वास नाही ज्या फुलांना फक्‍त ती पाहून घे,
धुंद आहे गंघ ज्यांना तो तिथे जाऊन घे.

चांदणे लाटात जेथे साजल्या वाळूमधे,
रात्र संपेतो इमाने गीत तू गाऊन घे.

प्रीत जेव्हा जागणारी सर्वभावे वाहते
बाहुंचा वेढा तिचा तू साहसे साहून घे.

वाढत्या ग्रीष्मात जेव्हा मेघ माथी कोसळे
सारुनी संकोच सारा त्यांत तू न्हाऊन घे

नेम ना लागेल केव्हा तुष्टतेची वाळवी :
वाळण्या ती या जगाचें दु:ख तू लावून घे.

वाटतां सारेंच खोटें, प्रेमनिष्ठा आटतां,
एकटा अंतर्गृहींच्या ज्योतिने दाहून घे.


कवि - बा. भ. बोरकर

भुलाबाईची गाणी

पहिली गं भुलाबाई देवा देवा साथ दे
साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा
खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी
अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी
गंगेच्या पाण्याने वेळवीला भात
जेविता कंठ राणा भुलाबाईचा.
ठोकीला राळा हनुमंत बाळा
हनुमंत बाळाचे लांब लांब झोके
टिकाऊचे डोळे हात पाय गोरे
भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी
झळकतीचे एकच पान
दुरून भुलाबाई नमस्कार
एवढीशी गंगा झुळझुळ वाहे
ताव्या पितळी नाय गं
हिरवी टोपी हाय गं
हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो
सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला
जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई
चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं
खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली
तळय़ा तळय़ा ठाकुरा
भुलाबाई जाते माहेरा
जाते तशी जाऊ द्या
तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या
बोटभर कुंकू लावू द्या
तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या
तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय
आउले पाऊल नागपूर गांव
नागपूर गावचे ठासे ठुसे
वरून भुलाबाईचे माहेर दिसे.

सासुरवाशी सून रुसून बसली कैसी

नणंदा भावजया दोघी जणी , खेळत होत्या छप्पापाणी
खेळता खेळता झगडा झाला, भावजये वरी डाव आला
रुसून बसली गाईच्या गोठ्यात
सासुरवाशी सून रुसून बसली कैसी
यादवराया राणी घरासी येईना कैसी || धृ ||

सासू गेली समजावयाला, उठा उठा सुनबाई चला घराला
निम्मा संसार देते तुम्हांला, निम्मा संसार नको मजला
सासरा गेला समजावयाला, उठ उठ मुली चाल घराला
दौत लेखणी देतो तुजला, दौत लेखणी नको मजला
मी नाही यावयाची तुमच्या घराला || 2 ||

जाऊ गेली समजावयाला, उठा उठा जाऊबाई चला घराला
ताकाचा डेरा देते तुम्हांला, ताकाचा डेरा नको मजला
मी नाही यावयाची तुमच्या घराला || ३ ||

दीर गेले समजावयाला , उठा उठा वाहिनी चला घराला
विट्टी दांडू देतो तुम्हांला, विट्टी दांडू नको आम्हाला
मी नाही यावयाची तुमच्या घराला || ४ ||

नणंद गेली समजावयाला, उठा उठा वाहिनी चला घराला
सोन्याची सुपली देते तुम्हांला , सोन्याची सुपली नको आम्हांला
मी नाही यावयाची तुमच्या घराला || ५ ||

पती गेले समजावयाला , उठा उठा राणीसाहेब चला घराला
लाल चाबूक देतो तुम्हांला , उठली गं उठली गजबजून
पदर घेतला सावरून, ओचा घेतला सावरून
कापत कापत आली घरासी
यादवराया राणी घरासी आली कैसी || ६ ||

कारल्याचा वेल

कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याचा वेल लावला हो सासूबाई लावला हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
कारल्याला कारली येऊ देत गं सुने येऊ देत गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याला कारली आली हो सासूबाई आली हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
कारल्याची भाजी कर गं सुने कर गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी केली हो सासूबाई केली हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
कारल्याची भाजी खा गं सुने खा गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई खाल्ली हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
आपलं उष्ट काढ गं सुने काढ गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
आपलं उष्टं काढलं हो सासूबाई काढलं हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा.

अडकित जाऊ खिडकीत जाऊ

अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होतं ताम्हन
भुलोजीला मुलगा झाला
नाव ठेवा वामन

अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होता बत्ता
भुलोजीला मुलगा झाला
नाव ठेवा दत्ता

अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होती वांगी
भुलोजीला मुलगी झाली
नाव ठेवा हेमांगी

अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होती दोरी
भुलोजीला मुलगी झाली
नाव ठेवा गौरी

अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होती पणती
भुलोजीला मुलगी झाली
नाव ठेवा मालती

अडकित जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होती घागर
भुलोजीला मुलगा झाला
नाव ठेवा सागर

अरडी गं बाई परडी

अरडी गं बाई परडी
परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं
दारी मूल कोण गं
दारी मूल सासरा
सास-याने काय आणलंय गं
सास-याने आणल्या पाटल्या
पाटल्या मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई सोडा गं बाई
अरडी गं बाई परडी
परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं
दारी मूल कोण गं
दारी मूल सासू
सासूने काय आणलंय गं
सासूने आणल्या बांगडया
बांगडया मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई सोडा गं बाई

अरडी गं बाई परडी
परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं
दारी मूल कोण गं
दारी मूल दीर
दीराने काय आणलंय गं
दीराने आणले तोडे
तोडे मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई सोडा गं बाई

अरडी गं बाई परडी
परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं
दारी मूल कोण गं
दारी मूल जाऊ
जावेने काय आणलंय गं
जावेने आणला हार
हार मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई सोडा गं बाई

अरडी गं बाई परडी
परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं
दारी मूल कोण गं
दारी मूल नणंद
नणंदेने काय आणलंय गं
नणंदेने आणली नथ
नथ मी घेत नाही सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई सोडा गं बाई

अरडी गं बाई परडी
परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं
दारी मूल कोण गं
दारी मूल नवरा
नव-याने काय आणलंय गं
नव-याने आणले मंगळसूत्र
मंगळसूत्र मी घेते सांगा मी येते
चारी दरवाजे उघडा गं बाई उघडा गं बाई
झिपरं कुत्रं बांधा गं बाई बांधा गं बाई................

माहेरचा वैद्य

आल्या माझ्या सासरचा वैद्य
डोक्याला टोपी फाटकी-तुटकी
अंगात सदरा, फाटका तुटका
नेसायला धोतर चिंध्या चिंध्या
हातात काठी जळकं लाकूड
तोंडात विडा शेणाचा
कसा गं दिसतो भिकाऱ्यावाणी
बाई भिकाऱ्यावाणी

आला माझ्या माहेरचा वैद्य
डोक्याला पगडी शिंदेशाही
अंगात सदरा मखमली
नेसायला धोतर जरीकाठी
हातात काठी पंचरंगी
तोंडात विडा केशराचा
कसा गं दिसतो राजावाणी