पिंजरा

कोंडून ठेविशी पिंजर्‍यात मला

म्हणशी, 'तू लुळा पांगळा रे'

उगवून झाला अंकूर हा वर

धोंडा तू त्यावर ठेवलास

टोचून बोलशी, 'खुरट तू खुजा

पिंड रोगी तुझा मूळचाच !

माझ्या सामर्थ्याची तुला ना कल्पना

चालू दे वल्गना दुष्टा, तुझी

येईल तो क्षण, पंख उभारून

घेईन उड्डाण अंतराळी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

अपराध

तुझा मी कोणता अपराध केला?

जिव्हारी मारिला बाण माझ्या !

एकान्तात होतो गात मी मंजुळ

तोच तू घायाळ केले मला

अंतरीच्या कोणा सांगू मी वेदना ?

तुला रे कल्पना काय त्याची !

भरून का कधी जखम येणार !

आता उपचार कशाला रे !

कसा कंठ खुला करून मी गाऊ ?

भरारी मी घेऊ अंतराळी ?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

नाटकी मी

काय जीवनाचे केले मी सार्थक !

करूनी नाटक दाखविले

कुणी केले टाळ्या पिटूनी कौतुक

त्यांना ते ठाऊक खरे खोटे

मुळातच होते थोडे भांडवल

होता तो केवळ मूर्खपणा

फसलो स्वतःला मानून शहाणा

अंगाशी बहाणा परी आला

नाटकी मी, नका भुलू माझ्या सोंगा

भीड नको, सांगा खरे खोटे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आई

थोडके आपुले सोसून मरण

माझे तू जीवन घडवीले

थोडके आपुले देऊन व्यक्तित्व

माझे तू जीवत्व वाढवीले

थोडके आपुले देऊन कवित्व

माझे स्फुर्ति-काव्य फुलवीले

पाजळून माझी जीवनाची ज्योत

क्षीण तुझा होत आता दीप

बाळ तुझा होऊ पाहे उतराई

अशक्य ते आई, जन्मोजन्मी


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

तुमच्या प्रेमाची हवी मला जोड

का हो चालवीली माझी छळणूक

काय माझी चूक झाली सांगा ?

तुमच्यासाठी मी फुलविली फुले

भांडार हे खुले तुम्हासाठी

तुम्हाला मिळावे सुखसमाधान

कष्ट रात्रंदिन करीत मी

जीवनरसाचा भरून मी प्याला

दिला तो ओठाला लावा तुम्ही

तुमच्या प्रेमाची हवी मला जोड

नका हिरमोड करू माझा


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

नाही मज आशा उद्याच्या जगाची

का रे दाखवीसी पुन्हा तेच स्वप्न

कराया उद्विग्न चित्त माझे !

मृगजळाचे ते दावून आभास

का रे खोटी आस निर्मितोस ?

घेत न कधी जे वास्तवाचे रूप

वाटे न हुरूप त्याचेविशी

माझे सुखदुःख राहो ते माझेच

विश्व माझे हेच माझ्यापाशी

नाही मज आशा उद्याच्या जगाची

कालचीच ज्याची गती आज


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या
प्रवाहाबरोबर तर सगळेच जातात, खरी मर्दानगी, खरं धैर्य लागतं प्रवाहाच्या उलट दिशेने जायला.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नेमकं हेच मला ट्रॅफिक हवालदाराला सांगायचं होतं पण येड्याने पावती फाडली.