व्यर्थ

सुर मागू तुला मी कसा?
जीवना तू तसा,मी असा!

तू मला ,मी तुला पाहिले,
एकमेकांस न्याहाळिले;
-दुःख माझातुझा आरसा!

एकदाही मनासारखा
तू न झालास माझा सखा;
-खेळलो खेळ झाला जसा!

खूप झाले तुझे बोलणे,
खूप झाले तुझे कोपणे,
-मी तरीही जसाच्या तसा!

रंग सारे तुझे झेलुनी,
शाप सारे तुझे घेउनी
-हिंडतो मीच वेडापिसा!

काय मागून काही मिळे?
का तुला बात माझे कळे?
-व्यर्थ हा अमृताचा वसा


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

पहाटे पहाटे

पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली!

मला आठवेना...तुला आठवेना...
कशी रात्र गेली कुणाला कळेना.
-तरीही नभाला पुरेशी न लाली!

गडे हे बहाणे,निमित्ते कशाला?
असा राहू दे हात माझा उशाला
मऊमोकळे केस हे सोड गाली!

कसा रामपारी सुटे गार वारा
मला दे उशाशी पुन्हा तू उबारा
अता राहू दे बोलणे,हालचाली!

तुला आण त्या वेचल्या तारकांची,
तुला आण त्या जागणाऱ्या फुलांची;
लपेटून घे तू मला भोवताली!


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

वय निघून गेले

देखावे बघण्याचे वय निघून गेले
रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले

गेले ते उडुन रंग
उरले हे फिकट संग
हात पुढे करण्याचे वय निघून गेले

कळते पाहून हेच
हे नुसते चेहरेच
चेहऱ्यांत जगण्याचे वय निघून गेले

रोज नवे एक नाव
रोज नवे एक गाव
नावगाव पुसण्याचे वय निघून गेले

रिमझिमतो रातंदिन
स्मरणांचा अमृतघन
पावसात भिजण्याचे वय निघून गेले

हृदयाचे तारुणपण
ओसरले नाही पण
झंकारत झुरण्याचे वय निघुन गेले

एकटाच मज बघून
चांदरात ये अजून
चांदण्यात फिरण्याचे वय निघून गेले

आला जर जवळ अंत
कां हा आला वसंत?
हाय,फुले टिपण्याचे वय निघून गेले


कवी - सुरेश भट
गझलसंग्रह - एल्गार

दर्जेदार

ती कुणाची झुंज होती? तो कसा जोहार होता?
जो निखारा वेचला मी तो निखारा गार होता!

हा कसा आता उन्हाचा निर्दयी पाऊस आला?
मी मघाशी पाहिलेला मेघ काळाशार होता

गांजले ज्यांनी मला ते शेवटी माझेच होते..
हा कळीचा दंश होता! तो फुलांचा वार होता!

ह्या करंट्यांनी स्वतःचे फोडले आधीच डोळे..
(त्यांचियासाठी उद्याचा सूर्य अत्याचार होता!)

स्वागतासाठीच माझ्या भुंकले ते आदराने
थुंकले तोंडावरी तो केवढा सत्कार होता!

गाढल्या त्यांनी पिढ्या अन् ठेवला नाही पुरावा
ह्या स्मशानाच्या धन्याचा देव ताबेदार होता!

लागला आहे अताशा वेदनेचा शौक त्यांना
(एरवी,त्यांचा सुखाचा चोरटा व्यापार होता!)

चोरली माझ्या घराची राखही त्याने परंतू
मी न केला ओरडा.. तो चोर अब्रूदार होता!

पाहिला नाही जरी मी चेहरा मारेकऱ्य़ाचा
लोकहो,माझा तरीही खून दर्जेदार होता!


कवी - सुरेश भट

भल्या पहाटे निघून आले !

सख्या तुला भेटण्यास मी या भल्या पहाटे निघून आले !
घरातुनी चोरपावलांनी लपून आले.. जपून आले !

तुझ्याच स्वप्नात रात गेली…तुझ्याच स्वप्नात जाग आली…
तुझ्याच स्वप्नात जागणा~या जगातुनी मी उठून आले !

विचारले मी न अंबराला.. विचारले मी न वारियाला …
तुझ्या मिठीचा निरोप आला- मिठीत मी मोहरून आले !

अताच हा दूर तारकांचा कुठेतरी काफिला निघाला
आताच हे चांदणे गुलाबी हळूच मी पांघरून आले

गडे मला बोलता न आले, कुणीकुणी बोललेह नाही…
अखेर माझ्याच आसवांना तुझा पता मी पुसून आले !


कवी - सुरेश भट

अबोलाही तिचा बोलून गेला!

अबोलाही तिचा बोलून गेला!
मला काही तरी सुचवून गेला!!

कसा मी वेंधळा इतका कळेना;
मला जो तो पहा हटकून गेला!

जरासे दार झाले किलकिलेसे....
नको तो आत डोकावून गेला!

जणू मी झाड जे रस्त्यामधोमध!
मला रस्ता स्वत: छाटून गेला!!

न पासंगासही माझ्या पुरा तो....
तरी टेंभा किती मिरवून गेला!

फळांनी मी लगडलो....चूक झाली!
दगड जो तो मला मारून गेला!!

फुले तोडून गेला....दु:ख नाही!
पहा काटेच तो पसरून गेला!!

पहा लोंढाच आला सांत्वनांचा....
जखम प्रत्येक अन् भिजवून गेला!

निसटला भोवऱ्यामधुनी जरी तो;
किनारा शेवटी बुडवून गेला!

दऱ्या बाजूस दोन्ही, बिकट रस्ता....
सुरक्षित जो मला घेऊन गेला!

विचारांचा जथा आला अचानक!
मनाला पार भंडावून गेला!!

न इतके दु:ख ग्रीष्माच्या झळांचे!
मला पाऊस वेडावून गेला!!

मतांची भीक मागायास आला...
हरेकालाच गोंजारून गेला!

खिरापत वाटुनी आश्वासनांची;
गरीबांनाच तो चकवून गेला!

किती पेरून साखर बोलला तो!
शिताफीने किती फसवून गेला!!

अशी बरसात शेरांचीच केली!
सभेला चिंब तो भिजवून गेला!!

न केले काय गझलेस्तव तयाने?
उभे आयुष्य तो उधळून गेला!

गझलसम्राट ना झाला उगा तो!
गझल जगला, गझल पेरून गेला!!


कवी - प्रा.सतीश देवपूरकर
वृत्त - मृगाक्षी
लगावली - लगागागा/लगागागा/लगागा

माझिया डोळ्यात आसवे जगाची

माझिया डोळ्यात होती आसवे साऱ्या जगाची!
शेवटी साऱ्या नद्यांना ओढ असते सागराची!!

पावसाळी या हवेला मी तरी भुलणार नाही!
मी दिले सोडून आता वाट बघणे पावसाची!!

चार दिवसंचीच असते रोषणाई उत्सवाची!!
रोज थोडी रात्र येते, पौर्णिमेच्या चांदण्याची?

गारव्याला माझिया होते विषारी साप सुद्धा!
जिंदगी माझी जणू होती सुगंधी चंदनाची!!

पाय आपोआप माघारी घरी परतायचे हे.....
केवढी गोडी मनाला रेशमी या बंधनाची!


कवी - प्रा.सतीश देवपूरकर