मानस होइ कसें !

दिशा दिशा या उज्जवल मंगल

आम्रांतुनि ललकारति कोकिल

दुमदुमतो वनिं तो ध्वनि मंजुल

मनिं रात्रिंचर कां कण्हत असे !

सरेल किंवा वसन्त म्हणुनी

सुकतिल कुसुमाकुल पुष्करणी

करपुनि जाइल अवघी धरणी

ती आंच अगोदर भासतसे !

अग्नीचा घट खांद्यावरती

घेउनि, अग्नी पेरित भंवती

ग्रीष्म निघाला येण्या जगतीं

चाहूल तयाची लागतसे !

हें काय अनामिक आर्त पिसें !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा