पावसाळा

चिंब झाली पावसाने भोवती रानोवनें
वर्षती येथे सखीची पावसाळी लोचनें.

नाचती पर्णांमधूनी स्वैर थेंबांच्या सरी,
तेवि वस्त्रांतूनी हीची मुक्तमाला नाचरी.

हालते आहे कळीची पाकळी अन पाकळी
चुंबनाधीरा घरी ही नाचरी ओष्ठावली.

स्वच्छ माझ्या अंगणीची केळ हाले राजसा;
रंग हिचा गौर आहे केळपानाचा जसा.

हा जलाचा पाट दावी थाट वीजेचा असा
आसवांचा पूर येथे अंतराचा आरसा

दूरश्या शेतांत कोणी चालविली लावणी
आणी येथे आत झाली भावनेची पेरणी

यायचें येवो कधीही धान्य शेतीचें घरी
हे बघा, आधीच आले पीक प्रीतीचे घरी


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

तुला किनी गऽ

अशी कुठेही नको बसू
‘मळा कुणाचा?’ नको पुसू
नको नाचवू तुझा रुपेरी गोफ असा हा तसू तसू
गऽ नको हसू !

अशी कुठेही नको शिरु;
अशी धिटाई नको करु;
मला गव्हाळी, तुला नव्हाळी, तु-यातु-यांना नको धरु,
गऽ नको फिरु !

नको फिरु या वनोवनी
तुझ्या अशा या नवेपणी
तुला किनी गऽ सखू, असावा नव्या शिणेचा कुणी धनी !
(मी जसा किनी !)


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

सांज हासली !

सांज हासली,सजणे, सांज हासली !

वाद हा जरा
थांबवू पुरा
विसावली परस्परात ऊनसावली!

संपवूचना
वेगळेपणा
विभक्त पाखरे पुन्हा निडात भेटली!

भोवती मुके
दाटले धुके
घरात एक मी नि, सखे, तूच एकली !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

हे जीवन

चिरदाहक चिंतनात चढते – चढते जीवन झुलले, रे!
कसले जीवन, आता नुसते – नुसते मरणच उरले, रे!

झडली पाने पुष्पे पहिली :
काट्यांची खाईच राहिली :
जीर्ण, गलित पर्णातच फुलते – फुलते गुलाब पुरले, रे!

वीज हरवली : उरले वादळ,
दिवाच विझला : उरले काजळ,
हताश ह्रदयामधून पुरते – पुरते तिमिरच भरले, रे!

शून्य मनाने बसलो वाचित
तिमिरामधले निर्दय संचित
संवेदन नसताही नुसते – नुसते मन हुरहुरले, रे!

कसले जीवन, आता नुसते – नुसते मरणच उरले, रे!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

तुटू दे !

जीवावर बांधव सारे उठलेत – उठू दे !
संबंध दिखाऊ सारे तुटलेत – तुटू दे !

उद्दाम, अघोरी, स्वार्थी, घनघोर जगाला
पाहून उदासी डोळे मिटलेत – मिटू दे !

व्याकुळ, करंट्या, माझ्या गततेज जिवाला
पाहून पुराणे प्रेमी विटलेत – विटू दे !

आघात किती सोसू मी दिनरात मुक्याने :
हा ऊरच आवेगाने फुटणार – फुटू दे !

हे जीवन : याची यांना पण किंमत नाही :
हे रक्त तुझे : लोकांची पण भ्रांत फुटू दे !

अद्याप किती, रे जीवा फिकीरीत पडू मी
हा बद्ध भुकेला आत्मा सुटणार – सुटू दे !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

चुकलेले कोकरु

दोष कुणाचा, तूच पहा, न कळतच घडल्या चुका :
वाट शोध शोधली : शेवटी थकून बसलो मुका.
ऐल कळेना, पैल दिसेना : बघ, सापडलो इथे
गहन घोर तिमिरांत एकला बन-ओसाडीमधे.

कुणीच नाही काय नेणत्या पतिताला आसरा?
कुठेच नाही दिसत, अरेरे, बुडत्याला कासरा!
घरट्याखाली पडले इवले बिनपंखी पाखरु;
हुरहुर बघते कळपामधले चुकलेले कोकरु

तळमळलो, व्याकुळलो, आणिक सभोवार देखले;
हाक घातली : पुन्हा पुन्हा पण पडसादच ऐकले
जिवास होता तुझा भरवसा : फोल ठरविलास ना!
उमेद खचली, आणि तनूची निमालीच चेतना

मायमाऊली, नकोस हयगय गरिबाविषयी करु!
चुकलो असलो तरी शेवटी तुझेच मी लेकरु


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

प्रेमपीठ

तू कलावती कमला, आणि सांब शंकर मी
वैभवे हवीत तुला, अन असा दिगंबर मी
अन असून तू जुलुमी पाहिजे तुला समता
आडवू नको, सजणे, भाळलो तुझ्यावर मी

प्रेमळास आवडली का कधी तरी समता
गऽ, परस्परांमधला भेद हीच सुंदरता
मी जरी चुका करतो राग तू नको मानू
गऽ, चुकीशिवाय कुठे वाढते खरी ममता!

दूर ती जरी इवली चंद्रकोर चंदेरी
गर्द या वनांत तरी धुंदफुंद अंधेरी
ती चकाकती सगळी दूर राहिली दुनिया
या तमामध्ये वसवू प्रेमपीठ शृंगेरी


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ