नदीच्या पलीकडे राळा पेरला बाई
राळा पेरला बाई
एके दिवशी काऊ आला बाई
काऊ आला
एकच कणीस तोडून नेलं बाई
तोडून नेलं
सईच्या अंगणात टाकून दिलं बाई
टाकून दिलं
सईने उचलून घरात नेलं बाई
घरात नेलं
कांडून कांडून राळा केला बाई
राळा केला
राळा घेऊन बाजारात गेली बाई
बाजारात गेली
त्याच पैशाची घागर आणली बाई
घागर आणली
घागर घेऊन पाण्याला गेली बाई
पाण्याला गेली
मधल्याच बोटाला विंचू चावला बाई
विंचू चावला

आता तरी धाडा ना धाडा ना माहेरा

सोन्याची दौत मोत्याचा टाक
तिथे आमचे मामंजी लिहीत होते
मामंजी मामंजी मला मूळ आलं
आता तरी धाडा ना धाडा ना माहेरा

मला काय पुसतेस, बरीच दिसतेस
पूस आपल्या सासूला सासूला
सोन्याचा करंडा बाई मोत्याचं झाकण
तिथे आमच्या सासूबाई कुंकू लावीत होत्या
सासूबाई सासूबाई मला मूळ आलं
आता तरी धाडा ना धाडा ना

मला काय पुसतेस बरीच दिसतेस
पूस आपल्या जावेला जावेला
सोन्याची रवी, मोत्याचा दोर
तिथे आमच्या जाऊबाई ताक करीत होत्या
जाऊबाई जाऊबाई मला मूळ आलं
आता तरी धाडा ना धाडा ना

मला काय पुसतेस बरीच दिसतेस
पूस आपल्या दिराला दिराला
सोन्याची विटी, मोत्याचा दांडू
तिथे आमचे भाऊजी खेळत होते
भाऊजी भाऊजी मला मूळ आलं
आता तरी धाडा ना धाडा ना

मला काय पुसतेस बरीच दिसतेस
पूस आपल्या नणंदेला नणंदेला
सोन्याची सुपली बाई मोत्याने गुंफली
तिथे आमच्या वन्सं पाखडत होत्या
वन्सबाई वन्सबाई मला मूळ आलं
आता तरी धाडा ना धाडा ना

मला काय पुसतेस बरीच दिसतेस
पूस आपल्या पतीला पतीला
सोन्याचा पलंग मोत्याचे खूर
तिथे आमचे पतिराज झोपले होते
पतिराज पतिराज मला मूळ आलं
आता तरी धाडा ना धाडा ना

आणा फणी घाला वेणी
जाऊ द्या तिला माहेरा माहेरा

ऐलमा पैलमा

ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय पारावरी
गोदावरी काठच्या उमाजी नायका, आमच्या गावच्या भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा
आमच्या आया तुमच्या आया, खातील काय दुधोंडे
दुधोंडयाची लागली टाळी ,आयुष्य दे रे भामाळी
माळी गेला शेता भाता, पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबोथेंबी, थेंबोथेंबी आडव्या लोंबी,
आडव्या लोंबती अंगणा
अंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या तुझी सोळा वर्षे
अतुल्या मतुल्या चरणी चातुल्या,
चरणी चारचोडे, हातपाय खणखणीत गोडे
एकेक गोडा विसाविसाचा, साडया डांगर नेसायच्या
नेसा गं नेसा बाहुल्यांनो, अडीच वर्षे पावल्यांनो

आज कोण वार बाई

आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार सोमवार महादेवाला नमस्कार || १||
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार मंगलवार मंगळागौरीला नमस्कार || २ ||
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार बुधवार बुधबृहस्पतीला नमस्कार || ३ ||
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार गुरुवार दत्तला नमस्कार || ४ ||
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार शुक्रवार अंबाबाईला नमस्कार || ५ ||
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार शनिवार शनि-मारुतीला नमस्कार || ६ ||
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार रविवार सूर्या नारायणाला नमस्कार || ७ ||

शिवाजी आमुचा राणा

शिवाजी आमुचा राणा| त्याचा तो तोरणा किल्ला |
किल्ल्यामध्ये सात विहिरी | विहिरीमध्ये सात कमळं |
एकेक कमळं तोडून नेलं | भवानी मातेस अर्पण केलं |
भवानी माता प्रसन्न झाली | शिवरायाला तलवार दिली |
तलवार घेउनी आला | हिंदूचा राजा तो झाला |
मोगलांचा फडशा तो केला | हिंदुनी त्याचे स्मरण करावे |
हादग्यापुढे गाणे गावे | प्रसन्न होईल गजगौरी |
प्रसाद वाटा घरोघरी |

दमडीचं तेल

काळी चंद्रकळा नेसू कशी
पायात पैंजण घालू कशी
दमडीचं तेल आणू कशी
दमडीचं तेल आणलं
मामंजींची शेंडी झाली
भावोजींची दाढी झाली
सासूबाईंचं न्हाणं झालं
वन्सबाईंची वेणी झाली
उरलेलं तेल झाकून ठेवलं
हत्तीणीचा पाय लागला वेशीबाहेर ओघळ गेला
सासूबाई सासूबाई अन्याय झाला चार चाबूक अधिक मारा
दहीभात जेवायला घाला माझं उष्टं तुम्हीच काढा.

हरीच्या नैवेद्याला

हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातलं उरलं पीठ त्याचं केलं थालीपीठ
नेऊनी वाढलं पानात, जिलबी बिघडली
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातलं उरलं दही त्याचं केलं श्रीखंड बाई
नेऊनी वाढलं पानात, जिलबी बिघडली
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातला उरला थोडा पाक त्याचा केला साखरभात
नेऊनी वाढला पानात, जिलबी बिघडली.
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातलं उरलं थोडं तूप त्याच्या केल्या पु-या छान
नेऊनी वाढल्या पानात, जिलबी बिघडली